समीक्षा - मराठी चित्रपट ' पिंजरा '

पिंजरा ह्या चित्रपटाची समीक्षा


समीक्षा - मराठी चित्रपट \" पिंजरा \"

३१ मार्च १९७२ रोजी व्ही. शांताराम दिग्दर्शित \" पिंजरा \" पहिला रंगीत तमाशाप्रधान चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेसृष्टीत \" मैलाचा दगड \" ठरला. मराठीत रंगीत चित्रपटाचे युग सुरू झाले. तसे तर व्ही. शांताराम यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपटांची देणगी दिली आहे. त्यांचे चित्रपट म्हणजे सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित आणि विचार करण्यास भाग पाडणारे असत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात नाविन्य विषयांची छाप असे. लोकांनी पिंजरा चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. सदाबहार गाणी आणि लावण्यांचा अविष्कार याबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या पिंजरा चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे.

मुळात पिंजरा चित्रपटाची कथा - कल्पना निर्माते व दिग्दर्शक अनंत माने यांची. त्यांनी ती शांताराम बापूंना सांगितली. व्ही. शांताराम यांना एक तमाशाप्रधान चित्रपट काढायचा होता. मुंबईमध्ये लालबाग येथे \" हनुमान \" नावाचे तमाशाचे थिएटर होते. त्यावेळी तिथे तमाशाचे खेळ होत असत. व्ही. शांताराम यांनी तिथे तमाशा पाहिला आणि तमाशाप्रधान चित्रपट काढायचं पक्कं ठरवलं तेव्हा एक अद्भुत कलाकृतीने जन्म घेतला. नायिका म्हणून संध्या यांचे नाव पक्के होते. संध्याच्याच तोडीला दमदार अभिनयाच्या नायकाच्या शोधात असताना डॉ. श्रीराम लागू यांची वर्णी लागली. डॉ. श्रीराम लागू हे नाट्यक्षेत्रात प्रख्यात होतेच. निळू फुले हे देखील अभिनयक्षेत्रात प्रख्यात होतेचं त्यामुळे त्यांना देखील महत्वाची भूमिका वाट्याला आली. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अक्षरशः जगवली.

संध्या, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांच्या अविस्मरणीय जिवंत अभिनयाने नटलेला, जगदीश खेबुडकर यांच्या गीतांनी सजलेला, राम कदम यांचे संगीत लाभलेला चित्रपट. डॉ. श्रीराम लागू यांचे मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण ह्या चित्रपटाद्वारे झाले. पन्नास वर्षांचा काळ लोटला तरी हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पिंजरा चित्रपटाची हिंदी आवृत्ती देखील काढली गेली होती पण हिंदी \" पिंजरा \" प्रेक्षकांना भावला नसल्याने सपशेल आपटला.

आली ठुमकत नार लचकत ..... ग साजणी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, दिसला ग बाई दिसला, मला इश्काची इंगळी डसली, दे रे कान्हा दे रे चोळी अन लुगडी, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल, मला लागली कुणाची उचकी, कशी नशिबानं थट्टा आज मांडली यांसारखी श्रवणीय गीते आणि त्यांना स्वरसाज चढविला होता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सुधीर फडके, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांनी.

\" पिंजरा \" ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अधःपतनाची कथा आहे.

चित्रपटाची सुरुवातचं \" आली ठुमकत, नार लचकत \" ह्या गाण्याने होते. तमाशाचे खेळ करण्यासाठी तमासगीरांचे संपूर्ण कुटुंबकबिला गावागावात जाऊन तळ ठोकते. उदरनिर्वाहासाठी तमाशांचे खेळ केले जातात. ज्या गावात ती मंडळी येतात त्या गावात चित्रपटाचे नायक एक हाडाचे शिक्षक श्रीराम लागू ह्यांच्या विचारांचा गावकऱ्यांवर प्रभाव असतो. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झटत असतात. त्यांना गावात अतिशय मान असतो. एकदम आदर्श असे ते गाव असते. तिथे कुठल्याही वाईट विचारांना, संगतीला थारा नसतो.

गावात तमाशा करण्यासाठी मंडळी आल्याचे समजताच श्रीराम लागू तमाशाचे खेळ गावात करण्यास विरोध करतात. त्यांना अपमानास्पद बोलतात. त्या तमाशाफडातील चित्रपटाची नायिका संध्या त्या आदर्श शिक्षकाच्या तत्त्वाने, झालेल्या अपमानाने त्वेषाने पेटून उठते. त्याच आवेशात ती शपथ घेते की, \" या गुरुजींना मी माझ्या नादी लावल्याशिवाय राहणार नाही.\" त्याप्रमाणे ती नायकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्या सौन्दर्याचा, मादकतेचा प्रभाव पाडण्यास सुरुवात करते. तिच्या पायाला चमक भरली असे सांगताच गुरुजी औषधी पाने आणून त्याचा पाला वाटून नायिकेच्या पायाला बांधतात. कधीही स्त्रीला स्पर्श देखील न केलेल्या गुरुजींना नायिका तिला स्पर्श करण्यास भाग पाडते. नायक जरी आदर्श शिक्षक असले तरी शेवटी पुरुषचं. नायिकेच्या मोहाला ते बळी पडतात. त्या स्त्रीमध्ये ते इतके गुंततात की, तमासगीरांच्या फडात ते राहू लागतात. गावात त्यांना मानाचे स्थान असते आणि इथे एखादया बांडगुळासारखे जीवन त्यांना जगावे लागते. त्यांना नोकरांच्या पंगतीत वाढले जाते. तरी ते नायिकेच्या प्रेमापोटी सगळं सहन करतात. कालांतराने त्यांच्यातील एक होतात. इथे सुडाने पेटलेल्या नायिकेची शपथ तर पूर्ण होते पण नायिका सुद्धा गुरुजींमध्ये गुंतत जाते.

इथे गावकरी अजूनही गुरुजींना त्यांचा आदर्श मानत असतात. गुरुजी गावात बरेच दिवस दिसत नसल्याने गावात खळबळ माजलेली असते. गावकऱ्यांचा देव्हाऱ्यातील देवचं नाहीसा झालेला असतो.

त्या तमाशातील फडात एक अशी व्यक्ती असते जिला नायक - नायिकेचे प्रेम बघवत नाही. कायम गुरुजींवर ती व्यक्ती जळफळाट करत असते. एके दिवशी अगदी अनाहूतपणे गुरुजींच्या हातून त्या व्यक्तीचा खून होतो. गुरुजी अतिशय घाबरून जातात. ते त्या मृत व्यक्तीला आपले स्वतःचे कपडे घालतात ज्याने करून सगळ्यांना वाटले पाहिजे की, गुरुजींचा खून झाला. गावातील लोकांच्या मनातील स्वतःबद्दलची प्रतिमा तशीच कायम राखण्यासाठी गुरुजी हे पाऊल उचलतात. गावकऱ्यांना वाटते की, गुरुजींचा खून झाला म्हणून गावकरी त्यांच्या देवासारख्या गुरुजींचा पुतळा उभारतात. गावकऱ्यांचे प्रेम बघून गुरुजींना अपराधी वाटू लागते. गुरुजी गावकऱ्यांना सांगतात की, गुरुजींचा खून माझ्या हातून झाला आहे. गावकरी संतापून गुरुजींना स्वतःच्याच खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या हाती स्वाधीन करतात. गुरुजींना कोठडीत बंद केले जाते. गुरुजी बंद तुरुंगात त्यांचे प्रायश्चित घेतात. इथे नायिका जी गुरुजींवर खरोखर प्रेम करू लागलेली असते तिला आपल्या कर्माची उपरती होते. गुरुजींना शिक्षेपासून वाचविण्यासाठी ती न्यायालयात हेच खरे गुरुजी आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करते. पण गुरुजींच्या सत्वामुळे नायिकेची वाचा जाते. अखेर मास्तर निरपराध सिद्ध होत नाहीत आणि त्या दोघांचे आयुष्य उध्वस्त होते.

चित्रपटात गाणी देखील अतिशय चपखलरीत्या बसवली आहेत. तमाशाप्रधान चित्रपट असल्याने गाणी आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळतो. \" आली ठुमकत, नार लचकत \" ह्या गाण्यातून नायिकेचा दिमाखदार प्रवेश दाखवला आहे. \" ग साजणी \" ह्या तानेवर तर अगदी जीव ओवाळून टाकावासा वाटतो. \" तुम्हांवर केली मी मर्जी बहाल \" हे गाणे नायिका मादकरित्या हावभाव करून जेव्हा मास्तर तिच्या पायांना लेप लावत असतात तेव्हा ती गाते. तिच्या रूपाची मोहिनी मास्तरांवर पडते. \" कशी नशिबानं थट्टा आज मांडली \" ह्या गाण्यात नायकाच्या जीवनाचा जीवनपट साकारला आहे. मास्तर फडावरती तुणतुणे घेऊन उभे राहतात. त्यांचा मानमरातब गळून पडतो.

आदर्श नीतिमत्ता, तत्वनिष्ठा असणाऱ्या शिक्षकाची ही कथा. एका तमासगिरीणीमुळे त्यांचं अधःपतन होतं. संपूर्ण कथेला तमाशाची पार्श्वभूमी आहे. चांगल्या - वाईट गोष्टींचा संघर्ष, नायिकेचं हृदयपरिवर्तन तरीही आदर्श शिक्षकाचे अटळ नुकसान होते. ते देशोधडीला लागतात.

" पिंजरा त्यो कोनाला चुकलाय ? अवो मानसाचं घर तरी काय असतंय ? त्योबी येक पिंजराच की." हे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि \" व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत \"या महान तत्वावर अफाट श्रद्धा असलेला नायक ह्या दोघांची संघर्षाची कथा म्हणजे \" पिंजरा \" चित्रपटात उत्कृष्टपणे मांडण्यात आली. तमाशा कलावंतीण आणि आदर्श मास्तर यांच्यातील संघर्ष आणि अव्यक्त प्रेम अतिशय सुंदररित्या कथेत मांडले. चाकोरीबाहेरचा विषय असूनदेखील रसिकांना तो भावला. चित्रपटाच्या कथानकाने संपूर्ण समाजमन ढवळून काढले. मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेशही पोहोचविला गेला. सर्वसामान्यांचे जीवन आणि तमासगीरांचे जीवन यांच्यातील तफावत मांडली आहे. अनैतिकतेच्या पिंजऱ्यात भले भले जरी अडकले तरी अधःपतनाशिवाय मागे फिरण्याचा रस्ता नाही ही शिकवण ह्या चित्रपटाने दिली. प्रत्येकाच्या मनःपटलावर ह्या चित्रपटाने एक वेगळं स्थान निर्माण केलं.