रूप गौराईचं

गौराईची वेगवेगळी रूपं...

 कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी

  विषय : गौराई माझी लाडाची...

                       रूप गौराईचं

जशी आतुरता गणरायाच्या आगमनाची असते, तशीच गौराईच्या आगमनाची सुद्धा असतेच. पुरुष वर्गाला गौराईच्या आगमनाचा उत्साह नाही असं मी मुळीच नाही म्हणणार. पण महिलांच्या गौराईबद्दलच्या उत्साहाला जणू काही मापच नसतं. या माहेरवाशिणीच्या स्वागतासाठी आणि सरबराईसाठी महिला मंडळ अगदी जोमाने तयारीला लागलेलं असतं. 

गणेशोत्सवाला जरी काही ठिकाणी बदलांचं गालबोट लागलं असलं तरी गौरीचा सण अजूनही स्वतःचं ते सुंदर साजिरं आणि प्रसन्न रूप जपून आहे, याचा आनंद वाटतो. 

या गौराईचं रूप गावागावांनुसार, जिल्ह्यांनुसार वेगळं पहायला मिळतं. बरं या गौराईची नावं सुद्धा किती! कुणी गौरी तर कुणी गौराई, कुणी गवर तर कुणी महालक्ष्मी या नावाने ओळखतात. हे सुद्धा खरं आहे की बऱ्याच ठिकाणी गौरी आगमन, पूजा, नैवेद्य, आणि इतर गोष्टींत साम्य आढळतं. पण तरीही विविधता तर आपली खासियत आहे नाही का? ही विविधता या बाबतीतही पुरेपूर दिसून येते. 

गौराईच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी तेरड्याची फुलं, गौरीची फुलं घेऊन त्यांची पूजा करून घरी आणलं जातं. या फुलांमध्ये समावेश असणारं एक फुल म्हणजे अग्निशिखा. याच फुलाला अग्निमुखी,कलहारी,बचनाग,कळलावी अशी बरीच नावं आहेत. अजून एक प्रसिद्ध फुल म्हणजे रान हळद. काही ठिकाणी ही फुलं एकत्र करून त्यांना टोपलीत घेऊन सोबतीने गौरी मातेचा फोटो ठेवतात. आणि मनोभावे पूजा करतात. तर काही ठिकाणी ही फुलं एकत्र केल्यावर त्यांची गौर बांधून मुखवटा, दागिने, वगैरे घालून सजवतात. मुखवटे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात. मुखवटा, फुलांची बांधलेली गौर यांचा वापर करून मग साडी नेसवून सुद्धा गौराईला सजवलं जातं.यातही काही जणांकडे उभ्या असलेल्या गौरी असतात तर काहींकडे खुर्चीवर बसवलेल्या गौरी असतात. बऱ्याच ठिकाणी मातीच्या मूर्ती सुद्धा आणतात.बरं त्यातही किती तरी रूपं! काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून सुद्धा स्थापना आणि पूजा केली जाते. 
रूप कोणतंही असलं तरी मनातला उत्साह आणि श्रद्धा काही कमी होत नाही.

गौरीला पूर्ण घर फिरवून आणणं, तिच्या आगमनावेळी पाऊलं उमटवणं अशा कितीतरी प्रथा दिसून येतात.

या गौराईचे लाड पुरवणं पण अगदी उत्साहात आणि जोमाने सुरू असतं. ठिकाणानुरूप नैवेद्याचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. गोडाधोडाचं आणि शाकाहारी नैवेद्याचं जसं महत्त्व आहे तसचं काही ठिकाणी मांसाहारी/ मत्स्याहारी नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत‌ आहे. या सर्वांत साम्य तर नक्कीच असतं पण तरीही विविधता सुद्धा लक्ष वेधून घेते. 

आगमन सोहळा संपन्न झाल्यावर महिला मंडळाचा उत्साह अजून वाढतो तो म्हणजे गौराईच्या जागरणाला! दुसऱ्या दिवशी असणारा हा जागरणाचा कार्यक्रम म्हणजे आनंद, उत्साहाची लयलूटच. झिम्मा, फुगडी, आणि इतरही पारंपारिक खेळांना,गाण्यांना अन् नृत्यांना उधाण आलेलं असतं.

कोकणातील बऱ्याच ठिकाणी सुपे ओवसण्याची सुद्धा प्रथा आहे.

अशा या गौराईचं तिसऱ्या दिवशी अगदी थाटामाटात विसर्जन केलं जातं.

काही ठिकाणी याला माहेरवाशिणीचा सण मानतात तर काही सासुरवाशिणीचा. पण ते काही जरी असलं तरी गौरीच्या या सणाचा आनंद प्रत्येकाच्या मनात तितकाच मोठा असतो. 
गौरीची पूजा, आरास, नैवेद्य, जागरण, इ. अनेक गोष्टी करण्याचं समाधान काही निराळचं! तीन दिवसांच्या या पाहुणीसोबत एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. तिचं लोभस रूप मनात घर करून राहतं.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बोलायच्या राहून गेल्या. पण भावना महत्त्वाच्या. हे मात्र खरं की प्रत्येक ठिकाणच्या या भिन्न पद्धती कधीतरी नक्की जाणून घ्याव्यात. कारण ही भिन्नता आपल्याला गौराईचं आणखी वेगळं रूप दाखवून देते. 

निरनिराळ्या प्रथा परंपरा, संस्कृती जपणारा हा सण यापुढेही कायम असाच आनंदाने आणि धुमधडाक्यात साजरा केला जावा हीच प्रार्थना. 
-© कामिनी खाने.

(फोटोत दाखवलेली गौराई आमच्या घरची आहे.)