सुटका : भयकथा भाग ४

A Haunted Story Of A Couple
थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. अजून तिथेच पडली होती ती. प्रचंड धक्का बसला होता तिला. तिला काहीच कळत नव्हतं. अजून 10 मिनिटे अशाच सुन्न अवस्थेत बसून राहिल्या नंतर ती सावकाश उठली. मनाची तयारी करून तिनं परत एकदा आरशात बघितलं. बधिर झाली होती ती. तिच्या डोळ्यांच्या जागी काहीच नव्हतं. फक्त भयाण अंधारी पोकळी होती. तिला तरीही सगळं दिसत होतं. आता तिला कळलं की तिला बघून ती माणसं का घाबरली. तिचा विश्वास बसत नव्हता. डोळे चोळायचे म्हणून तिनं हात चेहऱ्यापुढे आणले आणि डोळे चोळायला गेली तर बोटं चक्क आत गेली. त्या भयानक धक्क्याने वेड लागायची वेळ आली तिला. आपण खरंच भूत झालो की काय ? ह्या विचारानं मेंदूचा भुगा झाला तिच्या. तिथून बाहेर तरी आता कसं पडायचं हेच तिला कळेना. तिचं हे असं ध्यान बघून माणसं भिऊन पळत सुटणार हे नक्की होतं.

तिला समजेना नक्की आपल्याला झालंय काय? अभी कुठंय? आपण का आणि कसे आलो इथे? ती तिथेच एका कोपऱ्यात बसली गुडघ्यात मान घालून. आणि घडलेल्या घटनांचा विचार करत होती. त्या गार हवेचा झोत घरात शिरला तेंव्हापासूनचं सगळं आठवत होती ती.

उजवा हात गुडघ्याभोवती आवळल्यावर खूप दुखायला लागला. तिनं पाहिलं तर मनगटावर हाताच्या बोटांनी धरल्याच्या खुणा होत्या. त्या खुणा बघून ती स्वतःच दचकली. बोटं असलेल्या तेव्हढ्याच भागावर जळाल्याच्या खुणा होत्या. कातडी, मांस सगळं जळकं दिसत होतं. भयानक. फार भयानक वाटलं तिला. तिला कळेना डोळे गेले कसे? मग मला दिसतंय कसं? डोळे दुखत कसे नाहियेत? हे सगळं माझ्याच बाबतीत का चाललंय? क
काय वाकडं केलंय मी कुणाचं? मग मगाशी मी रडले ते पाणी कुठून आलं? डोळेच नाहियेत तर पाणी कसं आलं? मला हे असं भाजलं कसं? अशा असंख्य प्रश्नांनी तिचा मेंदू बधीर झाला होता. बराच वेळ ती तशीच बसून होती.

थोडं शांत बसल्यावर तिला जाणवलं की कोणीतरी बघतंय तिच्याकडे. वरून. छतावरून वाकून. तिनं चटकन वर पाहिलं. कोणीच नव्हतं. मानेतून एक कळ मात्र आली. डावा हात हळुवारपणे तिने त्या जागी लावला. ओलसर लागलं हाताला. हात काढून बघतेय तर जळकी कातडी आली हातात. रक्त मांस लागलं होतं तिच्या हाताला. आता तर घाबरून किंचाळायची सुद्धा ताकद नव्हती तिच्यात. तिनं हात झटकला आणि बाहेर आली. तिला त्या कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या शवागारापाशी तिचा अभी दिसला. जीव घेऊन ती त्याच्या दिशेनं पळत सुटली. ती जवळ आली तसं तो शवागाराचं दार ढकलून आता शिरला. आणि विचार न करता ती त्याच्या मागे त्याला हाका मारत आत शिरली. अभी अदृष्य झाला होता. तिच्या लक्षात येईपर्यंत मागे दाणकन दार लागलं. परत ती त्याच शवागारात अडकली. वेड लागल्यासारखी ती अभीला हाका मारत होती. शोधत होती. भिरीभिरी त्या जागेत फिरत होती. शेवटी असह्य केविलवाणे पणाने ती परत दारापाशी आली. दार उघडायचा प्रयत्न व्यर्थच होता. हताशपणे ती त्या दाराला टेकून बसली. आणि परत एकदा तिला रडू आलं. म्हणजे ही सगळी फसवाफसवी होती तर. तिनं चेहरा झाकला आणि बसून राहिली.

एक खसफसता अत्यंत भेसूर आवाज तिच्या कानाशी आला. दचकून घाबरून बघतेय तर एक अर्धवट जळकं प्रेत तिच्या बाजूला बसलेलं. फिदीफिदी हसत. तिनं उठायचा प्रयत्न केला पण त्या प्रेतानं तिचा डावा हात घट्ट धरला. तोच किळसवाणा स्पर्श. तिनं जीव तोडून उठायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. डावा हात मात्र भाजल्यासारखा दिसायला लागला. ते प्रेत परत त्याच अत्यंत भेसूर आवाजात तिला म्हणालं,"कुठे जातेयस? माझ्या ताब्यात आहेस तू. तुला असं सोडणार नाही". ती म्हणाली, "का? का पण असं? कोण आहेस तू? मला का आणलं आहेस इथं? मी तुझं काय वाकडं केलंय?सोड मला".

ते प्रेत तसंच फिदीफिदी हसत म्हणालं,"कोण आहे मी? तुझ्या अभीला विचार". ती म्हणाली," काय संबंध अभीचा? कोण आहेस तू? सांग आधी".

उत्तर द्यायच्या ऐवजी ते प्रेत नुसतंच खदाखदा हसत होतं. मध्येच एकदम बायकी आवाजात गाणं गात होतं. एकटंच नाचत होतं. स्वतःभोवती गिरक्या घेत होतं. सायली आता भीती ह्या शब्दाच्या पलीकडे गेली होती. तिच्या मनात आता फक्त तिची आई, तिचा अभी ह्यांचेच विचार येत होते.

"कसे असतील दोघं? तिला शोधत असतील. आई रडून रडून बेजार झाली असेल! किती वाजलेत देव जाणे? रात्रीची जेवली तरी असेल का?"

इकडे आता रात्र सरून पहाट व्हायच्या बेताला होती. रात्रभरच्या ताणाने सायलीच्या आईचा नुकताच डोळा लागला होता. सायली गायब होऊन नऊ तास उलटले होते.

अभी तर झोपलाच नव्हता. नुकतीच कुठे एका सुरेल गाण्याची सुरुवात व्हावी, आणि मध्येच तंबोऱ्याच्या तारा तुटाव्यात , तसं वाटत होतं त्याला.

शेवटी स्वतःसाठी एक पेग तयार करून तो बाहेर गॅलरीत आला. बाहेर पाऊस अजून चालूच होता. पण थंड हवेने त्याला थोडं बरं वाटलं. एका दमात त्याने तो पेग पोटात रिचवला. घशातली जळजळ त्याला जरा हुशारी देऊन गेली.

इकडे शवागाराच्या आत त्या प्रेताचा हिडीस नाच चालूच होता. मधेच एकदम सायलीकडे वळून ते म्हणालं, " तुला खरंच माहिती नाही मी कोण आहे ते? मी तुझ्या अभीची पहिली बायको". ते ऐकून तिला प्रचंड धक्का बसला.

खरंच कोण होतं ते? अभीची पहिली बायको? की अजून कोणी? सायलीचा काय संबंध? अजून काय काय घडणार पुढे? ह्याची उत्तरं उद्याच्या भागात.

🎭 Series Post

View all