ऋणानुबंध भाग ७ (मराठी कथा : marathi story) अंतिम भाग

Value of relations

मागील भागाचा सारांश: स्वराच्या जिजूंची अचानक नोकरी गेल्याने तिच्या बहिणीची आर्थिक परिस्थिती थोडी बिघडली होती म्हणून स्वराच्या ताईने स्वराकडे थोडी पैश्यांची मदत करण्याची मागणी केली. स्वराने सारंगला सांगितले की ताईला थोड्या दिवसांकरिता काही पैश्यांची गरज आहे व आपण तिला मदत करायला हवी पण सारंगने नात्यात पैसा आला की कटुता येते म्हणून ताईला पैश्यांची मदत करायला नकार दिला.

आता बघूया पुढे काय होतं...

स्वराने तिच्या mutual fund मध्ये गुंतवलेले पैसे काढून ताईला दिले. याबद्दल ती सारंगला काहीच बोलली नाही. स्वराने मध्यस्थ काढून बहिणीचेही मन सांभाळले होते आणि नवऱ्यालाही दुखावले नाही.

असेच काही दिवस निघून गेले. स्वराच्या ताईची आर्थिक परिस्थिती सुधारली, तिच्या जिजूंची नोकरी सुरळीत चालू झाली. स्वराच्या ताईने हळूहळू करून स्वराचे पूर्ण पैसे परत केले.  

स्वराच्या लग्नाला जवळजवळ सहा महिने पूर्ण झाले होते. स्वराचे सासू सारे युरोप टूरवर गेले होते, तेव्हा स्वरा व सारंग असे दोघेच घरी होते. एके दिवशी रात्री स्वरा आणि सारंग बाहेर जेवण करून उशिराने घरी परतत होते आणि नेमका त्याच वेळी सारंग व स्वराचा अपघात झाला, अपघात खूप मोठा होता, सारंग व स्वरा दोघेही रक्तबंबाळ झाले होते, सारंगची शुद्ध हरपली होती. स्वरा अर्धवट शुद्दीत होती. आजूबाजूला जमलेल्या लोकांपैकी एकाला स्वराने तिच्या ताईचा फोन नंबर दिला. स्वराला आणि सारंगला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट करण्यात आले. सारंग शुद्दीत आल्यावर त्याला कळाले की त्याचा एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे. स्वरालाही बरीच दुखापत झालेली होती. स्वराची ताई आणि जिजू हॉस्पिटलमध्ये सारंग व स्वरासोबत उपस्थित होते.

 सारंगने स्वराच्या जिजूंना विचारले, "जिजू स्वरा कशी आहे? तिला जास्त लागले नाही ना?"

जिजू म्हणाले, " तु स्वराचा विचार नको करूस ती ठीक आहे, तिची काळजी घ्यायला तिची ताई तिच्यासोबत आहे, तु आराम कर, तुला आराम करण्याची नितांत गरज आहे"

"जिजू आमचा अपघात झाल्याचे आई बाबांना कळवले का?" सारंगने प्रश्न विचारला.

जिजू बोलले, " नाही, त्यांना लगेच कळवण्याची गरज मला वाटत नाही, ते लगेच परत येऊ शकणार नाही आणि वरून इकडची काळजी करत बसतील सो मला वाटत आहे की त्यांना काही न सांगितलेलंच बरं"

सारंग पुढे बोलू लागला, " तुम्ही म्हणता ते खरे आहे, आई बाबांना इतक्यात काहीच नको सांगायला. डॉक्टर माझ्या पायाबद्दल काय बोलले? प्लास्टर कधी पर्यंत निघेल?"

जिजू म्हणाले, " सारंग तुझ्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, पायाचे छोटेसे ऑपरेशन करावे लागणार आहे, डॉक्टर म्हणाले की उद्या ऑपरेशन करून घेऊ. ऑपरेशन झाल्यावर तुला तीन महिने तरी बेड रेस्ट घ्यावी लागेल."

सारंगचा चेहरा रडवेला झाला होता, तो पुढे बोलू लागला, " ऑपरेशन! तीन महिने बेड रेस्ट! ऑफिसमध्ये काम पेंडींग आहे, तीन महिने ऑफिसमध्ये नाही गेलो तर माझा जॉब गेल्यातच जमा आहे."

जिजू सारंगला धीर देण्यासाठी बोलू लागले, " सारंग मला माहित आहे तुला घरी बसण्याची सवय नाहीये, तुला कंटाळा येऊच शकेल आणि हो नोकरीची तु काळजी करू नकोस, मी तुझ्या ऑफिसला मेल करून तुझा अपघात झाल्याचे कळवले आहे, त्यांनी तुला मेडिकल लिव्ह दिली आहे सो तु काहीच काळजी करू नकोस"

" जिजू ऑपरेशन साठी पैसे लागतील ना, घरी चेकबुक असेल ते घेऊन आलात तर मी चेकवर सही करून देतो म्हणजे हॉस्पिटलचे बिल भरायला सोपे जाईल" सारंग म्हणाला.

" सारंग तु बाकीचा विचार का करत आहेस? राहिला प्रश्न हॉस्पिटलच्या बिलाचा तर ते मी बघून घेईल, तुला बरे वाटल्यावर मला माझे पैसे परत कर आणि आता जास्त काहीच बोलायचे नाही, फक्त आराम करायचा" जिजू रागावून सारंगला बोलले.

जिजूंचे बोलणे ऐकल्यावर सारंगला मनातल्या मनात खूप वाईट वाटून गेले. तो विचार करू लागला की हे तेच जिजू आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज होती त्यावेळी आपण ती मदत नाकारली आणि आता हेच आपण न काही सांगता आपली किती मदत करत आहेत.

दुसऱ्या दिवशी सारंगच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. सारंगला काही दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार होते. स्वराला किरकोळ दुखापत झाली होती पण तिला अशक्तपणा खूप आलेला होता. स्वराला दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून सोडण्यात आले होते. सारंगसोबत एका जणाला हॉस्पिटलमध्ये थांबावे लागणार असल्याने स्वराचा भाऊ त्यांच्या मदतीसाठी आला होता. स्वराचा भाऊ व जिजू आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये थांबण्याची ड्युटी करत होते. सारंगची सेवा ते मनापासून करत होते.सारंग हॉस्पिटलमध्ये असताना स्वरा तिच्या ताईच्या घरी राहत होती.

काही दिवसांनी सारंगला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी जिजूंनी सारंगला त्यांच्या घरी घेऊन गेले. सारंगचे आई बाबा अजून परत आले नसल्याने स्वराच्या ताई व जिजूंनी त्यांना आपल्याच घरी ठेऊन घेतले. स्वराला पूर्ण बरी होईपर्यंत तिच्या ताईने जागच हलू दिले नाही किंवा एखाद्या कामालाही हात लावू दिला नाही. हॉस्पिटलमध्ये असल्याने सारंगचे स्वराशी बऱ्याच दिवसात काहीच बोलणे झाले नव्हते. एके दिवशी दुपारच्या वेळी ताई व जिजू बाहेर गेलेले असताना सारंगने स्वराशी त्याच्या मनातले बोलण्याचा प्रयत्न केला, " स्वरा खूप दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट खटकत आहे, तुझ्याशी बोलायचे आहे पण एकांत भेटतच नाहीये"

स्वरा बोलली, " अहो बोला ना मग, आता घरात कोणीच नाहीये, काय खटकत आहे?"

सारंग पुढे बोलू लागला, " स्वरा जेव्हा ताईला व जिजूंना आपल्या मदतीची गरज होती त्यावेळी मी नाही म्हणालो, त्यांना आपला राग आलाच असेल ना? पण त्यांनी तो राग मनात न ठेवता ते पूर्ण मनोभावे आपली मदत करत आहेत, मला खूप गिल्टी फील होत आहे"

स्वरा मिश्कीलपणे हसून बोलली, " सारंग हे तुमचं तुम्हालाच कळाले हे बरे झाले, अडचणीच्या दिवसांत आपलेच लोक आपल्या मदतीला धावून येतात, जेव्हा आपल्या पायाला ठेच लागते ना तेव्हा आपल्या जवळच्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येते, जसे सुखात आपण एकमेकांसोबत असतो दुःखातही एकमेकांची साथ दयायला हवी. सगळ्या नातेवाईकांना एकाच तराजूत तोलायचे नसते. अस गरजेचे नाहीये की तुमच्या बाबांची भावंडे जशी वागली तशी माझी भावंडेही वागतील. मी माझ्या बहीण भावांना चांगलीच ओळखते. खरी नात्यांची ओळख संकटाच्या वेळीच होते. आता आपलंच बघा ना, आपला अपघात झाला, आपल्या कडे पैसे भरपूर आहेत पण जर हेच नातेवाईक नसते तर आपले काय झाले असते? पैश्यांनी सर्व काही विकत घेता येते पण नाती पैश्यांनी विकत घेता येत नाहीत. नाती जपावी लागतात ती सांभाळून ठेवावी लागतात. तुम्ही ताईला पैसे द्यायला नाही बोललात त्यावेळी मला तुमचा खूप राग आला होता पण मला माहित होतं की एक ना एक दिवस तुम्हाला तुमची चुक उमगेल."

सारंगच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, तो पुढे बोलू लागला, " स्वरा मला नात्यांची किंमत कळाली आहे, मी सर्वच नातेवाईकांना एकाच तराजूत तोलू पाहत होतो. मला ताई आणि जिजूंची माफी मागायची आहे"

" माफी? ताई आणि जिजूंची कशाला?" स्वरा प्रश्नार्थक चेहरा करून सारंगकडे बघत होती.

सारंग म्हणाला, " आपण त्यांना मदत नाही केली म्हणून"

स्वरा हसून बोलली, " माफी मागायची काही गरज नाहीये, लग्नाच्या आधी मी काही पैसे mutual fund मध्ये गुंतवलेले होते, ते पैसे काढून मी ताईला दिले होते आणि काही दिवसातच तिने ते पैसे मला परत दिले सुद्धा. मला तुम्हालाही दुखवायचे नव्हते आणि ताईला मदतही करायची होती म्हणून मी हा मध्यस्थ शोधून काढला, सॉरी मी तुम्हाला न सांगता हे केलं"

" स्वरा तु खूपच छान मध्यस्थ शोधून काढलास, तु सर्वच नाती किती उत्तमरीत्या सांभाळतेस, एकाच वेळी सर्वांचे मन जपतेस. लग्नाच्या आधी तु जेव्हा मला तुझ्या फॅमिली बद्दल सांगितलं होतंस तेव्हा मला वाटलं होतं की तु एक उत्तम मुलगी, बहीण आहेस पण आता लग्न झाल्यापासून बघतोय की तु उत्तम सुन आणि बायको सुद्धा आहे.स्वरा मी खूप नशीबवान आहे की तुझ्यासारखी बायको मला भेटली आहे " सारंगला बोलता बोलता खूप भरून आले.

सारंगच्या डोळ्यातील अश्रू पाहून स्वराच्याही डोळ्यात अश्रू आले. स्वराने सारंगला घट्ट मिठी मारली.

"नाती असतातच अशी

काही जन्मासोबत जोडली जातात तर

काही जन्मा नंतर आपण जोडतो

आपण नात्यांशिवाय राहूच शकत नाही

काही नाती भरभरून आनंद देतात तर

काही नाती भरभरून दुःख

पण एकदा विचार करून बघा

जर आयुष्यात नातीच नसती 

तर या आयुष्याला काय अर्थ उरला असता?

आपण सुखात कोणासोबत नाचलो असतो?

आणि दुःखात कोणाच्या कुशीत जाऊन रडलो असतो?" 

चुका सर्वांकडूनच होतात, पण हे आयुष्य खूप लहान आहे, मोठ्या मनाने सर्वांना माफ करायला हवे आणि नात्यांमधील ऋणानुबंध सर्वांनी जपायला हवे.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all