सुड.. भाग -2

विजय दारू पियुन घरी येतो.

भाग -2


विजय स्वतःशीच तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलतो, "वाह! छान! , मला वाटलेलंच ती आजही नेहमीप्रमाणे येणार नाही."


तो पुन्हा वैतागत मधूला कॉल लावतो. तिचा कॉल काही लागत नसतो. तितक्यात त्याचा वकील येतो.


वकील बोलतो, "विजय सॉरी, पण आज त्या येऊ शकत नाहीत . आपण पुढची तारीख घेऊया का?"


विजय वकीलावर चिडत बोलतो, "चुकीचं आहे ना, ती प्रत्येक तारखेला असं वागतेय. "


वकील त्याला समजावत बोलतो, "आपण काही करू शकत नाही, त्या कोर्टाला ती कारणे देतात, जी पटण्यासारखी आहेत."


विजय चिडत बोलतो, "तिचं कारण पटतं आणि मग माझं कारण, त्याचं काय?"


वकील बोलतो, "ह्म्म्म!"


विजय बोलतो, "नुसती मान डोलावू नका. माझा वेळ सुद्धा वाया जातोय, त्याच काय?"


वकील बोलतो, "मी त्यांच्या वकीलाशी बोलून घेतो, तुम्ही जा आता! मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो."


विजय बोलतो, "तुम्ही कोर्टाकडून परमिशन घ्या!"


वकील बोलतो, "कसली परमिशन मिस्टर विजय?"


विजय बोलतो, "जर तिला कोर्टात यायला वेळ नाही तर, मी घेऊन येईन तिला कोर्टात!"


वकील त्याला समजावत बोलतो, "असं कसं शक्य आहे मिस्टर विजय?"


विजय बोलतो, "सगळं शक्य असतं , तुम्ही फक्त कोर्टाशी बोलून घ्या आणि मला संध्याकाळी कळवा."


एवढं बोलून विजय निघून जातो. विजयला समजावणं वकीलाला खूप अवघड जातं. विजयचा वकील जाऊन मधूच्या वकीलाला भेटतो. मधूची वकील ही एक स्त्री असते आणि तिला एका स्त्रीवर होणारा अन्याय सहन होत नसतो आणि मधूची केस खूप स्ट्रॉंग असते. मधूला न्याय मिळावा, म्हणून ती मधूची केस लढत असते.


विजयचा वकील मधूच्या वकिलाला आवाज देत थांबवतो, "मॅडम, मधू आल्या नाही? आज तारीख होती."


मधूची वकील बोलते, "हो, तसं कोर्टाला मगाशीच मी सांगितलं आहे."


विजयचा वकील बोलतो, "हो पण मिस्टर विजयला ते कारण पटत नाही आहे. "


मधूची वकील चिडते आणि बोलते, "न पटायला काय त्यात? त्यांचा हेल्थ प्रॉब्लेम आहे आणि ते त्यांना पटवून घ्यावं लागेल."


विजयचा वकील बोलतो, "हो मी खूप समजावलं, पण ते ऐकत नाहीत."


मधूची वकील बोलते, "मग त्यांना समजावणं तुमचं काम आहे आणि ते नाही समजत आहेत, तर हा त्यांचा नि तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यात माझ्या क्लाएंटला त्रास होता कामा नये."


एवढं बोलून मधूची वकील निघून जाते. आई विजयच्या फोनची वाट पाहत असते. तिला काळ्जी वाटत असते की, कोर्टात नक्की काय होईल ह्याची! ती सतत फोनकडे पाहत असते. तितक्यात दारावरची बेल वाजते. आई दरवाजा उघडते . विजयला दारात पाहून आईची काळ्जी कमी होते. विजय आत येतो. खांद्यावरची बॅग तो सोफ्यावर फेकतो आणि पायातले बूट काढून तो तावातावाने बेडरूम मध्ये जातो. आई काही न बोलता मुकाट्याने त्याच्या कडे पाहत असते. तिच्यात हिम्मत नसते त्याला काही विचारण्याची! विजय आत रूममध्ये जातो आणि बेडरूमचा दरवाजा लावून घेतो.


दुपारचे दोन वाजतात, विजयला घरी येऊन बराच वेळ झालेला असतो. आई त्याच्या बेडरूम जवळ जाते, दरवाजा नॉक करते. तरी तो दरवाजा खोलत नाही.


आई पुन्हा दरवाजा वाजवते आणि बोलते, "बाळा विजय, अरे दरवाजा उघड . किती वेळ झाला येऊन तुला! जेवायला तरी ये."


तरी विजयचं आतून हुं नाही की चू नाही.


आई पुन्हा आवाज देते, "अरे विजय....."


तेवढ्यात विजय आतून चिडत बोलतो, "मला नाही जेवायचं."


आई त्याला शांत करत बोलते, "अरे भूक लागली असेल ना? असं राग करून कसं चालेल?"


विजय पुन्हा चिडत बोलतो, "तू जा आई! मला जेवण नको आहे."


आईला कळतं की ह्याला समजावण्यात काही अर्थ नाही. तरी मुलगा म्हणून आई पदोपदी त्याची काळजी करत असते.


आई गरम केलेलं जेवण तसंच झाकून ठेवते. दुपारचे चार वाजतात. तरीसुद्धा आई विजयची वाट पाहत सोफ्यावर बसून असते. तिला कळतच नाही की, कधी तिचा डोळा लागतो. आई खडबडून जागी होते. तिचं लक्ष विजयच्या रूमकडे जात, रूमचा दरवाजा उघडा असतो. आई पटकन रूममध्ये जाते. पण विजय रूम मध्ये नसतो. त्याचा फोन ही घरीच असतो. बेडरूम मधले सामानसुद्धा त्याने रागात अस्ताव्यस्त करून ठेवलेल असतं. आई खिडकीतून वाकून पाहते, कदाचित तो खाली सोसायटीच्या गेटजवळ असेल. पण तो खालीसुद्धा नसतो. आईला खूप काळजी वाटू लागते की, हा नेमका गेला तरी कुठे असेल? आई त्याच्या काही मित्रांना कॉल लावते, पण तो त्यांच्यासोबत सुद्धा नसतो.


आई स्वतःशीच काळजीने बोलते, "ह्याच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे? काहीच सांगत नाही."


आई काळजीने रोहिणीला कॉल लावते. एक बेल वाजते आणि आई कॉल कट करते.


आई स्वतःशीच बोलते, "नको नको, रोहिणीला फोन नको करूया. तिला उगाच टेन्शन नको."


आई फोन बाजुला ठेवते. संध्याकाळचे सात वाजतात. तितक्यात दारावरची बेल वाजते. आई दरवाजा उघडते. दरवाजात विजय असतो. त्याचा झालेला अवतार पाहून आईच्या डोळ्यांत पाणी येत.


आई बोलते, "हे काय झालं आणि तू कुठे होतास विजय?"


विजय आत येतो. त्याला उभे राहण्याची सुद्धा शुद्ध नसते.


आई पुन्हा त्याला विचारते, "मी काय विचारते आहे ?"

आणि आई त्याच्या हाताला पकडते. तो आईचा हात झटकतो आणि अडखळून सोफ्यावर पडतो.

....

क्रमश 

🎭 Series Post

View all