बदला

Revenge

#बदला

प्रवासाच्या थकव्याने कविता जरा उशिराच उठली. तिचा नवरा सारंग कधीचा ऑफिसला गेला होता. जरा आळोखेपिळोखे देऊन ती अंघोळीला गेली. न्हाऊन आल्यावर चहा करण्यासाठी कठड्याजवळ गेली तर तिथे कॉफीचा मग होता ज्यात बरीच कॉफी शिल्लक होती.

 सारंग तर कॉफी पीत नाही मग..ती मनाशीच म्हणाली. तिने चहा उकळत ठेवला व केर काढायला म्हणून दिवाणखान्यात गेली. पहाते तर काय, टेरेसमधून दिवाणखान्यात उमटलेली कुंकवाची पावलं..ती पावलं पहाताच कविताची भीतीने गाळण उडाली. 

कविता ती कुंकवाची पावलं ओल्या फडक्याने पुसू लागली पण छे! ती पुन्हा उमटत होती. कविताच्या अंगावर सर्र्कन काटा आला. भीतीने ती दरवाज्याजवळ गेली. तिने दार उघडलं आणि..आणि..दारात ती धुसर आक्रुती उभी होती. तिला पहाताच कविता जागच्याजागी धरथर कापू लागली.

 कोण होती ती आक्रुती? ती आक्रुती कविताच्या नात्यातली होती. हो,कविताची सख्खी जुळी बहीण सविता. 

सविताचं लग्न सारंगशी झालं हेच मुळी कविताला आवडलं नव्हतं. लहानपणापासून प्रत्येक वस्तू..बाहुलीपासून ते फ्रॉक,चप्पल अगदी अंतर्वस्त्रसुद्धा एकसारखी घेणाऱ्या त्या जुळ्या बहिणी.

 त्यांच्या मम्मीपप्पांनी त्यांना लाडाने सवयच लावलेली तशी. आता मात्र वयात येता येता सविताची उंची ,बांधा हा कवितापेक्षा सरस दिसू लागला. 

सविताकविताच्या मम्मीने दोघी बहिणींची नावं विवाहमंडळात नोंदवली. पहिलं स्थळ आलं ते सारंग चक्रपाणी यांच तेही कवितेहून उजव्या दिसणाऱ्या सवितेसाठी. 

कविताला सारंगचा गौरवर्ण,तरतरीत नाक, कुरळे केस सगळं सगळं आवडलं होतं. तिच्या स्वप्नातलाच राजकुमार जणू त्यांच्या घरी आला होता पण त्याने मागणी घातलेली सवितेला. 

मम्मीपप्पा,सविता सगळे खूष होते. घराणंच होतं तसं वजनदार. शहरात टुमदार बंगला,गावचा वाडा,बागायती शैती,दिमतीला आलिशान गाड्या..शिवाय सारंगचं वकीलीचं शिक्षण. एक नामवंत वकील म्हणून तो जिल्ह्यात प्रसिद्ध होता. पण हे सारं सुख आता सवितेला मिळणार होतं. कविताने तोंडावर खुशीचा,प्रसन्नतेचा मुखवटा परिधान केला असला तरी ती आतून जळत होती,एखाद्या जळत्या मेणबत्तीसारखी तिची गत झाली होती.

अगदी धुमधडाक्यात सबनीसांच्या सवितेचं सारंग चक्रपाणीशी लग्न लागलं नि सविता सारंगची सहचारिणी बनली. कविता तिच्यासोबत तिची पाठराखीण म्हणून गेली होती खरी पण त्या दोघा नवविवाहितांचे चोरटे नेत्रकटाक्ष पाहून तिला फार वाईट वाटत होतं. तो ऐसपेस वाडा,ती शानशौकत,तो मानमरातब.. कवितेला वाटू लागलं आपण एकटेच असतो तर हे सारं आपलं झालं असतं. आपण सारंगच्या ह्रदयावर राज्य केलं असतं. 

चार दिवस सविताताईसोबत राहून कविता माघारी आली. आता तिचं मन कथाकादंबरी या कशातच रमत नव्हतं. जिथे पहावं तिथे तिला सारंग दिसत होता..गोरापान,घनदाट मिशांचा,हसरा बोलका सारंग..सारंग सवितेचा..अं हं..तो तर माझाच..तो सविताईचा कसा होईल! वयात आल्यापासून माझ्या स्वप्नात येणारा तो माझी अशी प्रतारणा नाही करु शकत. मी सारंगला मिळवणार..पण कसं?..या अशा विचारांत कविता रात्ररात्र जागू लागली.

इकडे महिना होत नाही तोच सविताची पाळी चुकली. सारंगला ही गोड बातमी सांगताना सविताच्या गोबऱ्या गालांवर लाल गुलाबांचा ताटवा फुलला. सारंग खूप खूप खूष झाला. सारंग त्याच्या आईवडिलांच एकुलतं एक पुत्ररत्न जे त्यांना लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनी झालं होतं. सारंगचे आईवडील आता वयोपरत्वे थकले होते.

 सारंगनंतर त्या वाड्यात लहान बाळाच्या रडण्याचा,हसण्याचा,बाळाच्या छुमछुम पावलांचा आवाज घुमलाच नव्हता. वाड्याचे कानही आसुसले होते बाळाचा आवाज ऐकायला. 

सारंगचे आईवडीलही ही गोड बातमी ऐकून खूप खूष झाले. लगेच सविताच्या माहेरी सविताने फोन करुन कळवलं. कविता हे ऐकून अजुनच बेचैन झाली. कवितेसाठीही छान छान स्थळं येत होती पण कवितेला कोणीच पसंत पडत नव्हतं कारण तिला हवा होता फक्त आणि फक्त सारंग. कवितेला चक्रपाण्यांची सून व्हायचं होतं. 

सविताची तब्येत दिवसेंदिवस नाजूक बनत चालली होती. सारंगने तिला माहेरी जाण्याचा सल्ला दिला पण सविताचा जीव सारंगमधे गुंतला होता. त्याला सोडून आता तिला माहेरी मुळीच चैन पडणार नव्हती.

 सविताची सासूही म्हणाली,"सविता,अगं माहेरी जायला मिळणार म्हंटल्यावर आम्ही किती खूष व्हायचो. तुला मात्र सारंगशिवाय क्षणभरही करमत नाही. आता तो ऑफिसला जाऊ लागला की कसं व्हायचं तुझं!" सविताने लाजून तिचा चेहरा तळहातांत लपवला.

सारंगला एका केसच्या संदर्भात वारंवार मुंबईला जावं लागत होतं म्हणून मग सारंग सवितेला घेऊन म़ुबईच्या बंगल्यावर रहायला गेला. इतर नोकरचाकर होतेच पण डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट सांगितल्याकारणाने सविताच्या माहेराहून कविताला सविताची काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आलं. 

सविताचे डोहाळे कडक होते. काही म्हणजे काही पोटात टिकत नव्हतं. ती ग्लानीतच रहायची. सारंगचं चहापाणी,त्याचं जेवणखाण सगळं आता कविता सांभाळू लागली. मुद्दाम त्याला रिझवण्यासाठी उत्तान वेशभूषा करु लागली. तरुण वयाचा सारंगही कवितेकडे आपसूक खेचला गेला. 

सविताला स्वैंपाक करणाऱ्या मावशींनी आडूनआडून कवितेबद्दल स़ागितलं खरं पण सविताला सारंग व कविता दोघांबद्दलही कमालीचा विश्वास होता. त्यामुळे सविता उलट मावशीवरच डाफरली. 

कविता व सारंगला जणू मोकळं रानच मिळालं. सारंग त्याच्या ऑफीसच्या कामासाठी कविताला घेऊन जातो म्हणून सांगून तिच्यासोबत सिनेमे बघू लागला..चौपाटीवर जाऊ लागला.

 इकडे आठव्या महिन्यात सविताचा बीपी वाढला. तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. बाळाचे ठोके मंदावत होते. सिझेरियन करावं लागलं पण सविताचं बाळ गेलं. सविताची अवस्था अत्यंत दिनवाणी झाली. स्तनांतून दुधाच्या धारा ओझरत होत्या पण ते प्यायला तिचं बाळ नव्हतं तिच्यासोबत. तिला धीर द्यायला हवा होता तो नवऱ्याने जो तिच्या सख्ख्या बहिणीसोबत आता राजरोस फिरत होता. अगदी सविताच्यादेखत दोघं एका ताटात जेवत होती.

सविताने मम्मीपप्पांना कळवायचं ठरवलं पण सविताच्या बाळाची दु:खद बातमी ऐकून तिच्या पप्पांना हार्ट एटेक आला होता व मम्मीही त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होती. सासूसासऱ्यांना सांगेल तर तेही बिचारे वयोव्रुद्ध. 

एके दिवशी कविता तिच्याशी फार गोड वागू लागली. तिने सविताचे केस विंचरले. तिला सॉरीदेखील म्हंटलं. सविताला फार बरं वाटलं. शेवटी पाठीमागची बहीणच ती. सविताने तिला माफ केलं.

 सविताच्या आवडीचं सगळं जेवण कविताने बनवलं व तिला खाऊ घातलं. सविता निवांत झोपली तशी तिच्या तोंडावर उशी दाबून धरून कविताने तिचा काटा काढला. सगळं इतक्या हातचलाखीने केलं की तो नैसर्गिक म्रुत्यूच वाटावा. पोलिसांत एडव्होकेट सारंग चक्रपाणींची वट होतीच. प्रकरण आपसूक दाबलं गेलं.

त्यानंतर महिनाभरात सारंग व कविताचे लग्न झाले. सारंगच्या आईवडिलांना तर कविताने हे लग्न करुन त्यांच्यावर उपकार केले असं वाटत होतं. 

आज पहाटेच सारंग व कविता वाड्यावरुन शहराकडे आली होती. स्वैंपाकीण मावशी व दोघे नोकर रजेवर गेले होते. त्यांना सारंगने निरोप पाठवला व त्याचे एक अर्जंट काम आल्याने ऑफिसला जरा लवकरच गेला.

 कविताला मात्र अंघोळीवरुन आल्यावर हे विविध भास होत होते..ती कुंकवाची न पुसली जाणारी पावलं.. तो  कॉफीचा मग आणि दारात उभी असलेली सुवासिनीचं मळवट भरलेली सवितेची छाया.. ती जणू सांगत होती..नाही सुखाने जगणार तू कविता..मी आलेय बदला घ्यायला..बघते आता कोण वाचवतो तुम्हाला. 

कविता चक्कर येऊन तिथेच पडली. थोड्याच वेळात मावशी आल्या. त्यांनी कवितेला या अवस्थेत पहाताच तिच्यावर पाणी शिंपडलं. काही क्षणात कविता शुद्धीवर आली पण ती भेदरलेली होती. "ती पावलं..ती ती बघ  कुंकवाची पावलं,"कविता मावशींना म्हणाली. 

"कुठेशी दिसतायत पावलं तुमास्नी ताई,लादी तर चकाचक दिसतीया."

"म्हणजे मी खोटं बोलतेय! आणि ती दारावर.."

"कोन ती..कुनीबी नाय बगा. तुमीच दार उगडं करुन ठिवलं व्हतं."

"थांब चल किचनमधे.. हा हा बघ कॉफीचा मग..अरे गेला कुठे? अर्धी कॉफी होती त्यात."

"काय ताई तुमीपन. सविताताई गेल्यापासनं घरात काफीचं पाकिटबी हानलं नाय नि तुमी काय सांगून राह्यलात!"

"म्हणजे,मी वेडी वाटते तुला!"

"आसं मिया कुठं म्हनलं?"

मावशी चुपचाप आपलं काम करु लागली. थोड्या वेळाने गणू व राघू दोघे नोकर आले. 

घरात सगळी असताना कविताला काही भीती वाटत नव्हती पण दुपारी मावशी तिच्या घरी जायची. दोन्ही नोकर आऊटहाऊजमधे झोपायला जायचे त्यावेळी मात्र कविता घाबरुन जायची. तिला पडदे हलल्याचे भास व्हायचे..कोणीतरी तिला बोलवतय असे भास व्हायचे.

 कविताने याबद्दल बरेचदा सारंगला सांगितल पण सारंग तिला तेवढ्यापुरतं समजवायचा. त्याचेही व्याप वाढले होते. तो त्याच्या कामात गुरफटत गेला होता शिवाय अधेमधे त्याला वाड्यावर जाऊन आईवडिलांची ख्यालीखुशाली घ्यावी लागायची.

कविता तिच्याच कोषात गुरफटत जात होती. तिच्या चेहऱ्यावरची पुर्वीची चमक गेली. ती आरशाजवळ गेली तरी तिला आरशात सविता हसत असल्याचा भास होई. शेवटी एके दिवशी ती पोलीस चौकीवर गेली व तिने तिच्या बहिणीची हत्या केल्याचं इन्स्पेक्टरांना सांगितल. ताबडतोब इन्स्पेक्टरांनी सारंगला बोलावलं. सारंगने तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं सांगितलं व कविताची रवानगी वेड्याच्या इस्पितळात झाली.

सारंग आता एकटाच बंगल्यात राहू लागला. मावशी येऊन स्वयंपाक करुन जायच्या. त्यालाही रात्रीचे वेगवेगळे भास होऊ लागले. भिंतीवर सावल्या दिसू लागल्या व सविताचा आवाज..सारंग असं झालं की त्याचं डोकं गच्च दाबून धरायचा.

 सततच्या ताणामुळे त्याचं कामात लक्ष लागेना. त्याची अधोगती होऊ लागली. शेवटी तब्बल एका वर्षाने सारंगने पोलिसांना आपला कबुलीजबाब दिला. त्याचे व कविताचे अनैतिक प्रेमसंबंध होते व कविताने त्याच्या सांगण्यानुसारच स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा गळा दाबून खून केला हे कबूल केलं. या प्रकरणात गणू व रघूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या सोबतीला स्वैंपाक करणाऱ्या मावशीही होत्या. तिघांनी मिळून आपल्या मालकिणीच्या खुनाचा बदला घेतला होता. 

एका अश्राप जीवाला त्यांनी त्याच्या मरणोपरांत न्याय मिळवून दिला.

---सौ.गीता गजानन गरुड.