जिथून पडल्या गाठी - 17

मनवा आणि ऋषीच्या त्याग,समर्पण,विरह आणि प्रेमाची भावस्पर्शी कथा.. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी-17
©®राधिका कुलकर्णी.




" असे काय विशेष आहे ह्या फोटोत ज्यामुळे तुम्ही सतत भावूक होत आहात?
का कढ दाटून येताहेत पुन्हा पुन्हा आज ? "

ह्या प्रश्नावर बंडोपंतांनी एकवार नजर दोघींवर फिरवली आणि आपल्या पत्नीचा आणि लाडक्या मनूचा हात हाती घट्ट धरत अडखळत सांगितले..

" हा फोटो माझ्या आयुष्याची अशी काळी बाजू आहे जी मी तुम्हाला कधीच दाखवू इच्छीत नव्हतो.
ह्या फोटोत दिसतोय ना तो दुर्दैवाने माझा बाप आहे..! "


सज्जलाबाई ऐकून चकित झाल्या. बारा वर्षांच्या संसारात त्यांनी कधीच त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांचा अगदी आईवडिलांचाही उल्लेख केला नव्हता.. मला कोणीच नाहीत, माझा सांभाळ माझ्या मामा-मामीने केला असेच ते नेहमी सांगत. त्यापूढे सज्जलाबाईंनीही मग कधी जास्त प्रश्न केले नाहीत. पण आज ह्या फोटोत चक्क आपल्या सासऱ्यांना पेटीवादन ऐकताना पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
आपला सासरा इतका रसिक माणूस तरीही ह्यांना का गायन वादनाचा इतका तिटकारा का !!!
हा तिढा आता फक्त बंडोपंतच सोडवू शकणार होते.

सज्जलाबाईंचे हात नकळत आदरपूर्वक जोडले गेले फोटोला पाहून तसे बंडोपंत जोरदार कडाडले.

" काही गरज नाहीये ह्या नीच माणसाच्या पाया पडायची… त्याची लायकी नाहीये तुझा नमस्कार स्विकारण्याची.."

सज्जलाबाई एकदम चपापल्या…

" अहोऽऽ..असे काय बोलताहात ! तुमचे जन्मदाते ना ते.? मी त्यांची सून आहे म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडायला

 नको ?? "


" त्याची काही गरज नाही…! "

“ बरंऽऽ,राहीलंऽ, पण मग बाजूला ह्या कोण बाई
आहेत ? कदाचित...… सा…...सू…..बा.. ????? ”

घाबरतच त्यांनी दुसरा प्रश्न केला

त्यांचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच बंडोपंत म्हणाले...

" लौकीकार्थाने हो, पण मी तिला कधी आई मानले नाही, पेक्षा तिने कधीच मला तिचा मुलगा मानले नाही.. काऽरऽऽण…. ती माझी सावत्र आई आहे.. "

“ माझ्या आयुष्याची ही कहाणी मला कधीच कुणाला सांगायची नव्हती पण…... आज तशी वेळ आलीय की मला हे सांगण्यावाचून भाग नाही…..
तुम्हाला दोघींना सतत माझा गायन वादनाविषयीचा विरोध आणि राग दिसतो…. का मी तुझ्या कलेचा, तुझ्या गुणांचा सन्मान करू शकलो नाही...का तुला असे फडताळात कोंडून ठेवलेय ???
का मी सतत माझ्या शिस्तीचा बडगा दाखवला…?
ह्या सगळ्यामागचे भयाण सत्य आज तुम्हाला ऐकवतो….
मग कदाचित तुम्हाला माझे वागणे जे तुमच्या दृष्टीने अन्याय्य किंवा चुकीचे आहे ते माझ्या नजरेत किती बरोबर आहे हे कळेल…..!! ”
-------------------------

बंडोपंत पंचवीस तीस वर्षे मागे आपल्या भूतकाळात गेले………………..ऽ

ही कहाणी तिथे सुरू होते जेव्हा हा बंडोपंत फक्त सात आठ वर्षांचा लहान निरागस मुलगा बंडू होता.
आमच्या घरात पिढीजात वैद्यकीय व्यवसाय. आमचे आजोबा, पणजोबा अगदी खापर पणजोबासुद्धा त्या त्या काळातील नामवंत वैद्य होते. फक्त नाडी परीक्षा करून ते असाध्य रोगांचे अचूक निदान करत असत. दूर दूर पर्यंत त्यांच्या नावाची ख्याती पसरलेली होती. तोच वारसा पूढे चालवत माझे वडील केशवराव वैद्यही वैद्यकीय व्यवसाय पूढे चालवत होते. तेही त्यांच्या व्यवसायात वाकबगारच होते. आजपर्यंत मागील पिढ्यांनी कष्टाने भरपूर माया जमवून ठेवली होती त्यामुळे केशवराव म्हणजेच माझ्या वडिलांना जास्त मेहनत करण्याची गरज नव्हती. फक्त कमावलेले जतन करून हाच व्यवसाय नीटपणे पूढे चालू ठेवायचा इतकेच त्यांचे काम होते..
पिढीजात नावामूळे आसपासचे लोकही केशवरावांकडेच इलाज करायला येत.

पण म्हणतात ना की कुठलीही गोष्ट मग ते पद , प्रतिष्ठा अगर पैसा असो जेव्हा तो गरजेपेक्षा जास्त मिळतो ना तेव्हा त्याला नको त्या वाटा फुटतात. बाबांचेही तसेच झाले. ह्या सगळ्या सधनतेमूळे केशवराव थोडे छंदी झाले होते. इतक्या गडगंज संपत्तीचे काय करायचे म्हणून ब्रीज खेळायचा नाद लावून घेतला. ब्रीजमध्ये ते कधीच पैसे जिंकले नाहीत फक्त हारूनच येत. आज्जी वेळोवेळी समज देऊनही ते गोड गोड बोलून आज्जीला घोळात घेत असत. हळूहळू ब्रीजपासून सुरू झालेला प्रवास पूढे नाच-गाण्यापर्यंत जाऊन पोहोचला. रोज वेगवेगळ्या मैफीली.. रोज नवीन कारणे सांगून ते मैफिलीत पैसा उधळत असत.
घरात म्हातारी आई आणि बायको सतत केशवरावांना टोकायच्या पण त्यांच्यावर ह्या सगळ्याचा शून्य परिणाम होत असे. श्रीमंत लोक शौक नाही करणार तर कोण करणार !! असा युक्तिवाद करून ते तात्पुरती स्वतःची सुटका करून घेत असत.


एकदा गावात एक नाचगाण्याचा फड आला. केशवराव रोजच त्या फडात नाच बघायला जाऊ लागले. एकदा फडातील मूख्य नर्तिका केसर आजारी पडली. तिच्या उपचाराकरता केशवराव सतत तिच्या शयनकक्षात जाऊ लागले. केसरबाई दिसायला सुंदर, गोरीपान तर केशवरावही तरूण तडफदार. खानदानी श्रीमंतीचे तेज तर चेहऱ्यावर होतेच. रोजच्या भेटीतून केसर केशवरावांच्या प्रेमात पडली. तर केसरच्या लाडीक चाळ्यांमूळे केशवरावही तिच्याकडे आकृष्ट झाले.
दोघांमध्ये हळूहळू चांगलेच सूत जुळले. आता केसरबाई फक्त बाबांसाठीच बैठक लावणी करू लागली. बाबाही तिच्यावर पैसे उधळू लागले. अशाच बैठकी वाढू लागल्या.
नंतर नंतर तर ते एक-एक दोन-दोन दिवस घरीच येईनासे झाले. खिशातला पैसा संपला की मगच त्यांना घराची वाट दिसायची. आज्जीकडे औषधी आणायची आहेत किंवा अशीच पटतील अशी कारणे देऊन ते पैशांची मागणी करत. आताशा आज्जीलाही त्यांची सगळी कारणे पाठ झाल्याने ती पैसे द्यायला नकार द्यायची. मग आधी लाडीगोडी लावून आणि शेवटी भांडून बळजोरी करून ते आज्जीकडून पैसा मिळवायचेच.
अशीच एक एक पायरी चढत त्यांना दारूचाही नाद जडला. बऱ्याचदा पहाटे कधीतरी ते झिंगत घरी यायचे. ह्या सगळ्याचा आईला प्रचंड मनस्ताप व्हायचा पण ती असहाय्य होती. तिला कोणाचा आधार नसल्याने जे होईल ते सहन करण्यापलीकडे तिला पर्याय उरला नव्हता.
हळूहळू सतत आई-बाबांमधे वाद आणि वादांचे रूपांतर भांडणात होऊ लागले. बाबा घरी आले की आई माझी रवानगी आज्जीच्या खोलीत करायची. तरीही हलक्या आवाजात दोघांचे स्वर कानी पडायचेच. मी खूप अस्वस्थ व्हायचो पण वय लहान असल्याने मला ते नीटसे कळत नसे. बाबांचे हळूहळू घराकडे आईकडे दुर्लक्ष होऊ लागले.

अशातच काविळीने ती आजारी पडली. सुरवातीला तर फक्त अशक्तपणा आणि जेवण जात नाही अशी तक्रार वाटून तिने दुर्लक्ष केले. घरगूती काहीतरी इलाज करून वेळ मारून नेली पण पुढे तिची तब्येत जास्तच खालावली. अगदीच अंथरूणावर पडून राहिली तेव्हा आज्जीने बाबांना खूप निरोप धाडले. आमचे बाबा पंचक्रोशीतील सर्वात उत्तम वैद्य होते. काविळीवर तर त्यांच्या औषधांनी लोक तीन दिवसांत ठणठणीत बरे होतं. परंतु आज मात्र घरचा वैद्य असूनही आई इलाजावाचून एक एक दिवस मृत्यूच्या जवळ जात होती पण बाबांना मात्र ही सगळी आज्जीने दिलेली खोटी कारणे वाटत होती त्यांना घरी बोलावण्या करताची…
ते कितीही बोलावणी पाठवले तरी आलेच नाहीत. अखेरीस ईलाजाविना तडफडून काविळीचे निमित्त होऊन आई गेली…
घरचा वैद्य असूनही आईवर उपचार होऊ शकले नाहीत कारण बाबा चोवीसतास त्या नायकिणीच्या माडीवर पडीक; नाचगाण्यात गुरफटलेले. बायको जगतेय की मरतेय हे बघायचीही त्यांना शुद्ध नसायची. आई गेल्यावर तर त्यांना रानच मोकळे झाले. आता तर राजरोस त्यांच्या स्वतःच्या घरातच नाच-गाण्याच्या मैफिली रंगू लागल्या. मी तेव्हा सात/आठ वर्षांचा असेन. मला ह्यातले काहीच नीटसे कळत नव्हते. एक दिवस चुकून मी लपतछपत माडीवर गेलो तर बाबा तिच्या समवेत बसलेले.
केसरचे लक्ष माझ्यावर गेले आणि खुणेनेच तिने मला तिच्याजवळ बोलावून घेतले.
आईविना पोरका मी तिच्या खोट्या मायेला भुललो. मला तिच्या स्पर्शात आईचे प्रेम जाणवू लागले. मी अतिशय आनंदून जायचो तिच्या सहवासात. जेव्हा कधी मी भेटे ती मला काजू-बदाम किंवा मग टॉफी खायला देई. त्या काळात मला त्या टॉफीचे खूप अप्रूप वाटे. तिच्याकडे ते कुठून येई माहीत नाही पण त्याच्या ओढीने माझे तिला भेटणे वाढू लागले. पण हा सगळा मला गठवायचा प्लॅन होता हे मला कधीच कळले नाही...
एक दिवस बाबांनी मला जवळ घेऊन विचारले..

" काय बंडोबा तुम्हाला आवडेल का ती माडीवरची केसर तुमची आई बनून आली तर? "

केसरबाईने घातलेल्या मोहिनीने मी तात्काळ खूष होऊन वडिलांना हो म्हणालो..
मग काय केशवरावांनी केसरबाईशी रीतसर विवाह करून तिला वैद्यांच्या घरची सून बनवून आईच्या जागी आणून बसवले. आज्जी खूप थकलेली. विरोध करण्याची तिच्यात ताकदच उरली नव्हती. पण मरेपर्यंत तिने सगळे व्यवहार आपल्या हातात ठेवले त्यामूळे नाईलाजाने का होईना बाबा आज्जीचे मन दुखवत नसत.
आता पिढीजात वैद्यकीय व्यवसायाला पुर्णपणे खिळ बसली. पूर्वीसारखे लोकही केशवरावांच्या ह्या वर्तणूकीने येणे बंद झाले.
काही दिवसातच आज्जीही देवाघरी गेली. मग तर सगळे आर्थिक व्यवहार केसरबाईच्याच हाती गेले. दिवस-रात्र घरात नाचगाणी चालू राहू लागले.आणि बाबा सतत नशेत.केसरबाई त्यांना कधी शुद्धीत राहूच देत नसे. नाहीतर मग तिला सगळा कारभार स्वतःच्या हाती कसा घेता येईल ना !
सात पिढ्या बसून खातील इतके कमावून ठेवलेली संपत्ती हळूहळू नाचगाण्यापायी खर्च होऊ लागली.आमदनी शून्य आणि वारेमाप खर्च ह्याचा परिणाम व्हायचा तोच झाला हळूहळू तिजोरी रिकामी होऊ लागली.

सुरवातीला काही दिवस प्रेमाचे नाटक करून हळूहळू केसरबाईने आपला असली रंग दाखवायला सुरुवात केली.
जसजशी तिची मूले जन्माला आली तिने माझा दुस्वास करायला सुरुवात केली. मला घरातली सगळी कामे करायला लावायची बदल्यात नीटपणे खायलाही द्यायची नाही. तरीही बाबांसाठी मी तिथेच राहीलो. पण तिला त्या साऱ्या संपत्तीचा वारस फक्त तिची मुले आणि ती हवी होती. म्हणून मला तिथून घालवण्यासाठी एक दिवस खोट्या चोरीचा आळ आणून तिने मला सर्वांसमक्ष दोषी ठरवले. माझ्याजवळ माझ्या सत्यतेचा कुठलाच पूरावा नसल्याने मी अंगावरच्या कपड्यांनीशी घर सोडले.
मग मी माझ्या मामाच्या गावी गेलो. मामा-मामींची परीस्थिती फारशी बरी नव्हती पण तरीही त्यांनी माझा सांभाळ केला. नंतर मी अभ्यास करून सातवीत नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला जिथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत असे. असे करून माझ्या स्वकर्तृत्वावर मी शिक्षण पूर्ण करून शिक्षकाची नोकरी मिळवली.
त्याचवेळी एका शालेय महोत्सवात तुझे बाबा श्री. बापूसाहेब काळे गायनासाठी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. त्यांनी मला बघितले. माझ्या मामांना भेटून सगळी माहिती मिळवली आणि आपल्या लग्नाचा योग जुळून आला.
लग्नानंतर तू ती वाद्ये घरात आणलीस त्या क्षणी मला माझ्या साऱ्या भूतकाळातल्या घटना आठवल्या ज्या मी इतके वर्ष कोंडून बंद करून ठेवल्या होत्या. म्हणूनच काही प्रश्न न विचारता माझी ही अट मान्य करण्याचे वचन मी तुझ्याकडून घेतले. ज्या नाचगाण्याच्या घाणेरड्या सवयीपायी माझी आई वारली,आज्जी गेली, वडिलांनी सगळी प्रतिष्ठा,  मान-मरातब आणि संपत्ती त्या बाईच्या पायात वाया घातली. घरादारावर तुळशीपत्र ठेवून मला दारोदार वणवण भटकायला भाग पाडले त्या नाचगाण्याचा म्हणूनच माझ्या मनात प्रचंड तिटकारा निर्माण झाला आणि मी ठरवून टाकले की भविष्यात ह्या कलेला माझ्या घरात थारा देणार नाही..
दुर्दैवाने तू पण गायकाची मुलगी माझ्या पदरी पडलीस. खरेतर तुझ्या घरी गायन वादन होते हे ऐकूनच मी नकार द्यायचे निश्चित केले होते परंतु मामाने तुझा फोटो दाखवला. फोटोतील निरागस चेहरा आणि बोलके डोळे ह्याचे साम्य कुठेतरी मला माझ्या आईचा आभास देऊन गेले म्हणून मी तुला होकार तर दिला परंतु ह्या कलेपासून तुला दूर ठेवायचा निश्चयही मनोमन केला.

आज तुला कळले असेल की ह्या कलेबाबत माझी इतकी चीड का आहे..!

तेव्हा कृपया करून ह्यापूढे तुम्ही दोघीही मला हे वचन द्या की तुम्ही कधीही गायन वादन आणि नर्तन करणार नाही…
नि:शब्द होऊन मनू आणि सज्जलाबाई फक्त बंडोपंतांकडे पहात होत्या.
त्यांच्या मनात ठसठसणारी वेदना आज त्यांना कळली होती..
दोघींनीही बंडोपंतांचा हात हातात घेऊन त्यांना मूक संमती दिली…..
त्या स्पर्शातच त्यांना त्याची पावती मिळाली….
सज्जलाबाईं आज पहिल्यांदाच ह्या कठीण खडकामागील प्रेमळ झरा आणि कठोर ऋदयामागे दडलेल्या व्यथेची अनुभूती घेत होत्या.....
तिघेही मूक होऊन फक्त स्पर्शातून सजल नेत्रांनी एकमेकांना आधार देत होते……..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रमशः भाग 17
©®राधिका कुलकर्णी.

अशाप्रकारे गायनाची प्रचंड आवड असूनही मनवाच्या आयूष्यातून गाणे हद्दपार झाले... आता पुढे काय होणार मग?
जाणून घ्यायला वाचत रहा
"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी"
आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा.
धन्यवाद
@राधिका.


🎭 Series Post

View all