ऋण आणि अनुबंध

This blog gives insights about relationship and bonding

ऋण आणि अनुबंध

तुमच्या बाबतीत कधी असे घडते का की, कधीतरी अचानक मनात काही विचार येतो आणि त्या विचाराच्या नादात विचारांशी खेळत आठवणीत आपण खूप लांब निघून जातो.
वास्तव परिस्थिती, आजूबाजूचे लोक आणि ते ठिकाण याचे जणू स्थान लोप पावते आणि उरतो तो फक्त एक आणि एकच भास, तो विचार, ती आठवण! मग तो आभास का असेना जो मनाला खूप भावतो आणि त्यातून बाहेर यायलाच नको असे वाटते.

तुम्ही वाचक म्हणाल यात काय ते नवीन! हे तर प्रत्येकालाच कधी ना कधी वाटते! तर मुळात मुद्दा हाच आहे की प्रत्येकालाच वाटते पण त्याला आपण महत्व देत नाही, कारण सगळ्यांच्या लेखी वास्तव हे जास्ती महत्वाचं समजले जाते.

एखादी व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येते,काहीच नाते नाही, ओळख नाही पण अचानक आपली भेट होते. मग वय तुमचे काहीही का असेना.
तुमच्या आपापसातील बोलण्यातून तुम्हाला लक्षात येते की विचार जुळत आहेत ज्याला आपण वेव्ह लेंथ म्हणतो. गट्टी जमते,गप्पा होतात मग मैत्री होते आणि मग त्याहीपलीकडे जाऊन एकमेकांचे घट्ट बंध निर्माण होतात. त्यासाठी तुम्ही स्त्री पुरुष असू शकता, किंवा 2 स्त्रिया, अथवा 2 पुरुष असे कोणीही असू शकते.
किंवा वयातही अंतर असू शकते पण या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही.
जे निर्माण होतात ते बंध आत्मीयतेचे असतात! अगदी मनापासून जे निर्माण होते ते!

कोणी म्हणावे आणि आपण करावे हा व्यवहार झाला कारण त्यासाठी समाजाचे किंवा नात्याचे बंधन असतात पण इथे असे काहीच नाही नसते.

एकमेकांसाठी काही केले तर मनाला आनंद मिळतो आणि जरी काही नाही केले तरी कोणी का नाही केले असे विचारत नाही. पण आपल्यालाच वाटते की त्या व्यक्तीला हे आवडते मग तसे करावे, जे आवडते ते करावे मग ते खाणेपिणे असो, कपडेलत्ते असो किंवा त्या व्यक्तीच्या भल्यासाठी केलेलं प्रयत्न असोत.
अगदी तोच प्रत्यय आपल्या त्या व्यक्तीकडून मिळाला की मग तर आनंदाला पारावर नसतो.
एकमेकांना आनंदी बघणे यातच समाधान पावणे हे खरे सुख ज्यामध्ये कोणतीही अपेक्षा ही जगरहाटीच्या दृष्टीने नसते.

म्हणतात की यामागे तुमचे पूर्वजन्मीचे काही नाते असेल! तुमचे एकमेकांचे काही भावनिक ऋण असतील जे पूर्ण होण्यास या जन्मी पुन्हा भेट झाली.
मी तर म्हणतो असे असेलही किंवा नसेलही तो वादच नको ना कारण आपले पूर्वज सांगतात की पूर्वजन्म वगैरे असतो आणि सायन्स काही वेगळेच सांगते पण मी तर म्हणेन की आपण जे आत्ता आहे त्यात जगावे आणि तोच विचार करावा हेच सुयोग्य.

अशा या सुंदर भावनिक गुंतवणीला, नात्याला नावन देता नुसते संबोधता येईल 'ऋण + अनुबंध'
जे नकळत ऋण करतात एकमेकांवर पण जे अनुबंध तयार झालेलं असतात त्यात त्या केल्या गेल्याचा काहीच आराखडा नसतो आणि त्याची गरजही भासत नाही.
जिथे भेटले, बोलले की मनाला छान वाटते! ज्याला मनातील किंवा परिस्थितीतील वास्तवता सांगितली की मार्ग मिळेल हा विश्वास असतो!
विश्वास हा असा की ज्याला डोळे असण्याची सुद्धा गरज नाही!
समाधान जे चेहऱ्यावर विलसते, काळजी प्रेम जे वागण्यातून जाणवते तेच हे बंध!
ज्याला हे मिळाले तो नक्कीच भाग्यवान म्हणेन मी.
कधी एकटे बसलो तरी त्या काही आठवणीने नकळत ओठावर हसू उमटते, नजरेत चमक येते, मनी प्रसन्नता येते....हे नाते मी म्हणेल मनाचे!
मैत्री म्हणा, प्रेम म्हणा किंवा त्याला काहीच नाव देऊ नका पण ते असते हे नक्की याची प्रचिती ही मिळते ती अनुभवाने.
त्या असण्याच्या विश्वासाने आणि 'मी आहे ना' या तीन जादुई शब्दाने.

मला माझ्या प्रोफेशनमुळे खूप वेग वेगळी लोक भेटतात त्यांच्याशी बोलणे होते आणि काहींना त्यातून मार्ग हवा असतो.
कुठलाही मेसेज हा प्रत्येक वेळी फक्त समोरासमोर बसून मिळेल असे नसते तर कधी कधी प्रत्यक्षात जे घडत असते त्याची जाणीव ही असं काही वाचून किंवा ऐकून होते यालाच तर अनुभव म्हणतात जो यावा लागतो.

मी तर म्हणेन की हे असे निर्माण झालेले बंध ज्याला मी ऋणानुबंध म्हणेन ते प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे कधी ना कधी कोणत्या तरी रूपाने आपले अस्तित्व दाखवून जातात.

ते समजून घ्या, त्यांना जाणून घ्या आणि जपून सुद्धा ठेवा. हा तुम्हाला मिळालेला अनमोल ठेवा आहे त्याची किंमत फक्त तुम्हालाच माहीत आहे जे 'अमूल्य' आहे.

चर्चेतून आणि अनुभवातून येणारा प्रत्येक विषयावर मी तुमच्याशी संवाद साधावासा वाटतो त्यामुळे विचार हे तुमच्यापर्यंत पोचवतो.
जर हा संवाद आवडला तर नक्की कळवा!

©®अमित मेढेकर