रियुनियन भाग २

Story Of Lost Love
रियुनियन भाग २


आधीच्या भागात आपण पाहिले कि शाळेच्या रियुनियन साठी रणजीत अमेरिकेवरून येतो एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी... पाहूया काय होते पुढे....




" हो हो आजीबाई , मला माहीत आहे तू माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठी आहेस ते.." रणजीत कान धरून म्हणाला आणि दोघेही हसायला लागले.
 " कसा आहेस?"
" कसा दिसतो?"
" मस्त, अमेरिका मानवलेली दिसते. जाडा आणि गोरा झाला आहेस थोडासा.."
" गोरा तर मी आधीपासूनच होतो. हा थोडे वजन वाढले आहे." 
रणजीतचा विश्वासच बसत नव्हता कि आपण अनघाशी एवढ्या मोकळेपणाने बोलतो आहोत. हे बोलणे कधीच संपू नये असे त्याला वाटत असतानाच स्मिता आली.
" अग अनघा, आम्ही पण आहोत इथे. कधीपासून वाट बघतो आहोत तिथे. हाय रणजीत ओळखलंस का मला?"
" तुला कोण विसरेल? तू तर शाळेची कॅप्टन. कशी आहेस?"
" मस्त. चला सगळेजण तिथे गप्पा मारत आहेत. तुम्हीपण जॉइन करा ना."
"चला," असे म्हणत अनघा निघाली. नाईलाजाने रणजीतला सुद्धा जावे लागले.. उरलेला पूर्ण दिवस मित्रांशी फालतू गप्पा मारत आणि एक डोळा अनघाकडे ठेवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागली. तिच्याशी परत बोलताच आले नव्हते. नंतर उरलेला सर्व वेळ वेगवेगळे कार्यक्रम चालले होते. सगळे हसत मजा करत होते. रणजीत मात्र बळजबरीने त्यात सामील होत होता. रात्रीची जेवणे झाल्यावर मात्र तो कंटाळला आणि जेटलॅगचे कारण सांगून तिथून सटकला. बाकीचे सगळेजण मस्त शेकोटी पेटवून त्याभोवती गाणी म्हणत बसले होते. काही उत्साही नाच करत होते.कोणालाही त्याचे जाणे जाणवले नाही. तसाच उदासपणे उठून तो स्विमिंग पूलपाशी जाऊन बसला. तिथपर्यंत गाणी ऐकू येत होती. काही मिनिटातच त्याला कोणीतरी आल्याची चाहूल लागली.
आता साडी जाऊन साधा ड्रेस आला होता..केसांचा सैलसर अंबाडा होता आणि छोटीशी टिकली..
" का रे एकटा इथे येऊन बसलास?" तोच तो हवाहवासा आवाज..
" सवय नाही राहिली एवढ्या गोंधळाची.."
"अरे देवा, मग मी बसू कि जाऊ?"
" तू ठरव.."
" थोडा वेळ बसते, तुझा चेहरा बदलला कि जाते."
" मनापासून थँक्स.."
"कशासाठी."
" न बोलावता इथे येण्यासाठी.."
" ऑलवेज वेलकम सर.." आणि परत ती खळखळून हसली.."मला सवय आहे न बोलावता जाण्याची.."
" तुझी मस्करी संपली असेल तर थोडे विचारू?"
" विचार ना.."
"आपले ग्रॅज्युएशन झाले आणि तुझ्या लग्नाची बातमी ऐकली होती मी.. ती खरी होती का?"
" माझ्या विषयावर आपण नंतर बोलू या का?"
" तुझी इच्छा."
" तू सांग.. तू तर नंतर कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतास. आधी काही वर्षे होतास तेवढाच. लग्न केलेस का?"
" हो."
" मग कशी आहे तुझी बायको? तुझ्याबद्दल कोणाचाच जास्त माहित नाही. तुझा नंबर पण लकीली मिळाला.."
" माझे लग्न नाही टिकले.. दोन वर्षातच आमचा घटस्फोट झाला. "
" सॉरी.. अमेरिकन होती?"
" नाही. महाराष्ट्रीयनच होती.. पण तिची आणि माझी मते नाही पटली.. सो.."
" जाऊ दे.. मग परत का नाही लग्न केलेस?"
" कंटाळा आला परत तोच खेळ मांडायचा?"
" कंटाळा आला कि कोणी भेटली नाही?"
" अशा खूप जणी भेटल्या पण कोणाशीच लग्न करावेसे वाटले नाही. एकजण आहे मनात, पण तिला विचारायची भिती वाटते."
" विचारून बघ. झाले लग्न तर आयुष्यभराची सोबत मिळेल. एकटेपण फार वाईट असते." त्याने चमकून तिच्याकडे पाहिले पण आज काही विचारायचे नाही असे ठरवले..

पाठी कोणीतरी गाणे गात होते ,"दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके."

अनघा उठली, "चल मी जाते झोपायला, तुझे काय?"
" मी पण जातो, एक विचारू अनघा?"
" ह्म्म."
" तू कुठे राहतेस? मी उद्या सोडू तुला घरी?"
"उद्याचे उद्या.. गुड नाईट.."
रात्रभर रणजीत तळमळत होता. \"नक्की काय झाले आहे हिच्या लग्नाचे, हिचा उद्या तासा दोन तासांचा सहवास मिळेल मला?"

दुसर्‍या दिवशी सगळ्यांनाच घरी जायचे वेध लागले होते. अनघा स्मिताला म्हणाली, " अग या रणजीतला त्याच्या आदिवासी मुलांच्या प्रोजेक्टसाठी थोडे फिरायचे होते. काल विचारत होता तो. मी जायचे म्हणतेय तू येतेस का?"
" नाही ग, सकाळपासून दहा फोन आले घरून. तू जा..काळजी नको करूस. आणि अजून कोणाला विचारूही नकोस.."
" ठिक आहे."
सगळेजण निघाले..न राहवून रणजीतने अनघाला विचारले," तू कशी आणि कोणासोबत जाणार?"
" काल मला एक लिफ्ट मिळणार होती, ती असेल तर त्याने, नाहीतर विचार करावा लागेल." अनघा हसत म्हणाली.
" ओह्ह, ग्रेट." रणजीतला ही हसायला आले..
 कितीतरी दिवसांनी रणजीतच्या मनासारखे होत होते, त्याचा आनंद चेहर्‍यावर दिसत होता..
" तू काय करतेस ते तरी सांगणार आहेस का?"
" लपवायला ते थोडेच राष्ट्रीय गुपीत आहे. मी एका बँकेत कामाला आहे. आपल्याच भागात घर घेतले आहे. तिथे राहते. आईबाबा येऊन जाऊन असतात."
" तू परदेशात जाण्याचा कधी प्रयत्न नाही केलास?"
" नाही बाबा, मला परदेशात नाही आवडत.. आपला देशच बरा." अनघाच्या उत्तरानुसार रणजीतचा चेहरा बदलत होता.
" मी आढेवेढे न घेता विचारू?"
" काही गंभीर आहे का?"
"हो. कोणाच्यातरी आयुष्याचा प्रश्न आहे."
" विचार"
"तू एकटी आहेस का? प्लीज नको ना टाळूस हा प्रश्न. "
" हो , मी एकटी आहे."
" मग करशील माझ्याशी लग्न?"
" तू काय वेडाबिडा आहेस का? कालतर भेटलो आपण.. आणि आज लगेच लग्न? तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल?"
रणजीतने गाडी एकाबाजूला लावली..
" पहिली गोष्ट मी वेडा नाही हे कालच्या पूर्ण दिवसात तुला हि कळले असेल. शाळेत असल्यापासूनच मला तू आवडतेस आणि मला असे कुठेतरी वाटते तुलाही मी आवडत होतो. चांगला जॉब मिळाल्यावर मी तुला लग्नाची मागणी घालणारच होतो पण त्या आधीच तुझ्या लग्नाची बातमी कळली.. आणि तेव्हा मी खरेच वेडा झालो होतो..खरेतर लग्न न करता फिरणे मनाला कुठेतरी पटत नव्हते आणि मनात खोटा विश्वास होता कि तू माझ्यासाठी थांबशील त्याच जोरावर मी तुला कधीच आधी विचारले नव्हते.."रणजीत श्वास घ्यायला थांबला..
पण हे ऐकून अनघाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या..
" माझा घटस्फोट झाला कारण मी आईवडिलांच्या हट्टापायी लग्न केले होते. पण तिच्यातही मी तुलाच शोधत होतो , तिने मला समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि तुझा स्वभाव आठवून मी अजून तुझ्या प्रेमात बुडतच गेलो. तुझ्यापासून लांब राहायचे म्हणून आणि फक्त म्हणून मी कोणाशीच संबंध ठेवला नाही.. पण नाही विसरू शकलो मी तुला.." रणजीत खूपच हळवा झाला होता..
    अनघाने त्याच्या हातावर हात ठेवला, " आपण माझ्या घरी जाऊन बोलूयात?"
" नाही , आता इथेच बोल जे काही बोलायचे आहे ते ..मी वीस वर्ष वाट पाहतो आहे तुझी. आता वीस मिनिटे सुद्धा सहन करायची ताकद नाही माझ्या..तू जर नाही म्हणालीस तर लगेच निघून जाईन परत.."
     "माझे लग्न झाले होते.." अनघाने बोलायला सुरुवात केली.."माझी आजी खूप आजारी पडली होती आणि तिने माझे लग्न पाहण्याचा हट्ट धरला होता. 



नमस्कार, खरेतर हि कथा दोन भागात संपेल असे मला वाटत होते.. त्यामुळे मी चुकून आधीच्या भागात तसे लिहिले.. पण नाही कथा थोडी लांबते आहे..त्यामुळे पुढच्या भागात परत भेटू.. तोपर्यंत कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all