Login

ऋतुचक्र - पुस्तक परीक्षण

Ritu Chakra Book Review
ऋतुचक्र - पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव - ऋतुचक्र
लेखिका - दुर्गा भागवत

मराठी साहित्य क्षेत्रातील एक नावाजलेले नाव दुर्गा भागवत यांचे ललित लेखन म्हणजे 'ऋतुचक्र'.
प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गात घडणारे बारीकसारीक बदल अतिशय समर्पक उपमा देऊन, प्रत्येक महिन्यातील निसर्गाच्या सौंदर्याचे समर्पक वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
यातील पहिला भाग ऋतुचक्र यामध्ये सृष्टीतील बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयीचे चिंतन आढळते. माणसाचे जीवन शहरी झाले असले तरी निसर्ग मानवाचा कशा पद्धतीने पाठपुरावा करतो याचे वर्णन अतिशय सुंदर शब्दात केले आहे.
यापुढील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक महिन्यातील बदलणाऱ्या सृष्टीचे वर्णन केले आहे. या प्रत्येक महिन्याला त्यांनी एक अतिशय समर्पक उपमा दिलेली आहे.
जसे की,
वसंतहृदय चैत्र, चैत्रसखा वैशाख, तालबद्ध पौष, मायावी माघ.

प्रत्येक भागात त्या त्या महिन्याचा प्रवास सुरू होतो. त्या महिन्यात असणारा ऋतू, बदलणारी सृष्टी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. निसर्गातील बदलणारी रूपे त्याचा पशुपक्ष्यांवर होणारा परिणाम यांचे केलेले बारीक निरीक्षण आपल्यालाही निसर्गाकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते.
सौंदर्य प्रत्येक गोष्टीत असते. या पुस्तकात निसर्गातील सौंदर्याच्या अतिशय सखोल वर्णन आपल्याला वाचायला मिळते आणि भाषेतील सौंदर्य ही बघायला मिळते.

हे पुस्तक वाचून खरोखर लेखिकेसारखे आपण उघड्या डोळ्यांनी भरभरून सृष्टीकडे बघतो का? निसर्गाचे निरीक्षण करतो का? असे प्रश्न समोर उभे राहतात.
निसर्गात रमणाऱ्या प्रत्येक निसर्गप्रेमी व्यक्तीने आणि भाषेचे सौंदर्य म्हणजे काय? याचा तर अनुभव घ्यायचा असेल तर दुर्गा भागवत यांचे ललित पर साहित्य ऋतुचक्र हे नक्की वाचा.
या पुस्तकातून आपल्याला पदोपदी भाषा सौंदर्याची प्रचिती येते असाच एक या पुस्तकातील मला आवडलेला परिच्छेद इथे देत आहे......

" पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या एक दोन कथांशिवाय आता करताच येईनासा झाला आहे. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर पण दैव योगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते, ते पावसाच्या रूपाने. त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मीलन सांज सकाळी होते. त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते! पौशातले उगवते तांबडे लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरीशुभ्र फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून, आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली, की खरोखरच वरचे रूपक सार्थ झालेले वाटते आणि म्हणूनच पौशातला सूर्योदय पहाणे मला फार आवडते."
- दुर्गा भागवत (ऋतुचक्र - तालबद्ध पौष)