सुटका : भयंकर भयकथा भाग ५

A Haunted Story Of A Couple

तिकडे पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर काळे पावसाला वैतागून बसून राहिले होते. कालपासून ते रात्री फार थोडा वेळ घरी जाऊ शकले होते. कालच्या एकाच दिवसात तीन तीन मर्डर केस आल्याने त्यांचं डोकं बंद पडायची वेळ आली होती. एकतर ते मुळात थोडे आळशी होते. त्यात एकाच दिवशी हे असं म्हटल्यावर त्यांची अजूनच चिडचिड वाढली होती. आळशी असले तरी कमालीची तल्लख बुद्धी, चाणाक्षपणा, थोडक्या पुराव्यानिशी आरोपी गाठण्यासाठी सगळ्या क्लृप्त्या लढवणं हा त्यांच्या अगदी डाव्या हातचा मळ होता.

ते तिन्ही केसेसचा एकत्रच विचार करत होते. पाऊस वाढत चालला होता, आणि गारठा देखील. तशा वातावरणात त्यांना चहाची प्रचंड हुक्की आली होती. त्यांनी चटकन "हवालदार" अशी हाक मारली. हवालदार माने धावत आले. " बोला साहेब! चहाची सोय करू का? " त्यांनी विचारले. हाक मारून काळे परत आपल्याच विचारात गर्क झाले होते.

" साहेब! " मानेनी परत हाक मारली. " अं ! काय म्हणालात माने? काळेंनी विचारले. " चहाची सोय करू ना? नाही म्हणजे, पाऊस, गारठा आणि इतका विचार तुम्ही करणार. म्हणजे तुम्हांला चहा लागणार की हो! " मानेंचा आपल्या आळशीपणाबद्दलचा तिरका स्वर काळेंनी ऐकून न ऐकल्यासारखा केला. त्या खुनांचा तपास त्यांना करावाच लागणार होता. ते म्हणाले, " माने! काय वाटतं तुम्हांला? हे तिन्ही खून एकाच दिवशी, एकाच एरियात घडावेत, म्हणजे त्यांचा खुनी एकच असावा की वेगवेगळा? आणि मगाशी आलेला तो मुलगा"?


" त्याचं काय" माने मधेच साहेबांच्या बोलण्याला काट देऊन म्हणाले?

" त्याला पाहिलंय कुठेतरी? कुठे ते मात्र आठवत नाहीये, पण पहिल्यांदा याला पहात नाहीये हे नक्की! " जवळजवळ पाच मिनिटे शांततेत गेल्यावर काळे अचानक ओरडले. " अरे! हा तर तो प्रसिद्ध लेखक. अभिजित दिवाण. ह्याचं लिखाण फार फेमस आहे. इतकं इमोशनल लिहितो की, बाया बापड्या तर रडायलाच लागतात". माने परत मधेच म्हणाले, " म्हणजे? इतकं रडकं लिहितो?

काळेंना हसूच आलं. "अहो माने, म्हणजे भावना अगदी ओतप्रोत भरलेल्या असतात त्यांच्या लेखनात.

" अच्छा! असं होय! मला वाटलं की असं रडकं का लिहितो? मी नाही कधीच वाचत बिचत बुवा" माने म्हणाले. काळे सारखे विचारात हरवत होते. अभिजित दिवाण हा माणूस आधी भेटला असल्याचं, आणि तेही अगदी इतक्यात, असं त्यांची तल्लख स्मरणशक्ती त्यांना सांगत होती.

आणि अक्षरशः दोन मिनिटात त्यांना आठवलं. अरे! हा तर अगदी सकाळी सकाळी आला होता इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. त्याच्या कोणीतरी नातेवाईकाची काहीतरी केस होती बहुतेक. बरीच माणसं देखील होती बरोबर. अचानक गलका झाला होता तिथे! ते तिथे एका खुनाच्या केसमध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट घ्यायला गेले होते. अचानक गलका झाल्याने ते तिथे गेले होते. तर हा अभिजित दिवाण तिथे दिसला होता. ते गलका होण्याचं कारण विचारणार तेवढयात त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा फोन आला, आणि ते तिथून बाजूला गेले. आणि बोलता बोलता ही क्षुल्लक घटना विसरूनही गेले. सकाळी हा तिथे असणं, आणि आता होणारी पत्नी हरवली म्हणून इथे चौकीत येणं, ह्यात खरे तर काही संबंध कोणी जोडला नसता. पण नेहमी तिरकस चालणारं ह्यांचं डोकं वेगळाच विचार करत होतं. ह्या दोन्ही घटनांत काहीतरी कॉमन दुवा असल्याचं त्यांना जाणवत होतं. अचानक त्यांनी तिथलं फोनचं रजिस्टर उघडलं आणि सिव्हिल हॉस्पिटलचा नंबर डायल केला. पलीकडे बराच वेळ रिंग वाजत होती. कोणीच फोन उचलेना, तेव्हा त्यांनी नाद सोडला आणि हातातल्या तीन केसेसचा विचार करायला सुरुवात केली.

इकडे त्या भयानक शवागारात अडकलेली सायली कोणत्या दिव्यातून जातेय, ह्याची बाहेरच्या जगाला काही कल्पना असण्याचं कारण नव्हतं. ती हताश पणे त्या प्रेताचे हिडीस चाळे बघत बसली होती. तिची जगण्याची इच्छा, केव्हाच मरून गेली होती. ती ह्यातून कदाचित सुटली तरी, हा अनुभव तिला कायमचा निराशेच्या, भीतीच्या गर्तेत ढकलून देणारा होता. क्षणभर तिला भास झाला की, तिच्या आजूबाजूला सुंदर बाग आहे, फुलपाखरं उडतायत, पक्षी मंजुळ गातायत, छान उबदार हवा आहे, तिचा हात अभीच्या हातात आहे, आणि दोघे मिळून पुढच्या सुखी संसाराबद्दल चर्चा करतायत.

पुढच्याच क्षणी तिला भान आलं कारण ते प्रेत आता तिच्यासमोर बसलं आणि भेसूर आवाजात विव्हळू लागलं. " मला मारू नका, मला मारू नका, मला सोडा, मी मी मी ...." असं म्हणत खूप जोरात किंचाळलं. सायली नुसतं बघत होती. एका क्षणी तिला परत वाटलं की हे समोर चाललं आहे ते एक भयानक स्वप्न आहे, आणि सकाळ झाली की, ते संपेल. पण असं होणार नव्हतं. भीतीचा कडेलोट झाल्यावर माणसाचं जे होतं तेच तिचं झालं. सगळं बळ एकवटून तिने त्या प्रेताला जोराचा धक्का दिला. ते प्रेत कोसळलं आणि फक्त मान वाकडी करून सुटकेचा मार्ग शोधण्यासाठी धडपडणाऱ्या सायली कडे पहात होतं.

सायलीच्या मनात एकच आशा होती की, कोणीतरी येईल आणि बाहेरून शवागाराचे दार उघडेल आणि तिला बाहेर पडता येईल. जिवाच्या आकांताने ती धावत होती. ठेचकाळत होती, धडपडत होती, पुन्हा उठत होती, पुन्हा धावत होती. जगण्याची इच्छा फार प्रबळ असते हेच खरं. शेवटी ती प्रचंड दमली आणि कोसळली. ते प्रेत खुरडत खुरडत तिच्याकडे आलं. तिला म्हणालं, नको प्रयत्न करुस. मी तुला जाऊ देणार नाही. " त्यावर सायली म्हणाली, " आता मी मरण स्वीकारते. पण तू कोण आहेस? मला सांग , मला प्लीज सांग"

ते प्रेत म्हणालं," नीट बघ माझ्याकडे. मी ही तुझ्यासारखीच एक मुलगी आहे. तुझ्या अभिचं आणि माझं लग्न झालं होतं चार वर्षांपूर्वी.त्याच्या मर्जीविरुद्ध. त्याच्या बाबांच्या मित्राची मुलगी मी. माझं नाव जयश्री.मी दिसायला यथातथाच होते. तुझ्यासारखी सुंदर नव्हते. त्यानं मला लग्न झाल्यावरही गावाला माझ्या बाबांकडेच ठेवलं. इकडे शहरात आणलंच नाही. तोच यायचा कधीतरी. नवरा म्हणून कधी वागलाच नाही. यायचा तो घटस्फोट मागायला. एकदा यावरूनच एकदा आमचं भांडण झालं. त्यानं मला मार मार मारलं. पण मी नाहीच बधले. रागाच्या भरात त्यानं मला बांधलं. आणि माझ्या डोळ्यात चुलीतलं जळकं लाकूड खुपसलं. असह्य वेदनेनं मी किंचाळायला लागल्यावर त्यानं माझा गळा आवळला. आणि अर्धवट बेशुद्धीत असताना माझ्यावर रॉकेल ओतून मला जाळलं. "खोटंय हे", सायली ओरडली. ते प्रेत आता हिडीस हसू लागलं. अर्धवट जळालेल्या त्याच्या तोंडून भेसूर आवाज , किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. ते प्रेत आता विचित्र नाचत, ओरडत भयाण हसत, आवाज करत तिच्या दिशेनं येऊ लागलं. ते जळकं ध्यान जसं पुढं सरकू लागलं तशी सायली घाबरून मागं सरकू लागली. आणि ट्रॉलीला धडकली. ते प्रेत तिच्यावर वाकलं. आणि............

🎭 Series Post

View all