Oct 18, 2021
कथामालिका

ऋणको भाग ५ वा

Read Later
ऋणको भाग ५ वा
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

ऋणको भाग ५ वा..

मागील भागावरून पुढे..

वैभव मघाशीच ऑफीसामधून घरी आला होता. अनघा त्याच्यासाठी चहा करायला आत गेली होती. वैभव येण्या आगोदरच अनघानी चहा आणून टेबलावर ठेवला. “ताई चहा घ्यायला इथे येताय कि तिथे आणू.?” ताईनी चकीत होऊन अनघाकडे बघितलं. अनघाच  बोलतेय की आपल्याला भास होतो आहे  याची तिनी खात्री करून घेतली. कारण मघापासून म्हणजे दुपारचा चहा झाल्यापासून अनघा काही बोलली नव्हती, “येते तिकडे” ताई उठून टेबलापाशी गेली.

 

टेबलाची खुर्ची ओढून ती त्यावर बसली तेव्हाच वैभव आला आणि चहा बघताच म्हणाला “अरे...चहापण तयार.” हे ताईकडे बघूनच बोलला आणि खुणेनीच अनघा कशी आहे ते विचारलं. ताईनी मान नकारार्थी डोलावली. वैभव काही न बोलता चहा घ्यायला येऊन बसला. त्याच्यासमोर अनघा बसली होती पण अगदी निर्विकार

चेह-यांनी. वैभवला तिचा चेहरा बघवत नव्हता. काहीतरी बोलायला हवं म्हणून तो बोलला. “ताई काय स्पेशल केलं होतं जेवणात आज अनघानी?” “अरे मीच तिला आवडते म्हणून फणसाची भाजी आणली होती पण तिला बहुदा आवडली नसावी. कारण ती काहीच बोलली नाही.” दोघांनी अनाघाकडे बघितलं ती चहाच्या कापाकडेच बघत बसली होती. दोघांनी एकमेकांकडे बघितलं शब्दांशिवाय दोघांना कळलं कि दोघांनाही एकमेकांना काय सांगायचं आहे.

 

“अनघा ताई काय म्हणतेय आज तिनी तुझ्यासाठी फणसाची भाजी आणली. ती तुला आवडली नाही. असं तिला वाटतय.” यावर अनघाच्या तोंडून काहीही शब्द बाहेर पडले नाही. वैभवनी मान हलवत हताश झाल्याचं दर्शवलं. त्यांनी अनघाचा हात जोरात हलवला तेव्हा ती भानावर आली. वैभवनी पुन्हा विचारलं “ अनघा” अनघा भानावार येत म्हणाली “ काय झालं?” “तेच आम्ही दोघं तुला विचारतो आहे. काय झालं? एवढी कोणत्या विचारात गुंतली आहेस? ताई म्हणतेय आज अनघाला फणसाची भाजी आवडली नाही असं वाटतंय कारण ती काहीच बोलत नाही.” “ ताई असं नका वाटून घेऊ. भाजी खूप छान झाली आहे. पण आज मलाच काही कळत नाही आहे. मी काय जेवतेय, काय करतेय.” तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. वैभव चटकन तिच्या शेजारी जाऊन बसला.

“अनघा कशाचा एवढा विचार करतेय सांग तर. तू सांगीताल्या शिवाय आम्हाला कसं कळेल?” “माझ्या मनात सारखा त्या उपचार पद्धतीचा विचार येतो. कसं सगळं होणार?” वैभवनी ताईकडे बघत स्मित केलं. दोघांची जी अटकळ होती ती खरी ठरली होती.  “उपचार आपण करणार आहोत आपलं ठरलंय अनघा.” “ हो ठरलंय पण एवढा पैसा कुठून आणायचा?” “ त्याचा तू आत्ताच का विचार करते आहेस?” “ का आत्ता नको करू? वैभव या घराचे हप्ते चालू आहेत. हे मेजर ऑपरेशन  आहे. आपण बीजांड तरी कोणाला मागणार? जी द्यायला तयार होईल तिलासुद्धा पैसे द्यावे लागतील. हे कसं जमणार आहे सगळं?” “तू शांत हो.” वैभव तिचा हात थोपटत म्हणाला. “ कशी शांत होऊ? त्यात मी नोकरी करत नाही. माझी तुला काहीच मदत होणार नाही.” आणि रडू लागली. “ अनघा तू नोकरी करत नाहीस याचा इथे काय संबंध? मला माहिती आहे आईच्या बोलण्यामुळे तुझ्या डोक्यात हे येतंय. आजपर्यंत तू नोकरी केली  नाहीस म्हणून कधी अडलं का? सांग नं?” “ नाही. पण या उपचारासाठी खुप पैसा लागेल.” “हे बघ अनघा आपण अजून डॉ. मेहतांना हो सांगितलं नाही. त्यांना हो सांगितल्यावर ते खर्चाचा  अंदाज सांगतील. मग आपण जमतंय का याचा विचार करू,”

 

“माझ्याच वेळी असं का झालं? मलापण इतर बायकांप्रमाणे   सहजपणे का मूल झालं नाही” पुढे तिला काही बोलणच अशक्य झालं. वैभव नी तिच्या हातावर थोपटून तिला शांत करायचा प्रयत्न केला. ताई म्हणाली “ वैभव समजा मी अनघाला बीजांड दिलं तर?” क्षणभर वैभवला कळलच नाही की ताई काय बोलली. लक्षात आल्यावर तो म्हणाला “ताई...अग हा एवढा मोठा निर्णय एकदम नको घेउस.” अनघाच्या कानावर काहीतरी पडलं. बीजांड हा शब्द ऐकताच ती मनातून शहारली. तिनी लगेच  वैभवला विचारलं “वैभव ताई काय म्हणाल्या?”“ताई तुला बीजांड देईन असं म्हणतेय.”

अनघा पटकन ताईजवळ जाऊन  बसली आणि म्हणाली ”ताई तुम्ही मला बीजांड दिलात तर मला खूप आनंद होईल कारण त्यासाठी आमची होणारी धावपळ वाचेल आणि बाळाची प्रतीक्षा पण लवकर संपेल. पण... ताई हा खूप मोठा निर्णय आहे. तो काही सेकंदात नका घेऊ. त्यावर विचार करा.” “ हो ताई मीपण तेच म्हणतोय.”वैभव बोलला. “अरेपण मी मनाशी ठरवलं आहे मी अनघाला बीजांड देणार.” ताई ठामपणे म्हणाली. “ आमच्या झोळीत सुखं टाकण्याच्या प्रयत्नात काहीच विचार न करता निर्णय घेऊ नका.” अनघाचे डोळे भरून आले. ताईलापण राहवलं नाही तिनी अनघाला जवळ घेतलं.

 

“ताई  तू आधी घरी मुकुंदरावांशी बोल. आनंद निनादशी बोल. आता ते दोघही मोठी झालीत त्यांचाही विचार तुला घ्यावा लागेल.” “का? अरे मी माझ्या शरीराबाबत निर्णय घेऊ शकते.” ताई बोलली. तिच्या चेह-यावर ठामपणा दिसत होता.  “निश्चित घेऊ शकते पण हे खूप मोठं ऑपारेशन आहे. म्हणून सगळ्यांचे विचार घेऊन सगळ्यांच्या संमतीने निर्णय घे.” वैभव म्हणाला. अनघा म्हणाली   “ताई या ऑपरेशन नंतर तुम्हाला खूप सांभाळून राहावं लागेल. काय पथ्यपाणी असेल, ऑपरेशननंतर किती थकवा येईल या सगळ्याचाच विचार करावा लागेल.”

ताईला त्याही परिस्थितीत अनघाची शांतपणे विचार करण्याची पद्धत आवडली. बीजांड इतक्या सहज मिळू शकतात हे कळूनही ती हुरळली नाही तर माझ्या तब्येतीचा पण तिनी विचार केला. एवढ्या गुणी मुलीला का देव असं छळतोय असं ताईला वाटलं.

“ताई मी काय म्हणालो ते कळलं न तुला?” “ हो” ताई म्हणाली. “ “मग उद्या तू घरी गेल्यावर सगळ्यांशी बोल. हवं तर डॉ. मेहतांना भेटा आणि बोला. मुकुंदरावांच्या मनात काही शंका असतील तर त्यांना त्या शंका डॉ. ना विचारू दे. आपल्याला डॉ.ना  हो सांगायची घाई नाही.” “ हं” यावर ताईनी फक्त हुंकार दिला.

“जेवायची वेळ झाली आहे. अनघा तुझा मूड आहे की बाहेरून डबा मागवू?” “ वैभव आज डबाच मागव. अनघाला विश्रांती हवी आहे. विचार करूनच ती दमली आहे.” ताई  म्हणाली. “ठीक तसचं करतो.” वैभवनी  डबा सांगण्यासाठी फोन लावला.

 

जेवण झाल्यावरही याच विषयावर तिघांची बरीच चर्चा झाली. शेवटी वैभव म्हणाला “ ताई उद्या सावकाश बोल सगळ्यांशी. उद्या जर नाहीच जमलं तर परवा बोल. काही घाई करू नको. आपल्याला सगळ्यांच्या संम्मतीने हा निर्णय घ्यायचा आहे . तरच त्या उपचाराचा आनंद आणि बाळ झाल्याचा आनंद होईल.” “ ताई आम्ही बाळाच्या आनंदात राहू पण कुणाच्या मनात जर आक्षेप असेल तर तो निखळ आनंद आम्हाला मिळणार नाही. म्हणून घाई करू नका.” “अनघा किती सगळ्यांचा विचार करतेस. एखादी मुलगी सहज बीजांड मिळताहेत कळल्यावर हुरळली असती पण तू किती विचार करते आहेस या गोष्टीवर. मला तुझा खूप अभिमान वाटतो.” अनघा हसली पण त्यात खिन्नता होती. घडयाळात १ वाजला तशी ताई म्हणाली “ वैभव आता झोपूया. उद्या तुला ऑफीस आहे.” “ हो झोपूया. तू उद्या राहतेस की..” हे वाक्य वैभव अनाघाकडे बघत बोलला. तिची यावर काही प्रतिक्रिया नव्हती. ताईला वैभावचं मन कळत होतं. ती म्हणाली “वैभव उद्या सकाळी बघे काय करायचं?” “ चालेल.”

तिघही झोपायला गेले. “ अनघा फार विचार करू नकोस सगळं ठीक होईल. शांतपणे झोप.” वैभवच्या या बोलण्यावर अनघा कसबसं हसली आणि “ हो “ म्हणाली. ऑफीसचं काम, अनघाच्या वागण्याचा ताण, रस्त्यावरच्या गर्दीचा ताण या सगळ्यामुळे  वैभव खूप थकला होता. त्यामुळे त्याला गादीवर पडल्या-पडल्या झोप लागली. अनघाचे डोळे मात्र टक्क उघडे होते. विचारांचे पक्षी तिच्या मनात इतके धुमाकूळ घालत होते की डोळ्यात झोप यायलाच तयार नव्हती. विचारांच्या ताणानी तिच्या डोळ्यातून पाणी वाहात होतं ते ती अडवायचा प्रयत्नही करत नव्हती. डोळ्यातून ओघळलेल्या पाण्यातून मनावरचा ताण निघून जातो हे माहिती असल्यानेच ते पाणी ती अडवत नव्हती. ते शेवटी तिच्या गालावरच वाळून गेलं. तरी तिला झोप येत नव्हती.

विचारात गुंतलेल्या अनघाला केव्हातरी झोप लागली. अलार्म झाला तसा वैभव उठला. त्यांनी अनाघाकडे बघितलं तर ती गाढ झोपली आहे असं लक्षात  आलं. अलार्मच्या आवाजानीसुद्धा तिला जाग आली नव्हती. तो गादीवरून उठला आणि अनघाच्या बाजूला आला तसं त्याला तिच्या गालावर डोळ्यातून ओघळलेलं  आणि गालावर सुकलेलं पाणी दिसलं. त्याला मनातून फार वाईट वाटलं. तो पावलांचा आवाज न करता खोलीबाहेर पडला आणि हळूच खोलीचं दार लोटलं.

ताई स्वयंपाक घरात चहा करत होती. वैभव स्वयंपाक घरात गेला तसं ताईने त्याला विचारलं. “ कायरे अनघा उठली का?” “ नाही झोपली आहे. रात्री बहुदा तिला बराच वेळ झोप लागली नसावी. ती रडत होती बहुदा कारण तिच्या गालावर डोळ्यातलं पाणी ओघळून सुकलेलं दिसतंय.” “ हं... ती ही अवस्था किती आणि कशी सहन करणार त्यात आपली आई. तीनी खूप छान घाव घातला तिच्या मनावर.” ताईनी चहा गाळून वैभावच्या हातात कप दिला.

वैभवही खूप अस्वस्थ झाला. ताईनी विचारलं “डब्यात कोणती भाजी देऊ. मी करते तुझा डबा. अनघाला झोपू दे.” “ताई तू डब्याचं राहू दे. मी कॅन्टीनमध्ये जेवीन. तू नाश्त्याला पोहे कर.” “ बरं करते. चहा झाला की तू आवर मी तोवर पोहे करते.” “ तू राहशील का आज?” “ अनघा उठल्यावर बघू कशी आहे. वाटलं तर राहीन.” “ठीक आहे. चल मी आवरतो.” चहा संपवून वैभव ऑफीसाच्या तयारीला लागला. ताईनी पोहे करून टेबलावर आणून ठेवले. प्लेट,चमचे, पाणी आणून ठेवलं मग आपला चहा घेऊन समोर सोफ्यावर येऊन बसली.

 

चहा घेत ताईच्या डोक्यातपण या उपचाराबद्दलच  विचार चालू होते. तेवढ्यात तिचा फोन वाजला. उठून तिनी फोनमध्ये बघितलं तर तिच्या मिस्टरांचा म्हणजे मुकुंदरावांचा फोन होता. “हा बोला.” “कशी आहे अनघा? तू आज येते आहेस का?” ताईनी त्यांना त्या उपचाराबद्दल सांगितलं. यावर तिची आई काय म्हणाली ते सांगितलं. त्यामुळे अनघाची झालेली अवस्था सांगितली. यावर मुकुंदराव म्हणाले “धन्य आहे तुझी आई. अनघाला सावरायला    हवं नाहीतर एवढा शंभर टक्के खात्री असलेला उपचार सुद्धा करता येणार नाही.” “ हो नं. वैभवला तीच काळजी वाटतेय. काल रात्री तिला बराच वेळा झोप नव्हती असं वाटतय वैभवला. त्यात ती रडली  असावी असही त्याला वाटतंय. अजून झोपलीच आहे ती.” “हो का. अग तिचं अस्वस्थ होणं आणि विचार करून रडणं हे होणारच. वैभव कसा आहे? गेला का ऑफीसाला?” “ नाही  तयारी करतोय. अनघा अजून झोपली आहे. उठल्यावर ती कशी असेल माहित नाही. एकटी असेल तर नाश्ता करेल की नाही माहित नाही. अनघा उठली की मी निघते.”

“अग आत्ता लगेच नको निघू. रहा तू. मीच संध्याकाळी येईन. तेव्हा बघू अनघाची अवस्था कशी आहे. ती ठीक असली तर माझ्याबरोबर चल नाहीतर आजही रहा. आम्ही इथे सांभाळू. तुझीच मदत लागणार त्यांना.” “हो. ठीक आहे. वैभवचं आवरलंय त्याला नाश्ता देते. या तुम्ही संध्याकाळी. ठेवते.” ताईनी फोन ठेवला.

“मुकुंदरावांचा फोन होता?” वैभवनी विचारलं “हो. येतो म्हणाले संध्याकाळी. अनघा कशी आहे विचारलं मग मी सांगितलं सगळं. फोन करून आपल्या आईनी केलेला कारभार सांगितला. त्यांनाही आईचा राग आला. म्हणाले आत्ता थांब संध्याकाळी मी येतो अनघा ठीक असेल तर ये माझ्याबरोबर नाहीतर थांब ताईकडे.” “ताई तुम्ही दोघं आहात म्हणून आम्हाला किती आधार आहे.” ताई यावर फक्त हसली आणि वैभवच्या गालावरून प्रेमानी हात फिरवला. तसं वैभवच्या डोळ्यात पाणी आलं.”अरे वेड्या रडतो का मी लहानपणा पासूनच तुझ्या पाठीशी आहे. मग आत्ताच कसा माझा आधार काढून घेईन. आता मी सगळे उपचार होईपर्यंत तुमच्या  सोबतच राहणार.  चल नाश्ता कर. मी आहे काळजी करू नको. अनघा जेव्हा उठेल तेव्हा उठू दे.” “ ठीक आहे. ताई तू स्वयंपाक करू नकोस कालसारखा डबा सांगतो.” “ अरे कशाला?’ “ तू आराम कर. चाल मी निघतो” वैभव निघाला.

वैभव ऑफीसाला गेला. पुन्हा ताई एकटीच होती घरात. माणूस एकटा असला आणि आजूबाजूला चिंतेचं वातावरण असलं तर मग त्याच्या डोक्यात काय उलथापालथ होईल सांगता येत नाही. ताईचं आत्ता तसच झालं. या समस्येवर तोडगा कसा निघेल? आपल्या घरचे माझ्या निर्णयाला संम्मती देतील का? अनघा सगळ्यांची आवडती आहे पण हा प्रश्न खूप नाजुक आहे. ऑपरेशन मोठं असल्यामुळेच घरचे याबद्दल कसा विचार करतील आणि काय निर्णय घेतील हे खरच सांगणं कठीण आहे.

 ताई अजून कितीवेळ विचारात गुंतली असती कुणास ठाऊक. दारावरची बेल वाजल्यानी तिची विचारांची साखळी तुटली. ताईनी दार उघडलं. दारात अनघाची कामवाली गीता उभी होती. “ अरे ताई तुम्ही कधी आलात?” “ कालच आले दुपारी.” “ रहाणार न? रहा दोनतीन दिवस अनघाताईला बरं वाटेल.” “ बघते.” ताई उत्तरली गीता आत कामाला गेली. दार लावून ताई एकदा अनघाच्या खोलीत डोकावली. अनघा गाढ झोपली होती.

“ गीता आज अनघाची खोली झाडू-पुसू नको ती झोपली आहे.”

“ठीक आहे. अनघा ताईला बरं नाही का?” “थोडा तापासारखं  वाटतय.” एवढं बोलून ताई सोफ्यावर येऊन बसली. पुन्हा तिच्या डोक्यात विचारमंथन सुरु झालं.

------------------------------------------------------------------------------क्रमश: पुढचा भाग परवा वाचा.

लेखिका मीनाक्षी वैद्य.

 

 

 

     

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now