ऋणानुबंध भाग १ (मराठी कथा : marathi story)

Introduction of family

      स्वरा आणि सारंग यांचे थोड्याच दिवसांत लग्न होणार असते, त्यांचे लग्न प्रॉपर कांदेपोहे कार्यक्रम होऊन जमलेले असते. सारंग व स्वराची पहिली भेट झाली ती स्वराच्या घरी, स्वरा पहिल्या नजरेतच सारंगला आवडली होती, त्याला अगदी हवी तशीच लाईफ पार्टनर मिळाली होती. कांदेपोहे कार्यक्रम झाल्यावर दोन आठवड्यात सारंग व स्वराचा साखरपुडा झाला. तीन महिन्यानंतर सारंग व स्वराच्या लग्नाचा मुहूर्त निघाला होता. 

         साखरपुडा झाल्यावर जवळजवळ दोन आठवड्याने सारंग व स्वरा एकमेकांना भेटणार होते, अस पहिल्यांदाच होणार होतं की ज्यावेळी सारंग व स्वरा एकटेच भेटणार होते नाहीतर इतरवेळी घरातील कोणीतरी त्यांच्या सोबत असायचे. सारंग व स्वरा दोघेही उच्चशिक्षित होते, चांगल्या कंपनीत, चांगल्या पदावर नोकरीला होते, दोघेही एकाच शहरात नोकरीला असल्याने लग्नानंतर स्वराला किंवा सारंगला आपापली नोकरी सोडण्याची गरज पडणार नव्हती.

       सारंगने स्वराला एका कॅफेत भेटायला बोलावले होते. ठरलेल्या वेळेप्रमाणे स्वरा कॅफेत जाऊन पोहोचली, अजून सारंग यायचा बाकी होता. स्वरा सारंग येईपर्यंत मोबाईलवर टाईमपास करत बसली. जवळपास वीस मिनिटांने सारंग कॅफेत येऊन पोहोचला.

सारंग--- हाय स्वरा, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला, मला वाटलं होतं की तु ठरलेल्या वेळेच्या उशिरा येशील.

स्वरा--- सारंग मी वेळेच्या बाबतीत खूप जास्त पक्की आहे, मी दिलेली वेळ पाळते, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला फक्त पाच मिनिटे उशीर झाला आहे, मीच वेळेच्या आधी पंधरा मिनिटे आली आहे.

सारंग--- आपण खायला काहीतरी ऑर्डर करूया मग निवांत गप्पा मारुयात.

(सारंग व स्वरा आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतात)

सारंग--- स्वरा आज पहिल्यांदाच अस होतय की आपण दोघेच भेटत आहोत नाहीतर कोणीतरी आपल्यासोबत रहायचेच.

स्वरा--- हो ना. कामामुळे आपल्याला फोनवर जास्त बोलता येत नाही. आज निवांत गप्पा मारायला भेटतील.

सारंग--- आपल्याला आयुष्य एकत्र घालवायचं आहे सो आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागेल. मी पहिल्यांदा ज्यावेळी तुला बघायला तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तु असं म्हणाली होती तुला समजून घ्यायच असेल तर पहिले तुझ्या फॅमिली मेम्बर्स बद्दल जाणून घ्यावं लागेल, याचा अर्थ मला कळाला नाही.

स्वरा--- सारंग आज मी जी कोणी आहे ती माझ्या फॅमिलीमुळे, माझ्या आई पप्पांच्या संस्कारांमुळे, त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे, माझ्या बहीण भावांच्या साथीमुळे. माझ्या स्वभावावर, वर्तणुकीवर या सगळ्यांचा खूप जास्त प्रभाव आहे. अर्थात फॅमिलीचा प्रभाव हा सगळ्यांवरच असतो पण मला वाटतं की माझ्यावर जरा जास्तच आहे. मला भरपूर फ्रेंड्स आहेत पण मी त्यांच्या पेक्षा माझ्या फॅमिलीत जास्त रमते. मी फॅमिली गर्ल आहे असं म्हटलं तरी चालेल.

सारंग--- ओके, मला तुला जाणून घ्यायचे असेल तर तुझ्या फॅमिली बद्दल सर्व मला माहीत हवे असंच ना.आमची फॅमिली छोटी आहे म्हणजे आई बाबा आणि मी, मला बहीण भावांबद्दल काहीच अनुभव नाहीये, त्यांच्याशी काय बोलायचं, कस वागायचं म्हणजे भांडण झालं तर कस सोडवायच याचा अनुभव काहीच नाहीये. आज मला तु तुझ्या सर्व फॅमिली मेम्बर्सची ओळख करून दे म्हणजे मला कळेल तरी भावा बहिणींचे एकमेकांशी नाते कसे असते?

स्वरा--- लग्न झाल्यावर तुम्ही माझ्या फॅमिलीचा एक भाग असणार आहात सो तुम्हाला भाऊ बहिणींची कमतरता नाही भासणार, सुरवातीला सगळ्यांमध्ये ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल पण हळूहळू तुम्ही आमच्यातलेच एक होऊन कसे जाल हे तुम्हालाही कळणार नाही. आमच्यात भांडणं झाली की मलाही वाटतं हे बहीण भाऊ मला नको हवे होते, कशाला इतके बहीण भाऊ दिलेत पण हे सगळं वाटतं ते रागाच्या भरात , राग निवळला की सगळ्यांच्या बद्दलची मनातील अढी निघून जाते.

सारंग--- म्हणजे तुमच्यात अजूनही भांडणे होतात.

स्वरा--- हो अर्थातच, आमची भांडणे जास्त काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त अर्धा तास, अर्ध्या तासानंतर हेही लक्षात राहत नाही की आपल्यात भांडण झालं होतं आणि आपल्याला यांच्याशी बोलायचं नव्हतं.आता मी तुम्हाला एकेक करून सर्व फॅमिली मेम्बर्स चा परिचय करून देते म्हणजे त्यांचा स्वभाव कसा आहे, माझं त्यांच्याशी नातं कसं आहे आणि त्या संबंधित असलेले आमचे किस्से, बोअर झालं तर सांगा नाहीतर मी आपली बोलतच राहील.

        सर्वप्रथम आमच्या घरातील कर्ते पुरुष म्हणजे माझे पप्पा, ज्यांचं नाव माझ्यापुढे लागलेलं आहे, जे माझे जन्मदाते आहे. आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना, कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाताना हाच विचार केला की मी केलेल्या कृतीमुळे, मी घेतलेल्या निर्णयामुळे पप्पांना काय वाटेल? माझा नेहमी हाच प्रयत्न असायचा की आपल्या कोणत्याही प्रकारच्या वागणुकीचा त्रास आपल्या पप्पांना होता कामा नये. पहिल्यापासूनच आम्ही एका खेडेगावात राहत आहोत, पण तुम्ही एक गोष्ट नक्कीच नमूद केली असेल की आमची वाढ, जडणघडण जरी एका खेडयात झाली असेल तरी आमचे विचार मागासलेले नाहीत ज्याचे श्रेय आमच्या पप्पांना जातं. पप्पा जरी खेडयात राहत असले तरी त्यांचे विचार उदात्त होते, ते नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करत असायचे. माझ्या पप्पांना खूप शिकायचे होते, डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे होते, त्यांचा एका कॉलेजमध्ये नंबरही लागला होता पण नेमका त्याच वर्षी दुष्काळ पडला, पप्पांना कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न मिळाल्याने त्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले. शेती, उद्योग करता करता त्यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पप्पांनी त्यांचं उच्च शिक्षण घेण्याच स्वप्न आमच्याकडून पूर्ण करून घेतलं. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ असे आम्ही चार भावंडे असून सुद्धा त्यांनी आम्हाला सर्वांनाच उच्च शिक्षण दिलं. आमचं सर्वांच प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता पहिली ते चौथी गावातील मराठी शाळेतच झाले. आम्ही लहान असतानाच त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलींना शिकवून त्यांच्या पायावर उभे करायचे आहे आणि म्हणूनच इयत्ता पाचवी पासून आम्हाला तालुक्याला शाळेत घालण्यात आले. माझी सर्वांत मोठी बहीण ज्यावेळी पाचवीला तालुक्याला जाऊ लागली त्यावेळी गावातील सर्व लोकांनी पप्पांना विरोध केला, गावातील लोकांचे म्हणणे होते की एकट्या मुलीला एवढ्या लांब शाळेत घालण्याची काय गरज आहे? मुलीच्या जातीला एवढं शिकून काय करायचं आहे? आमच्या गावापासून आमची शाळा वीस किलोमीटरवर होती.पप्पा कुणाच्याही बोलण्याला बळी पडले नाही. पप्पांनी आमच्यासाठी बेस्ट शाळा निवडली होती. आज आम्ही जे काही आहोत त्यात आमच्या शाळेचाही खूप मोलाचा वाटा आहे. पप्पा वेळोवेळी शाळेत येऊन आमच्या अभ्यासाबद्दल, प्रगती बद्दल शाळेत येऊन चौकशी करायचे. आमच्या शाळेच्या बाबतीत ते खूप जास्त जागरूक होते. आम्हाला सर्वांना शिकवता यावं म्हणून त्यांनी खूप कष्ट केले आहेत. पप्पांचा स्वभाव खूप कडक होता, आम्ही सर्व बहीण भाऊ त्यांना खूप घाबरायचो, त्यांचा आवाज जरी आला तरी आम्ही गुपचूप अभ्यासाला बसायचो. पप्पांनी आमच्यापैकी कोणावरच कधीच हात उगारला नाही. आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त भीती असायची. लहानपणापासून मी एक गोष्ट बघत आलीये की आमच्यापैकी कोणीही त्यांच्याकडे पाच रुपये मागितले तर ते दहा रुपये द्यायचे आणि वरून ते कधीच हिशोबही मागायचे नाही, अजून सुद्धा अगदी तसच आहे पाचशे रुपये मागितले तर हजार रुपये देतात. आजपर्यंत पप्पांनी आमची सर्व स्वप्ने पूर्ण केलीत, आम्हाला कुठल्याही गोष्टीची कधीच कमतरता पडू दिली नाही. पप्पांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच अपयशाना सामोरे जावे लागले पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आयुष्यात कितीही संकटे आली पण ते कधीच झुकले नाहीत, त्यांनी प्रत्येक संकटांतून मार्ग काढला, ते पुढे चालत राहिले. पप्पांकडून घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे इच्छाशक्ती आणि सहनशक्ती. त्यांच्यात खूप जास्त पेशन्स आहेत, त्यांच्याकडे बघून एक गोष्ट कळते की जर आयुष्यात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी इच्छाशक्ती असणे आणि त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

        खेडेगावात मुलींचे लग्न कमी वयात म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर लगेच करायची पद्धत आहे, आमच्याही गावात अगदी तसच आहे. माझी ताई ज्यावेळी अठरा वर्षे वयाची झाली त्यावेळी गावातील लोकांनी, नातेवाईकांनी पप्पांना सुचवलं की मुलीच लग्नाच वय झालं आहे तिचं लग्न करून द्या, राहिलेलं शिक्षण ती लग्नानंतर पूर्ण करू शकेल. पप्पांनी त्यावेळी सर्वांना सांगितलं की शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी माझ्या मुलीच लग्न करणार नाही. 

        ताईचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने काही दिवस नोकरी केली आणि मग पप्पांनी तिला साजेश्या मुलाशी तीच लग्न लावून दिलं. माझे पप्पा कधीच कोणाच्या बोलण्याला बळी पडले नाही, त्यांना जे योग्य वाटतंय तेच त्यांनी केलं. आता माझ्या बाबतीत घ्याना, माझं कॉलेज संपून तीन वर्ष झाली आहेत, आमच्या बऱ्याचश्या नातेवाईकांनी पप्पांना सुचवलं की मुलीच वय वाढत चाललंय, सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही भेटणार, कुठेतरी अडजस्टमेंट करावीच लागेल पण नाही पप्पांनी माझ्या योग्यतेचच स्थळ शोधलं तेव्हाच ते राहीले.

            अस म्हणतात की रोजच्या शिदोरीची सोय करते ती आई असते आणि आयुष्याच्या शिदोरीची सोय करतो तो बाप असतो. माझ्या पप्पांनी आम्हा तिघी मुलींना शिकवून आमच्या पायावर उभे करून आमच्या आयुष्याच्या शिदोरीची सोय केली आहे आणि त्यासाठी मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील. माझ्या पप्पांच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठं कर्तृत्व म्हणजे आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो तेव्हा आम्ही मोजून चार ते पाच जण गावातून एस टी ने शाळेत जायचो, आमच्या गावातील माझी ताई त्या शाळेची पहिली विद्यार्थिनी होती आणि आज बघितलं तर त्याच शाळेत आमच्या गावातून दोन बस अगदी गच्च भरून जातात. माझी ताई आमच्या गावातील पहिली इंजिनिअर आहे आणि आता आमच्या गावातील एक घरात प्रत्येकी दोन इंजिनिअर सापडतील. माझ्या पप्पांनी मुलींना शिकवलं म्हणून गावातील इतर लोकही आपल्या मुलींना शिकवायला लागले.

           माझे पप्पा खरंच खूप ग्रेट आहेत. आज मी जी कोणी आहे त्यांच्यामुळेच आहे. मी देवाकडे प्रार्थना करेल की मला पुढच्याही जन्मी हेच पप्पा मिळू दे.

©® Dr Supriya Dighe

       

🎭 Series Post

View all