सुटका : तुफानी भयकथा भाग ८

A Haunted Story Of A Couple

त्याची बोबडीच वळली. त्याच्या मागे त्यानंच जाळलेलं जयश्रीचं अर्धवट जळकं प्रेत थयथया नाचत होतं. स्वतःचंच मुंडकं हातात घेऊन. त्या प्रेताचा तो भीषण थयथयाट पाहून अभी चक्रावला. वेडापिसा झाला. त्याला काही सुचेना. भीती भीती आणि फक्त भीती एवढी एकच भावना त्याला घेरून टाकत होती. ते प्रेत अत्यंत विचित्र आवाज काढत होतं. स्वतःभोवती गिरक्या घेत होतं. हातातलं मुंडकं गरागरा फिरवत होतं. मधेच त्यानं मुंडकं हवेत उडवून अभिचे दोन्ही हात धरले. आणि मोठमोठ्याने गायला आणि नाचायला सुरुवात केली. वावटळीत सापडलेल्या वाळक्या पानासारखी अभीची अवस्था झाली होती. एक शब्द देखील त्याला सुचत नव्हता. त्या प्रेतानं नाचत नाचत अभीला उचललं आणि पलंगावर आदळलं. उचलून परत आपटलं. अभी आता बधिर झाला होता.



तेवढ्यात बेल वाजली आणि

ते प्रेत अचानक गायब झालं. आणि सायलीच्या रुपात परत आलं. तीच सायली दरवाजा उघडायला गेली. बाहेर कोणी पोलीस इन्स्पेक्टर दिसत होता. तिने ओळखलं की हा नक्की आपल्या जळण्याच्याच केस बद्दल आला असणार. तिने पटकन दरवाजा उघडला आणि अत्यंत लघवी स्वरात विचारलं, " कोण हवंय आपल्याला"?


"अभिजीत दिवाण इथेच राहतात का? मला त्यांना भेटायचं होतं" ते म्हणाले.


"हो हो! या ना आत. बसा. मी पाणी आणते". सायली म्हणाली.


" नाही पाणी वगैरे काही नको, मला फक्त दिवाण साहेबांना भेटायचं आहे. जरा पटकन बोलवा. थोडी अर्जन्सी आहे. आणि तुम्ही कोण"? त्यांनी तिच्याकडे निरखून बघितलं. का कोण जाणे पण तिच्याकडे बघताना त्यांना एक विचित्र संवेदना झाली. एक नकोशी भावना त्यांच्या मनात आली. एकदम तिथे थांबूच नये, अशी प्रबळ भावना त्यांना झाली.


" मी त्यांची बायको. त्यांना बोलावते हं! बसा ना तुम्ही". ती परत म्हणाली.


"तुम्ही नाहीश्या झाल्याची तक्रार तुमचे मिस्टर घेऊन आले होते. तुम्ही तर इथेच आहात की! मग का आले होते ते"? काळेंनी विचारले.


"हो, मी नाहीशी झाले होते काही काळ. त्या रात्री तुफान पाऊस पडत होता. अभिजीत मला भेटायला घरी आले होते. इतक्यात वीज गेली. कोणीतरी माझा हात धरला आणि माझ्या नाकावर कसलातरी स्प्रे मारला. मला काही कळायच्या आत डोळ्यापुढे अंधारी आली. आणि पुढचं मला काहीच आठवत नाही. मी जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा एका रूममध्ये होते. तिथे दुसरं कोणीच नव्हतं. माझे कपडे फाटले होते. मला थंडी पण खूप वाजत होती. मी फार थकले होते. तरीही मी दार वाजवलं, खूप हाका मारल्या. मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिथे एक निळा गाऊन दिसला हॉस्पिटलमध्ये असतो तसा. मी तो पटकन घातला. तेव्हा थोडी ऊब आली. किती वेळ गेला, ते आठवत नाही पण तेवढयात एक माणूस मला खायला घेऊन आला. मी त्याला पाणी मागितलं. त्यासाठी तो वळला आणि मी त्याला दारावर जोरात ढकललं आणि जीव घेऊन पळत सुटले. बाहेर आले तर सकाळ झाली होती. मी सरळ रिक्षा केली आणि घरी आले".


काळे म्हणाले, " मग तुम्ही परत आल्यावर पोलीस स्टेशनला यायला हवं होतं ना! जरी तुमची सुखरूप सुटका झाली होती, तरी तुमच्या अपहरणाचा गुन्हा तर घडला. मग मला गुन्हेगार शोधायलाच हवा".


ही काळेंची ब्याद घालवल्याशिवाय आपल्याला अभीचं काहीच करता येणार नाही, हे तिच्या लक्षात आलं. तिच्या मनात खरं तर अभीशिवाय कोणालाही इजा करण्याची ईच्छा नव्हती. त्यामुळे तिने गोड बोलूनच त्यांना घालवायचं ठरवलं. ती म्हणाली," अभिजित नको म्हणाले. त्यांना विषय वाढवायचा नव्हता. असो. मी त्यांना बोलावते. बसा तुम्ही. मी आलेच".


इतके बोलून ती आत आली. तिने बधिर झालेल्या अभीच्या डोळयांत बघून त्याला संमोहित केलं आणि आणि जणू काही घडलेच नाही असा बदल अभिमध्ये दिसायला लागला. तो अगदी फ्रेश दिसायला लागला. हसत हसत तो बाहेर आला, तेव्हा काळे घराचं निरीक्षण करत होते. इथे आल्यापासून त्यांना एक विशिष्ट जळका वास येत होता. नकोसा करणारा तो वास कुठून येत होता, तेच कळत नव्हतं.


"अरे! इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? बोला बोला, काय काम काढलंत? " अभी म्हणाला.


सायली आलीच पाठोपाठ. "मी चहा आणते" असं म्हणून ती आत गेली.


काळे म्हणाले, " नक्की काय भानगड आहे दिवाण साहेब? त्या दिवशी तुम्ही सकाळी तुमच्या बायकोचं जळकं प्रेत घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलात. आणि रात्री लगेच होणारी बायको हरवली म्हणून तक्रार घेऊन आलात. इथे आलो तर, तुमची बायको तिच्या अपहरणाची आणि सुटकेची फिल्मी स्टोरी सांगतेय. काय समजायचं आम्ही? त्यांचा आवाज बोलता बोलता कठोर झाला होता.


तेवढ्यात तिकडून सायली जोरात रडत आली. " अभी काय सांगतायत हे? तुझं लग्न झालंय ह्या आधी? तिच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू गळत होते.


काळे म्हणाले," मी तेच तर विचारले. काय प्रकार आहे हा"?


अभी संमोहनाखाली असल्याने त्याला तिने दिलेला त्रास काहीच आठवत नव्हता. तो आता अगदी नॉर्मल झाला होता. त्याने एकदम सायलीचा हात धरला आणि म्हणाला, " नाही गं राणी! ह्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. तूच माझी बायको आहेस. प्लीज रडू नकोस".


"तुमचं लग्न कधी झालं? काळेंनी विचारलं. आणि एकदम एक विचित्र आवाज त्यांना ऐकायला आला. "चार वर्षांपूर्वी" खर्जातला, घाणेरडा, एकदम भयानक आवाज ऐकून काळे दचकले.


इकडे तिकडे बघतायत तर कोणीच दिसेना. " कोण बोललं आत्ता? मला विचित्र आवाज आला" ते म्हणाले.


" कोणीच नाही." अभी म्हणाला.


काळेंनी एकदा परत त्या दोघांकडे पाहिलं आणि त्यांना समजेना आपण काय पहातोय! ते दोघं दिसायच्या ऐवजी त्यांना एक पेटलेली चिता आणि त्यावर बसलेला अभी असंच दृष्य दिसत होतं. आणि अचानक त्यांना कोणीतरी उचललं आणि त्या चितेकडे घेऊन जायला लागलं. ते विरोध करत होते, पण त्यांची ताकद चालेना. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, पण आवाज निघेना. ते भित्रे नव्हते, पण असं काहीतरी घडतंय म्हटल्यावर त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले.


काळे शुद्धीवर आले तेव्हा रात्र झाली होती. एका निर्जन ठिकाणी एका झुडुपात ते पडले होते. हात आणि चेहऱ्यावर काटे लागून किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यांना कळेना, आपण इथे कुठे आलो? काहीच आठवेना त्यांना. शेवटी ते कसेबसे उठले आणि रिक्षा करून तडक घरी गेले.


रात्र नुकतीच चढायला लागली होती. सायली अभीच्या जवळ आली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, " चल ना! जेवून घेऊ. मला खूप भूक लागली आहे".


"हो चल. बाहेर जाऊ जेवायला". अभीने तिला अजून जवळ ओढत म्हटलं. तिने लाजून हात सोडवून घेतला. त्याने परत तिला जवळ ओढलं. ती निसटली आणि पळाली. अभी तिच्या मागे पळाला आणि पळता पळता त्याला दिसली ती जयश्री. पळत सायली होती, पण मागे वळवलेला चेहरा मात्र जयश्रीचा होता. ते बघून अभी किंचाळला. आणि जागेवरच उभा राहिला.

त्याला भानावर यायला कैक तास लागले. भानावर आल्यावरही त्याला बोलत येत नव्हतं. आता उजाडलं होतं. तरीही त्याला घडलं ते खरंय की नाही, जे पाहिलंय ते खरंय की नाही, जे अनुभवलंय ते खरंय की नाही हेच समजत नव्हतं. तो हाताची मिठी गुढघ्याभोवती घालून बसला होता. त्याच्या हातावर हात पडला. न दचकता केवळ शून्यात नजर लावून त्यानं वर पाहिलं. त्याच्या डोळ्यातली चेतना हरवली होती. केवळ काही रात्रीत त्याची अवस्था आजाऱ्यासारखी झाली होती. डोळ्याखाली काळं झालं होतं. सायलीनं त्याला कॉफी आणली होती. ती पिण्याचीही त्याला शुद्ध झाली होती. तिनंच त्याला कॉफी पाजली. तरीही तो पूर्ण भानावर येत नव्हता. बराच वेळ तो असाच बसला. सायली खायला घेऊन आली.


त्याला म्हणाली,"बोल ना रे अभी. काय झालंय तुला? मी जवळ आले की असं का वागतोयस माझ्याशी? मी आवडत नाही का तुला"? अभी बघत बसला तरीही नुसता.


तेवढ्यात सायलीची आई आली. ह्या दोघांना असं बघून विशेषतः अभीला असं बघून ती बुचकळ्यात पडली. ,"काय झालं? असा का बसलाय अभी"? आईनं सायलीला विचारलं. ती म्हणाली,"अगं काहीच कळत नाहीये. हा असं का वागतोय"? आईनं त्याचे हात चोळायला घेतले आणि ती जोरात ओरडली? "सायली, हे बघ काय आहे ह्याच्या हातावर! सायली उर्फ जयश्री मनातल्या मनात हसली. तिला आधीच माहिती होतं की त्याच्या हातावर काय आहे ते. तरीही खोट्या उत्सुकतेनं तिनं पाहिलं. त्याच्या हातावर बरोबर पंजावर एक काळी आकृती उमटली होती. त्या आकृतीला हात पाय होते. मुंडकं होतं. पण ती आकृती पूर्ण काळी होती. चेहरा नव्हता. मनातल्या मनात जयश्री खुश होत होती. आता ती रात्रीची वाट बघत होती. आज रात्री तिला परत एकदा अभीला असाच एक भयानक खेळ दाखवायचा होता.


अभीची अवस्था बघून आई इथे थांबणार असं आईने तिला सांगितलं. आता मात्र जयश्रीनं ठरवलं की काहीही झालं तरी आईला इथे थांबू द्यायचं नाही. सायली आईला म्हणाली ,"आई, मी जरा बाहेर जाऊन येते गं". आई म्हणाली,"अगं आता कुठे जातेयस? याची अवस्था बघ. त्याच्या पाशी बस". ती म्हणाली," अगं, घरात काहीच सामान नाहीये. निदान भाजी तरी घेऊन येते आणि डॉक्टर कडेही जाते. बघते ते घरी येतायत का"? "हो चालेल. तोपर्यंत मी घेते याची काळजी" आई म्हणाली. सायली आवरून बाहेर पडली आणि सरळ सायलीच्या घरी गेली. घरात सिलिंडर चा नॉब चालू करून बाहेर हॉल मध्ये आली. कागद एकत्र करून त्याला आग लावून शांतपणे बाहेर आली. थोड्या वेळाने स्फोट होणार होता आणि सायलीच्या आईला घरी यावंच लागणार होतं. सायली घरी पोहोचली तर आई रडत होती. कारण माहीत असूनही सायलीनं विचारलं,"आई , आता तुला काय झालं? अभी बराय ना? सांग ना". आई रडत रडत म्हणाली," शेजारच्या जोशी काकांचा फोन आला होता. आपल्या घरी स्फोट झालाय. मला जायला हवं". "बाप रे? कसं काय? काय झालं? चल जाऊ दोघी आपण". आई म्हणाली," कसं शक्यय? अभीची अवस्था बघ. तुझं त्याच्या पाशी थांबणं फार आवश्यक आहे". "अगं पण तू एकटी कशी निस्तरशील? माझं येणं आवश्यक आहे". आईनं नाहीच ऐकलं. रडत रडत घाईघाईत आई निघून गेली. आईला दारापर्यंत सोडायला गेलेल्या सायलीनं आई गेल्यावर विकट हास्य केलं. अभीपाशी आली आणि त्याच्या समोर बसली. त्याचा हात हातात घेऊन.


रात्र झाली. अभी जरा सावरला होता. थोडं फ्रेश होऊन हॉल मध्ये येऊन बसला. प्रथमच त्याला त्याच्या बाबांची खूप आठवण आली. त्यांना फोन करायला तो उठला आणि त्याचा फोन कुठेच सापडेना. सायली आली त्याच्या जवळ. त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली," काय होतंय रे राजा तुला"? तो म्हणाला ," काही नाही गं. काहीच नाही. मी जरा बाहेर फिरतो. बरं वाटेल त्यानं मला" ती म्हणाली ," हो. जा". तो वळला आणि मागून एकदम ......


काय घडलं तिथे? काय झालं अभीचं? उत्तरं उद्याच्या भागात


🎭 Series Post

View all