सुटका : एक तुफानी भयंकर भयकथा भाग १०

A Haunted Story Of A Couple
बऱ्याच वेळाने अभि शुद्धीवर आला. आधी क्षणभर त्याला काहीच समजत नव्हतं. अंग ठणकत होतं. एका डोळ्याने काहीच दिसत नव्हतं. एवढ्या वेदना त्यानं कधीच नव्हत्या अनुभवल्या. डोकं दुखत होतं. उलटी होईल असं वाटत होतं. तो कसाबसा उठला आणि भिंतीला टेकून बसला. आजूबाजूला अजूनही पिसं पडली होती. घुबडं आणि वटवाघळं अजूनही तिथेच होती. त्यानं वर पाहिलं. जयश्री नव्हती. त्याच्या लक्षात आलं की आता त्याची सुटका नव्हती. त्यानं केलेलं पाप आता त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. हताश होऊन तो बसला. आता त्याच्या मनाची तयारी व्हायला लागली होती. जे होईल ते निमूट सहन करून मरण कधी येतंय याची वाट बघायची हा आणि हाच विचार फक्त त्याच्या मनात होता. बाहेर अजूनही अंधार होता.आणि त्याच्या मनातही. प्रथमच त्याला त्यानं केलेल्या दुष्कृत्याचा पश्चाताप होत होता.

काळे आणि सायलीची आई सायलीच्या घराकडे निघाले आणि रस्त्यातच काळेंना परत फोन आला. त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि आणि फोन उचलून बोलायला सुरुवात केली. आणि पलीकडून काहीतरी ऐकून ते जवळजवळ किंचाळले. " नाही नाही! नाही असं नसेल, तुम्ही खात्री करा" ते इकडून ओरडत होते. पलीकडून सतत कोणीतरी बोलतच होतं. शेवटी ते म्हणाले, " थांबा मी येतोच तिकडे. मला हे सगळं प्रत्यक्षात बघायलाच हवं. मी आलोच". असं म्हणून त्यांनी फोन डॅशबोर्डवर जवळजवळ आपटला.

सायलीची आई म्हणाली , " अहो साहेब! काय झालं इतकं? असा का दिसतोय तुमचा चेहरा?

पण त्यांच्या कानापर्यंत हे प्रश्न पोहोचलेच नाहीत। त्यांनी जे ऐकलं ते त्यांच्या पचनीच पडत नव्हतं. ते त्यांच्याच विचारात इतके हरवले होते की, आपल्याबरोबर दुसरं कोणीतरी आहे, हे ते साफ विसरले होते. सायलीच्या आईने त्यांना परत हाक मारल्यावर ते भानावर आले.

" अं! काय म्हणालात? " काळेंनी विचारले.

" मी म्हटलं की, काय झालं एवढं? केवढे ओरडलात? मला तुमचा मगाचचा चेहरा बघून फार भीती वाटली". सायलीची आई म्हणाली

" काही नाही. चला तुम्हांला सोडतो". असे म्हणून त्यांनी गाडी सुरू केली. अभिजितच्या घराच्या अलीकडेच त्यांनी गाडी थांबवली आणि ते म्हणाले, " मॅडम, तुम्ही जा इथून. अगदी जवळच आहे घर. मला अर्जंट जावं लागतंय".

सायलीची आई ठीक आहे, असं म्हणून त्यांचे आभार मानून उतरली. आणि घराकडे जाऊ लागली. तिला पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची जराजरी कल्पना असती, तर तिने एकतर काळेंना जाऊ दिलं नसतं, नाहीतर खरोखर रस्त्यावर रात्र काढणं पसंत केलं असतं. ती घरी आली आणि तिने बेल दाबली. दार उघडलं गेलं आणि एकदम शे दोनशे वटवाघळं, अनेक घुबडं तिच्या एकदम अंगावर आली. ती एकदम दचकली, आणि जोरात ओरडली. क्षणभर तिला कळेना, हा काय प्रकार आहे.

अचानक तिला कोणीतरी घराच्या आत खेचलं. अंधारात तिला काही दिसेना आणि कळेना. हळूहळू एक जाळ प्रकाशित झाला आणि त्या प्रकाशात तिला दिसलं की अभी खूप जखमी आहे. त्याचा चेहरा सगळा रक्ताळला होता, त्याच्या एका डोळ्यातून रक्त येत होतं.

ती पटकन त्याच्या जवळ गेली. त्याला हाक मारली. त्याचा काहीच प्रतिसाद आला नाही. तिने परत हाक मारली, त्याला गदागदा हलवलं, पण काहीही उपयोग झाला नाही. सगळी चेतना हरवून तो बसून राहिला होता. मनात तो फक्त आणि फक्त जयश्रीची माफी मागत होता. आजूबाजूला काय चाललंय, हे काहीही त्याला उमगत नव्हतं. त्याला असं बघून, घरभर ती घुबडं आणि वटवाघळांची पिसं, रक्त बघून सायलीच्या आईने त्याचा नाद सोडला आणि तिने दाराकडे धाव घेतली. दार उघडेना. कोणीतरी तिला धरलं आणि डोक्यावर आघात करून बेशुद्ध केलं.

इकडे काळे फॉरेन्सिकमध्ये पोहोचले तेव्हा तिथे गडबड उडाली होती. बरीच माणसं तिथे जमा झाली होती. काळेंनी थेट फॉरेन्सिकचे चीफ डॉक्टर वसंत कुलकर्णी ह्यांचीच भेट घेतली. तेही बुचकळ्यात पडले होते.

कुलकर्णी म्हणाले," काळे, बरं झालं तुम्ही आलात. फार विचित्र घटना घडली आहे. ते तुम्ही पाठवलेलं जळलेलं प्रेत आम्ही तपासलं. त्याचा विचित्र रिपोर्ट आम्ही तुम्हांला कळवलाच. आता तर ते प्रेत .... प्रेत कसलं, मांसाचा जळका गोळाच तो! गायब झालाय आमच्या कामगारांच्या समोर. मी कामगारांना सांगितलं त्याची विल्हेवाट लावायला. जसं त्या कामगारांनी त्या प्रेताला हात लावला, तसं ते प्रेत त्यांच्या डोळ्यादेखत कोणीतरी उचललं आणि त्या खिडकीवाटे घेऊन गेलं. माझा देखील विश्वास बसला नाही ह्यावर. पण सगळेच सांगतायत तर, मी तुम्हाला बोलावलं".

काळे हादरून बघत बसले. ह्यावर काय प्रतिक्रिया द्यावी त्यांना कळेना. ते प्रेत जिथे ठेवलं होतं तिथे आले, आणि त्यांना तिथे काहीतरी दिसलं. ते दचकून उडाले आणि एकदम मागे सरकले.

काय दिसलं त्यांना? काय होणार सायलीच्या आईचं? अभीचं काय होणार? ह्या सगळ्याची उत्तरं उद्याच्या अंतिम भागात....

🎭 Series Post

View all