Jan 26, 2022
नारीवादी

ऋणको भाग २

Read Later
ऋणको भाग २

                                                                     ऋणको  भाग २ रा

पहिल्या भागावरून पुढे...

वैभव आणि अनघा डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसली होती. सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले “मिसेस पांगारकर आपण तुमची हार्मोनल टेस्ट करून घेऊ”  “सोनोग्राफीचा रिपोर्ट काय सांगतोय” अनघानं विचारलं डॉक्टरांनी  तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं "मिसेस पांगारकर तुमच्या बीजांडकोशाचा आकार लहान झाल्या सारख वाटतोय.ते बहुदा काम करत नाहीत. त्याकरता आपल्याला तुमची हार्मोनल टेस्ट करावी लागेल. त्यातून  नक्की कारण काय आहे ते कळेल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पेशंटसाठी या सगळ्या टेस्ट खूप जाचक असतात.पण पेशंटनी जर सकारात्मक विचार ठेवला तर चटकन चांगला रिझल्ट मीळतो. या सगळ्या तपासण्यांसाठी  खूप वेळ लागतो.पण त्या कराव्याच लागतात. त्याला इलाज नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. सकारात्मक रहा. एक डॉक्टर म्हणून तुम्हाला विनंती करतो. मनावर दडपण ठेऊ नका. सकारात्मक विचार करा .चांगला रिझल्ट मिळेल."

 अनघाच्या मनातल्या सगळ्या शंका डॉक्टरांच्या बोलण्यानी दूर झाल्या तरीही अनघानी विचारलं "डॉक्टर काही दोष दिसतोय का?" अनघाच्या मनाची होणारी घालमेल डॉ. समजू शकत होते.कारण ज्या स्त्रिया आपल्याला मुल व्हावं म्हणून त्यांच्याकडे उपचारासाठी येत त्या सगळ्या स्त्रीयांची मनस्थिती अनघासारखीच असते. हे त्यांना माहित होतं म्हणून अनघाच्या प्रश्नं विचारण्याचा त्यांना त्रास होत नव्हता.ते स्पष्ट पण शांतपणे म्हणाले "मी तुम्हाला काय सांगीतलं. एका तपासणी करून काम होत नाही. सोनोग्राफीमधून नक्की काय झालं आहे ते कळलं नाही म्हणुन आता आपण  ब्लड टेस्ट करायची आहे." डॉ.चं वाक्य पूर्ण व्हायच्या आताच अनघा बोलली "तुम्ही तर हार्मोन्स टेस्ट म्हणालात"डॉ. किंचित हसले.

वैभवला मात्र अनघाच्या सतत प्रश्नं विचारण्यानी डॉ. चिडतील की काय अशी भीती वाटत होती. पण डॉ. हस-या चेह-यांनी अनघाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते.  "हो हार्मोन्स टेस्टच करायची आहे पण ती ब्लड घेऊन करतात. तुम्ही अवंती लॅबमध्ये जा. कोणती टेस्ट करायची आहे ते लिहून देतो. तेवढी करा.रिपोर्ट आला की घेऊन या." डॉक्टरांनी दोघांकडे बघून स्मीतहास्य केलं. दोघही त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडले.

"वैभव रोजचा दिवस माझ्या अंगावर कोसळतो.सहन होतं नाही." " अनघा डॉक्टर काय म्हणाले आत्ता सकारात्मक विचार करा. नको फार ताण घेऊन. चल बस गाडीवर ." तिच्या खांद्यावर थोपटत बोलला.वैभव बाईक आणे पर्यंत अनघा तिथेच थांबली होती. पुन्हा ती त्याच विचारात गुंतली. उद्या ब्लडटेस्ट केल्यावर काय निकाल येतो देव जाणे. वैभव आला तरी तिचं लक्ष नव्हतं. “अनघा” वैभवच्या हाक मारण्यानी ती दचकली. “ अनघा बस. पुन्हा विचर करायला लागली.” “नाहीरे. पण हो विचार येतात मनात. चल” अनघा गाडीवर बसली आणि ते घराच्या दिशेनी निघाले.

आज ब्लड टेस्ट केली. रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळेल. अनघानी ब्लड देऊन घरी आल्यावर उत्साह नसतांनाही स्वयंपाकघरात शिरण्याची तयारी दाखवली.वैभव तिची मन:स्थीती जाणून होता म्हणून तो म्हणालाही तिला “अग राहू दे डबा. तुझ्यासाठी जेवणाची ऑर्डर करतो. मी ऑफीसच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करीन. मी आता आंघोळ करून तयारीला लागतो.” वैभव आंघोळीला गेला तशी अनघा चटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली.

एका बाजूला बटाट्याच्या काच-या फोडणीस घालून दुसरीकडे पोहे केले. घाई-घाईत बटाट्याची भाजीच मदतीला येते.साधी आणि सोपी. अनघाला हसू आलं कशाचं? बटाट्याच्या भाजीमुळे नाही तर मनुष्य किती प्रत्येक ठिकाणी कष्ट न घेता काम कसं होईल हे बघतो. आपल्या बाबतीतही हेच घडतंय नं! बाळ तर हव आहे पण पटकन. त्यासाठी एवढे दिवस थांबायची तयारी नाही. एवढ्या तपासण्या करणं म्हणजे कट–कट वाटते. आई नेहमी म्हणते कोणतीही चांगली गोष्ट करताना अडथळे येतातच. सहज आपल्याला काहीच मिळत नसतं.थोडे कष्ट घ्यावेच लागतात. आईचं ऐकून आपण कंटाळा न करता सगळ्या तपासण्या करायच्या कितीही वेळ लागू दे. वैभव आपल्या बरोबर आहे ही किती महत्वाची गोष्ट आहे.

पोहे होताच तिनी पोळ्या केल्या आणि मग कुकर लावला. अनघा विचारात इतकी गढली होती कि नाश्ता आणि वैभवचा डबा दोन्ही कधी तयार झालं हे तिच्याच लक्षात आलं नाही. तिला कळलं तेव्हा पुन्हा ती स्वत:शीच खुदकन हसली. माणसाचं मन विचारात गुंतलं की किती यांत्रिकपणे आपल्यासमोरची कामं करतो काळतही नाही.वैभवाचा डबा भरून अनाघानी समोर डायनिंग टेबलावर पोह्याची कढई आणून ठेवली. दोघांसाठी दोन प्लेट, चमचे, पाणी सगळं आणून ठेवलं. वैभवचा डबा पिशवीत ठेवून टप्परवेयरच्या कंटेनरमध्ये थोडं ताकपण दिलं. सध्या उन्हाळ्याचा कहर सुरु झाला होता. तोपर्यंत वैभव तयार होऊन आला.

तो खोलीच्या बाहेर आला तर त्याला दिसलं की अनघानी टेबलावर पोह्याची कढई, दोन प्लेट्स,चमचे, पाणी सगळं ठेवलं होतं. वैभव मनातून आनंदाला तरी तिला म्हणाला “अग कशाला केलस. मी बाहेर खाल्ल असतं” अनघा टेबलासमोर येऊन बसली त्याच्याकडे बघून हसत तिनी प्लेटमध्ये पोहे वाढले आणि म्हणाली “ तुझा डबासुद्धा तयार आहे. वैभव या सगळ्या ताणातून मी एकटीच जातेय असं नाही नं तुला सुद्धा खूप ताण आहे. मग मी फक्त माझ्याच  ताणाचा विचार करून रडक्या चेह-यांनी सतत बसून राहू का?” “ आग तसं नाही पण ...”  “ काही होत नाही मला. माझा स्वयंपाक पण तयार आहे.  तुझाबरोबर नाश्ता केला की तु पण किती निवांत ऑफीसला जाशील. आता या सगळ्या तपासण्या करायच्या आपण ठरवलं आहे नं मग असं रडत-रडत करायचं का?

मी खूप छान आहे. बाळासाठी मी सगळं करायला तयार आहे.” एवढं बोलून अनघा मनापासून हसली. वैभवलापण बरं वाटलं नाहीतर त्याच्या मनावर खरच ताण होता. आता तोही निर्धास्तपणे या तपासण्यांना सामोरं जाउ शकणार होता.तरी वैभवनी तिला विचारलाच “हा धीटपणा फक्त माझ्यापुढे दाखवत नाहीस नं? नाहीतर मी ऑफीसाला गेल्यावर पुन्हा रडूबाई सुरु.”

“ ए काहीतरी काय! असं अजिबात होणार नाही. मी माझा वेळ माझ्या आनंदात घालवीन. तू संध्याकाळी आलास की बघशील मी आता जशी आहे तशीच तुला दिसेन.” एवढं बोलून अनघा वैभवकडे बघून गोड हसली. आता वैभवाची खात्री पटली. तो मनापासून पोह्याचा आस्वाद घेऊ लागला. आज पोह्यात काय जास्तीचं घातलं अनघा?” “ का? आज पोहे जमले नाहीत?’ अनघाच्या चेह-यावर हलकीशी नाराजी आली.ती बघताच वैभव लगेच म्हाणला “अगं तसं नाही.पोहे नेहमीपेक्षा छान झालेत म्हणून विचारलं काय आणखी घातलस ह्यात.”

“ बापरे, मी एवढी घाबरले. वैभव मला घाबरवत नको जाऊस” वैभव हसला आणि म्हणाला “तुला चीडवायचा घाबरवायाचा मला अधिकार आहे. मी नवरा आहे तुझा” आणि हसू लागला. अनघा जागेवरू उठली त्याला थपडा मारण्यासाठी तर वैभव तिला म्हणाला “ प्लीज हे संध्याकाळी.आत्ता तू धक्का-बुक्की केलीस तर ऑफीसचे कपडे खराब होतील...प्लीज” “ ठीक आहे तुला संध्याकाळी बघते. आत्ता ऑफीसला  चाललास म्हणून तुला सोडलं तू भी क्या याद करेगा” हे वाक्य म्हणतांना अनाघानी जो आविर्भाव केला त्यांनी वैभवला हसू आलं. हसत हसत वैभव ऑफीसासाठी निघाला. आज अनघानी चेष्टामस्करी केल्यामुळे तो खुश होता.    

 

 

संध्याकाळी ब्लड रिपोर्ट घेऊन वैभव आणि अनघा डॉ. मेहतांकडे आलेले होते. त्यांचं नाव पुकारताच दोघंही केबीनमध्ये गेले. अनघानी पर्स मधून रिपोर्ट काढला आणि डॉ.समोर ठेवला. तो रिपोर्ट त्यांनी वाचला. डॉ. म्हणाले,”मिसेस पांगारकर या रिपोर्टनुसार तुमचं बीजांडकोष  काम करत नाहीत. त्यामुळे त्यात बीजच तयार होत नाहीत. म्हणून तुम्हाला गर्भधारणा होत नाही.” “ म्हणजे डॉ. मी कधीच आई होऊ शकणार नाही का?” “आत्ताच्या परिस्थितीत तरी नाही.” डॉ. म्हणाले. अनघाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. वैभवनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. डॉ.चं बोलणं ऐकून तोही सुन्न झाला. दोघांनाही सावरण्यासाठी डॉ.नी जरा वेळ दिला.तोवर तेही शांत बसले होते. आपल्याला मुल होऊ शकणार नाही ही गोष्ट कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही हे ते जाणून होते. म्हणूनच ते शांत बसले होते.

ब-याच वेळानी वैभवनी डॉ.ना प्रश्न केला “यावर काही उपाय नाही का?” “आहे नं. तुमच्या नशीबानी आता एवढ्यातच या समस्येवर उपाय निघाला आहे.” “कोणता उपाय डॉ.?” वैभवनी अधीरपणे विचारलं. अनघा अजूनही आपल्याला मूल होऊ शकणार नाही या  धक्क्यातच होती.

डॉ. मेहता म्हणाले “मुंबईच्या एका डॉ. नी यावर संशोधन केलय. नुकतंच ते यशस्वी झालं आहे. बीजांडकोशाचं प्रत्यारोपण केल्यानी हा प्रश्न सुटतो. मुल होण्याचे चान्सेस वाढतात.” वैभवच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी अनाघाकडे बघितलं. ती अजूनही सावरलेली नव्हती. “डॉ. हे खरच शक्य आहे का?” “हो. म्हणून तर तुम्हाला म्हटलं की तुम्ही भाग्यवान आहात. आत्तापर्यंत अशी शस्त्रक्रिया होत नव्हती. आता सुरवात झाली आहे .तेव्हा आपण याचा फायदा घेऊ. जर तुमची परवानगी असेल तर.” “डॉ. आमची परवानगी आहे.” अनाघाकडे वळून वैभव तिला हलवून म्हणाला

 

“अनघा ऐकलास का? डॉ. काय म्हणाले?” “अं...”अनघाच्या डोळ्यात अश्रू शिवाय कुठलेच भाव नव्हते. डॉ. अनाघाकडे बघुन डॉ.म्हणाले “मिसेस पांगारकर आता आपण बीजांड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून तुमची समस्या सोडवू शकतो.” “म्हणजे?” काहीच न समजून अनाघानी डॉ.नाच प्रतिप्रश्न केला. डॉ.च्या चेह-यावर स्मितं होतं. ते अगदी शांतपणे अनघाला समजाऊन सांगू लागले. “ हे बघा तुम्ही एवढ्या निराश होऊ नका. जसं आपण किडनी पेशंटला दुस-याची किडनी देऊन त्याला वाचवतो. तसंच तुमच्या केसमध्ये आपण

दुस-याचं बीजांड तुमच्या शरीरात रोपण करू. त्यांनी तुम्हाला मूल होण्याची शक्यता शंभर टक्क्याच्या जवळपास असते.” “ पण डॉ. हे बीजांड आम्ही कुठून आणणार?”

“ बरोबर आहे तुमचा प्रश्न. तुमच्या ओळखीच्या,किंवा नात्यातीला कोणत्या स्त्रीचं बीजांड तुम्हाला चालेल हे बघून आपण ही शस्त्रक्रिया करू. कळलं.” “ पण डॉ. कोणतीही स्त्री तिचं बीजांड मला का देईल? तिच्या शरीराला ती का धोका निर्माण करून घेईल?”

डॉ. स्मितहास्य करत म्हणाले “तुमची शंका बरोबर आहे. पण आपण जर एखाद्या स्त्रीचं बीजांड घेतलं तरी तिला अपाय काहीच होणार नाही. ज्या स्त्रीची पाळी बंद झाली आहे अशा स्त्रीचं बीजांड आपण घ्यायचं. याचं कारण पाळी बंद झाल्यावर त्या बीजांडाचा त्या स्त्रीला काहीच उपयोग नसतो. ती तशीच तिच्या शरीरात असतात. तिच्या शरीरात असणा-या दोन बीजांडापैकी एक आपण काढलं आणि तुमच्या शरीरात लावलं तर तुम्ही आई होऊ शकता. ज्या स्त्रीच्या शरीरातून आपण बीजांड काढू ती पूर्वीसारखंच जीवन जगू शकते. ही मोठी शस्त्रक्रिया आहे. हे करण्याची तुमची तयारी नसेल तर आपण इथेच थांबू. कितीही वेगवेगळे उपाय तुम्ही केलेत तरी उपयोग होणार नाही. विचार करा. मग मला सांगा.” वैभव आणि अनघा एकमेकांकडे नुसते बघतच बसले.

 

शेवटी धीर एकवटून वैभव म्हणाला “डॉ. घरी एकदा बोलून मग सांगितलं तर चालेल.” “ हो.नक्की. मी तुम्हाला हा निर्णय लगेच घ्या म्हणत नाही. कारण दोन्ही शस्त्रक्रिया मोठ्या आहेत.एका स्त्रीच्या शरीरातून बीजांड काढून मग ते आपण मिसेस पांगारकरच्या शरीरात बसवणार आहोत. त्यामुळे निट विचार करा आणि सांगा. तसच मी एक गोष्ट सुचवू का?”

“हो डॉ.सुचवा नं.” “आपली शस्त्रक्रिया करायची ठरलं तर शस्त्रक्रिया होऊन या प्रेग्नंट राहीपर्यंत यांना समुपदेशन करावं लागेल. कारण या खूप ताण घेतात. तो ताण येणं सहाजिकच आहे. पण ताणामुळे कधी-कधी यश मिळता-मिळता राहतं. शस्त्रक्रिये दरम्यान आणि नंतर या पूर्ण सकारात्मक विचारांनी वागल्या तर तुम्हाला लगेच आनंदाची बातमी कळेल. तणाव रहित कसं राह्यचं याची पद्धत हे समुपदेशक सांगतात आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतात. आत्मविश्वास वाढला की ताण संपतो. ताण संपला की आपण हाती घेतलेलं काम यशस्वीरीत्या पूर्ण होतं.”

 

“कोणत्या समुपदेशकाकडे जायचं?” वैभवनी विचारलं. “तुम्ही निर्णय सांगायला याल तेव्हा सांगतो. ठीक आहे.” “ हो.”. डॉ. नमस्कार करून दोघही केबिनबाहेर आले. अनघा तिथे जमलेल्या सगळ्या प्रेग्नंट बायकांकडे आसुसलेल्या नजरेनी बघत होती.तिचं असं बघणं लक्षात येताच वैभवनी तिला हटकलं “ए अशी काय बघतेस त्या बायकांकडे. चल घरी जाऊ” अनाघालाही आपला वेडेपणा लक्षात आला तसं तिला ओशाळल्यासारखं झालं. वैभव आणि अनघा घरी आले. वैभवच्या लक्षात आलं की आज सकाळपर्यंत सावरलेली अनघा आता पुन्हा गप्प झाली. घराजवळ येताच वैभवनी गाडी थांबवली तरी अनघा गाडीवरच बसलेली होती. काही सेकंदानंतर वैभव तिला म्हणाला “अग अनघा उतर घर आलं आपलं.”

“ आं...हो उतरते.” घर आलं हे अनघाच्या लक्षातच आलं नाही इतकी ती विचारात गढली होती. गाडी पार्क करून वैभव तिच्याजवळ आला नि म्हणाला “अग चलतेस न घरी की इथेच थांबायचं आहे.” “सॉरी मी विचारातच होते. चल.” दोघ लिफ्टपाशी आले. लिफ्टमध्ये ही दोघं शिरल्यावर तिचं दार बंद होणार तेवढ्यात रावत काकू आत शिरल्या. त्यांना बघताच अनघाच्या कपाळावर आठी आली. वैभव त्यांच्याकडे बघून हसला. “काय कुठून येणं केलत?” रावत काकुंनी विचारलं “असंच जरा बाहेर गेलो होतो.” वैभव उत्तरला. अनघाची मात्र मनातच चीडचीड झाली. त्यांचा मजला येताच ते दोघं बाहेर आले. घराचं दार उघडून ते आत शिरता-शिरताच अनघा रागानी बडबडली “यांना काय करायचं आहे आम्ही कुठंही जाऊ. या सांगतात का कधी.उगीचच दुस-यांच्या घरात भोचकपणे बघायचं.” एवढं बोलून ती धप्पकन सोफ्यावर बसल्री. अजून तिचा चेहरा रागावलेलाच दिसत होता. वैभव तिच्याजवळ बसत म्हणाला “ एवढी का रागावतेस? असतो काही जणांचा असा भोचक स्वभाव आपण दुर्लक्ष करायचं. जेवढ तू लक्ष देशील त्यांच्याकडे  तेवढी तुझीच चीड-चीड वाढेल. रावत काकुंना काही फरक पडणार नाही. त्या तश्याच वागणार. सोड ते. जेवायला आज साग्रसंगीत करू नको. सरळ खिचडी लाव. खूप दिवस झाले खिचडी खाल्ली नाही. तुझा मूड आहे का? नाही तर मी करतो. करू?” अनघानी त्याच्याकडे नुसतच बघितलं. तिच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. “ वैभव आता आपण बीजांड कोणाकडे मागणार? कायतरी या अडचणी. मला वाटत हे सगळे उपचार करत-करत मीच म्हातारी होईन.”आणि ती रडू लागली.” ए चल काहीतरी बरळू नकोस. करू आपण त्यावर विचार. मी फ्रेश होऊन खिचडी लावतो. तोवर तू तुझ्या आई-बाबांना सांग आज डॉ. काय म्हणाले ते. कळलं?” अनघानी नुसती मान डोलावली. वैभव हसून म्हणाला “शाहाण बाळ.” आणि तो फ्रेश व्हायला गेला. अनघानी पर्समधून मोबाईल काढला पण ती कितीतरी वेळ मोबाईलकडे नुसती बघतच  बसली. त्याचवेळी तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिच्या आईचाच फोन होता. तिनी फोन उचलला “ आई...” ती सगळी घटना आईला सांगू लागली. तिचं बोलण वैभव स्वयंपाकघरात असला तरी लक्ष देऊन ऐकत होता.

जरावेळानी आपणही आई-बाबा आणि ताईला कळवायला हवं असा त्यांनी विचार केला. खिचडीचा कुकर लावला आणि त्यांनी आपला फोन हातात घेतला.आई-बाबा आणि ताईला आजचं डॉ.चं म्हणण सांगण्यासाठी.

क्रमश:    पुढील भाग परवा वाचा.

मीनाक्षी वैद्य.

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now