रियुनियन भाग १

Story Of Lost Love
रियुनियन  भाग १



आज शाळेच्या वॉटसॲप ग्रुपला अजिबात शांतता मिळाली नव्हती. ग्रुपवर नुसता चिवचिवाट चालला होता..मिनिटामिनिटाला मॅसेज येत होता..ग्रुप म्यूट करून सुद्धा कोणी बसत नव्हते कारण उत्सुक तसे सगळेच होते , दाखवत फक्त काहीजण होते. त्यात आघाडीवर होता महिलावर्ग सॉरी मुलींचा वर्ग..कारणही तसेच स्ट्राँग होते ना.. कारण होते \"गेटटुगेदर\"...
     
   हो.. शाळेचे गेटटुगेदर.. शाळा संपून वीस वर्ष पूर्ण झाली होते. त्या निमित्ताने एकदातरी भेटायचेच असा जोरात प्लॅन चालू होता..म्हणजे तसा वॉटसॲप ग्रुप होऊन चारपाच वर्ष नक्कीच झाली होती. पण भेटणे म्हणजे मुलामुलांचे, मुलामुलींचे किंवा अगदीच जवळच्या मित्रमैत्रिणींचे.. अख्खया वर्गाचे भेटणे असे झालेच नव्हते.. चार दिवस मस्त कुठेतरी सगळेच फिरायला जाऊ आणि जुनी मैत्री पुन्हा नवी करू असा काही जणांचा सूर होता..हो नाही करता करता एक दिवस, एक रात्र असा प्लॅन ठरला.. ग्रुप मधल्या एकाच्या मित्राचे फार्महाऊस ठरले.. आता मेम्बर्स ठरायला सुरुवात झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि यु.एस. मधील सुद्धा...
        "अरे त्या रणजीतचे काय? तो येणार आहे का भारतात?" कोणीतरी विचारलेच..
      " तो कशाला येतोय एवढ्या लांबून?"
     " तो येईल.. अनघाने सांगितले तर नक्कीच.." कोणीतरी मॅसेज लिहिला आणि पटकन डिलीट ही केला..पण त्या आधीच रणजीतने तो वाचला होता. वाचून तो स्वतःशीच हसला. एवढ्या सगळ्या गोंधळात फक्त तिचाच काही मॅसेज नव्हता..आणि तो फक्त तिच्याच मॅसेजची वाट पहात होता...
           रणजीत स्वतःशीच विचार करत होता..\"जवळ जवळ दहा वर्षे झाली इथे अमेरिकेत येऊन, काय मिळवले , काय गमावले आता तर आठवत पण नाही. सोमवार ते शुक्रवार मरमर काम करा आणि शनिवार, रविवार कधी संपतात याची वाट पहा. इतके दिवस आईबाबा भारतात परत ये म्हणून सांगत होते, आता तर त्यांनी ते ही थांबवले आहे. भाऊबहिण आहेत, पण त्यांचाही संसार आहे.. खरेतर कोणाशीच संबंध ठेवायचा नाही म्हणून इथे आलो. कोणालाच माझा नंबर द्यायचा नाही असे घरातल्यांना बजावले होते, तरिही या मित्रांनी कुठून नंबर मिळवला माहित नाही. काहीच न विचारता सरळ ग्रुपमध्ये ॲड केले. एक्झिट करणारच होतो पण म्हटले बघावं कोण कोण आहे ग्रुपमध्ये. आणि तिथे तिचे नाव दिसले. लग्नानंतर नाव बदलले नाही बहुतेक. फोटो का नाही डीपी मध्ये? चेहरा दाखवायचा नाही? आणि एक्झिट करण्याचा निर्णय सध्यातरी लांबणीवर टाकला.. त्या दिवसापासून एकच चाळा लागला होता. रोज तिचा डीपी पाहायचा.. पण तीही अशी हट्टी. डीपी रोज बदलायची पण फोटो मात्र फुलांचे, रांगोळ्यांचे.. तिचे स्टेटसही कधी दिसले नाही. तिने नंबर सेव्ह केला नाही का माझा?\" हा विचार डोक्यात येताच जणू रणजीत झोपेतून जागा झाला. त्याने ठरवले अनायसे साचलेली भरपूर सुट्टी आहेच, कामाचा लोडही नाहीये काहिही झाले तरी हे गेटटुगेदर अटेन्ड करायचेच.. आईबाबांनाही भेटता येईल.. 
      एका महिन्याची सुट्टी कन्फर्म झाली, तिकीट काढून झाल्यानंतर रणजीतने ग्रुपवर \"येणार\" असा मॅसेज टाकला.. तो एवढा लांबून येतोय म्हटल्यावर जवळचे ज्यांचे अजून तळ्यात मळ्यात होते त्यांनीही लाजेकाजेस्तव होकार कळवला..सगळ्यात शेवटी \"येणार\" असा तिचा मॅसेज आल्यावर रणजीतला मनात कुठेतरी सुखावल्यासारखे वाटले..
         भेटायचे नक्की झाल्यावर परत सगळ्यांचा चिवचिवाट सुरू झाला.भरपूर अटी घातल्यानंतरच सगळ्यांनी फायनल होकार दिला...
१.. कोणीही आपापल्या नवरा किंवा बायकोला घेऊन यायचे नाही. त्यांच्यासाठी वाटल्यास नंतर परत भेटू.. हि फक्त आणि फक्त जुन्या मित्रमैत्रिणींची सहल असेल..
२.. अगदीच लहान मूल असेल तरच त्याला घेऊन येणे..
३.. धूम्रपान, मद्यपान पूर्ण बंदी.
४..सर्वांनी पहिल्या दिवशी तरी ड्रेस कोड म्हणून लाल रंगाचे कपडे घालावेत..
५.. वेळेवर फार्महाऊसवर पोचावे..
......

६...

आणि शेवटी सहलीचा दिवस उगवला..रणजीत चार दिवस आधीच भारतात आला होता. ठरवून कोणालाच भेटला नव्हता.काही जणांचा ठरवून एकत्र जाण्याचा प्लॅन चालला होता. पण रणजीतच्या डोक्यात वेगळाच प्लॅन चालू होता.
        ठरल्याप्रमाणे सगळेजण फार्महाऊसवर भेटले..
" अय्या तू किती वेगळा दिसायला लागला आहेस, डोक्यावरचे छप्पर उडाले कि तुझे.."
" किती ग बारीक झालीस तू, नक्की काय करतेस ते तरी सांग.."
" बाकी कसा चालू आहे तुझा जॉब?"
" बरे झाले बाई मुलांना नाही आणले ते, नाहीतर आपल्याला बोलताच आले नसते."
"काय लपूनछपून बघतोस तिच्याकडे, मामा म्हणतात तिची मुले तुला?"
" गप ना ऐकेल ती?"
अश्याच सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. शाळेत आपण किती क्षुल्लक कारणावरून भांडायचो हा विचार करून आता सगळे हसत होते..
" अरे हा रणजीत येतो म्हणाला होता, टांग दिली बहुतेक त्याने."
" काय माहीत, काल त्याच्या भावाला फोन केला होता, आलाय म्हणे तो भारतात.."
" जाऊ दे , कामासाठी आला असेल मग त्याच्या. त्याला काय उत्साह असणार आपल्याला भेटण्यात?"
" मग काय? जशी शाळा सोडली त्याने कॉन्टॅक्ट सुद्धा ठेवला नाही.. नेमक्या माझ्या एका कलिगच्या तोंडातून त्याचे नाव ऐकले आणि त्याचा नंबर मिळाला.."
" ग्रुपमध्ये येऊन सुद्धा तो फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो फक्त, बाकी काही नाही."
" जाऊ दे. आज कोणतेच मनाला दुःख देणारे विषय नको.."
  तेवढ्यात बाहेर कसला तरी गलका झाला. काय झाले म्हणून सगळे पुरुष नाही मुले बाहेर पाहायला गेले तर तिथल्या आजूबाजूच्या गावकरी मुलांना कोणीतरी चॉकलेट्स आणि वस्तू वाटत होते. काहीतरीच असते काही जणांचे म्हणून हे वळले तर मागून आवाज आला," बस काय, न ओळखण्याइतका बदललो कि काय मी?"
    " अरे रणजीत तू? इथे काय करतो आहेस मग?"
   "आणि एवढा बदललास तू, पटकन कसे ओळखणार तुला?"
  " तू कसे आम्हाला ओळखलेस?"
  " एकतर तुमचे फोटो मी बर्‍याच वेळा ग्रुपवर पाहिले आहेत आणि दुसरे म्हणजे लाल कपडे.."
   हसतच सगळे त्याला घेऊन आत आले. त्याला बघताच परत बाकीच्यांचे " हाय, हॅलो" सुरू झाले. पण त्यात ती मात्र कुठेच दिसत नव्हती.. \"येते म्हणून आली नाही का ती? पण ती तर अशी दिलेला शब्द न पाळणारी नव्हती. कि ती मला भेटायचे नाही..\" क्षणात हजार विचार त्याच्या डोक्यात येऊन गेले. त्याची निराशा बाकीच्यांना जाणवली.
" काय रे काही अडचण..,"
" नाही रे, सगळेच आले आहेत ना?"
"हो, हो सगळेच आले आहेत . तू कोणा खास व्यक्तीला शोधतो आहेस का?"
" नाही रे खास असे कोणी नाही.."असे म्हणत असतानाच समोरून ती येताना दिसली.. त्याला खात्री होती तशीच बाकीच्या लाल पंजाबी ड्रेस, वनपीस मध्ये उठून दिसणारी साडी, लांबसडक केसांची बांधलेली सैल वेणी, त्यात माळलेले भरपूर गजरे, कपाळावरची लहानशी चंद्रकोर, ओठांवर लावलेली पुसटशी लिपस्टिक, हातात नाजूक बांगड्या, कानात घातलेले नाजूक लोंबते कानातले ,वाढलेले वय अजिबात चेहर्‍यावर न दिसणारे, ओठांवर तेच हास्य आणि गळ्यात फक्त साधीशी चेन.. \"पण हिचे तर लग्न झाले होते ना... म्हणूनच तर मी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला ना...\"
     रणजीतची नजर अनघावरून अजिबात हटत नव्हती. खूप मुश्किलीने त्याने बाकीच्यांशी बोलायला सुरुवात केली..\" हिच्याशी मी बोलायला जाऊ कि तिची वाट पाहू\" रणजीतच्या डोक्यात द्वंद्व सुरू होते . कोण काय बोलते आहे त्याचे लक्षच नव्हते. तेवढ्यात समोरून एक डिश हातात घेऊन अनघाच समोर आली.." हाय ओळखलंस का?" तेच मानेला हलकेच झटके देत खळखळत हसून बोलणे..  
" तुम्हाला.."
" काय??" ती जोरात किंचाळली..."तू जर विसरला असशील तर आठवण करून द्यायला आवडेल मला कि आपण दोघेही एकाच वर्गात होतो. आपल्या वयात असले तर काही महिन्यांचेच अंतर आहे.. तुम्हाला वगैरे काय? तू म्हण..."


पुढे काय होते ते वाचू पुढच्या आणि अंतिम भागात...

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all