रीतीरिवाज.. अंतिम भाग

माणसांसाठी रीतीरिवाज की रीतीरिवाजांसाठी माणसे


रीतीरिवाज.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की आशुतोषच्या मुंजीची तयारी सुरू असतानाच भास्कररावांचे निधन होते.
सगळ्यांचा मुंजीतला उत्साह निघून जातो. आता बघू पुढे काय होते ते.


अश्विनच्या मावशीनेच एक दिवस फोनवर विषय काढला..
" अश्विन, अरे मुंजीचे काय करणार आता?"
" मावशी, मी विसरूनच गेलो होतो ग."
" मग आता काही तरी ठरव.. वासंती सांगत होती.. हॉल बुक केला आहे, तुमची सगळी खरेदी झाली आहे म्हणून.."
" हो मावशी, आई आणि बाबांनीच तर सगळे केले.. आता बाबा नाही तर?"
" मी सांगते, ते ऐक.. मुंज करून टाक.. आधीच उशीर झाला आहे अजून नको.. तू जर पैसे भरले असशील तर ते परत देतात का ते बघ.. दिले तर मुंज घरातल्या घरात कर. नाहीतर मग बघ. हवंतर मी बोलते वासंतीशी.."
" तूच बोल"
वासंतीताईंनी मुंज करण्यास होकार दिला.. कोणीच आधी दिलेला ॲडवान्स परत द्यायला तयार नसल्याने आधी ठरल्याप्रमाणेच मुंज करण्याचे अश्विनने ठरवले. क्षिप्रा फक्त हो ला हो करत होती.. मुंजीचा दिवस आला.. सगळेजण हॉलवर जायला निघाले.. इतके दिवस सगळ्याच गोष्टीत पुढे पुढे करणार्‍या वासंतीताई पाठी राहू लागल्या.. विधींना सुरूवात झाली.. मातृभोजन करायला बटू बसला.. सगळ्या बायका तिथे जायला लागल्या.. वासंतीताईंना त्यांची बहिण तिथे घेऊन गेली.. आपल्या नातवाचे कौतुक त्या भरल्या डोळ्याने पहात होत्या.. त्यांच्या बहिणीने त्यांना आशुतोषला घास भरवायचा आग्रह केला.. त्या पुढे जाणार इतक्यात अश्विन त्यांच्याजवळ आला.
" आई, तू कशाला पुढे जाते आहेस?" इतर कशानेही झाले नसते तेवढे दुःख अश्विनच्या एका वाक्याने वासंतीताईंना झाले.. क्षिप्रा आशुतोषजवळ बसल्यामुळे तिला काय चालले आहे ते जरी कळत नव्हते तरी वासंतीताईंचा उतरलेला चेहरा मात्र तिला दिसला.. ती आशुतोषला सोडून त्यांच्याजवळ आली.. " आई कधीची तुमची वाट पाहते आहे, आशुला पहिला घास भरविण्यासाठी.."
" अग पण, ती कशी येणार?" अश्विन मध्येच बोलला..
" का? काय झाले?"
" अग, बाबा नाहीत ना?"
" व्वा अश्विन, मला ना खरेच अभिमान वाटतो कि तू माझा मुलगा नाहीस याचा.. तुला लाज नाही वाटत हे बोलायला.. अरे जन्मदात्री आई आहे ना हि तुझी? बाबा गेले म्हणून काय झाले? बाबा नसताना तुझ्या मुलावर लक्ष ठेवल्याने, त्याला आपण नसताना भरवल्याने काही अपशकुन होत नाही. आणि तेच आज सगळ्यांसमोर समारंभात केल्याने अपशकुन होतात?"
" अग पण रीतीरिवाज?" अश्विनने आपली बाजू मांडण्याचा न पटेलसा केविलवाणा प्रयत्न केला..
" अश्विन, रीतीरिवाज हे माणसाने निर्माण केलेले आहेत.. ते जोपर्यंत जाचक होत नाहीत तोपर्यंत पाळायला काहीच हरकत नाही.. पण आपल्याच जवळच्या माणसांचे मन दुखावतील, त्यांना त्रास होईल असे रीतीरिवाज पाळणे मला तरी शक्य नाही.. तुझे तू ठरव.. अजून एक.. इतके दिवस मी सगळे सहन केले कारण कुठेतरी मनात आशा होती कि हे बदलेल, पण नाही.. जर तू आपल्या आईचाच मान राखू शकत नसशील तर बायको काय आहे.. बरोबर ना?"
" आई, आजी येताय ना? अजून किती वाट बघायची? मला भूक लागली आहे.." तिथून आशुतोष ओरडला..
वासंतीताईंनी अश्विनकडे पाहिले..
" मला माफ कर.. आता तू त्यालाही भरव आणि मलाही.. त्याच्यापेक्षा जास्त शास्त्र शिकायची गरज मलाच आहे.. बरोबर ना क्षिप्रा?"
भरलेल्या डोळ्यांनी वासंतीताईंनी आशुतोष, अश्विन सोबत क्षिप्रालाही भरवले.. कारण आता त्यांना कळून चुकले होते. रीतीरिवाज माणसांसाठी आहेत, माणसे रितीरिवाजांसाठी नाही..

कथा कशी वाटली नक्कीच सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all