Dec 08, 2021
General

मनाची श्रीमंती

Read Later
मनाची श्रीमंती

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मनाची श्रीमंती

कोणे एके काळी कोण्या एका गावात दामु नावाचा मजूर रहात होता. दामू फार गरीब होता. कामाला वाघ होता. त्याच्या पदरात शैतीचा तुकडापण नव्हता.एक बायको,दोन मुलं नी वर्षभर खोकणारी म्हातारी आई हेच त्याचं जग होतं. या त्याच्या माणसांसाठी तो राब राब राबायचा. कधी कुणाची कौले शाकारी,कधी कुणाला माडाचं चुडात वळून द्यायचा. कुणाची चार कापून द्यायचा.  मिळेल ती कामं तो करायचा.

दामूची बायकोपण गोधड्या शिवायची. कोण बाळंतीण झालं तर बाळबाळंतीणीची मसाज,अंघोळ अशी काम करायची.

त्यांच्या घराशेजारी एक वाडा होता. वाड्यात एक म्हातारी आजी रहायची. तिची सगळी पिलावळ बाहेरगावी रहात होती. आजीच्या अंगात ताकद होती तोवर ती कोणावर अवलंबून नव्हती. आपली कामं आपण करायची. आजीचे यजमान गेले नि आजी एकटी पडली. एकटीसाठी काय स्वैंपाक करणार नि केलेला स्वैंपाक एकटीच्या घशातून जातही नव्हता. आजी बरेचदा उपाशी रहायची. याने व्हायचे तेच झाले. आजीची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली.
 तिला उठून बसतापण येईनासं झालं.

आजीने दामुच्या बायकोला,दुर्गेला विचारलं,"माझ्याकडे कामाला येशील?" खरंतर तेंव्हा काजूचा हंगाम चालू होता. काजूच्या फेक्टरीत स्त्रीमजुरांना भरपूर मागणी असायची. भाजलेल्या काजुबिया फोडणे,त्यांच्या साली काढणे,अख्खे गर,अर्धे गर,फुटकळ अशी वर्गवारी करणे ही कामं बाया तिथे जाऊन करायच्या किंवा काहीजणी काजुबियांचे डबे घरी आणून दिवसभर मान मोडेस्तोवर ते काम करायच्या. त्यात बऱ्यापैकी कमाई व्हायची. अगदी सालींचंही वजन व्हायचं त्यामुळे चोरीमारीला जागा नव्हती पण बऱ्यापैकी पैसे सुटायचे. 

दुर्गेने दामुला आजीची अडचण सांगितली. दामू म्हणाला,"म्हातारीची यानिमतान सेवा घडंल आपल्या हातून. पैशाचं काय घिवून बसलियास. पैसा काय आज हाय उद्या न्हाय. तू आजीची सेवा कर. मी घरात मदत करीन तुला."

दुसऱ्या दिवशीपासून दुर्गा आजीकडे कामाला जाऊ लागली. आजीच्या अंगाला कोमट तेलाने मालिश करुन,ऊन ऊन पाण्याने तिला न्हाऊमाखू घालू लागली. आजीचे सुतरफेणीसारखे पांढुरके केस छान विंचरून त्यांची बारीकशी वेणी घालू लागली. तिचे कपडे साबण लावून स्वच्छ धुवू लागली. आजीचं अंथरूणपांघरुणही ती आठवड्यातून एकदा नदीवर न्हेऊन स्वच्छ धुवे.

अंग स्वच्छ झाल्याने आजीच्या मनालाही उभारी आली. दुर्गा करत असलेल्या मालिशने म्हणा अगर ती लावत असलेल्या जीवामुळे, आजीचं मन बरं झालं. मन बरं झालं तसं तनही सुधारू लागलं. आजी उठूबसू लागली. आधीसारखी कुत्र्यामांजरांशी,झाडापेडांशी गप्पा मारु लागली. 

दुर्गा आजीला वेळेवर नाश्ता,जेवण द्यायची. साजूक तुपातला शीरा,उपीठ,थालिपीठलोणी, मेतकुट भात,डाळिंब्याभात असं सारं पौष्टिक अन्न खाऊन आजी भोपळ्यातल्या म्हातारीसारखी गुटगुटीत झाली.

आजीने दुर्गेला भरभरुन आशीर्वाद दिला. तिला महिन्याला दोन हजार रुपये देऊ लागली शिवाय आजी तिच्यासोबत दुर्गालाही जेवायला लावायची. दोघी मिळून जेवत असल्याने आजीलाही जेवण जाऊ लागलं होतं.

दुर्गा सासूचं सगळं करुन मगच कामाला जायची पण सासूला ती डोळ्यासमोर हवी असायची. सासूच्या लेकी आल्या की सासू त्यांच्यापुढे सुनेची गार्हाणी मांडी.
सून लक्ष देत नाही,दिवसभर बाहेर जाते....असं आणि तसं.

एकदा माहेराहून घरी जाताना दुर्गाच्या नणंदेचा अपघात झाला. तिच्या नवऱ्याला कमी लागलं पण ती मागे बसलेली असल्याने ती उडवली. तिला बराच मुकामार लागला व हात फ्रेक्चर झाला. पायाच्या हाडांत क्रेक गेला.

अशा परिस्थितीत तिच्या नवऱ्याने तिला इस्पितळातून सरळ तिच्या माहेरी नेऊन सोडलं. दुर्गेने नणंदेबद्दल कोणताही पुर्वग्रह मनात न धरता नणंदेची सेवा केली.

चारेक महिन्यांनी नणंद हिंडू फिरू लागली.
तिला दुर्गाविषयी आपण किती चुकीचे विचार करत होतो हे आठवून पश्चाताप झाला. तिच्या आईलाही आत्ता तिची सून आवडू लागली.

हे सारे करताना दुर्गाने आजीकडे अजिबात दुर्लक्ष केलं नव्हतं. पहाटे लवकर उठून ती या सगळ्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडत होती. 

एकदा नेहमीप्रमाणे दुर्गा आजीकडे गेली असता,आजीची अंघोळ झाल्यावर आजीने दुर्गाला शेजारी बसवलं. आजीने दुर्गाला तिने साठवलेले पन्नास हजार रुपये,चार सोन्याच्या बांगड्या,राणीहार,मोत्याची नथ,कुडी,बुगडी,बाजूबंद यांनी भरलेला डबा दिला.

दुर्गाला काहीच समजेना. ती आजीला म्हणाली,"हे दागिने घालू का तुला आजी?" यावर आजी खुदकन हसली,म्हणाली,"अगं दुर्गे निरोगी,सुद्रुढ शरीर हाच खरा दागिना. हा माझा मौल्यवान दागिना मोडकळीस आला होता. तू माझी डागडुजी केलीस. अगं रक्ताची माणसं करणार नाहीत इतकी सुंदर सेवा करतैस तू माझी.
हे माझं स्त्रीधन मी तुला प्रेमाने देतेय बाळा. याचा स्विकार कर. काल मी लेकाला फोन लावून मला बघायला ये म्हणून सांगितलं तर लेकाने मला सांगितलं की शेजाऱ्यांना सांगून ठेव. मला अजिबात वेळ नाही सध्या. 
तुझं बरंवाईट झालं तर शेजाऱ्यांनाच करा म्हणून सांग. मी पैसे ट्रान्सफर करेन त्यांना. मग मी लेकीला फोन लावला तर ती म्हणाली तू दादालाच सांग काय ते. माझंच मला होत नाहीए. तुला सांगते दुर्गे,माझा या नात्यांवरचा
 विश्वास उठला आहे. तु माझी कुणीच नाही तरी म्हातारपणात आपलं माणूस म्हणून सेवा करतेस. तुझं नी माझं नातं काय?
माझी माणसं पैशाने श्रीमंत आहेत पण खरी श्रीमंती मनाची ती तुझ्याजवळ आहे दुर्गा.
आजपासून तुम्ही माझ्या वाड्यावर रहायचं.
माझ्यानंतर या वाड्याची मालकीण तू."

दुर्गा आजीच्या पाया पडली. दोन दिवसांनी ती सर्वजणं आपली चार भांडीकुंडी गोळा करुन आजीच्या वाड्यावर रहायला आली. दुर्गा नेहमीप्रमाणे वाड्याची साफसफाई करु लागली. आजीची नियमित निगा राखू लागली. आजी आताशी गोडधोड खायला मागे. दुर्गा तिला ती मागेल ते करुन घाली.

दोन्ही म्हाताऱ्या मिळून गप्पा मारीत. दुर्गाचे कौतुक
 करीत.

एक दिवस आजीचा मुलगा एका बिल्डरला घेऊन तो 
वाडा विकण्यासाठी आला. आजीशी फार गोडगोड बोलत त्याने कोऱ्या कागदावर आजीची सही मागितली कारण त्याला माहित होतं की आजी सहजासहजी वाडा विकू देणार नाही.  आजीने सही द्यायला नकार दिला.
तिने मुलाला म्रुत्यूपत्र दिलं. त्यात तिने लिहिलेलं होतं की तिच्या म्रुत्यूनंतर सगळी संपत्ती ती दुर्गाला देणार.

मुलगा जरा चडफडला. बरंच काही बडबडला. हे लोक तुझ्या पैशासाठी तुझ्यासभोवती गोळा झालेले डोमकावळे आहेत म्हणाला. आजीने त्याला म्हंटलं,फार बोललास. नीघ आता. 

आईपुढे आपलं काहीच चालत नाही आहे हे लक्षात येताच मुलगा खाली मान घालून चालू पडला. वाकून आईला नमस्कार करावसंही त्याला वाटलं नाही. लेकीचाही फोन आला. तिलाही आजीने लेकाला दिलं तेच उत्तर दिलं. 

आजी दुर्गेच्या कुटुंबातलाच एक घटक झाली व भरपूर वर्ष सुखाने जगली.

-------सौ.गीता गजानन गरुड.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now