सुटका : एक भयकथा भाग ६

A Haunted Story Of a Couple
आणि.... ते प्रेत अजूनच जवळ आल्यावर तिच्या लक्षात आलं की त्या प्रेताचे डोळे अगदी तिच्यासारखे होते. त्या प्रेताचे दोन्ही हात तिच्या हातांवर फिरत होते. जसे जसे त्याचे हात फिरत होते तशी तशी तिची त्वचा भाजत होती. आणि त्या प्रेताचे हात तिच्या सारखे चांगले होत होते. ती सुटकेचा भयानक प्रयत्न करत होती. ते प्रेत आता तिच्या पायांवर हात फिरवत होतं. तिचे पाय जळके होत होते आणि त्याचे चांगले. ती प्रचंड किंचाळत होती. पण तिची सुटका होणार नव्हती. तिला तिचं मरण समोर दिसू लागलं. ती त्याही अवस्थेत त्या प्रेताला म्हणाली," मी तर आता मरणार आहे. तुझ्या तावडीतून माझी सुटका नाही. फक्त मला एवढंच सांग की ह्या सगळ्यात माझा काय दोष"? मला तर ह्यातलं काहीच माहिती नव्हतं. माझी शेवटची इच्छा म्हणून सांग. म्हणजे माझा आत्मा तरी तुझ्यासारखा तळमळणार नाही आणि हो अजून एक, माझ्या आईला मात्र ह्यातलं काहीच कळू देऊ नकोस. माझ्या मरणानं खचेल ती". असं म्हणून सायलीच्या डोळ्यातून शेवटचा अश्रू ओघळला. ते म्हणालं,"तुझा दोष एवढाच की तुझ्या देखण्या चेहऱ्याला भुलून अभिनं मला नाकारलं. कालच सकाळी त्यानं मला जाळलं. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम साठी मला शहरातल्या ह्या शवागारात आणलं. पण माझा आत्मा तळमळत होता. आता मी तुझं रूप घेणार. तुझे सुंदर डोळे, तुझी गोरी त्वचा घेणार आणि जाणार अभिकडे त्याचा बदला घ्यायला. तुझ्या रुपात त्याला छळून छळून मारायला". इतकं सांगून ते प्रेत विकट हसायला लागलं. भेसूर दिसणारं ते प्रेत आता गोरं गोरं दिसायला लागलं. आणि गोरी गोरी दिसणारी सायली भेसूर. किळसवाणा स्पर्श करत त्या प्रेतानं तिची सगळी त्वचा काढून स्वतःच्या अंगावर घातली. आता तिचा शेवटचा श्वास चालू होता. जिवंतपणी नरकयातना भोगत होती ती. का? याला तिच्याकडे उत्तर नव्हतं. केवळ दोघांच्या भांडणात तिचा क्रूर अंत होत होता. आता अगदी शेवटी ते प्रेत तिच्या केसांवरून हात फिरवत होतं. आणि तिच्या डोक्यावरचे सुंदर केस त्या प्रेताच्या डोक्यावर जात होते. तिच्यासमोर मूर्तिमंत तीच उभी होती. पण होता तो एक प्रेतात्माच. अखेर त्या प्रेतानं तिचा शेवटचा श्वास हिरावून घेतला. निर्दयीपणे ते प्रेत आता समोरच्या खरोखर न जळता सुद्धा जळालेल्या निष्प्राण सायलीकडे पाहत होतं. खदाखदा हसत होतं. सुंदर दिसत होतं. त्या प्रेतानं तिथलाच एक निळा गाऊन घातला आणि शवागाराच्या बाहेर आलं. आता इतरांच्या दृष्टीने ती सायली होती. अभिची सायली. ती सायलीरूपी जयश्री सरळ हॉस्पिटल च्या बाहेर आली आणि रिक्षा करून सरळ सायलीच्या घरी गेली. तिथे हलकल्लोळ उडाला होता.
आई रडत होती. अभि सुन्न होऊन एका कोपऱ्यात उभा होता. सायलीला बघून दोघं अवाक झाले. विस्कटलेले केस. चेहऱ्यावर थकवा. अंगावर हॉस्पिटलसारखा निळा गाऊन. आईने पळत पळत येऊन तिला मिठी मारली. तिनं विचारलं,"कुठे होतीस? अशी का अवस्था झालीय तुझी?" सायली तिच्या डोळ्यात बघत म्हणाली," अगं मला काल कोणीतरी इथून अंधारात खेचून नेलं. पुढचं काहीच आठवत नाहीये मला. एवढंच की मी एक खोलीत होते. माझे कपडे फाटले होते. मी तिथलाच एक गाऊन घातला आणि एक माणूस मला खायला घेऊन आला. ती संधी साधून दारावर त्याला ढकलून मी बाहेर पडले. खूप वेळ पळतच होते. अखेर मला एक रिक्षा मिळाली. आणि मी घरी आले. असं बोलता बोलता ती सहज अभिच्या शेजारी जाऊन उभी राहिली आणि त्याच्या अंगावर कोसळली. त्यानं तिला सावरलं. बसवलं. तिच्या स्पर्शानं मोहोरला एकदम अभि. जरा पाणी पिऊन शांत झाल्यावर सायली म्हणाली,"आई, माझं आणि अभिचं लग्न ठरल्यावर हे असं झालं. कोणीतरी अभिच्या पैसे आणि प्रसिद्धी वर जळणारं असेल. आम्हाला लवकर लग्न करायला हवं. नाहीतर अजून काहीतरी व्हायचं". ती सतत आईच्या डोळ्यात बघून बोलत होती. आई झपाटल्यासारखी हो म्हणाली. सायली च्या आवाजात असं काहीतरी होतं की आई आपोआप ती म्हणेल त्याला हो म्हणत गेली. अभि तर काय एक पायावर तयार होता. घरी कोणीच नाही असं त्यानं सांगितलं होतं. घरच्यांच्या नकळत त्यानं एक फ्लॅट घेतला होता. लग्नानंतर दोघं तिथेच राहणार होते. कोणाचाही संपर्क नको म्हणून त्याच्या बाबांचा फोन नंबर त्यानं ब्लॉक केला होता. त्यामुळे त्याच्याशी कोणीच संपर्क करू शकलं नव्हतं. त्यामुळे दोनच दिवसांनी सायलीच्या घरी दोघांचं साधेपणाने लग्न झालं. सायली माप ओलांडून अभिच्या घरी आली. आणि तो ज्याची आतुरतेनं वाट बघत होता ती पहिली रात्र आली. सजवलेली खोली, त्याहून सुंदर सजवलेला पलंग. अभिनं कशाचीच कमतरता ठेवली नव्हती. केशरी दुधाचा प्याला घेऊन सायली लाजत लाजत त्याच्या जवळ आली. त्याच्या हातात दुधाचा प्याला दिला.त्यानं त्या दुधाकडं बघितलं मात्र तो एकदम दचकून, प्याला टाकून उठला. सगळं दूध सांडलं. घाम जमा झाला होता त्याच्या कपाळावर. थरथर कापत होता तो. वरकरणी काळजी दाखवत पण मनात छद्मी हसत तिनं विचारलं,"अरे का झालं?असं का करतोयस? तो अनिमिष नेत्रांनी त्या सांडलेल्या दुधाकडे बघत होता. तो म्हणाला त्या दुधात..... त्या त्या त्या दुधात......

क्रमशः

🎭 Series Post

View all