जिथून पडल्या गाठी - 25

Intense Love Story Of Manva And Rushi
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी-25
©®राधिका कुलकर्णी.

घाबरत दबकत मनवा सांगितल्याप्रमाणे प्राचार्यांच्या केबीनकडे गेली.
हाताला कंप सुटत होता तरी मन घट्ट करून ती तेथे पोहोचली. जवळच एक चपराशी फाईलचा गठ्ठा घेऊन जात होता. तिने धावतच त्याच्या जवळ पोहोचून प्रश्न केला

" सर कधी येतील ? भेटायचे होते त्यांना ? "

" कोणते सर ? "

भांबावलेल्या मनवाला आपली चूक लक्षात येताच तिने परत अक्षर जुळवणी करत विचारले..

" म्हणजे प्रिंसीपल सर कधी येतील? "

" काय काम आहे ? "

हे चपराशी म्हणजे आगाऊच असतात. प्रिंसिपल केबीनची देखरेख करतात म्हणजे स्वतःला अर्धे प्रिंसिपलच समजतात इतकं उद्धट वागतात. आता ह्याला काय करायचे काय काम आहे हे जाणून?
मनातल्या मनात मनवा चांगलीच उखडली त्याच्यावर पण आत्ता हा राग दाखवायची वेळ नव्हती हे जाणून ती शांतपणे उत्तरली

" सरांनीच भेटायला बोलावले होते आत्ता अर्ध्या
तासात. "

" सरांनी ? बोलावलेय ? मग दोन दिवसांनी या आता, सर बाहेरगावी गेलेत. "

कुत्सित कटाक्ष टाकत जाता जाता चपराशाने उत्तर दिले.

उत्तर ऐकून मनवा अचंबित झाली. "आत्ता तर वरती आपल्याला भेटायला बोलावले आणि हा काय सांगतोय की सर गावाला !
नेमकं कोण खोटं बोलतेय ?"

" पण सरांनीच मला इकडे भेटायला बोलावले होते आणि तुम्ही असे कसे सांगताहात ?? "

मनवाने चपराशाला प्रतिप्रश्न केला. त्यावर तोही चढ्या स्वरात बोलल्या

" हे बघा मला जेवढे माहितीय ते मी सांगितले. सर दोन दिवसांनी आले की या. आता निघा."

मनवाचे डोके चक्कर खायला लागले. ही नेमकी काय भानगड आहे?

ती विचार करतच होती इतक्यात तिला आधीच्या चपराशाने पुन्हा वरती भेटायला बोलावले असा निरोप दिला. आता मात्र ती प्रचंड घाबरली. कॉलेज आहे की भूताटकी !
एक सांगतो सर गावाला गेलेत आणि एक सांगतो वरती बोलावलेय.., आता ह्यात काय पाणी मुरतेय ते बघूच या. तावातावाने मनवा वरती पून्हा त्याच केबिनकडे गेली.

" मे आय कम इन सर ? "

परवानगी घेत मनवा आत गेली. समोर सर आपल्या खुर्चीत मस्त पाठीमागे हात ताणून रेलून बसलेले. त्यांचे हे रूप बघून मनवाच्या डोक्यात पाल चुकचुकली.. संशय आणि भीती दोन्ही एकाच वेळी मनात दाटून आले तरीही वरकरणी सगळे ठीक असल्याचा अविर्भाव करत ती समोरच्या खुर्चीत बसली.
काय बोलावे हे न समजून ती अस्वस्थपणे चूळबूळ करत बसली. तिला अजुनही कळत नव्हते की खरे काय आहे..

" सर एक प्रश्न विचारू? "

" होऽऽ.. एक का दोन विचार.."

हे असे टपोरी उत्तर तर तिला मुळीच अपेक्षित नव्हते.. आता तिची शंका जास्तच पक्की झाली. दोन क्षण मौन धारण करून ती जागची उभी राहिली आणि चढ्या आवाजात बोलली..

" तुम्ही नेमके कोण आहात हे सांगा नाहीतर आत्ताच्या आत्ता मी ऑफीसमध्ये तुमच्या विरुद्ध तक्रार करेन माझ्याशी मिसबिहेव्ह केल्याची… "

मनवाने घेतलेल्या रौद्र रूपाचाही त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता.

" काय पुरावा आहे की मी तुमच्याशी गैरवर्तन केलेय ? कसे सिद्ध कराल मिस मनवा ? "

म्हणतच ते आपली चेअर सोडून आता हळूहळू मनवाच्या चेअरकडे येऊ लागले. आधी गळ्यातला टाय सैल करून बाजूला फेकत ते मनवाच्या अधिकच जवळ येऊ लागले. मनवाच्या छातीत धडधड वाढली. आपण ह्या कुठल्या संकटात सापडलोय ह्याचा तिला अजिबात अंदाज येत नव्हता. बर हा कोण मनुष्य कॉलेज प्रिमायसिसमधे घुसून हा कसला खेळ करतोय हे तिला कळत नव्हते. त्याने आपल्याशी काही गैरवर्तन केले
तर ? "
नुसत्या कल्पनेनेच तिचा थरकाप उडाला. हाक मारली तरी ह्यावेळी तिकडे कोणी देखील फिरकत नाही हे तिला इतक्या वर्षात चांगले माहीत होते. म्हणजे बऱ्याच प्लॅनिंगने ही निर्मनुष्य जागा ह्याने निवडलीय तर !
आता घाबरून पाय गाळून चालणार नाही. रूद्रावतार घ्यावाच लागेल नाहीतर हा……
पुढचा तर विचारही करवेना मनवाला.. तिने दीर्घ श्वास घेतला आणि शक्य तितक्या धारदार आवाजात ती कडाडली..

" हे बघा तुम्ही जे कोणी असाल, दूर रहा माझ्यापासून नाहीतर मी ओरडा करेन. बऱ्या बोलाने मला इकडून जाऊ दे नाहीतर मी काय करेन मलाही माहित नाही. "

होतं नव्हतं ते अवसान गोळा करून मनवाने बेदम दम भरला.
तसे एक क्रूर हास्य करत तो आणखीनच जवळ येऊन म्हणाला ,
" काय करशील? चल आता करच. मला तरी बघू दे तुझी हिंमत किती वेळ टिकते.. "

मनवाने सगळे बळ एकवटून त्याला दूर ढकलले आणि तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून आवाज आला..

" हे मनवा ऽऽ मग कसे वाटले हे नाटक? "

मनवाने चमकून मागे वळून पाहिले तसे ती थक्क झाली. आपली खोटी दाढी मिशी आणि सगळा अटायर फेकून मिश्किल हसत हाताची घडी करून सौरभ तिच्या पुढ्यात उभा राहिलेला ती पहात होती.
मनवा परत माघारी वळली आणि त्याला एक जोरदार फटका मारून रडायला लागली..

" काय हे सौरभ? किती क्रूर चेष्टा केलीस ?
किती घाबरले होते तुला कल्पना तरी आहे का ? कोण लंपट माणूस माझी छेड काढतोय असे झाले. "

" सॉरी सॉरी ! खरच मनापासून सॉरी ! पण खरं सांग, कसा वाटला माझा अभिनय ? बाबा समाधानी झाले की नाही प्रिंसीपलला भेटून ? "

" बाबा तर निशब्द होऊन गेले जातांना पण….
अरेऽऽ त्यावरून आठवले.. ती कोणती सेंटी स्टोरी सांगून इमोशनल केलेस रे बाबांना ?
चक्क त्यांनाही गुंडाळून ठेवलेस की तू !
कमाल आहेस यार ! मला तर ह्या क्षणापर्यंत सांगेपर्यंत ओळखू आला नाहीस तू , इतका जबरदस्त गेट-अप. आणि अभिनय तर, पार एक्सलंस !
हॅट्स ऑफ रीअली !
पण ती स्टोरी कुठून चोरलीस रे ? "

" एऽऽ मनवा प्रिंसिपल भलेही खोटा होता पण ती स्टोरी 100% खरी आहे हं… एक अक्षरही खोटे नाही त्यातले.. तुझ्या बाबांनी खरच माझी फिस पे केली होती..हा, फक्त काही साल मागे केले मी पण बाबांना ते लक्षात आले नाही नशीब माझे... "

" आणि ते प्रोजेक्ट सलेक्शन लेटर ? ते पण खोटे होते ना? मी उगीचच हवेत उडत होते माझे यूजीसीसाठी सलेक्शन झाले म्हणून. "

मनवा हिरमुसल्या चेहऱ्याने बोलली..

त्यावर तिच्यासमोर तेच लेटर नाचवत सौरभ म्हणाला,

" अगं वेडाबाई खाली बोर्डवर एवढी मोठी नोटीस लावलेली वाचली नाहीस का तू ! ती वाचूनच मी ते लेटर ऑफीसातून मिळवले. ह्याचा वापर करता येईल हा विचार करून जवळ घेऊन ठेवले. काल तुझा निरोप मिळाला तशी माझी सारी फिल्डिंग लावून मी तयार ठेवली. प्रिंसिपल गेले दोन दिवस आऊट ऑफ टाऊन आहेत हे कळल्यामुळेच हे सगळे करणे सोपे झाले. "

" अरे पण उद्या बाबा पुन्हा काही कारणांनी भेटायला आले तर ? त्यांना हा खोटेपणा कळेल तेव्हा काय करशील ? "

" तेव्हाचे तेव्हा बघू. आता तर तुला नाटकात काम करायला परमिशन मिळेल नाऽऽ. ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि पुढल्या सहा महीन्यात तुच कॉलेजमधून बाहेर पडशील. मग कोण कशाला येतेय इकडे. आपली आजची गरज तर भागली ना. ते महत्त्वाचे. "

" धन्य आहेस तू सौरभ ! पण काही म्हण तू एक उत्कृष्ट कलाकार आहेस.. उद्या भविष्यात तू मला फिल्म किंवा प्रायोगिक नाटकात काम करताना दिसशील ह्यात शंका नाही. "

" मनवा ताई तुला एक सांगू. नाटकात काम करणे ही माझी आवड आहे. पण त्याने पोट भरण्याइतकी कमाई नाही होत गं. अजून तरी आपल्या देशात ह्या क्षेत्रात पैसा नाही हवा तसा. नाहीतर मग खूप वर्ष घासावी लागतात तेव्हा कुठे छोटे-मोठे काम मिळते. म्हणून नोकरी तर मला करावीच लागेल पैसा कमवायला. आताही मी त्यासाठीच वेगवेगळ्या परीक्षा देत असतो. फावल्या वेळात ही आवड जपतो.."

" ओह, बघ सगळे तुझ्या मनासारखे होईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी कायम आहेत. ऑल द बेस्ट सौरभ ! "

" बास बास. इतके सेंटी डायलॉग नको मारूस. मला वाटायला लागले की तू आजच कॉलेज सोडून चाललीस.
थोडं खऱ्या फेअरवेल करता राखून ठेव की ! "

सौरभनेही डायलॉगबाजी करून गंभीर वातावरणाला लाईट करायचा प्रयत्न केला.

" बरं चला. ह्या नादात आजची रीहर्सल बुडली मॅडम. जा लवकर. आज निदान थोडं तरी काही करून घरी जा. "

" येस सर! "

" सर काय म्हणतेस. आपण बरोबरीचेच आहोत. एखादं वर्ष मागेपुढे फारतर. "

" खरं सांगू सौरभ, आज तुझे अभिनय कौशल्य बघितल्यावर तुला सर म्हणायची मनापासून इच्छा झाली आणि तू जसे मला ताई म्हणतोस तसे अभिनय क्षेत्रात तर तू माझा बाप आहेस. म्हणून ते \"सर\" संबोधन आदरार्थी आहे.. प्लीज डोन्ट माइंड इट ब्रो. "

" बरं, ओके बाबा ! काहीही म्हण पण नाटक एकदाचं नीट पार पडू दे म्हणजे झालं. आणि हो मनवाताई, आता फक्त आठवडाच उरलाय हं आपल्याकडं , त्याआधी एक रंगीत तालीम तरी व्हायलाच हवीय. सो मेक इट लीलबीट फास्ट ! "

" आता तू चिंताच करू नकोस सौरभ. आता बघच मी काय करते. तुझी निवड फेल जाऊ देणार नाही एवढे वचन नक्की देईन. आपला आशीर्वाद असू द्या
पिताश्री ! "

मिश्किल हसत मनवाने कोपरखळी मारत तिकडून पळ काढला..

-----------------------------------------------------------
क्रमशः -25
©®राधिका कुलकर्णी.

मनवाची एक अडचण तर दूर झाली.. वातावरणातील तणावही निवळला..आता बघूया पूढे काय होतेय?
वाचत रहा ऋणानबंधाच्या जिथून पडल्या गाठी.
धन्यवाद.
@राधिका.




🎭 Series Post

View all