रूप पाहतां लोचणीं

गोष्ट... विठ्ठलावर प्रेम असणाऱ्या एक विठ्ठल भक्ताची
रूप पाहतां लोचणीं!


हरी मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।

पुण्याची गणना कोण करी ।।

गावातल्या देवळातला हरिपाठ संपला. सदाभाऊ आणि शांतामाई देवाचे दर्शन घेऊन परत आपल्या घरी निघाले होते. सदाभाऊ पासष्टीच्या वरच्या वयाचे तर शांता माई साठीच्या!

"अरे सदाभाऊ, आज लवकर निघालास?" गोविंद सदाभाऊला मागून आवाज देत आला. गोविंद म्हणजे गावातलं सगळ्यांच्या मदतीला न बोलावता धावून जाणारं तरुण व्यक्तिमत्त्व!

"आरे गोविंद्या, तू हाएस व्हय रं…?" सदाभाऊ रस्त्याने चालता चालता थांबून मागे वळत बोलले.

"मंग! आजूक कोण असणार बरं? वाईच बिगी बिगी निघाले घरला… म्या तिथं पारावार बसून वाट बघत हुतो तुमची." गोविंद

"व्हय रं! उद्या गावातून वारी निघणार न वं पंढरपूरकडं जायला… सकाळी लवकर सगळं आटपून जावं लागन नव्ह… म्हणून निघालो होतो घरला." सदाभाऊ, गोविंद आणि शांतामाई तिघे रस्त्याने बोलत जात होते.

"व्हय व्हय! पण सदाभाऊ, लै झ्याक वाटतंय ना? दोन वर्षानंतर वारी निघणार या साली… या महामारीनं सगळे देव देवळात बंद करून ठेवले होते." गोविंद

"पांडुरंगाची मर्जी! दुसरं काय त्यात! अरे, त्या ईठ्ठलाची कृपा नव्ह का… आपण या महामारीतून सुखरूप बाहेर पडलो… त्याची कृपा म्हणूनच उद्या दोन वर्षानंतर का असना, पंढरपूरला जायला तरी मिळालं…" सदाभाऊ

"हे मात्र बराबर बोलले तुम्ही." गोविंद

"तू येणार हाय नव्ह वारीला?" शांतामाई

"वारी निघन अन् त्यात ह्यो गोविंदा नसन आसं होईन का बरं? येतो म्या… उद्या सकाळच्याला भेटू देवळात." गोविंद सदाभाऊंचा निरोप घेऊन निघून गेला.

"सगळी पांडुरंगाची मर्जी म्हणतासा, त्यानं मग आपली झोळी काऊन रिकामी ठेवली?" आयुष्यभराच्या दुःखाची सल शांतामाईच्या डोळ्यांतून अलगद बरसली.

"शांते, अग अजून किती दिवस ते दुःख कुरवळणार? मुल बाळ असलं काय नसलं काय… त्यानं बोलावल्यावर इथलं इथंच ठेऊन जावं लागणार, नाई का?" सदाभाऊ शांतामाईची समजूत काढत होते. बोलता बोलता दोघे घरी आले. दोघे शांतामाईने केलेले पिठलं आणि भाकरी पोटभर जेवले. शांतामाईने दोन पिशव्यात दोघांचे दोन जोडी कपडे भरले. वारीला सोबत न्यायचं म्हणूम स्वतःच्या हाताने रंगवलेल्या तुळशी वृंदावनावरून एकदा मायेने हात फिरवला. अंथरूण टाकून दोघे पडले होते; पण उद्या वारीला जायच्या आनंदात दोघांनाही झोप लागत नव्हती.

"आवं, मी काय म्हणते, या बारीनं, आपण जरा जास्त दिस राहू पंढरपुरात… नुसतं कळसाच दर्शन घेऊन नाही यायचं या बारी… ते सावळ रूप मला डोळेभरून बघायचय… ईठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवायचंय… किती युगांपासून माझा देव असा उभाच आहे… त्याचे पाय दुखत नसतील का? एकदा त्याचे पाय बी दाबून द्यायचे हायेत…." शांतामाई बोलत होती. सदाभाऊ आणि शांतामाई विठ्ठलाचं रूप डोळ्यात साठवत होते. त्या रूपाकडे बघता बघताच त्यांचा डोळा लागला.

सदाभाऊंना लवकरच जाग आली. अजून झुंजूमुंजू व्हायचं होतं. त्यांनी शांतामाईकडं पाहिलं, माई अगदी गाढ झोपली होती. सदाभाऊ माईला न उठवताच उठले, स्वतःचे सगळे प्रातर्विधी आटोपून तयार झाले. त्यांनी शांतामाईंना आवाज दिला; पण माई काही उठली नाही. थोड्यावेळाने सदाभाऊने परत आवाज दिला; पण माईने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सदाभाऊ घाबरून माईजवळ गेले, त्यांनी माईला हलवलं; पण माई निपचित पडून होती. सदाभाऊ घाबरून गेले, कोणाची मदत मिळते का म्हणून धावत घरच्या बाहेर आले.

"आरं, कुणी हाये का मदतीला?" सदाभाऊ रडत रडत ओरडत होते. सदाभाऊंचा आवाज ऐकून तेवढ्यात गोविंद तिथे आला. सदाभाऊ त्याला घेऊन घरात आले, माईला असं निपचित पडलेलं बघून गोविंद लगेच गावातल्या डॉक्टरला बोलवायला गेला. गोविंद डॉक्टरांना घेऊन आला. त्यांनी माईला तपासलं.

"सदाभाऊ, माईला मोठ्या इस्पितळात न्यावं लागेल. तुम्ही काळजी नका करू, माझी गाडी आणि ड्रायव्हर घेऊन जा सोबत. शहरात माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, मी चिट्ठी लिहून देतो, तुम्हाला पैसेही कमी लागतील.." डॉक्टर बोलले आणि लगेच त्यांनी एक चिठ्ठी लिहुन दिली. गोविंद आणि डॉक्टरच्या ड्रायव्हरने माईला गाडीत बसवलं. सदाभाऊ गाडीत बसले, पाठोपाठ गोविंदही बसला.

"आरे, तुला वारीला जायचंय नव्ह…?" सदाभाऊ

"ही सेवा काय ईश्वर सेवेपेक्षा कमी आहे का? वारीला जाईल पुढल्या वर्षी… आता तुम्हाला मदतीची गरज आहे." गोविंद म्हणाला. गाडी शहराच्या दिशेने धावू लागली. दोन तासात सर्वजण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सदाभाऊंनी गावातल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी दाखवली. तिथल्या डॉक्टरांनी शांतामाईला लगेच आय.सी.यु. मध्ये ऍडमिट केलं. माईंच्या खूप साऱ्या तपासण्या झाल्या.

"न्यूमोनिया झालाय… म्हणजे छातीत पाणी भरलं आहे…त्यामुळे झोपेत श्वास घ्यायला त्रास झाला आणि झोपेतच त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना शुद्धीत यायला वेळ लागेल, तोपर्यंत आपण त्यांना श्वास घ्यायच्या मशीनवर ठेवू." डॉक्टर बोलत होते. डॉक्टर जे बोलत होते, सदाभाऊ ते मन लावून ऐकत होते.

"आता तुमच्या आणि त्या ईठ्ठलाच्या भरवश्यावर हाये समदं…" सदाभाऊ अगदी हात जोडून डॉक्टरांना म्हणाले.

"आपण प्रयत्न करू." डॉक्टर बोलून निघून गेले.

दिवस सरत होते. माईंच्या तब्येतीत चढ उतार होत होते; पण माई अजून बेशुद्धच होती. गोविंद सदाभाऊंसोबत होताच. विठ्ठल नामाचा जप करत सदाभाऊ एक एक दिवस पुढे ढकलत होते.

"पांडुरंगा! काय हाये तुझ्या मनात? आरं किती आस लावून बसली हुती शांती तुला भेटायची… पर… तुझी योजना तुलाच माहिती रं बाबा! ईठ्ठल, ईठ्ठल, ईठ्ठल…!" सदाभाऊ मनाने रोजच विठ्ठलासोबत बोलून मोकळे व्हायचे. एक दिवस अचानक शांतामाईच्या बेडवर कसलासा आवाज येऊ लागला. सिस्टर धावत तिथे गेली. शांतामाई शुद्धीवर आल्या होत्या; पण श्वास घ्यायच्या मशीनचा मोठा मास्क चेहऱ्यावर लावलेला असल्याने त्यांचा आवाज कोणाला जात नव्हता, म्हणून त्या आपला हात बेडच्या रेलिंगवर आपटत होत्या. सिस्टर त्यांच्याजवळ गेली, तिने मशीन थोडी कमी करून हळूच तो मास्क काढला, तेवढ्यात डॉक्टरही राऊंडवर आले. आपल्या पेशंटला बरं झालेलं बघून तेही आनंदीत झाले होते. त्यांनी सदाभाऊंना आत बोलावलं. सदाभाऊही आनंदात शांतामाईजवळ गेले.

"अहो, चला ना, वारीला जायचं नाही का?" शांतामाई शुद्धीत आली तसा पहिला प्रश्न तिने विचारला.

"आज, आषाढी एकादशी!" सदाभाऊ थोडं खिन्नपणे म्हणाले.

"म्हणजे, या बारी पण मला त्या सावळ्याचं दर्शन नाही." माईंच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

"कोण म्हणे, त्याचं दर्शन नाही… तोच तर होता तुझ्या दिमतीला!" सदाभाऊ

"म्हणजे?" शांतामाई

"म्हणजे, बघ… तू त्यादिवशी बेशुद्ध होतीस… आधी मदतीला धावून आला तो गोविंद… नंतर मग आपल्या गावातले डॉक्टर माधव… त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर हरी… हे हॉस्पिटल… याचं नाव काय माहिती…? \"माऊली हॉस्पिटल\" आणि तुझे उपचार ज्यांच्याकडे सुरू होते ते डॉ. पांडुरंग…!" सदाभाऊ डॉक्टरांकडे बघत बोलले. गळ्यात स्टेथोस्कोप घालून, दोन्ही हात कमरेवर ठेवून डॉक्टर पाठमोरे उभे होते. आय. सी. यु. च्या गवाक्षात बाहेरच्या बाजूने एक कबुतर अडकले होते, एक वॉर्ड बॉयच्या मदतीने डॉक्टर त्याला सोडवायच्या सूचना देत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर ते कबुतर निघाले. गवाक्षाची काच बंद करून तो वॉर्डबॉय खाली उतरला. डॉक्टर तसेच दोन्ही हात कमरेवर ठेवून माईकडे वळाले आणि गोड हसले. डॉक्टरांच्या त्या सावळ्या रंगात माईंना त्यांचा विठ्ठल दिसला होता. शांतामाईंनी त्यांच्यासमोर मनोभावे हात जोडले…
सदाभाऊंच्या तोंडून ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळी आपसूकच बाहेर पडल्या…

रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥

तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥

बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥

सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥


फोटो- गुगलवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर