ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.

अल्लड, हळव्या मनाच्या मनवाची कहाणी. विरह, संघर्ष आणि शेवट गोड होणाऱ्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी.. राधिका कुलकर्णी.
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी-भाग-1
©® राधिका कुलकर्णी.

रात्रीचे बारा वाजून गेले होते. नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर आता तुरळक भूरभूर चालू होती. पावसामूळे वातावरणात आलेला गारवा प्रकर्षाने जाणवत होता. सूनसान रस्ता अधिकच गूढ वाटत होता. घरी आई एकटीच आहे ह्या जाणीवेने मनवा गाडीचा स्पीड वाढवत भरधाव वेगाने रस्ता कापत होती.
बाहेर छानसा पाऊस आणि गाडीत आपल्या मनपसंत जगजितसिंगच्या गझल ऐकत ड्राईव्ह करणे हा एरवी मनवासाठी सुखद योग असला तरी आज मात्र तसेच सगळे असुनही ती त्यात रमत नव्हती. आईच्या काळजीने तिला घेरले होते. कधी एकदा घरी पोहोचतेय असे मनवाला झाले होते.

मनवा वैद्य. मुंबईच्या नामांकित विद्यापीठाची डीन होती. विद्यापीठ परिसरातच क्वार्टर मिळाल्याने आपल्या आईसह तिथेच रहात होती. एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने गेले दोन दिवस बाहेर असलेली मनवा आता घराकडे परतत होती. रस्ताभर लागलेल्या पावसाने तिला सीटीत पोहोचायला नाही म्हणले तरी जरा जास्तच उशीर झाला होता त्यामुळेच आईच्या काळजीने तिचे मन थाऱ्यावर नव्हते. कॉन्फरन्स संपवून निघता निघताच सुधाचा म्हणजेच आईच्या केअर टेकरचा फोन आला होता की \"आई जेवत नाहीत, तुम्ही लवकर या. सारख्या तुमचीच चौकशी करत आहेत.\"

गाडी शंभरच्या स्पीडने हाकत आता फक्त एकच सिग्नल, तो ओलांडल्यावर पहीला लेफ्ट टर्न की युनिव्हर्सिटी गेट. मग एकदा आत शिरले की अवघ्या पाच मिनिटांत घरी. मनातल्या मनात कॅल्क्युलेशन्स करत मेंदू आणि गाडी जवळपास एकाच वेगाने जात असताना नजर मात्र सिग्नलवर होती मनवाची. लांबुनच सिग्नल पडून अडकुन पडू नये हा धावा करतच ती सूसाट वेगाने गाडी पळवत होती पण नेमके दुर्दैवाने सिग्नलला पोहोचली आणि लाल दिवा ब्लिंक झाला. युनिव्हर्सिटीचा अती रहदारीचा चौक असल्याने खूप जास्त वेळ सिग्नल यंत्रणा चालू असायची ह्या रोडला. आणि मनवा पडली काटेकोर कायदे आणि नियम पाळणारी. त्यामूळे रस्त्यावर चिटपाखरूही नसताना ती सिग्नल जंप न करता चरफडत ग्रीन लाईटची वाट पाहत अस्वस्थपणे इकडे तिकडे नजर फिरवत टाईमपास करत होती. ती नेमकी पोहोचली आणि सिग्नल बदलल्यामुळे त्या अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर फक्त तिचीच गाडी उभी होती. अजून बाय डिफॉल्ट ग्रीन सिग्नल यायला बराच वेळ लागणार होता हे जाणून तिने इंजिन बंद करून गाडीच्या काचा खाली केल्या आणि बाहेर नजर टाकली.
बघता बघता एका जागी तिची नजर स्थिरावली अणि तिच्या पोटात भितीने गोळा उठला.
रस्त्याच्या कडेला अंधारात तिला एक हात हलताना दिसला. रात्रीचे बारा वाजून गेलेले. रस्ता सूमसाम आणि अशा पावसाळी रात्री हे असे दृश्य म्हणजे काही भूताटकी तर नाही ना!!!
मनवाला एसी गाडीतही दरदरून घाम फुटला. इथून पळ काढावा तर सिग्नल अजुन सूटला नव्हता.
क्षणभर भितीच्या सावटातून बाहेर येऊन मनवाने हा खरा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी हलकेच गाडी रीव्हर्स घेत रस्त्याच्या त्या कडेला घेतली जिकडे तिला हातासारखे काहीतरी हलताना बघितल्याचा भास झाला होता.
आजकाल सुनसान रस्त्यावर ॲक्सिडेंट सदृश दृश्य उभे करून वाटसरूंना लुटणे, मारहाण किंवा अगदी खून करण्यापर्यंतच्या घटना ऐकून माहितीच्या असल्याने लोक आजकाल सोईस्कर दुर्लक्ष करून मदत न देताच पळ काढतात. ते पाहता मनवालाही खरेतर तसेच करणे अपेक्षित होते परंतु मुळातला मदतीचा स्वभाव तिला सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक करत होता. \"जर खरच कुणालातरी जेन्युनली मदतीची गरज असेल तर?\"
\"आणि आता इतक्या पावसात रस्त्यावर कोणाचीही मदत न मिळाल्याने जर कुणाचा वाचणारा जीव हकनाक गेला तर?\"
\"नाही नाही.. जाऊन खात्री करायला काय हरकत आहे..\"
मनाची पूर्ण तयारी करत मनवा गाडी रस्त्याच्या कडेला लावत अलगद खाली उतरली. संथ पण सावध पावले उचलत ती त्या अस्पष्ट आकृतीजवळ पोहोचली.
समोरचे दृश्य पाहून मनवाच्या अंगावर काटा उभा राहिला.
एव्हाना हलणारा तो हात तसाच शांत झाला होता.
नीट निरखून पाहिल्यावर कळले की एका कॉलेज वयीन मुलाचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता. हे सगळे आत्ता आत्ताच घडले असावे कारण त्या मुलाची शुद्ध नुकतीच हरपली होती आणि म्हणुनच हलणारा हात आता गळून शांत पडला होता. मुलाच्या डोक्याखालून रक्ताचा ओघळ वहात होता. तो मुलगा निपचित पडला होता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनवाने घाईघाईने जवळच्याच अपोलो हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीचा फोन केला आणि ॲम्ब्युलन्स मागवली.. आता इतक्या वर्षात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तिला सगळेच ओळखत असल्याने डॉक्टर, पोलिस क्षेत्रात तिच्या बऱ्याच ओळखी होत्या. त्यामुळे पाचच मिनिटांत निश्चित स्थळी ॲंम्ब्युलन्स आली. त्या मुलाला व्यवस्थित स्ट्रेचरवर ठेवून गाडीत घातले आणि ॲंम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. मनवाने आजूबाजूला नजर फिरवून त्याचे काही सामान दिसतेय का हा अंदाज घेतला. बाजूलाच त्याची कॉलेज सॅक पडलेली होती. एक लेदर शू तसाच अस्ताव्यस्त पडलेला. गळ्यातले आयकार्ड पण रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले. तिने आपल्या हातरूमालाने सर्व कामाच्या वस्तू उचलून गाडी स्टार्ट केली. सगळ्यात आधी सुधाला घरी फोन करून तिला यायला थोडा उशीर होईल हे सांगून तिने गाडी ॲंम्ब्युलन्सच्या मागे दामटली.
ड्यूटी डॉक्टरांनी त्याला तपासले. वरकरणी फार काही खोल जखमा दिसत नसल्या तरी तो बेशुद्ध झाला ही काळजीची बाब होती त्यात डोक्याला लागलेला मार आणि रक्तस्त्राव हे सगळेच काहीतरी गंभीर घटनेकडे इशारा करत होते. ड्यूटी डॉक्टरांनी ताबडतोब त्याच्या बाकी टेस्ट्स करायचा निर्णय घेतला. एम आर आय काढल्यावर रिपोर्टमधे मेंदूला दूखापत झाल्याचे निष्पन्न झाले. जर लवकरात लवकर ऑपरेशन केले नाही तर मूलाच्या जीवाला धोकाही संभवण्याची शक्यता होती. काय करावे काहीच सुचत नव्हते. कारण आयडेंटीटी कार्ड ह्या सगळ्यात थोडे फाटल्याने त्यावरचा नाव, पत्ता ,फोन नंबर सगळेच धुसर झाले होते.
एक क्षण विचार करून मनवाने कंसेंट पेपरवर सही करून त्याच्या ऑपरेशनच्या सर्व लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या.
मुलाचा चेहरा पाहताच ती क्षणभर दचकली. खूप ओळखीचा चेहरा होता. खरेतर आयुष्यात कधीच विसरता येणार नाही असाच तो चेहरा होता. तिच्या नकळत डोळ्यातून ओघळणारा एक अश्रू पुसतच तिने मुलाचे नाव थरथरत्या हाताने लिहीले.
ओंकार डोंगरे आणि रिलेशन -आई….
ताबडतोब सांगितलेली रक्कम जमा करून ती तिथेच एका बेंचवर बसून राहिली.
प्रवासाने आधीच शिणलेले डोळे ह्या अतिरिक्त अवचित आलेल्या तणावाने नकळत मिटले गेले..
तिला प्रचंड ग्लानी आली. मधेच जाग येत होती तर मधेच पेंग. मधेच विचार भूतकाळात नेत होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रचंड तोकड्या लहान संकरी गल्लीबोळातून ती धावत सुटली होती. वर आकाश दिसत नव्हते की आजुबाजुला घरांच्या आतुन कोणी माणूस दिसत नव्हता. नुसत्या खडबडीत गल्लीबोळातून ती जशी वाट फूटेल तशी धावत होती. त्या संकरी गल्ल्या जणू एक निर्वात पोकळी होती जिथे श्वास घेणेही मुश्किल. कधी एकदा ह्या गल्ल्यांमधून बाहेर पडून मोकळा श्वास घेते असे झालेले.
अंधार दाटलेला. पायाखाली काय येतेय हे पाय ठेवेपर्यंत जाणवू नये इतका भयाण काळोख. वाट फुटेल आणि दिशा दिसेल तसे फक्त धावत होती ती अणि अचानक एका मजबूत दरवाज्यावर जाऊन ती धडकली. अंधारात कडी कोयंडा दिसत नव्हता. तिने हातानेच स्पर्श करत दरवाजाच्या कडीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला कुठेही कोणतीच कडी कुलूप नव्हते.
म्हणजे !!!
दरवाजा बाहेरून बंद आहे…?
"अरे कोणी आहे का तिकडे? प्लिज दार उघडा. मी अडकलेय ह्या निर्वात पोकळीत. माझा श्वास कोंडलाय. डोळे शिणलेत. पाय थकलेत. विचार थांबलेत. मी भांबावलेय, भरकटलेय. आधार हवाय मला. आहे का कोणी तिकडे?
प्लिज ह्या भोवऱ्यातून माझी सुटका करा…"
दारावर थापा मारत ती फक्त गयावया करतेय इतक्यात पलिकडून पण अस्पष्ट आवाज येऊ लागला.. तिकडूनही कोणीतरी दारावर धडका मारून ते उघडण्याचा प्रयत्न करत होते.
"अरे आहे का कोणी तिकडे.? दार उघडा. मला आत यायचेय पण रस्ता सापडत नाही. हा दरवाजा दिसतोय पण उघडत नाही. कोणीतरी आतुन कडी लावलीय. प्लिज उघडा."
ती दचकली. तोच ओळखीचा आवाज. पण तो दार उघडत का नाही? दार तर इकडून बंदच नाही, मग हा आवाज असे का म्हणतोय की दार आतून बंद आहे. ही काय भानगड आहे?
हे असे कोणते दार आहे जे आतुन बाहेरून कुठूनही बंद नाही तरीही उघडत नाही??
ही अशी कोणती अजस्त्र गूहा आहे जिला मूळी दारच नाही. म्हणजे मी सतत ह्या बंद दारामागील पोकळीत अशीच अडकून राहणार का? ह्यातुन माझी सुटका आहे की इकडेच गुदमरून मी अखेरचा श्वास घेणार.?
काय आहे माझ्या प्राक्तनात?
मला माझ्या हक्काचे ते मोकळे आकाश, तो मोकळा श्वास कधी अनुभवता येणारच नाहीये का ??
देवा माझ्या आत्म्याची ही घुसमट कधी रे थांबणार.. !
जागेपणीही सतत त्याच यातना किती काळ सहन करायच्या मी ?
ती फक्त बंद दारावर डोकं बडवत रडत होती.. रडत होती…..
" मॅडम, अहो मॅडमऽऽऽ !! डॉक्टर बोलावताहेत तुम्हाला. "
" ओ मॅडम उठा.. सर बोलावताहेत. "

नर्सने गदगदा हलवून जागे करताच मनवा दचकून जागी झाली.
इतक्या वेळ पहात होते ते स्वप्न होते तर् .!
काय होते ते ! किती विचित्र स्वप्न !
आत्ताच का पडले पण..?

तोंडातून गळणारी लाळ पुसत मनवा लगबगीने वॉशबेसिनकडे गेली. भितीने भेदरलेला आणि घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर पाण्याचे हापके मारुन जरा फ्रेश होऊन ती डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली.

"या बसा मॅडम. "
" कोण तुम्ही ह्यांच्या? "
" अं…..ऽऽऽ? "
मनवाला काय उत्तर द्यावे समजत नव्हते.

डॉक्टरांच्या इशाऱ्यानूसार मनवा यंत्रवत समोरच्या खुर्चीत येऊन बसली.
डॉक्टरांचा निर्विकार चेहरा बघून मनवा जराशी चरकलीच मनातल्या मनात.
" का बोलावले असेल डॉक्टरांनी? "
"तो मुलगा बरा असेल ना?"
"की काही विपरीत घडलेय त्याच्या बाबतीत?"

डॉक्टर शांतपणे पेपर्सवर नजर फिरवत होते. पण ती शांतता मनवाच्या काळजाला घर्रे पाडत होती.
मनवाचे ऊर धडधडत होते. काही अनिष्ट बातमी सांगण्यासाठी तर डॉक्टर हा इतका मोठा पॉज घेत नसतील ना?
\"कोण कुणाचं लेकरू.. अजून त्याच्या आईबापाचा थांग पत्ता पण लागला नाही आणि असे काही झाले तर कसे तोंड दाखवू मी त्यांना?\"
\"काय करायला गेले आणि हे काय भलतेच घडतेय???
ते घाणेरडे स्वप्न काही संकेत तर देत नाही ना मला???\"
मनवाचे विचारचक्र अव्याहत चालू होते.

डॉक्टर आपले मौन सोडून कधी बोलते होतात ह्याची वाट पाहत ती अस्वस्थपणे खुर्चीत बसून राहिली……
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्रमश: भाग-1

काय होणार पूढे?
कोण आहे तो मुलगा?
मनवाच्या स्वप्नाचा अर्थ तिला कळणार का?
डॉक्टर आता मनवाला कोणती बातमी देणार?
पूढे काय होणार हे पुढील भागात बघू..
धन्यवाद.


🎭 Series Post

View all