#ऋणानुबंध
©स्वप्ना...
" थोडी भारी दाखवा ना दोन हजारच्या पुढे पण चालेल,..आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लिज.." ह्या महेशच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला,..तेंव्हा असावरीने न राहवून महेशला मांडीला चिमटा काढत खुणावलं,.. आणि हातानेच काय असं विचारलं,..महेश म्हणाला," बोलू या नंतर साड्या बघ आधी,.."
ती नाक मुरडत म्हणाली,"मला चॉकलेटी साडी नको,..त्यावर महेश हसत म्हणाला,"तुला नाही ग,..?"आसावरीने परत डोळे मोठे करत मग,..दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग,..त्यावर महेश म्हणाला,"त्यांना पण नाही,.."देशमुख काकूच्या मुलीच लग्न ठरलंय ना,.." त्याच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली,.."काय देशमुख काकूंना दोन हजाराची साडी,..?"तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक,आणि आजूबाजूचे गिऱ्हाईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे,..अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या,..तिला ते जाणवलं आणि ती जराशी चपापली आणि खर्ज्यात आवाज लावत म्हणाली,"अरे पोळ्यावाली आहे ती आपली,..तिला कशाला एवढी महाग साडी,..?घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्या आहेत त्यातली देऊ,.."तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता,..महेशला आठवणीत होती तशीच मोठया काठांची सोनेरी बुट्ट्या असलेली चॉकलेटी साडी या नवीन गठ्ठ्यात दिसली त्याने ती साडी पटकन उचलली,..किंमत तीन हजार सहाशे होती पण त्याने लगेच ही साडी पॅक करा असं सांगितलं आणि तो असावरीकडे न बघताच काऊंटर कडे चालू लागला,..
आसावरी मनातून प्रचंड चिडली होती,..तिथे न थांबता तणक्यात ती गाडीत येऊन बसली,.. महेशने साडीच पार्सल मागे गाडीत टाकलं,.. आणि सिट बेल्ट लावत म्हणाला,"छान आहे ना ग साडी,..अगदी मला हवी तशी मिळाली,.."
आसावरीचा रागाचा भडकाच उडाला,"अरे,काय पायातली वाहाण छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण,.."
महेश म्हणाला ,"असावरी तुला काही माहीत नाही बोलू आपण निवांत,.."त्यावर चिडून आसावरी म्हणाली,"सगळं माहीत आहे मला, अण्णा बोलले होते मागे ह्या देशमुखबाईचे फार उपकार आहेत आपल्यावर,..म्हणून काय एवढी महाग साडी,..?"
महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली,..आसावरी तणक्यानेच टेबलवर बसली,..महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला,.."माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिम्मत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं,..शेतीचं उत्पन्न कमी आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला,.. पण एकदा कळलं गावातले देशमुख शहरात राहायला येणार,..गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे,.. त्यामुळे रोजच्या उठण्याबसण्यातल्या ओळखी होत्या,..आजोबांनी शब्द टाकला," पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल,..शिक्षणाचा खर्च पेलत नाही,..एक वेळ चहा नाष्टा धकवतो,..खरंतर रोज पूजेला आला असता पण कॉलेजची वेळ सकाळची,.."आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्क झालं,..ही मायमाऊली तेव्हां पासून माझी अन्नपूर्णा आहे,..मला छोटीमोठी काम त्या घरात सांगितली जायची,..कधी दळण आणायचं,कधी भाजी आणून द्यायची,..
मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं,..मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता,..आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा यायचा,..कसं होईल आपलं,..?खोलीचे भाडे,चहा नाश्ता बिल जीव घाबरून जायचा,..त्यादिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही तेंव्हा देशमुख काकु डोक्यावरून हात फिरवून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या,..म्हणायच्या ,"येतील आजोबा नको काळजी करुस,.." जेवताना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे,.. आईचा स्पर्श आठवायचा,..असे ते दिवस होते,..
एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितल्या गेलं,..तश्या काकु बाहेर येऊन म्हणाल्या,"अहो असं रागावून का सांगता त्याला,..आणि त्याला सवय नसेल इस्त्री करण्याची,..पण त्यादिवशी देशमुख काका रागातच होते,..त्यांचा माझ्यासोबत बारावी शिकणारा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो,..तो रागच होता,..उपकाराचा,..त्यादिवशी त्यांचा मुलगा,.. ही आता लग्न ठरलेली चिमी तर आठच वर्षांची होती ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती,..काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला,..आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या,.. "खुप खुप मोठा हो,.."
काकांनी परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्याच इर्षेने मला इस्त्री करायला बसवलं,..मी घाबरत इस्त्री करायला लागलो,..कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं,..आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती,..शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होतो,..पण ही देशमुख इस्त्री चांगली जड होती,..भीतभीत फिरवायला लागलो,..दोन पाच कपडे मस्त जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली,.. काकूंची साडी जळाली,.. मन घाबर घुबर झालं,..तो जळका भाग घडीत लपवला,..थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या सगळ्यात खाली ती साडी घातली,.. त्यादिवशी न जेवताच तिथून पोबारा केला,.. दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती,..डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले,..तिसऱ्या दिवशी निरोप आलाच काकूंनी बोलावलंय,..जावं तर लागणार आजच मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो,..मनात निश्चय केला फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ,..
दबकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठे तरी निघण्याच्या बेतात,..प्रत्येकानेच आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते,..तेवढ्यात देशमुख काकु बाहेर आल्या,..तेंव्हा काका ओरडले,.."अहो ती चॉकलेटी साडी नसणार होत्या ना तुम्ही खास इस्त्री केलेली,..?"माझं हृदय धडधडायला लागलं,.. सगळ्या अंगाला घाम फुटला,..पण काकु म्हणाल्या,"मला त्याचे काठ खुप टोचतात,..तशीही माझ्या माहेरची साडी ती तुम्हाला जसं माझं माहेर टोचत तशीच झाली ती साडी त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणीचे छान, मऊसूत आहे,..उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढू मला त्रास होतो,..देशमुख अगदीच खुलले आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरावर असं बोलते म्हणून,..लगेच म्हणाले नकाच नेसू ती टोचकी साडी,..आपण अश्याच साड्या घेऊ तुम्हाला मऊसूत,.. तेवढ्यात काकु माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या,"महेश छान थालपीठं केली आहेत जेवून घे,..काही थालपीठं जळाली आहेत त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस,.."काकूंच म्हणणं फक्त मला समजलं,..आज मला त्यांनी वाचवलं होतं,.. जेवताना कळलं थालपीठं जळाली नव्हतीच पण ते वाक्य साडीवरून होतं मनाला लावून घेऊ नकोस,..पुढे काही महिनेच मी तिथे होतो परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं,.. तिथे कोणी देशमुख नव्हते,...हळूहळू काळही बदलला,..छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं,..जेवणाचे प्रश्न मिटले,..पुढे नोकरी,लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली,..त्यात नेमकं ह्या अपार्टमेंट मध्ये ह्याच काकु पोळ्याला भेटणं,..काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं,..काका वारले, मुलगा दारूकडे वळला,..आता काकु पोळ्या करून उदर निर्वाह करतात,..त्यात चिमीचं लग्न ठरलं,..आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची मला प्लिज त्या संधीचा आंनद घेऊ दे,..खरंतर त्या माऊलीने तेंव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो,..तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाही मग ही संधी आहे,.. मला त्याचा फायदा घेऊ दे,..आसावरी आवक झाली,..किती वेगळं असतं रे प्रत्येकाच आयुष्य,..आज तुझ्या यशामागे किती तरी अदृश्य हात आहेत,..महेश हसला म्हणाला," हो त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात,..त्यांच्या कायम ऋणात राहायचं पण संधी आली तर त्या समोरच्याला आंनदी करायचं,..\"
तो उठून कॉफी बिल पे करायला गेला,..आसावरी गाडीत येऊन बसली तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती ती म्हणाली,.."छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना म्हणत त्या साडीवर आसावरी हात फिरवू लागली,.."
महेश गाडी चालावत होता पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा, देशमुख काका,काकु आणि इस्त्री दिसत होती,..शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता,..त्याचे डोळे भरून आले,..आठवनींनी,मायेने की ऋणानुबंधामुळे त्यालाच कळेना..
वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा,..धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा