राईट्स

Gosht Eka Lekhakachya hakkachi

"काव्या, तू लिहिलेली कथा मी आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते." योगेश आपल्या बायकोला म्हणाला.





"काहीतरीच बोलू नकोस योगेश. माझ्या कथेला पहिला नंबर मिळाला आहे आणि मी लिहिलेल्या कथा तू कधीच वाचतही नाहीस. मग इतरांच्या कथा वाचण्याची तुझी गोष्टच निराळी. बघ, आजवर मी चारशेच्यावर कथा लिहिल्या आहेत. त्यापैकी पन्नासहून अधिक कथामालिकाच असतील आणि सोशल मीडियावर माझे बऱ्यापैकी नावही झालेले आहे. 



अनेक लोक मला आता नावानिशी ओळखतात. मग मी असे का करेन? आणि इतर कुणाची कथा कॉपी करायची मला गरजच काय? पंधरा दिवसांपूर्वी रात्रभर खपून मी ही कथा लिहिली आहे." काव्या रागारागाने आपल्या नवऱ्याला म्हणाली.





"नाही गं.. कधी कधी असे होऊ शकते." योगेश.





"मग तसं स्पष्टच बोल ना. मी दुसऱ्याची कथा चोरून, आपली म्हणून लिहिली! झालं समाधान?" काव्या.





आता बोलण्यात काही अर्थ नाही, असे समजून योगेश खांदे उडवत ऑफिसला निघून गेला.





इकडे मनीषा काळजीत होती. आपल्याच कथेचा आशय, आपलेच विचार, आपल्या संवादाप्रमाणे संवाद कोणी दुसऱ्या कथेद्वारे मांडत असेल तर एक लेखक म्हणून तिला याचा राग येणं साहजिकच होतं. लेखक म्हणून एकमेकांचे आचार- विचार नक्कीच जुळू शकतात. पण आपल्या मैत्रिणीकडून 'स्वतःची 'कॉपी केलेली कथा पहिल्या नंबरात यावी याच तिला दुःख वाटत होतं.





तिने स्वतःची आणि काव्याची कथा आपल्या आईला वाचायला दिली.



"आई, काय वाटते तुला या दोन्ही कथा वाचून?"





"दोन्ही कथा सेमच वाटतात. दुसरी काव्याची जी कथा आहे, ती पहिल्या कथेप्रमाणे थोडीशी रंगवून वाढवल्यासारखी वाटते. बाकी पहिल्या कथेतले सर्व लिखाण दुसऱ्या कथेत तसेच आहे."आई.





"हो ना? म्हणजे मला जे वाटते तेच तुला वाटते. पण आता पुढे काय करायचे हे काही कळत नाहीये मला." मनीषा आईला म्हणाली.



"आपण कष्ट करून, कामातून वेळ काढून कथा लिहितो. कधी कधी एखादी लघुकथा लिहायला दोन-तीन दिवस लागतात तर कधी अगदी तासाभरातही कथा लिहून होते आणि कथामालिका लिहिण्याची गोष्ट तशी अवघडच म्हणायची. विचारा स्पष्टता असली की कथा लिहायला आपोआप सुचते. 



आपण कष्ट करून आपल्या मनातले विचार कागदावर उतरवतो आणि त्याचे श्रेय दुसराच कोणीतरी मस्त लाईक्स, कमेंट्स अन् पहिल्या नंबराद्वारे अक्षरशः पळवून नेतो? याला काय अर्थ आहे?"





"मनीषा, लेखकाला या अशा गोष्टींचा सामना कधी ना कधी करावाच लागतो. मग तो लेखक प्रसिद्ध असला तरी आणि नसला तरीही."





"तरीही आई, मी काव्याला याचा जाब विचारल्या शिवाय राहणार नाही." मनीषाने आपल्या मैत्रिणीला फोन लावला. अपेक्षेप्रमाणे तिने हे मान्य केले नाही.





"मनीषा, तू कोणी फार मोठी लेखिका लागून गेलीस का? की तुझ्या कथा कॉपी करून त्या स्वतःच्या म्हणून लिहून मी त्यावर नंबर मिळवेन? आत्ता आत्ता कुठे तू लिहायला लागली आहेस. तू काही अनुभवी लेखिका नाहीस. हे लक्षात ठेव आणि आता माझ्या कथा मी तुला विचारून लिहू का?" काव्या चिडून आपल्या मैत्रिणीला म्हणाली. 





या उत्तराने मनिषाचे समाधान झाले नाही. 





"झाल्या प्रकारामुळे वाईट वाटणे साहजिकच आहे. पण हा विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही. उगीच आपल्या डोक्याला ताप." आई म्हणाली.





'पण जे चूक ते चूकच म्हंटले पाहिजे ना? लेखकाची कुठलीही परवानगी नसताना त्याचे साहित्य आणि नाव 'वापरणे 'हे देखील चुकीचे आहे. कारण त्याने निर्माण केलेली कलाकृती त्याची 'स्वतःची 'असते. यावर कोणी दुसराच हक्क सांगत असेल तर हा गुन्हा नाही का होत? आणि आपलीच माणसे अशी करू लागली तर बाहेरच्यांना जाब विचारण्यात अर्थ काय? या आधी हा प्रकार दोन-तीन वेळा झाला आहे त्यावेळी मी गप्प बसले ना? कधीतरी आपण आपल्या हक्कासाठी लढायला हवे.'





एक प्रयत्न म्हणून मनीषाने काव्याने भाग घेतलेल्या स्पर्धा कमिटीला संपर्क केला. त्या कमिटीला या दोन्ही कथा तिने पाठवून दिल्या. तशा कमिटीने या कथा पडताळून, निकष तपासून काव्याची कथा स्पर्धेतून बाद केली. कारण मनीषाने ही कथा दोन महिन्यांपूर्वीच लिहिली होती.





नंतर काही दिवसांनी काव्याने आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली.





"काव्या, तू असे कसे करू शकतेस? तुझ्या लिखाणात एक प्रकारचा चार्म आहे, पॅशन आहे. बऱ्याचदा वाचतो मी तुझ्या कथा. दुसऱ्याच्या कथेनुसार आपली कथा लिहून तू स्वतःचे नाव का खराब करून घेतलेस?" योगेश म्हणाला.





"अरे, त्यावेळी ती महत्त्वाची स्पर्धा होती ना त्यात मला नाव कमवायचे होते, पुढे जायचं होते आणि लेखन क्षेत्रात अशा गोष्टी बऱ्याचदा घडत असतात. आज-काल लिहिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मला वाटलं कोणाच्या लक्षात येणार नाही, त्यात सहज खपून जाईल. पण मी हे काही मुद्दाम, कोणाला त्रास द्यायचा म्हणून केलेलं नाही. माझ्या हातून चुकून घडून गेलं. कदाचित वाचलेली कथा डोक्यात फिट बसली असल्याने ती आहे तशीच उतरवली गेली. पण पुन्हा अशी चूक माझ्याकडून कधीच होणार नाही याची मी खात्री देते." काव्याने स्पष्टीकरण दिले.





हा विषय इथे संपला असला तरी अनेकदा लेखकांच्या कथा या आपल्या नावावर छापणारे बरेच जण असतात. मग तो लेखक प्रसिद्ध असो अथवा नसो.



लेखकाने आपले साहित्य अगदी मनापासून लिहिलेले असते. त्यात आपला जीव ओतलेला असतो. त्यावर दुसऱ्यांनी हक्क सांगणे हे चुकीचे आहे. तसेच लेखकाचे नाव वापरले याचा अर्थ लेखकाची परवानगी असेलच असा होत नाही. 



आपण स्वकष्टाने आणि मनापासून दिलेले साहित्य चोरीला गेले समजून, कधी त्या लेखकाच्या जागी आपण आहोत असा विचार करून बघा! आपण जे केले ते चुकीचे की बरोबर याचे उत्तर स्वतःला नक्की सापडेल.





सर्व लेखकांना समर्पित.





©️®️सायली.