Oct 24, 2021
कथामालिका

ऋणको भाग ८वा

Read Later
ऋणको भाग ८वा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ऋणको भाग ८वा
अनघाचंऑपरेशन होऊन दहा बारा दिवस लोटले होते. अनघा आणि ताई दोघींनाही चांगला आराम मिळावा म्हणून दोघींच्या घरचे प्रयत्न करत होते. अनघाचे आई-बाबा आले होते. आता ते काही दिवस राहणार होते.

अनघा आता हिंडूफिरू लागली होती.वैभव तिला काल संध्याकाळी डाॅ.मेहतांनी सांगीतलेल्या समुपदेशकाकडे घेऊन गेला होता. ऑपरेशनच्या आधीपण अनघाचे त्यांच्याकडे दोन सिटींग्ज झाले होते.काल पुन्हा त्यांचं एक सिटींग झालं.त्यांनी काही गोष्टी सांगीतल्या.ज्यानी तिचं मन सतत प्रसन्न राहील. आता तिला जेव्हा दिवस राहतील तेव्हा यायला सांगीतलं

अनघाला पेंटींग करायला आवडायचं. वैभव तिला म्हणाला "घरातली जास्तीची कामं काढण्यापेक्षा फावल्या वेळात तू पेंटींग कर.तुला आवडतं नं.त्यानी मॅडम म्हणाल्या तसं तुझं मन प्रसन्न राहील." अनघाला ही वैभवचं म्हणणं पटलं.

आता रोजचा दिवस ऊजाडायचा तो बाळाची चाहूल घेतच. अनघा प्रसन्न कशी राहील याकडे वैभवचं लक्ष असायचं. अनघाच्या आई-बाबांना एवढ्या आधीपासून अनघाकडे येऊन राहणं जमणार नव्हतं.अनघाचा भाऊ आमोद आणि त्याची बायको स्वाती दोघंही नोकरी करत.त्यामुळे त्यांच्या लहान मुलाला हर्षला बघावं लागतं असे.अनघाला दिवस राहील्या नंतर लगेच गरज वाटली तर ते येणार होते.

अनघानी पेंटींग करणं सुरू केलं होतं.आता ती प्रत्येक काम खुप ऊत्साहानी करायला लागली होती. कधी कधी तिच्या मनात नकारात्मक विचार यायचे पण समुपदेशकानी सांगीतल्याप्रमाणे ते विचार ती मनातून लगेच काढून टाकत असे. आता तिचा फोकस फक्त बाळावर होता म्हणून सतत ती स्वतःच समुपदेशकानी सांगीतल्याप्रमाणे वागत होती.

हळूहळू दिवस सरत होते.वैभव आणि अनघा रोज आनंदानी सगळी कामं करत असत.पण मनात कुठेतरी सतत बाळाची वाट बघणं चालू असायचं. ताई मधून मधून फोन करायची, कधी घरी पण यायची. मध्येच वैभव अनघा आणि ताईकडचे सगळे मिळून छान अंगतपंगत करायचे.रात्री पत्याचा डाव रंगायचा,काॅफी व्हायची.काॅफी निनाद छान करायचा त्यामुळे काॅफीचं काॅंट्रॅक्ट निनादकडेच असायचं.


अनघाला मधूनच भिती वाटायची. आपण ऑपरेशन तर केलं पण आपल्याला नक्की बाळं होईल नं! क्षणभरच असा विचार तिच्या मनात यायचा पण लगेच ती सावध व्हायची. नाही असा विचार पुन्हा मनात आणायचा नाही.आपल्याला बाळ नक्की होणार. अनघाची अशी मन:स्थिती होणं स्वाभाविक होतं कारण तब्बल दहा वर्षांनी तिला गोड बातमी कळणार होती. म्हणून मधेमधे असा विचार तिच्या मनात यायचा.

आजही कॅनव्हाॅसवर रंगाचे फटकारे मारताना असंच काहीतरी मनात येत होतं.फोनच्या आवाजांनी तिची तंद्री भंगली. तिनी फोन घेतला.तिच्या आईचा फोन होता. " बोल आई.सहज केलास नं फोन?" " हो सहजच केला.तुझी मधून मधून विचारपूस करावी असं आम्ही दोघांनी ठरवलं आहे.कधी तुझे बाबा बोलतील तर कधी मी. काय करते आहेस?" " सध्या पेंटींगचा नाद लागलाय.वैभव म्हणाला तुला आवडतं ते कर.पेंटींग आवडतं तर ते कर. जरा प्रसन्न राहशील.म्हणून सुरू केलंय."

" छान झालं.वैभव,ताई,तुझे सासरे सगळे तुझी काळजी घेतात म्हणून आम्हाला ताण येत नाही. तुझ्या सासूचे काय बिनसलंय कळत नाही." " जाऊ दे.मला सगळ्यांनी ताकीद दिली आहे की त्यांच्या बोलण्याकडे अजीबात लक्ष द्यायचं नाही. मनावर कुठलाही ताण घ्यायचा नाही. डाॅ.नीपण सांगीतलं आहे जितकं तुम्हाला प्रसन्न राहता येईल तेवढं रहा म्हणजे गोड बातमी लवकर कळेल." " बरोबर आहे त्यांच़ म्हणणं.चल ठेवते आमचे राजकुमार शाळेतून यायची वेळ झाली.ठेवते.काळजी घे.काळजी करू नको." " हो आई." अनघाने फोन बंद केला आणि पुन्हा पेंटींग करू लागली.


ऑपरेशन होऊन दोन महिने होत आले होते.एक दिवस अचानक अनघाच्या लक्षात आलं की महिना झाला आपली पाळी आली नाही.यावेळी अनघा मागच्या वेळसारखी उत्तेजीत झाली नाही.तो अनुभव गाठीशी होता म्हणून ती शांतपणे वैभवला म्हणाली " वैभव महिना झाला आज. मला पाळी आली नाही. डाॅ.कडे जाण्याअगोदर टेस्ट करून बघू." हे ऐकल्यावर वैभव पण आनंदी झाला.तरी मागच्या वेळेचा अनुभव गाठीशी असल्याने तोही उत्तेजीत न होता अनघा सारखाच शांत होता.


प्रेगा न्यूज आणुन त्यावर अनघानी टेस्ट केली ती पाॅझीटिव्ह आल्यावर अनघाला शरीरावर आणि मनावर अलगद मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. तिनी लगेच वैभवला हाक मारून सांगीतलं. तोही खूष झाला.अनघाच्या,त्यांच्या आई-बाबांना, ताईला ही बातमी सांगीतले सगळे खूष झाले. वैभव अनघा तर आनंदाच्या परमोच्च बिंदूवर होते.आज संध्याकाळी डाॅ.कडे जायचं होतं.

डाॅ.मेहतांकडे दोघंही संध्याकाळी गेले. डाॅ.च्या चेह-यावर पण आनंद होता.ते म्हणाले "आता काही दिवस खूप धावपळ करायची नाही.वजन ऊचलायचं नाही. पहिले तीन महिने नीट काळजी घ्यावी लागते.कारण गर्भ तिनं महिन्याच्या कालावधीत नीट रूजतो. म्हणून धावपळ करायची नाही. काही कामं पडून राहीलीत तर राहू द्या.आहाराकडे नीट लक्ष द्या.मी तुम्हाला आहारतज्ञाचं नाव लिहून देतो. त्यांच्याकडून आहार लिहून घ्या.समुपदेशकाकडेही जात रहा कारण खूप वर्षांनी तुमच्याकडे ही बातमी आलीय त्यामुळे योग्य आहार व्यायाम पुरेशी झोप घ्यायची आणि नियमीतपणे मी सांगीतलेल्या तारखेला तपासणीला यायचं.कळलं?" "हो.मी सगळी काळजी घेईन." अनघा बोलतानाही जाणवत होतं की ती अंतर्बाह्य मोहरून गेली आहे.

हळुहळू सगळी दिनचर्या डाॅ.नी समुपदेशकांची सांगीतल्याप्रमाणे सुरू झाली. अनघा एकटीच असताना पोटावर हात ठेऊन बाळाशी बडबड करायची. बाळाशी किती बोलू आणि किती नाही असं तिला झालं होतं. इतकी वर्षे मनातली बाळाची ओढ त्याला पोटात असतानाच त्याला सांगावी असं तिला वाटायचं. फळं जशी झाडावर लागतात तशी आनंदाची फळं अनघाच्या तनामनास लगडली होती. अख्खा दिवस तिचा आनंदात जात असे.दिवसातून दोनदा तरी ती आरश्यासमोर उभी राहून आपल्या पोटाचा आकार बघत असे आणि स्वतःशीच हसत असे.

बघता बघता अनघाला सहावा महिना संपायला आला तसं ताईंनी वैभवला सांगीतलं " आता स्वयंपाकाला बाई ठेव.तिला आता फार दगदग नको.बाकीच्या कामाला गीता आहेच.तिला सांग फार सुट्या घेऊ नको ती नाही आली तर स्वयंपाक करणारीला भांडी घासायला सांगत जा.तिला पैसे दे.घरात तू कुंचा फिरवत जा." या सगळ्या सूचनांना वैभवनी हो म्हटलं ."दोन दिवसांनी अनघाची आई येणारच आहे.मग एवढी काळजी वाटणार नाही." वैभव म्हणाला."ठीक आहे.मी जसं जमतं जाईल तशी येतच असते.तिची आई आली की काळजी नाही.चल ठेवते."

वैभवला एकदम जबाबदारीची जाणीव व्हायला लागली.आपण बाबा होणार म्हणजे त्या इवलुश्या जीवाला जबाबदारी नी आणि प्रेमानी सांभाळावं लागेल. आपण बाबा म्हणून कुठेही कमी पडायला नको.समजा अडचण आलीच तर जयंत आहेच आपल्याला सांगायला.वैभव स्वतःशीच हसला. जयंतराव खूप छान अनुभव आहे.त्याची दोन्ही मुलं फार गोड आहेत. जयंतनी बाळांची सगळी जबाबदारी बायकोवर नाही टाकली.तो सुद्धा तितकच लक्ष देतो.आपल्याला काही अडचण आली तर जयंतीलाच विचारायचं हे वैभवी मनाशी पक्कं ठरवलं.


वैभव चे आई-वडील आले होते कारण उद्या अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं होतं. वैभवच्याच सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम करणार होते. एवढं मोठं पोट घेऊन फिरताना अनघाला गंम्मत वाटायची. आज आणि उद्या वैभवनी सुट्टीच घेतली होती. काय तयारी करायची, काय सामान आणायचं यासाठी वैभवाची धावपळ होत होती. उन्हात एरवी एवढी धावपळ करायची वैभवला कंटाळा आला असता पण आता तो ही सगळी धावपळ येणा-या बाळासाठी करत होता.हा आनंद वेगळाच होता.


आज अनघाचं डोहाळजेवण होतं. हाॅल छान सुशोभीत केला होता. अनघा मनातून फुलून आली होती. तो आनंद तिच्या चेहे-यावर दिसत होता. ताईनी स्वतःलक्ष देऊन हाॅलचं डेकोरेशन केलं होतं. अनघाच्या मैत्रीणी तिच्याभोवती चिवचिवाट करत होत्या तिला तयार करता करता तिला चिडवतही होत्या. त्यांच्या चिडवण्यामुळे अनघा लाजत होतीच पण रोमांचीतही होतं होती. आजपर्यंत ती इतर बायकांच्या डोहाळजेवणाला गेली होती. त्यांचं वागणं,ऊठणं,बसणं सगळं आधशीपणे डोळ्यात साठवून घ्यायची. आज तिचं डोहाळजेवण होतं आत्तापर्यंत अशक्य वाटणारी गोष्ट त्या डाॅक्टरांनी लावलेल्या शोधामुळे आणि ताईंच्या धाडसी निर्णयामुळे शक्य झाली. अनघा आपल्याच तंद्रीत होती.


मैत्रीणी नी तिला गदागदा हलवत विचारलं "अनघा कुठे हरवलीस ?" "काही नाही असंच.."असं म्हणून हलकंसं हसली. मैत्रीणी समजल्या."कळलं आम्हाला बाळाची वाट बघतेस नं?" लवकर बाळाला आपल्या मांडीवर ठेवशील बघ." त्यांचं अजूनही चिडवणं चालुच होतं तेवढ्यात ताई त्यांना बोलवायला आली.,"झाली का तयारी?चला हाॅलवर लोकं यायला सुरुवात झाली." अलगद अनघा खुर्चीवरून उठली आणि सावकाश हाॅलवर जायला निघाली.

माधवरावांनी या संपूर्ण कार्यक्रमात फक्त मालतीबाई कडेच लक्ष देण्याचं काम केलं कारण त्यांना आपल्या बायकोच्या कुचकट स्वभावामुळे तिच्यावर विश्वास नव्हता. मालतीबाईंना ते क्षणभर दृष्टीआड होऊ देत नव्हते.एकदा मालतीबाईनी विचारलही "काय तुम्ही सारखे माझ्या मागे मागे करतात? असं करत नाही तुम्ही कधी." " हो मी नेहमी असं करत नाही पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. कुठे आनंद दिसला की त्याच्यावर विरजण कसं घालता येईल याचाच विचार तू करत असते. म्हणून मला तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतंय." या बोलण्यावर मालतीबाईं रागानी नाकाचा शेंडा उडवून तरतर चालत सोफ्यावर जाऊन बसल्या. शांतपणे माधवरावही त्यांच्या शेजारी जाऊन बसले.


डोहाळजेवण आनंदात पार पडलं. रात्री सगळा कार्यक्रम आटोपता आटोपता अकरा वाजत आले होते. घरी आल्यावर अनघा अगदी दमून गेली होती.आनंदाची बरसात झाली होती आज तिच्यावर.सगळ्यांचं आनंदाचं बोलणं,वैभवचा ताईचा आनंदी चेहरा बघून तिलाही खूप आनंद झाला.दमलेली अनघा कशीबशी आपलं पोट सावरत सोफ्यावर बसली."दमलीस तू आता जाऊन झोप.ऊद्या सकाळी उठायची घाई करु नकोस."ताई म्हणाली.तशी अनघा सोफ्यावरुन कशीबशी उठली. त्या फोमच्या सोफ्यावरून उठतांना वैभवी तिला पकडलं आणि अलगद उभं केलं आणि तिला आत घेऊन गेला.

" एवढं काय झालंय थकायला.सगळी सोंग नुसती." माधवरावांनी मालतीबाईंकडे जळजळीत नजरेनी बघीतले.त्यावर ऊसळुन मालतीबाई म्हणाल्या " का चुकीचं काय बोलले. आम्ही नाही राह्यलो का कधी गरोदर? गरोदर असूनही कामाचा डोंगर उपसत होते .या एवढ्याश्या डोहाळजेवणानी दमली. सगळी नाटकं नुसती." यावर माधवराव म्हणाले" आजचा कार्यक्रम संपला. ऊद्या सकाळीच इथून निघायचं.आपल्याला मानानी बोलावलंय वैभवनी हे विसरू नको.आज रात्रभर तोंड गप्प ठेवायचं.घरी गेलो की किती फुत्कार मारायचे ते मार." माधवराव खुप चिडून बोलत होते.

"बाबा अगदी लगेच ऊद्या का जाताय,? थांबा एकदोन दिवस." " वैभव तुला तुझ्या आईचा स्वभाव माहिती आहे नं.आता आग्रह नको करुस खूप छान झाला कार्यक्रम. अनघाचा आणि तुझा आनंदी चेहरा बघून खूप आनंद झाला मला.या आनंदावर विरजण पडू नये असं तुला वाटतं असेल तर ऊद्या आम्हाला निघू दे.थांबण्याचा आग्रह करू नकोस. कळलं नं बेटा." वैभवनी मान हलवली.आईच्या स्वभावामुळे ते लवकर जातात आहे नाहीतर ते नक्की थांबले असते. डोहाळजेवण सूद्धा तुझ्याकडे होऊ दे असं बाबांनी स्पष्ट सांगीतलं होतं ते ही आईच्या स्वभावामुळेच.वैभवलाही आता कोणताही धोका पत्करायचा नव्हता.कळतं असूनही वैभव खिन्न झाला.


"चल बेटा झोप आता. तूपण खूप दमलास. मी संध्याकाळी फिरायला जातो त्यावेळी तुला फोन करत जाईन. तुझ्या आईसमोर तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या घडामोडी मला ऐकायच्या नाही.कारण मला त्याचा निखळ आनंद घेता येणार नाही.कळलं नं तुला मी का म्हणतोय हे.?" " हो" माधवरावांनी त्याचा खांदा थोपटला आणि झोपायला गेले.वैभवपण झोपायला गेला.आत गेल्यावर त्याला दिसलं अनघा गाढ झोपली होती.आणि चेह-यावर हसू होतं.
--------------------------------------------------------------
क्रमशः. पुढचा आणि शेवटचा भाग परवा वाचा.
लेखिका ------ मीनाक्षी वैद्य.❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now