चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद (अंतिम भाग ८)

दोघांचे अस्तित्व एक होऊन गेले


कथेचे नाव:- चंद्राची रोहिणी अन् पुनवेचा चांद
विषय:- प्रेमकथा
फेरी:-  राज्यस्तरीय कथामालिका लेखन

पुनमची अवस्था पाहून सुधांशु म्हणाला,"आता तिच्या आठवणींत जगायचे आहे. दुःखाचे गाठोडे मनात कायम राहणार आहे. परंतु यापुढे आपल्याला आपल्या कामावर देखील लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे."

त्याने लॅपटॉप उघडून ईमेल बघितले. मोबाईल ऑन करून पुनमला फॅशन शोच्या ग्रुप मध्ये जॉईन करत बोलला. उद्या पासुन ते शोच्या शेवट दिवसापर्यंत आपण खुपच व्यस्त होणार आहोत. रोहिणीच्या घरी जाऊन तुझे सामान पॅक करून ठेव. ड्रायव्हरला सांगुन उद्या आणायला सांग. त्या घरात तु एकटी राहू शकणार नाहीस. इकडे गेस्ट रूममध्ये तु राहू शकतेस." 

"मला तर प्रश्न पडला होता. पण सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपोआप मिळत जातात. खरंच रोहिणी माझ्या सोबतच आहे." तिचे मन तिला आपुलकी देऊन गेले.

दुसऱ्या दिवशी पासून सुधांशु आणि पुनम दोघंही बिझी झाले. उशीराने घरी आल्यावर ते आपापल्या रूममध्ये निघुन जायचे. मात्र एकमेकांची विचारपुस न चुकता करायचे. त्यांना एकटेपणा जाणवत नव्हता. ह्या मागचे एकच कारण होते की, रोहिणीने दिलेल्या वचनामुळे दोघांचे ऋणानुबंध जोडले गेले होते.

बघता बघता तीन महिने कसे निघुन गेले कळलंच नाही. फॅशन शोचा दिवस उजाडला. जिथे फॅशन शो होणार होता तिकडे बाहेरच व्यानिटी व्यान उभी केली होती. दुपार नंतर पुनम तिकडे आली. मेकअप आर्टिस्ट व असिस्टंट तयारी करण्यासाठी तिला व्यानमध्ये घेऊन गेले. आज मात्र रोहिणी गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आनंदाची कळी खुलली.कारण तिचे सिनेस्टार सारखे व्यान मध्ये तयारी करण्याचे स्वप्न ते देखील पुर्ण झाले होते.

तीन तासांनी पुनम व्यान बाहेर पडली. लाल रंगाचा लांब सडक गाऊन, लाल रंगाचे हील शुज, केसांची कर्ली हेअर स्टाईल, गळ्यात लाल स्टोनचा नेकलेस व कानात लाल सिंगल स्टोन घातले होते. चेहऱ्यावर चमकदार मेकअप, डोळे काळ्या रंगाने शेड केलेले आणि ओठावर लाल गडद लिपस्टिक लावली होती.

सुधांशु तिला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी बाहेर आला आणि तिच्याकडे पाहताच राहिला. पहिल्यांदा दोघांची नजरानजर एकमेकांना काहीतरी सांगुन गेली होती. तो नजर बाजुला करत सगळी माहिती पद्धतशीरपणे देऊ लागला."मुंबई म्हटलं तर मायानगरी. शक्यतो इथे होणारे शो कोणीच सोडत नाही. बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच मॉडेल आलेल्या आहेत. पण आपल्या स्टुडिओचा फॅशन शो टॉप झाला पाहिजे. स्पेशली यु पुनम. तु तर नंबर वन आहेच. पण ह्या घडीला आपल्या स्टुडिओचा आणि रोहिणीने जे स्वप्न बघितले त्याचा सवाल आहे. बेस्ट ऑफ लक डियर."

तिने एक नजर त्याच्या कडे रोखुन पहिली आणि ती स्टेजकडे वळली. तसा तो माघारी फिरला. पुनम स्टेजवर गेली. त्याने सांगितल्या प्रमाणेच तिने सगळे नियम फॉलो केले.

सिंगल परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटी तीन तासांनी पंचवीस मॉडेल एकत्र उभ्या राहिल्या. त्यातून तीन नंबर काढण्यात येणार होते. शेवटून दोन मॉडेलचे नाव जाहीर करण्यात आले. आता टॉप मॉडेलचे नाव घोषित करण्यात येणार होते. नाव ऐकण्यासाठी सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती. सगळ्यांचे लक्ष घोषणेकडे वेधले होते. \"वन अँड ओन्ली बेस्ट मॉडेल अवॉर्ड गोज टू द मिस पुनम बर्वे.\"


टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. पुनमच्या डोक्यावर गोल्ड क्राऊन चढविण्यात आला. स्टेजवरील सगळ्या मॉडेल तिचे अभिनंदन करू लागल्या. तिची एकटीची फोटोग्राफी सुरू होती. शिवाय व्हिडिओ काढण्यात आले. काही वेळातच तिला सुधांशुला भेटण्याची ओढ लागली. तिच्या नजरा त्याचा शोध घेऊ लागल्या. स्टेज वरून उतरून ती बाहेर पडणार इतक्यात ऑटोग्राफ घेण्यासाठी तिच्यापाशी गर्दी झाली. ऑटोग्राफ देताना तिने रोहिणी नाव लिहिले. प्रत्येक जण अवाक होऊन पाहत होते. जसे तिने रोहिणीला सांगितले होते तसेच तिने केले. रिपोर्टर तिच्या जवळ माईक घेऊन आले. तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागले. पण तिने कोणालाच काहीच उत्तर दिले नाही. 


तिच्यासोबत बॉडीगार्ड होते ते तिला वाट मोकळी करून देऊ लागले. लोळणारा गाऊन सावरत ती सुधांशुचा शोध घेत वेड्यासारखी फिरत होती. मात्र सुधांशु तिच्या नजरेत कुठेच पडत नव्हता. इतक्यात ड्राइव्हवर धावत तिच्याकडे आला आणि म्हणाला,"मॅडमs सर घरी गेले आहेत. तुमचा कार्यक्रम झाल्यावर घरी सोडायला सांगितले आहे."


"मला आताच्या आता घरी घेऊन चला." तिने प्रतिउत्तर दिले आणि कारमध्ये बसली.


"निदान माझे नको पण स्वतच्या स्टुडिओचे नाव घोषित झाले हे ऐकण्यासाठी तरी तिथे निदान उभा राहिला पाहिजे होता. नाही घेऊ शकत मी रोहिणीची जागा. नाहीतरी चंद्र सुद्धा रोहिणी शिवाय कोणाला जवळ येऊ देत नाही. नको करुस मला जवळ.  पण एकदा माझ्या सोबत उभा राहिला असता तर मला बरे वाटले असते ना. अचानक जुळले गेलेले मन आणि मनात उठलेल्या एकतर्फी प्रेमाचा तरंग मी कधी व्यक्त करू शकेल की नाही? " मनात गूजगोष्टी करत असताना तिला रडू कोसळले.

बंगल्या खाली कार येऊन थांबली. पायातले हील शूज काढून ती टेरेसवर जाणाऱ्या पायऱ्या चढू लागली. तो टेरेसवर लॅपटॉपवर काम करत होता. तिला बघुन म्हणाला,"शो सोडुन तु इथे काय करते आहे. तुझे स्वप्नातले क्षण आहेत. अभिनंदन." हात पुढे करत तो म्हणाला.

का कुणास ठाऊक पण तिला राहवलं नाही. क्षणाचा विलंब न करता ती त्याच्या मिठीत शिरली. पहिल्याच त्यांनी एकमेकांना स्पर्श केला होता. आनंदाचा दिवस असुनही दोघं रडून मन हलके करत होते.

"श्रावण क्वीन आणि टॉप मॉडेलमुळे मला जो फेम मिळाला आहे. त्याचे मानकरी तु आणि रोहिणी दोघे आहेत. सोबत रोहिणी नाही पण तिची उणीव तुच भरुन काढत आहेस. माझी जिम्मेदारी रोहिणी तुझ्यावर टाकून निघुन गेली. तुझ्या शिवाय मी कोणाचा हात पकडणार सांग ना. " उचक्या देत ती बोलून गेली.

तिचे डोळे पुसत तो म्हणाला," तुझी जिद्द.. तुझी मेहनत.. तुझा विश्वास.. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न.. त्याचे फळ आज तुझ्या हातात आहे.."

"सुधांशुs आय रिअली लव यू. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचं आहे. रोहिणीने तुला कायम सांभाळण्याचे वचन माझ्याकडून घेतले आहे." पुनमने मनातलं प्रेम त्याच्या पुढे जाहीर केलं.

"एक मैत्रीण समजुन आजपर्यंत मी तुझी मदत केली आहे. रोहिणी अचानक निघुन गेली. लगेच तिच्या मागोमाग मी लग्न करून संसार थाटायचा. मनाला पटत नाही." त्याने डोळ्याआड पाणावलेल्या कडा लपवल्या..

तिने त्याचा हात पकडला तसे त्याच्या अश्रुंची वाट मोकळी झाली.  त्याच्या गालावर ओघळणारे अश्रु तिने दोन्ही हाताने पुसले,"आपलं दोघांचं दुःख एकच आहे. ती नेहमी दिलेल्या वचनाप्रमाणे कार्यभाग पार पाडायची. मला टॉप मॉडेल बनवायचे तिचे वचन तु पूर्ण केले. मग मी का माझे वचन पुर्ण करायला पाठी राहू. खरं सांगू का? मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. माझ्या माणसांत असली तरी तुझ्या शिवाय एकटी असेन. रोहिणीची जागा मी भरून काढू शकणार नाही. पण एक मैत्रीण होऊन कायम तुझ्या सहवासाचा उपभोग घ्यायचा आहे."

"पुनमs तुला आता भरपूर ऑफर येतील. खुप कामं मिळतील. तुझ्या मागे चांगली स्थळ उभी राहतील. मी त्यांच्या समोर काहीच नसणार. माझ्याशी लग्न करण्याची इच्छा झटकून टाक. एक टॉप मॉडेल कुठे आणि साध्या स्टुडिओचा डायरेक्टर कुठे?" केविलवाण्या नजरेने तो तिच्याकडे पाहत बोलला.

"फेम, पैसा आणि बरोबरी सगळं काही असतं का? मन महत्वाचे नाही का? काहीतरी ऋणानुबंध असावेत म्हणून आपले धागे जोडले गेले ना. आपली गाठ बांधण्यासाठी रोहिणी एक निमित्त ठरली. मला तुझ्यात चांगला मित्र सापडला आहे. आजवर तो कधीच कोणामध्ये सापडला नव्हता. दुःख कोसळले असताना देखील माझ्यात आत्मविश्वास जागवलास. माझ्या स्वप्नवत क्षेत्राची जगासमोर आगळी ओळख करून दिलीस. तु माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. तर तुझ्या एकांतात तुझा आधार मी का नाही होऊ शकत? विल यू म्यारी मी." म्हणत शेवटी तिने सुधांशु पुढे उडघे टेकले आणि कवितेच्या ओळी गाऊ लागली 


डोळ्यातील अडवूनी पाणी,
पापण्या तू होशील का रे?


बंद दृष्टीश स्पर्श होताना,
नव सृष्टी दाखवशील का रे?

म्हणशील का रे मजला?
सखे! चल जाऊया..
स्वप्नांच्या देशी जाऊ..

चंद्राच्या शहरांमधल्या..
चांदण्याच्या वाटेवर,
अनवाणी चल धाऊ..

जेव्हा पुन्हा उघडती डोळे,
तु सोबत असशील ना रे..

नको वेगळा होऊ आता,
पापण्यांशिवाय डोळे,
सुरेख दिसतील का रे?

सुधांशु पुनमला जवळ घेत म्हणाला,"रोहिणीचा चंद्र तर कायम राहणार अन् तोच अनंत काळाचा चंद्र प्रेमाचा साक्षीदार म्हणून पुनवेची साथसोबत देणार. आय लव्ह यू."

एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार करत लख्ख चांदण्याच्या प्रकाशात दोघांचे अस्तित्व एक होऊन गेले. चंद्र सुद्धा लाजुन कृष्ण ढगांच्या आड लपला. आज त्याला शोधण्याचा मोह तिला झालाच नाही.पुनम मनोमन एवढंच म्हणाली,"श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्रीची तुलना कोणीच करू शकत नाही. पण माझ्या आयुष्यात रोहिणी श्रीकृष्णा म्हणुनच आली. जसे श्रीकृष्णाने सुदाम्याचे अबोल मन जपले. सगळं काही न सांगता देत गेला. परंतु रोहिणीने जाताना माझ्या स्वप्नाची पूर्तता आणि तिच्या वाटेचे प्रेम माझ्या पदरात अर्पण केले." चकोरासारखे सुधांशुच्या रूपाला न्याहाळत असताना आसमंतातील तारा निखळून पडला. रोहिणी पुनवेच्या चंद्राची साक्षीदार होती.

समाप्त


©®नमिता धिरज तांडेल
जिल्हा पालघर

🎭 Series Post

View all