जिथून पडल्या गाठी - 14

Manva And Rushi's Intense Story Of Love Sacrifice And Devotion. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी. राधिका कुलकर्णी.

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी- 14
©®राधिका कुलकर्णी.


मनूची गाण्याची शिकवणी सुरू होऊन आता तीन आठवडे होत आले होते.
घरी करता येत नाही म्हणून मनू शाळेतच मधल्या सुट्टीत आपला सराव करत असे. आपले एक स्वप्न पूर्ण होतेय म्हणून आजकाल मनवा जरा जास्तच खूष असायची.
सर्व काही अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित चालू होते.
आजही नेहमी प्रमाणेच मनू क्लासला निघाली इतक्यात बंडोपंत घाईघाईने घरी आले. अचानक अवेळी त्यांना घरी पाहून मनवा आणि सज्जलाबाई दोघीही बिचकल्या.

" अगं ऐकतेस का, जरा चटकन जेवायला वाढ. मला गावी जावे लागतेय. आपले नरूमामा गेले. आत्ताच निरोप

 आलाय. "


"अरेरे ! कशाने ? आजारी होते का ? "


हळहळत सज्जलाबाईंनी चौकशी केली.

" नाही गं, आजारी कसले !   पंच्याऐशी वयालासुद्धा विहीरीचे पाणी शेंदून स्नानाचा नेम कधी चुकला नाही त्यांचा. आजही सगळे उरकून दूपारी पडवीत बसले होते. थोडीशी पाठीला हाताला रग लागतेय म्हणाले. तर मुलानी बाम लावून चोळून दिले. "आता बरे वाटतेय. मी पडतो जरा" म्हणाले आणि खाटेवर निजले.
सायंकाळ झाली तरी उठेना म्हणून सून जाऊन बघतेय तर ते झोपलेलेच. हलवले तर हात गळून पडला आणि अंग गार पडलेले. तिला शंका आली. मुलाने डॉक्टर बोलावला तर त्यांनी सांगितले की दोन तास झाले त्यांना जाऊन.
आत्ताच सुदामा निरोप घेऊन शाळेत आला. आता जातो त्याच्या बरोबरच. वाढ पटकन मला. "

इकडे मनवाची तकतक चाललेली. बाबा अचानक घरी आल्याने तिला गायनाच्या शिकवणीला जाता येणार नव्हते.
पण आता गावी गेल्यावर निदान दोन दिवस तरी बाबा येणार नाही म्हणजे जास्त वेळ गाण्याची प्रॅक्टिस करता येईल ह्या विचाराने मनू मनोमन आनंदीही होती.

जेवण उरकून जुजबी लागणाऱ्या वस्तू एका कापडी पिशवीत भरून बाबा बाहेर पडले तसे मनवा आणि सज्जलाबाई दोघीही हुश्श झाल्या.
क्लासला उशीर झाला तरीही जास्त वेळ बसून आज तिने तिचा सगळा अभ्यास पूर्ण करूनच घरी गेली.

घरी आल्यावरही आईबरोबर आज काय काय शिकले ह्याची चर्चा करत त्यांची जेवणे आणि इतर कामे खेळीमेळीत उरकली.

दोन दिवस झाले तरी बाबा अजून गावाहून परतले नव्हते.
त्यामुळे क्लास संपल्यावरही मनवा घरी येऊन भूप रागाच्या आलापाची प्रॅक्टिस करत होती. सज्जलाबाई पण काम करता करता तिचा सराव ऐकत होत्या.

अचानक त्या मनूशेजारी येऊन उभ्या राहिल्या.
मनवा डोळे मिटून सराव करत होती. अचानक झालेल्या हालचालीने तिची तंद्री भंगली. डोळे उघडताच आईला समोर बघून ती सावरली.
प्रश्नार्थक नजरेने तिने सज्जलाबाईंकडे पाहिले.


" आत्ता काय गात होतीस ? परत गा बघू. "

सज्जलाबाई मनवाला म्हणाल्या.
मनूने तोच आलाप पुन्हा गाऊन दाखवला.

" अजून एकदा पुन्हा गाऽऽ. "

मनूने पुन्हा आलाप सारेगम तर गायला.

" पुन्हा अजून एकदा गाऽऽऽ. "


सज्जलाबाई पुन्हा म्हणाल्या.

आता मनूने जरा अधिक सावध होऊन तोच आलाप पुन्हा गायला..
मंद स्मित करत सज्जलाबाई म्हणाल्या.

" हंऽऽम, आत्ता बरोबर गायलीस. पण काय चूक करत होतीस कळले का तुलाऽऽ ? "

मनू असमंजसपणे आईकडे बघत होती. गाण्यातला इतका सूक्ष्म फरक हिला कसा जाणवला ??
मनात विचार करतच तिने नकारात्मक मान हलवली.
त्यावर सज्जलाबाईंनी हळूच डोक्यावर हात ठेवून अतिसौम्य स्वरात सांगितले

" अगंऽ भूपाळी रागात मध्यम आणि निशाद स्वर वर्ज्य असतात…

सा रे ग प ध सां ।
सां ध प ग रे सा ।

आरोह - अवरोह शिकवलेत ना बाईंनी तुला ? "

मनवाने ओशाळल्या स्वरातच मान डोलावली.

" मग अशी चूक कशी केलीस तू ! "

" हो आई, आता नाही चूकणार. सॉरी. पण मला सांग तुला कसे कळले की मी चुकीचे गातेय ? "

" अगं राणीऽऽ, जन्मापासून संगीत ऐकत मोठी झालेय. कान इतके तयार झालेत की चूकीचे कानावर पडताक्षणी कळते, इतके माझ्या नसांनसांत गायन भरलेय. तुझ्या बाबांना आवडत नाही म्हणून नाहीतर मीही अशीच कुठेतरी फाटकबाईंसारखे क्लास किंवा संगीत महोत्सवात गायन करत असले असते.
असो. ते महत्त्वाचे नाही. पण कोणतीही विद्या शिकताना मन लावून शिकली पाहिजे. तेव्हाच त्यात प्राविण्य मिळवता येते. कळले का मनवाबाई ! "

" हो आई कळलं. नीट कळलं ! पण हीच बंदीश गाऊन दाखव ना मला. प्लिजऽ आईऽ. "

" अगं नको गं. आता रीयाज राहीला नाही. मला नाही जमणार. "

" आईऽऽऽ. असे काय गं करतेस ! म्हण नाऽऽ. आज बाबा पण घरी नाहीत. म्हण ना..
माझ्यासाठी, प्लिऽऽज.! "

" अगं पेटी पण नाहीये. मग कसं गाऊ ? "

" आई आता कारणं देऊ नकोस ना. वरची माळ्यावरची पेटी काढूयात. तसेही बाबा घरी नाहीत. गाऊन झाले की पुन्हा टाकू की माळ्यावर. "

सज्जलाबाईंना कित्येक वर्षांनी पेटीवादनाचा मोह होत होता परंतु दुसरीकडे भीती पण वाटत होती. मन द्विधा मनःस्थितीत अडकले होते. एकीकडे खूप वर्षांपासून मनात दाबलेली गाण्याची आवड उफाळून वर येत होती. हात शिवशिवत होते पेटीवर फिरवायला तर दुसरीकडे बंडोपंतांचा चेहरा, त्यांना दिलेले पहिल्या रात्रीचे वचन... काय करू ? त्या प्रचंड अडचणीत सापडल्या होत्या. एकीकडे मनूचा आग्रह तर दुसरीकडे आपणच दिलेले वचन…

"टू बी ऑर नॉट टू बी" च्या भोवऱ्यात सज्जलाबाईंची नावं अडकली होती.
त्यांना खूप वेळ मौन झालेले पाहून मनवाने पुन्हा हट्ट केला..

" आईऽऽऽ इतका कसला विचार करतेस गं ! मी फक्त आजच गळ घालतेय ना. मग माझी एवढी इच्छाही पूर्ण करणार नाही का तू ? "

मनूच्या लाडिक आग्रहापूढे सज्जलाबाईंचा इतक्या वर्षांचा निर्धार गळून पडला. त्यांनी परवानगी देताच मनवाची कळी खुलली. लगबगीने जाऊन तिने शिडी माळ्यावर लावली आणि वर चढून इतके वर्ष खितपत धूळ खात पडलेल्या पेटीवर एक प्रेमळ हात फिरवला. त्याच्यावर चढलेला धूळीचा थर हलक्या हाताने दूर सारून त्याला संजीवनी दिली आधी. मग अलगदपणे हार्मोनियम सज्जलाबाईंच्या हाती सुपूर्द करत ती सावधपणे खाली उतरली.
संध्याकाळची वेळ होती. हवेत हलकासा गारवा पसरलेला. हळूहळू थंडीची सुरुवात होत होती. त्याची पुसटशी चाहूल संध्याकाळच्या थंड गारव्याने अगोदरच देऊन टाकली होती.
मनवाने देवघरात दिवा लावला. शुभंकरोती, परवचा उरकून ती तयार होऊन बसली. आज ती खूप अधीर झाली होती. आज दस्तूरखुद्द सज्जला बापूसाहेब काळे उर्फ सज्जला बंडोपंत वैद्य ह्यांच्या आवाजात तिला स्वर्गीय गायनाचा आनंद मिळणार होता. लग्नानंतर जो आवाज काळाच्या पडद्याआड लुप्त झाला तोच
"याची डोळा याची देही" तिला अनुभवायला मिळणार ह्या नुसत्या कल्पनेनेच तिच्या अंगावर रोमांच उभे रहात होते.
ती आतूरतेने त्या क्षणाची वाट पाहत होती.
सज्जलाबाईंना कळत नव्हते की काय करावं. एकदा गायला सुरुवात केली की त्यांना वेळ काळाचे भान उरत नसे. अगदी तल्लीन होऊन गात असत त्या.
आजही इतक्या वर्षांनी त्यांना तीच अधिरता तीच उत्सुकता जाणवत होती. थोडीशी भीती थोडीशी धडधड अशा संमिश्र भावना मनात निर्माण होत होत्या. अगोदर सगळा रात्रीचा स्वयंपाक उरकून मग हात धुवून त्या बाहेर आल्या. मनवाही तिचे सगळे आवरून आईला ऐकायला सज्ज होऊन बसली..
कधी एकदा आई येते आणि तिच्या आवाजात काहीतरी गाते असे झालेले मनवाला..

अखेर तो स्वर्गीय क्षण अवतरला.
सज्जलाबाईंनी देवघरात जाऊन आधी प्रार्थना केली. ज्या वचनासाठी आजतागायत त्यांनी जाणीवपूर्वक गायनाकडे पाठ फिरवली आज तेच वचन मोडून त्या पेटीला हात लावणार होत्या. नुसता हात नाही तर सोबत गाणार पण होत्या.. थोडीशी धाकधूक होतीच की कसे जमणार आपल्याला ?
कुणाची चूक काढणे खूप सोप्पे असते पण तीच चूक सुधारून योग्य काय ते दुरुस्त करून सांगणे हे जास्त अवघड असते. त्यामूळे आज त्यांची परीक्षेची घडी होती.

मुलीची चूक तर काढली पण योग्य काय हे सांगताना आपण कूठे कमी पडू नये ही एकच अपेक्षा करत होती सज्जला आणि त्यासाठीच ती आज त्या सरस्वतीपूढे नतमस्तक झाली होती..

छानशी दरी अंथरून त्यावर हार्मोनियम मधोमध ठेवून मनवा आईची वाट पहात बसली होती.
नमस्कार करून सज्जलाबाई पेटीसमोर येऊन बसल्या. हात जोडून नमन करून आपल्या गुरूंचे म्हणजेच आपल्या पित्याचे मनात स्मरण करून त्यांनी पेटीला सूर लावले. आज कितीतरी वर्षांनी त्यांनी आणि ह्या भिंतींनी वाद्य सूर ऐकले होते.
सर्व प्रथम त्यांनी मनवाला भूप रागातली तीच बंदिश ऐकवली.
सज्जलाबाईंच्या खणखणीत आवाजात

"नमन कर चतुर श्री गुरू चरणा।"

हे ऐकून तर मनवा चकीत झाली... सज्जलाबाईंचा इतका मधूर आणि इतका कसलेला तयार आवाज असेल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता..

मग बराच वेळ त्यांनी मनवाचा त्याच बंदिशीवर आधी सराव करुन घेतला. मग मनूची एक एक फर्माइश आणि सज्जलाबाई तल्लीन होऊन तो तो राग गाऊन दाखवत होत्या.
यमन रागातील
" गगरी ना भरन देत मोरी "  ने सुरुवात झाली.

मग सायंप्रहर म्हणून राग पुरीया धनश्री गायला सुरुवात केली.
पुरीया धनश्रीतली अतिशय गाजलेली बंदिश

पायलिया झनकार मोरी
झनन झनन बाजे झनकारी।
पिया समझाऊ समझत नाही
सास ननंद मोरी देगी गारी।

गायला सुरुवात केली..

प्रत्येक आलापासरशी मनवाच्या अंगावर रोमांच उठत होते. सज्जलाबाई तल्लीन होऊन गात होत्या. सर्व वातावरण स्वर्गीय झाले होते.. सज्जलाबाई डोळे मिटून भान हरपून गात होत्या..
एका पाठोपाठ विविध पठडीचे , प्रहराचे राग …. जसे की सायंप्रहर राग- मारू बिहाग, राग भैरव, रात्रीचा प्रथम प्रहर- राग ललित,कलंगडा त्यातील आरोह-अवरोह, शुद्ध/कोमल स्वर ,आलाप आणि बंदिशी गाता गाता कधी रात्र झाली दोघींनाही कळले नाही.
सज्जलाबाईंना तर काय काय गाऊ आणि किती सांगू असे झालेले..
शेवटी मारू बिहाग रागातलीच त्यांची खूप आवडती बंदिश

जागू मैं सारी रैना बलमा ।
गाऊन त्यांनी समारोप करायचे ठरवले.
बंदिशीचे बोल होते…..


जागू मैं सारी रैना बलमा
रसीया मन लागेना मोरा।
बहूत रमायो सौतन घरवा
पीया गरवा लगायो।

वाह वाह !  मनवा तर रंगून गेली त्या बंदिशीत आणि आईच्या स्वर्गीय आवाजात.
तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू ओघळायला लागले.. आपण, हे घर, काय काय गमावून बसलेय ह्या विचारांनी ते अश्रू सांडत होते.
आपल्या आईने किती मोठ्ठा त्याग केलाय फक्त एका वचनपूर्तीसाठी हे पाहून ती नतमस्तक झाली त्या गानसम्राज्ञी समोर. आज तिला तिच्या आईतील गानसरस्वती साक्षात समोर दिसत होती. तिच्या बहुमूल्य शिक्षणाची, ह्या कलेची, ह्या घरात झालेली बेमोल किंमत बघून तिला आज खऱ्या अर्थाने जास्त त्रास होत होता. एक गायकच तिच्या गायकीची खरी किंमत करू शकणार होता. दुर्दैवाने तिला तो जोहरी लाभला नसल्याने तिची ही उत्कृष्ठ विद्या आज वैद्यांच्या घरात धूळ खात पडून होती. ह्याचेच मनोमन मनूला खूप वैषम्य वाटत होते.
तिने आईच्या पायावर डोके ठेवून तिला नमन केले…

तेवढ्यात बाहेर हलका पाऊस सुरू झाला..
कदाचित मनूच्या मनातील व्यथा, तगमग जशी तिच्या डोळ्यातून पाझरत होती तसाच आसमंतही तिला त्यात सहभागी होऊन दुजोरा देत असावा..

बाहेर पडणारा पाऊस बघून सज्जलाबाईंच्या मुखातून नकळत मिया मल्हार बरसू लागला..

सावन घन गर्जे घूमघूम
बरसत शीतल जल झूमझूम।
जातक कीर कोकीला बोलेऽ
हंस चकोर चहू दिस डोले।
नाचत मन अति करत कलोले।
मोर-मोरनी झूमझूम….
सावन घन गर्जे।

दोघीही एकसूरांत तल्लीन होऊन कितीतरी वेळ गात होत्या. आईच्या सूरात सूर मिसळून मनवा कधी गायला लागली तिचे तिलाच कळले नाही..
बाहेर मेघांनीही सूरात तान मिसळून तारसप्तकात बूॅंदे बरसायला सुरवात केली.

एकीकडे मनवा गात होती तर सज्जलाबाईंनी तराना गायला सुरुवात केली. सगळे वातावरण भारलेले आणि अचानक जमिनीवर काहीतरी पडल्याचा जोरदार
आवाज झाला तसे दोघींनीही घाबरून डोळे उघडले आणि डोळ्यांसमोर जे दिसले ते पाहून त्यांची पाचावर धारण बसली.
स्तब्ध होणे, दातखीळ बसणे, जागीच खिळून राहणे किंवा शरीर दगड होणे ह्या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ काय असतो ह्याचा अनुभव त्या दोघीही आत्ता जीवंतपणे घेत होत्या. समोरच्या दृश्याने दोघीही जागीच थिजल्या.…….!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्रमशः-14
©®राधिका कुलकर्णी.


काय झाले असेल…?
असे काय झाले की दोघीही भीतीने गर्भगळीत झाल्या?
इतक्या सुंदर क्षणांचा विचका करण्याइतके नेमके काय घडले होते तिथे?
काय होणार पुढे?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला पुढील भाग नक्की वाचा..
हा भाग कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा.
धन्यवाद ?
@राधिका.


🎭 Series Post

View all