तुझी माझी मैत्री

माझ्या सखीसाठी गोड अनपेक्षित आनंदाची पर्वणी
तुझ्या माझ्या मैत्रीची, एक वाट असावी
दुःखाला तिथे जराही जागा नसावी !
मानलेल्या नात्याची, घट्ट वीण असावी
मनाची मनाला घडलेली गाठ असावी !!

देता तू आवाज, मी लगेच यावे
तुझे अश्रू माझ्या डोळ्यांनी टिपावे!
येता तुला हसू, माझे हास्य फुलावे
तुझे माझे हात हाती, झोक्यागत झुलावे !!

तू चित्रीलेल्या फुलांचा, खरा सुगंध असावा
नसली सोबत तरी, तोच जिव्हाळा रहावा !
जीवनाच्या वाटेवर, तुझ्या सोबतीचा गोडवा
मैत्रीचा स्वाद आयुष्यभर, जिभेवर रेंगाळावा !!

तुझी माझी मैत्री, गुळागत गोड असावी
जीवनात तिला कशाची तोड नसावी !
सुखात ती हसावी, दुखात ती रडावी
पण आयुष्यभर ही मैत्री सोबतच असावी !!

तुझी माझी मैत्री, चिमणीसारखी असावी
चिऊ काऊंचा गोड घास भरवणारी असावी !
दर्यात तरणाऱ्या तारू सारखी असावी
अलगत किनाऱ्याला, सुखरूप सोडणारी असावी !!

तुझी माझी मैत्री म्हणजे...
जुन्या वहीतलं जपलेलं जाळीदार पान,
सदैव हिरवळ असलेलं सदाफुलीच रान !
परिजातकाची कोमलता, मोगऱ्याचा सुगंध,
तसे तुझे नि माझे सखे प्रेमळ ऋणानुबंध !!


✍?संध्या