Oct 24, 2021
कथामालिका

ऋणको भाग ७वा

Read Later
ऋणको भाग ७वा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

ऋणको भाग ७ वा
मागील भागावरून पुढे वाचा.
वैभवनी त्याच्या बाबांना म्हणजे माधवरावांना ताईचा निर्णय सांगितला त्यावर ते म्हणाले “ वैभव ताईनी तुमच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही दोघं जर आमंदात राहिलात तरच या ऑपरेशनचा फायदा होईल. तेव्हा निट रहा. अनघाची मना:स्थिती तुलाच सांभाळायची आहे. आई काहीही बोलली तरी तिच्या बोलण्याकडे लक्षं देऊ नका. कळलं?” “ हो बाबा. तुम्ही काळजी करू नका. मी अनघाला सांभाळीन.” माधवरावांनी फोन ठेवून ते मागे वळले तशी त्यांना त्यांच्या मागे उभी असलेली मालती त्यांची बायको दिसली. तिच्या चेह-यावर भयंकर राग होता. हे कळूनही न कळल्यासारखं दाखवून माधवरावांनी त्यांना विचारलं.

“काय झाला? अशी रागानी का बघते आहेस?” “ तुम्हाला कळलं नाही. छान किती खोटा अभिनय करावा माणसानी.” “ आता मी कसला अभिनय केला?” “ हाच तुम्हाला काहीच कळलं नाही असं तुम्ही दाखवत आहात तोच अभिनय आहे. तुम्हाला कळलं आहे मी का रागावली आहे.” “ मी अंतर्ज्ञानी नाही. मला कसं कळेल. तू का रागावलीस. उगीच काहीतरी बडबड करायची.” “ मी उगीच बडबड करत नाही. का ममता तिचं बीजांड देते आहे. त्या अनघाला मूल होत नाही म्हणून माझ्या मुलीचा जीव तिनी का धोक्यात टाकायचा. शोधावी की तिनी दुसरी बाई.” रागारागात मालतीबाई येर-झा-या घालत मोठ्यानी बोलत होत्या.

“ममताचा जीव कुठे धोक्यात घालतेय अनघा?” “ ऑपरेशन नाही करत आहे? का त्याशिवाय ममताच्या पोटातून बीजांड बाहेर येणार आहे? सांगा न असं होणार नाही न? मग माझ्या मुलीचा जीव धोक्यात नाही का? अनघाला कोणी अधिकार दिला माझ्या मुलीचा जीव धोक्यात घालायचा?” माधवराव कपाळावर हात मारतात. “ मालती हात जोडले तुझ्यापुढे. मामाताचीच इच्छा आहे अनघाला बीजांड देण्याची. अनघानी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. या ऑपरेशनमुळे वैभव अनघाच्या घरात बाळ येईल याचा तुला आनंद होत नाही का?” “ कशावरून हे केल्यानी अनघाला बाळ होईलच?” “अग डॉ. नी सांगितलं आहे. ते खात्री असल्याशिवाय सांगतीला का?”

“ एवढा खर्चिक उपाय करायचाच कशाला?” मालतीबाईंचा राग कमी न होता वाढतच चालाला होता. “ लग्नाआधी पत्रिका बघा म्हटलं होतं पण माझं ऐकतं कोण?”
“आता इथे पत्रिकेचा काय संबंध?” “ वा कसा नाही. पत्रिकेतून दिसतं न सगळं अगदी बाळ होईल की नाही हे सुद्धा कळतं.” “मालती आपलीपण पत्रिका बघितली होती. पण त्यातून तू इतकी विचित्र स्वभावाची असशील हे कुठे कळलं नाहीतर तेव्हाच मी तुझ्याशी लग्न केलं नसतं.” “ काय मी विचित्र स्वभावाची आहे. छान इतकी वर्ष कधी तुम्हाला माझ्या स्वभावातील दोष दिसले नाही आता सुनेचा पुळका आला म्हणून मी विचित्र वाटायला लागली का?”
“तुझ्या या विचित्र स्वभावामुळे आपली मुलंच काय सगळे नातेवाईकही आपल्यापासून लांब गेलेत. काधी त्यांना आमंत्रण केलाच तर बिचकत येतात. कारण पाहुण्यांना घरी बोलावूनही तू त्यांचा छान अपमान करू शकते. हे सगळ्यांना माहिती आहे.” बोलता-बोलता माधवराव खुर्चीवर विमनस्क अवस्थेत बसले.


मालतीला कसं समजवायचं त्यांना कळत नव्हतं. “ तुम्हाला माहिती आहे न तिच्या एका मावशीला मूल झालच नाही.. दुस-या मावशीला कितीतरी वर्षानी मूल झालं. आता अनघाची तशीच कथा आहे. उपचार करूनही काही झालं नाही तर पैसे तर गेलेच असं होईल न? वैभावालाच भुर्दंड पडणार. ती काय नोकरी करत नाही कि कुठून पैसे कमावत नाही.”
“मालती अग कुठली गोष्ट कुठे नेऊन सोडते. वैभवलाही बाळ हवं आहे नं? अनघा त्याची बायको आहे. दुस-या कोणा बाईसाठी तो एवढा खर्च करत नाही. जरा पटेल असं बोलत जा.”
“तुम्हाला सगळं गोडगोड ऐकायची इच्छा असते. मी खरं बोलले की तुम्हाला टोचतं.म्हणून मला सगळं सांगत नाही यावेळी.”

“ कसं सांगणार? तुझी प्रत्येक गोष्टीला नकारघंटा वाजवण्याची सवय माहिती आहे. या उपचाराला तुझा नाट लागू नाही म्हणून सांगत नाही. अग जे बाळ येईल ते तुझाही कोणीतरी असणार नं! त्या येणा-या बाळाकडे, त्याच्यामुळे आपल्या घरात येणारा आनंद याकडे बघ नं. कशाला उगीच वेडे-वाकडे विचार मनात आणायचे आणि रागावून बसायचं. सतत कानात गुण-गुणणा-या डासासाराखी बडबड करत बसायचं.” माधवरावांनी जरा चिडून आणि हताश होऊन मान झटकली.
“ हे बघ या विषयावर तू अजिबात अनघाला फोन करून तिला त्रास द्यायचा नाही. मला ते आवडणार नाही. पूर्ण उपचार होईपर्यंत ती आनंदित राह्यला हवी. वैभवला सुद्धा तू फोन करायचा नाहीस. जे काय असेल ते मी तुला सांगत जाईन. कळलं? “ एवढं बोलून माधवराव पायात चपला अडकवून तडक बाहेर जायला निघाले. “आत्ता एवढ्या उन्हाचं कुठे जाताय?” “डोकं जरा शांत करून येतो.”

संध्याकाळी ताई आणि मुकुंदराव डॉ. मेहतांच्या दवाखान्यात आले होते. आपला नंबर येईपर्यंत वाट बघत बसले होते. जवळपास अर्धा तास झाला होता त्यांना येऊन. एवढ्यात त्यांचं नाव पुकारल्या गेलं. “ ममता मुकुंदराव कोल्हटकर कोण आहे?” ममता गडबडीनं उभी राहिली आणि म्हणाली “ मी आहे.” “ आत जा.” रीसेप्शानिस्ट बोलली. दोघाही आत गेले.
“नमस्कार डॉ. मी ममता कोल्हाटकर.” “नमस्कार बसा” डॉ. म्हणाले.

“डॉ. मी आपले पेशंट असलेल्या वैभव पांगारकर यांची मोठी बहीण.” अच्छा.” “मी माझं बीजांड माझ्या वहिनीला द्यायला तयार आहे.” तिचं बोलण मधेच तोडत मुकुंदरावांनी बोलण्याची सूत्र आपल्याकडे घेतली. “डॉ. ममताला तिचं बीजांड द्यायचं आहे पण हे मोठ ऑपारेषन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटायला आलो. मनात काही प्रश्न आहेत ते तुम्हालाच विचारवं असं वाटलं ” “छान केलत तुम्ही आलात.” “ यात ममताला काही धोका नाही न? म्हणजे ऑपारेषन नंतर तिला काही दुसरा त्रास जडणार नाही न?” “नाही. असं काही होणार नाही. तुम्हाला बीपी, शूगर काही आहे का?” “नाही.” मग तर काहीच प्रश्न नाही. या दोन गोष्टी असल्यातर जरा काळजी असते. पांगारकरांनी येऊन ऑपारेशन नक्की करायचं सांगितलं की मी लगेच पुढील तयारीला लागतो. तुमच्या काही टेस्ट करून घ्याव्या लागतील.”

“ आत्ता सांगताय का?” “ येऊ द्या पांगारकरांना मग सांगतो.” “ ठीक आहे. मग आम्ही निघू?” “ हो. आणि अजिबात काळजी करू नका. सकारात्मक रहा. तुमच्या वाहिनीलाही सकारात्मक राहण्यात मदत करा. मी त्यांना ऑपारेषन पूर्वी आणि बाळंतपण होईपर्यंत समुपदेशन करून घ्या असं म्हणालो होतो. कारण त्या मला हळव्या स्वभावाच्या वाटल्या.” “ हो डॉ. ती थोडी हळवी आहे. ठीक आहे निघतो.” नमस्कार करून दोघही मेहतांच्या दवाखान्यातून बाहेर पडले. “घरी गेल्यावर वैभवाला फोन करून सांग उद्या लगेच डॉ. जाऊन भेट म्हणा. आता सगळ्या पाया-या पटापट चढल्या पाहिजे.” मुकुंदराव म्हणाले. ताई तर खूप उत्तेजित झालेली होती.


कधी घरी जाते आणि वैभवाला फोन करते असं तिला झालं होतं.
तेवढ्यात तिला माधवरावांचा फोन आला. “ हं बाबा आम्ही आत्ताच डॉ. कडून निघालो. उद्या वैभव त्यांना भेटला की ते मला काही टेस्ट करायच्या आहेत ते त्याला सांगतील. तुम्ही सहज फोन केला होता?” “तुला तुझा आईचा फोन आला तर तिच्याशी वाद न घालता सरळ फोन ठेवून दे. नाहीतर घेऊच नकोस तिचा फोन.”“का? असं काय झाला?” “अग ती वेड लागल्यासारखं बोलतेय. तुलाही काहीबाही बोलेल तर तुझी मना:स्थिती बिघडेल. आता हे ऑपरेशन होईपर्यंत तुझी आणि अनघाची मना:स्थिती उत्तम राह्यला हवी. आताच माझं आणि तिचं जरा झमकलं म्हणून जरा बाहेर देवळात येऊन बसलोय. सकाळीपण वाद झाला तेव्हाही इथेच येऊन बसलो होतो.” “ बाबा तुम्ही काळजी करू नका. आईचा फोन आलाच तर मी काय बोलायचं ते बोलीन. ठेवू का. निघतो आम्ही घरी जायला. तुम्हीपण शांतपणे जा. संध्याकाळ आहे. संध्याकाळ कसली रात्रच झाली आहे रस्ता सावकाश ओलांडून जा.”


मुकुंदरावांना तसा थोडा अंदाज आला होता. घरी जाऊन सविस्तर ममताला विचारू असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी बाईक सुरु केली. ताई बाईकवर बसता-बसता पुटपुटली “ ही आईपण एक कोडंच आहे. काय मिळतं असं विचित्र वागून तिला कुणास ठाऊक?” “ काय ग काही म्हणालीस का?” मुकुंदरावांनी मागं वळून ताईला विचारल. “ काही नाही. घरी गेल्यावर सांगीन.” आणि दोघं घरी जायला निघाले
घरी पोहोचताच ताईनी वैभवला फोन लावला. डॉ. काय म्हणाले ते सांगितलं. आईबद्दल बाबा काय म्हणाले तेही सांगितल. वरून ती हेही म्हणाली “वैभव अनघाला यातील काही सांगू नको. तिला कुठलाही ताण आपल्याला आता द्यायचा नाही. ऑपरेशन ते बाळंतपण होईपर्यंत ती कधी निराश किंवा ताणाखाली असणार नाही याची आपणच काळजी घायायाची आहे. विशेषत: तू. कळलं?”

“ हो. कळलं. ताई मी सगळं करायला तयार आहे. मलापण बाळ हवाय ग. मी मित्रांकडे बघतो न किती उत्साहात बोलतात आपल्या मुलांबद्दल. तेव्हा मला त्यांचा हेवा वाटतो. मलाही बाबा व्हायचंय ग.” हे बोलतांना वैभवचा आवाज भरून आला. ताईच्या हे लक्षात आलं. ती लगेच म्हणाली “ वैभव काळजी करू नको. तू नक्की बाबा होणार. आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. डॉ. मेहता म्हणाले तसं अनघाला समुपदेशकाकडे घेऊन जा. आजपण डॉ. मला म्हणाले की तुमची वाहिनी हळवी आहे. तिला या पूर्ण काळात समुपदेशनाची गरज लागेल.” “ हो उद्या दवाखान्यात गेलो की त्या समुपदेशकांचा नंबर घेतो. ठेवतो. अनाघाला सांगतो.”

वैभवनी अनघाला ताई काय म्हणाली ते सांगितलं. उद्या सकाळीच आपण जाऊ डॉ.कडे मी उद्या सुट्टी घेतो. अनघाचा चेहरा आनंदानी फुलला. तिचा चेहरा बघून वैभवही खूष झाला. तो फक्त तिच्याचकडे बघत राहिला. आणि अनघा ती बाळाच्याच विचारात गुंतली होती आणि तिच्या चेह-यावर हसू होतं.
क्रमश: पुढचा भाग परवा वाचा.
लेखिका--- मीनाक्षी वैद्य.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now