ऋणको भाग ३ रा

अनघाची बाळाबद्दलची ओढ या कथेत रंगवली आहे.

    ऋणको भाग ३ रा



 मागच्या भागावरून पुढे ...



वैभव सकाळी ऑफीसला जाण्याची तयारी करत असतांनाच त्याच्या आईचा फोन आला. तयारी करता-करता फोन स्पीकरवर ठेवून तो बोलू लागला. “हं आई बोलं.”“ काय बोलणार? बोलायला काही बाकी ठेवलस?”“असं का म्हणतेस आई. मला कळलं नाही.” “कसं कळणार. काल आपल्या बाबांशी बोललास. आई तुझी कोणीच नाही. हो नं?” “ आग असं का म्हणतेस? रात्र खूप झाली होती म्हणून बाबांना सांगितलं तुला आज सविस्तर फोन करणार होतो. बाबांनी तुला सांगितलं असेल नं?” “ हो सांगितलं. किती खर्च येणार आहे या उपचारांना ?” “अजून माहित नाही. ही शस्त्रक्रिया करायची ठरवली की ते सांगतील. बीजांड देऊ शकेल अशी स्त्री पण शोधायची आहे.”



“वेड लागलाय तुला. त्या डॉ.चं काय ऐकतोस. डॉ. काय वाट्टेल ते सांगतात. म्हणून सगळंच त्यांचं ऐकायचं नसतं.” “आई अग डॉ. कशाला वाट्टेल ते सांगतील. मला काळात नाही तू असं का बोलते आहेस.”“मी काही चुकीचं बोलत नाही. कशाला एवढा खर्च करायचा? तुला झेपणार आहे का? तुझी बायको नोकरी करत नाही तुझ्यावर किती बोझा पडेल याचा विचार केला का?” “ माझी बायको! अग ती तुझी सून आहे. अनघा नाव आहे तिचं” “असेल. तिच्या माहेरी तिच्या एका मावशील मुलाबाळच नाही तर दुसरीला किती वर्षांनी झालं. हे तुला माहिती आहे तरी एवढा पैसा खर्च करतोय. तिची पत्रिका बघितली असती न तर हे सगळं आधीच कळलं असतं. पण तू कुठे माझं ऐकतोस?” वैभवला काय बोलावंच सुचत नव्हतं. फोनमधून त्याला त्याच्या बाबांचा चढलेला आवाज ऐकायला आला.” मालती तू काय बोलतेस ते कळतंय का? ठेव फोन त्यांच्या आयुष्याचे त्यांना निर्णय घेऊ दे. आपलं तोंड जरा गप्प ठेव. तुला तुझ्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देता येत नसतील तर शाप तरी देऊ नको.” “तुम्ही आपली बडबड थांबवा. वैभव बाबांचं ऐकू नकोस.” तेवढ्यात अनघा तिथे आलेली त्याच्या लक्षात आलं त्यानी फोन कट केला. त्याला फार वाईट वाटलं कारण अनघाचा चेहरा रडवेला झाला होता. आईचा परत-परत फोन येत होता पण वैभवनी घेतला नाही.



तो अनाघाजवळ आला. ती हातानी चेहरा लपवून हुंदके देत होती. वैभव हळूच तिच्याजवळ बसला. तिला म्हणाला “ अनघा तू आईचं बोलणं मनावर घेऊ नको. तिचे विचार कसे आहेत तुंला माहिती आहे नं?आपण सगळे उपचार करायचे आहेत. आपल्या आयुष्यातील हा महत्वाचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. आणि तो आपण घेतला आहे त्यामुळे बाकी लोक काय म्हणतात याकडे आपण लक्षं द्यायचं नाही. अगदी माझी आई असली तरी. कळलं.”



वैभवला वाटलं आपण उगीच फोन स्पीकरवर ठेवला. फोन स्पीकरवर असल्यामुळेच आईचं बोलणं अनघाला कळलं. पण आपल्याला तरी कुठे माहिती होतं आई असं काही बोलेल. त्याक्षणी वैभवाला आपल्या आईचा प्रचंड राग आला. किती प्रयत्नांनी अनघा आता सकारात्मक्तेनी  या उपचारांकडे बघतेय. आईच्या या कुचकट बोलण्यानी सगळ्यावर बोळा फिरवला. आता अनघानी  जर आपलं पाउल मागे घेतलं तर कसं होईल. वैभवचं डोकं काम करेनासं झालं. तो हळूच उठला आणि ऑफीसाला जाण्याची तयारी करू लागला. वैभव ऑफीसला जायची तयारी करतोय हे कळल्यावर अनघा चटकन उठली आणि खोलीबाहेर पडली. तिला जाताना पाठमोर बघितलं तसं वैभवचा जीव कासावीस झाला. लंचटाईम मध्ये आईशी  जरा कडक भाषेतच  बोलायला हवं हे वैभवच्या लक्षात आलं.  



तयार होऊन वैभव खोलीबाहेर पडला. त्याला अनघा टेबलावर नाश्त्याची मांडा-मांड करतांना दिसली. तिची चाल हळू झाली होती. चेहराही उतरलेला होता. टेबलावर त्याचा डबा भरून ठेवलेला दिसला. त्याला उगीचच अपराधी वाटू लागलं. अनघाला मुल होत नाही हा तिचा एवढा मोढा अपराध आहे का? काल आपल्या मनात आलं बाईला मूल झालं नाही तर घरचे त्याचं दुसरं लग्न लावतात ही केवढी मोठी चूक आहे. चूक नाही जिला मूल होत नाही तिच्यावर हा अन्याय आहे. पण आज...आज आपलीच आई या उपचारा विरुद्ध आहे. स्पष्ट म्हणाली नाही तरी तिचं पण मन आपलं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे हे लक्षात आलं आहे. हे आईचं  विचित्र वागणं बोलणं थांबवायलाच हवं.



विचारात असतानाच तो टेबलाजवळ आला. तिथे एकच प्लेट बघून त्याच्या लक्षात आलं. आता हिला आपल्याबरोबर नाश्ता करायला लावला नाही तर ही दिवसभर काहीच खाणार नाही. म्हणून तो तिला म्हणाला  “अनघा तू पण ये नां” खुर्चीवर बसता-बसता  वैभव अनघाला म्हणाला. “हं” एवढाच हुंकार देऊन तीपण त्याच्याबरोबर नाश्ता करायला बसली. तिची सगळी हालचाल मुकाटपणेच चालू होती. डोळ्याच्या कोप-यातून वैभव तिच्याकडे बघत होता आणि नाश्ता करत होता. खरतर आईच्या बोलण्यामुळे त्याच्या तोंडाची चवच गेली होती. नाश्ता कारायची सुद्धा त्याला इच्छा नव्हती. पण जर त्याने खाल्लं नसतं तर तीनही खाल्लं नसतं म्हणून तो जबरदस्ती उपम्याचा घास तोंडात घेत होता. दुपारी अनघाला फोन करून जेवलीस का विचारायला हवं नाहीतर अशीच संध्याकाळपर्यंत बसून राहील.



नाश्ता संपवून तो बसला होता. कारण अनघाचं खाणं खूपच हळू चाललं होतं. “ अनघा अगं अजून काहीच खाल्लं नाहीस तू. मला निघायचं आहे ऑफीसाला.” “तू जा ऑफीसला. मी खाते हळू-हळू.” तिचा आवाज एकदम निर्विकार होता. तो मनाशीच चरकला. अनघा कितीही चिडली तरी अशी निर्विकारपणे उत्तर देत नाही. आज आईच्या बोलण्यानी सगळा घोटाळा केलाय.बाळासाठी आसुसलेल्या एका स्त्रीचा आईनी अपमान केलेला होता. अनघा कसं सहन करू शकेल हे. ऑफीसाला जावं की नाही हाच विचार तो करत होता. पण काल सुट्टी झाली आज जावं लागेल.जरा अनिछ्चेनीच वैभव खुर्चीवरून उठला. त्याला निघावच लागणार होतं कारण आधीच त्याला अर्धा तास उशीर झाला होता.



डबा घेऊन अनघाच्या डोक्यावर हलकच थोपटत तो घरातून बाहेर पडला. बाईकपर्यंत येता-येता त्याला प्रकर्षानी वाटलं की आपण ताईला फोन करावा. सगळं सांगावं आणि तिला जमलं तर घरी ये अनाघाजवळ असं सांगावं.



ताईची अनघा लाडकी होती ती नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. पण क्षणात ती खात्री नाहीशी झाली. त्याच्या मनात आलं आई अशी वागेल असं कुठे वाटलं होतं आपल्याला. ‘हं...’ एका मोठा उसासा त्याच्या तोंडून बाहेर पडला. त्यानी शांतपणे डोक्यावर हेल्मेट घातलं आणि बाईक चालू करून ऑफीसच्या दिशेनी निघाला.    





ऑफीसमधे पोचताच जयंतनी विचारलं. “ कारे वैभव आज एवढा उशीरा? घरी ठीक आहे न? तुझा चेहारा इतका का उतरला आहें?” त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता वैभव आपल्या जागेवर जाऊन बसला. जयंत त्याच्या टेबलापाशी आला. हळूच विचारलं उपचारात काही अडचण आली का?” वैभव चुपच होता. “ अरे बोल काहीतरी. तू काही बोलल्याशिवाय मला कसं कळेल.” “जयंत माझी आई या उपचाराच्या विरोधात आहे. कारण हा उपचार करायला खूप खर्च येणार आहे.” वैभवच्या डोळ्यातून घळ-घळ पाणी वाहू लागलं जे त्यांनी अनघा समोर असताना महत्प्रयासानी रोखून ठेवलं होतं. जयंत त्याच्या पाठीवरून हळूच हात फिरवू लागला.



“अंदाजे किती खर्च येणार आहे?” “ अजून कळलं नाही. हे उपचार करायचे आहेत हे त्यांना नक्की सांगीतल्यावर ते अंदाज देतील. पण मध्येच आईनी सगळा घोळ घालून ठेवला. अरे आत्ता कुठे अनघा जरा धीट झाली होती. आता पुन्हा पहिले पाढे  पंचावन्न.” “हे बघ असा निराश नको होऊ. अनघा कोणाचं ऐकेल.?” “सुजाताईचं ऐकेल ती.” “ मग झाल तर आत्ता सुजाताईला फोन लाव.” “ हो मी ठरवलंच होतं सुजाताईला फोन करायचा. लगेच करतो.”





वैभवनी चटकन डोळे पुसले. आणि सुजाताईला फोन लावला. त्याच्या या कृतीकडे बघून जयंताच्या चेह-यावर स्मितहास्य आलं. सुजाताईनी फोन उचलताच वैभव बोलला “ सुजाताई...आज आईचा सकाळी फोन आला होता आणि...” त्यांनी सकाळची सगळी हकीकत ताईला सांगितली. यावर ताई म्हणाली “ वैभव तुला आपल्या आईचा विचित्र स्वभाव माहिती आहे नं? तू तिच्याकडे दुर्लक्ष कर. बाबा आपल्याकडून आहेत नं मग कशाला घाबरतो?” “हो पण ताई आत्ताच अनघा जरा धीट झाली होती.” “ तू काळजी करू नको.” “ताई अग आज सकाळी तिनी नाश्तापण  व्यवस्थित केला नाही. मी घरी नाही तर जेवेल की नाही कुणास ठाऊक? मी फोन करणार आहे तिला जेवायच्या वेळेस. मला हो जेवते म्हणेल किंवा जेवली असही सांगेल पण प्रत्यक्षात माहित नाही काय करेल.” बोलता-बोलता वैभवाचा आवाज रडवेला झाला होता. ताई म्हणाली



“ हे बघ मी आज तुझ्या घरी जाते. जेवायच्या वेळेसच जाईन कारण आज अनायसे अनघाच्या आवडीची फणसाची भाजी केली आहे. ती घेऊन जाते. बघते ती काय बोलते. वाटलच ती खूप अस्वस्थ आहे तर आजची रात्र मी थांबीन तुझाकडे.” वैभव चटकन म्हणाला “ताई तू थांबच मला सुद्धा  धीर येईल. मी एकटा  तिला कसं समजावू शकेन कळत नाही. तू घरी सांगून दे आज तू माझ्याच कडे राहणार आहे म्हणून.” “बरं. मी सांगते घरी आणि आज तुझ्याकडेच राहते. ठीक आता काळजी करू नको.ऑफीसच्या कामाकडे लक्षं दे” ताई हसतच म्हणाली आणि तिनी फोन ठेवला.





वैभवनी फोन ठेवला आणि जयंतकडे बघितलं. “ ताई येते आहे न तुझ्याकडे? आता काळजी करू नको. चांगल्या  कामात अडथळे येतातच. आपण धीर सोडायचा नाही. चला, आता शांत डोक्यानी काम करा.” जयंतचा हात दाबत वैभव म्हणाला “ मित्रा तू आहेस म्हणून मला खूप आधार आहे.” “आभारप्रदर्शन पुरे.” असं म्हणत जयंत हसायला लागला. वैभवला ताई येतेय म्हटल्यावर खूप बरं वाटलं. आता ऑफीस मध्ये आपण शांतपणे काम करू शकू याची त्याला खात्री वाटली.





अनघा पलंगावर आडवी होऊन छताकडे बघत बसली होती. तिला आज सकाळचं तिच्या सासुचं बोलणं आठवत होतं. त्या का इतक्या विरोधात आहेत तिला कळत नव्हतं. आपल्याला जशी बाळाची ओढ आहे तशी त्यांना त्यांच्या नातवंडाची ओढ नाही का? त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं बाळ त्यांना आपल्या मांडीवर खेळवावंस नाही वाटत का? अनघाचं डोकं विचार करून-करून थकून गेलं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहून सुकून गेलं तरी तिला उत्तर सापडत नव्हतं.



अनघा विचारात पडली होती. जेवायची इछ्चाच नव्हती तिला. कुठेतरी वेड्यासारखं बघत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कितीवेळ वाजत होता कुणास ठाऊक. जरावेळानं तिचं लक्षं गेलं. तिच्या आईचा फोन होता. “ आई बोल.” “ काय ग आवाज का तुझा इतका खोल येतोय?” “ काही नाही ग असंच.” “ अग तू रडत होतीस असं वाटतंय. खरं सांग. काय झालं.?” “अग काही झालेलं नाही. जरा विचार करत होते.“ “तेच विचारते आहे कसला विचार करत होतीस? मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू विचार फार करतेस मग रडतेसुद्धा म्हणून विचारते आहे.” अनघा बळेच हसून म्हणाली.” “मी विसरलेच तू माझी आई आहेस. तुला चटकन ओळखायला येईल.” “ होनं. मग सांग काय झालं?” “ पुढचे उपचार काय करायचे आहेत ते सांगितलं मी तुला. त्यासाठी पैशाची सोय कशी करता येईल याचा विचार करत होते. कारण बराच खर्च येणार आहे. बाकी काही नाही.” “ पैशांची गरज असेल तर सांग मी पाठवतो.” बाबांचा आवाज ऐकून ती चमकली. “बाबा तुम्ही! स्पीकरवर आहे का फोन?” “ हो. बाबा म्हणाले मला अनघा काय म्हणतेय ते ऐकायचं आहे.” हं अनघा मनाशीच हसली. “आई अग मी नंतर करते फोन. मला सुजाताईचा फोन येतोय.” “ बरं ठेव पण काळजी करू नको.” “ हो”. अनघा बोलली.  





“अनघा आग मी आज तुमच्याकडे येणार होते. तुझं जेवण झालं का?” “नाही.” “अग आज फणसाची भाजी केली आहे. तुला आवडते नं? म्हणून मी ठरवलं आज यावं. येऊ नं?” “ताई काय हे आमच्याकडे येतांना तुम्हाला परवानगी कशाला हवी. हे माहेर आहे तुमचं. या” अनघानी फोन ठेवला आणि चेहरा पाण्यानी स्वच्छ धुवायला बाथरूम मध्ये गेली. तिला ताईंसमोर रडका चेहरा घेऊन जायची इच्छा नव्हती. उगीच त्या खोदून-खोदून विचारतील मग मलाच राहवणार नाही आणि मी रडले तर त्यांना सकाळची घटना सांगावी लागेल. कशाला उगाच. हा विचार अनघानी केला.पण  तिला माहिती नव्हतं वैभवनी आधीच सगळं ताईला सांगितलं आहे म्हणूनच त्या आज इकडे येतात आहे.  



फोन ठेवल्यावर ताई स्वत:शीच पुटपुटली “ अनघासारखी इतकी छान सून मिळाली तरी आईला बघवत नाही. हिचा स्वभावाच कुचकट म्हणूनच कोणी नातेवाईक हिच्या वा-यालासुद्धा फिरकत नाही. आपले बाबा  म्हणजे संत माणूस. त्यांच्याकडे बघून सगळे नातेवाईक तिच्याशी बोलतात. सगळे काय आम्हीसुद्धा. जाऊ दे लवकर आवरून वैभवकडे जाऊ.” ताईनी आज वैभवकडेच  राहणार आहे हे सांगितलं आणि तयारीला लागली. अनघाला कसं बोलतं करावं आणि तिला कसं समजवावं याचाच ती विचार करत होती.



ताई छोटीशी पिशवी घेऊन ऑटो स्थानका पर्यंत आली. तिनं ऑटो केला आणि वैभवाचा पत्ता त्याला सांगितला.



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------क्रमश:       पुढील भाग परवा वाचा.



लेखिका—मीनाक्षी वैद्य.


🎭 Series Post

View all