रियुनिअन ( भाग ९ )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.


रियुनिअन ( भाग ९ )

निलेशने आदिवासी बांधवांना कुठल्या गरजेच्या वस्तू हव्या आहेत ते शशांक आणि निलिमाला विचारून घेतले. शशांक आणि निलिमाला आपल्या ग्रुपमधील लोकांच्या सेवाभावी वृत्तीने भरून आले. शशांकने गरजेच्या वस्तूंची यादी निलेशला पाठवली. निलेशने ती लिस्ट ग्रुपमध्ये पाठवली आणि दहा - दहा लोकांचा ग्रुप तयार करून प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या वस्तू आणायला लावल्या. त्यामुळे एकदम शिस्तबद्ध काम पार पडले. प्रत्येकाने स्वेच्छेने आदिवासी बांधवांना, त्यांच्या मुलाबाळांना भरपूर प्रमाणात खाऊ देखील घेतला.

आता रियुनिअनसाठी फक्त चार दिवस उरले होते. ग्रुपमध्ये कमालीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

निलेशने सगळ्यांना सोयीस्कर असे एक ठिकाण ठरवले. तिथून तीन बसेस सुटणार होत्या. सकाळी सातची वेळ ठरवली म्हणजे आठपर्यंत तरी ग्रुपमधील सदस्य पोहचतील या हिशोबाने. मुंबईहून पालघरला जायचे असल्याने गोरेगाव, बोरिवली, मिरारोड, भाईंदर, वसई, विरार येथे राहणाऱ्या सदस्यांना जाता जाता पिकअप केले जाणार होते. त्या सदस्यांना कुठे उभे राहायचे हे ठिकाण देखील निश्चित करण्यात आले होते. निलेशने कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने केले होते.

अखेर रियुनिअनचा दिवस उजाडला. सकाळीच अमेरिकेतील सदस्यांचा ग्रुपवर मेसेज आला की, " सगळ्यांनी खूप मज्जा करा. आम्ही पुढच्यावेळी येऊ तेव्हा सगळे पुन्हा भेटू." सगळ्यांनी त्यांना \" मिस यू \" चे मेसेज पाठवले. प्रत्येकाला विलासची आठवण आल्याशिवाय राहवले नाही.


एक एक करत सगळे सदस्य साडेसात वाजेपर्यंत नियोजित ठिकाणी पोहचले. एकटी अंजली अद्याप आली नव्हती. तिची सगळेजण वाट पहात होते. शेवटी पाऊणेआठ वाजता धापा टाकत अंजली पोहचली एकदाची.

" अरे निलेश ! सॉरी सॉरी. माझी चिक्की मला सोडत नव्हती रे. तिला समजलं ना मी कुठेतरी चालले आहे तर सकाळपासून माझ्या मागेमागेचं फिरत होती. मी जेव्हा घराबाहेर पडले तर माझ्या मागे चालायला लागली. मग ह्यांनी कसंतरी तिला फसवून घरात नेले. तेव्हा मी कुठे येऊ शकले. तिला माझीच सवय आहे ना रोजची. आज काय करेल काय माहित ? ती आल्यापासून मी कधीच एवढा वेळ बाहेर राहिले नाही ना ?" अंजलीने बडबड करून एक दीर्घ श्वास घेतला.

" अग मग तुझ्याबरोबर तुझ्या चिक्कीला पण आणायचं ना. एवढी लोकं होती तिला सांभाळायला. तुझ्या नवऱ्याला पण सुट्टी घ्यावी लागली नसती." निलेश अंजलीला म्हणाला.

" अरे ! ती सहज आली असती तर आणलं असतं तिला. खूप भित्री आहे ती. सोसायटीच्या गेटच्या बाहेर जात नाही. फक्त सोसायटीच्या आवारात फिरते आणि इतक्या माणसांना बघून थरथर कापत बसली असती. माझा भित्रा ससा आहे रे."

" बरं ! सगळे आले आहेत ना ? कोणी राहिलं नाही ना बघा. की मी हजेरी घेऊ ?" निलेशने विचारले.

" अरे निलेश ! आता लक्षात आलं, संजय नाही आला आहे. थांब मी त्याला फोन करतो." महेशने संजयला फोन लावला तर त्याच्या बायकोने फोन उचलला आणि ती बोलली, " हॅलो ! मी संजयची बायको बोलते आहे. रात्री ह्यांच्या खूप पोटात दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. कोणाचा हिरमोड होऊ नये म्हणून ह्यांनी मुद्दाम कोणाला फोन करून सांगितले नाही. ग्रुपमधून सकाळी फोन येईल ही त्यांना खात्री होती. फोन आला की सगळं सांग असे ह्यांनी मला सांगून ठेवले होते. ह्यांनी सगळ्यांना निरोप दिला आहे की, " मला येता येणार नाही म्हणून कोणीही वाईट वाटून घेऊ नका. छान एन्जॉय करा. पुढच्या वेळी मी नक्की येईन."

" वहिनी, संजय आता कसा आहे ? कशामुळे त्याच्या पोटात दुखत होते ? काय बोलले डॉक्टर ? काही काळजीचे कारण आहे का ? आम्ही रद्द करू का आमचे जाण्याचे ?" महेशने हळहळ व्यक्त केली.

" भाऊजी, काळजी करण्याचं कारण नाही. त्यांना किडनीस्टोन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत होते. डॉक्टरांनी पेन किलरचे इंजेक्शन दिले आहे त्यामुळे आता दुखणे थांबले आहे आणि आता त्यांना झोप देखील लागली आहे. तुम्ही सगळे खुशाल जा."

महेशने ग्रुपमध्ये संजयबद्दल सांगितले तर सगळ्यांनाच वाईट वाटले. संजयने किती उत्साहाने रियुनिअनसाठी पैसे भरले होते. निलेशने संजयच्या बायकोला फोन केला आणि काही मदत हवी आहे का असे विचारले. जे लोकं रियुनिअनसाठी वैयक्तिक कारणामुळे येऊ शकणार नव्हते त्यांच्यापैकी कोणालातरी निलेशने संजयसाठी वेळात वेळ काढून भेटायला जाण्यास सांगितले.

निलेश, संदीप आणि संतोषने तीन बसेससमोर नारळ फोडले. सगळेजण बसमध्ये स्थानापन्न झाले. \" पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.\" \" गणपती बाप्पा मोरया.\" सगळ्यांनी गजर केला आणि बसेस सुटल्या. जशा बस सुटल्या तशा हौशी महिलावर्गाने खाऊचे डब्बे काढायला सुरुवात केली. महिलावर्गाने पहाटे उठून पदार्थ बनवले होते. मेथीचे ठेपले, थालीपीठ, साबुदाण्याची खिचडी, अळूवडी, कोथिंबीरवडी, इडली - चटणी, शिरा, पोहे, उपमा, बेसनलाडू अशा पदार्थांची रेलचेल होती. काहींजणींनी फरसाण, केक, चिवडा, बाकरवडी, वेफर्स, बिस्किटे असा सुका खाऊ भरपूर आणला होता.

सगळ्यांचे उदरभरण झाल्यावर सगळ्यांना चहा - कॉफी पिण्यासाठी बसेस थांबविण्यात आल्या. चहा - कॉफी पिऊन सगळ्यांना तरतरी आली. सगळेजण पुन्हा आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. आता बसमध्ये सुरू झाला अंताक्षरीचा खेळ. पुरुषांच्या विरुद्ध महिला अंताक्षरीचा खेळ रंगला. साहजिकच खेळात महिलाच आघाडीवर होत्या.

आता बसेस पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागल्या. पहिली गोरेगावला मेघना चढली. मेघनाने सगळ्यांसाठी तिच्या इथली फेमस गरमागरम जिलेबी आणली होती. तिने जिलेबीचे दोन मोठे पुडे दोन बसमध्ये दिले आणि एक पुडा हातात ठेऊन ती बसमध्ये चढली. सगळेजण गरमागरम जिलेबी खाऊन तृप्त झाले होते.

नंतर बोरिवली, दहिसर, नायगाव, वसई, विरार येथील एक एक करून सदस्यांना पिकअप करण्यात आले. विरार आले तसे मधेच नितीनला आठवले की ऑन द वे एक वृद्धाश्रम आहे आणि तिथे शाळेतले राणे सर सपत्नीक राहतात. नितीन त्यांना एक दोनदा जाऊन भेटला होता. नितीनने निलेशला आपण सगळे सरांना भेटून पुढे जाऊ अशी विनंती केली. त्याप्रमाणे तिन्ही बसेस वृद्धाश्रमासमोर थांबवण्यात आल्या. आपल्या शाळेतल्या इतक्या विद्यार्थ्यांना पाहून राणे सरांना भरून आले. काही विद्यार्थी राणे सरांचे प्रचंड लाडके होते. त्यांना सरांनी नावानिशी ओळखले. निलेशने सरांना रियुनिअनची कल्पना सांगितली. शशांक आणि निलिमाच्या कार्याची माहिती दिली. सरांना रियुनिअनची कल्पना आवडली. शशांक आणि निलिमाचा त्यांना अभिमान वाटला. सरांनी सगळ्यांना त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली.

ग्रुपमधील सदस्यांनी ताबडतोब पैसे जमा करून दहा हजारांची रक्कम वृद्धाश्रमाला डोनेशन म्हणून दिली.

राणे सर वृद्धाश्रमात का राहतात हाच सगळ्यांना प्रश्न पडला होता. सरांनी प्रत्येकाच्या मनातला प्रश्न ओळखला आणि ते स्वतःहून सांगू लागले, " मी वृद्धाश्रमात का राहतो हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडला आहे ना ? मी त्याचे उत्तर तुम्हाला देतो. माझी दोन्ही मुले अमेरिकेत राहतात. आम्हा दोघांना ते तिकडे कायमचे वास्तव्य करायला सांगतात पण आम्हाला परदेशात करमत नसल्याने आणि भारत सोडून जायचे नसल्याने आम्ही दोघांनी स्वखुशीने इथे वृद्धाश्रमामध्ये येण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे म्हातारे. आम्हाला पाहणार कोण ? आमची काही दुखलं खुपलं तर सेवा कोण करणार ? घर आहे स्वतःचं पण त्या घरात आम्ही दोघेचं. बोलून बोलून किती बोलणार एकमेकांशी ? आजूबाजूला माणसे हवीतचं ना ? म्हणून आम्ही आमचे राहते घर भाड्याने दिले आणि दोघांनी इथे येण्याचा निर्णय घेतला. तसंही आम्हा दोघांना पेन्शन पण येते. मुलांवर अवलंबून राहायला लागत नाही.
ह्या वृद्धाश्रमात छान घरासारखे वातावरण आहे. सगळ्या वृद्धांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात येते. इथे एक डॉक्टर आमच्यासाठी चोवीस तास तैनात असतात. सकाळी उठल्यावर व्यायाम, मेडिटेशन घेतले जाते. नाश्ता, दोन वेळेचे जेवण अतिशय सुग्रास असते. दर महिन्याला आमचे मेडिकल चेकअप होते. इनडोअर, आऊटडोअर गेम खेळायला मिळतात. संगीत ऐकण्यासाठी, टी. व्ही. पाहण्यासाठी, पुस्तके वाचायला वाचनालाय अशा बऱ्याच सुविधा आहेत. सगळे समवयस्क असल्याने आम्ही सगळे मिळून खूप मज्जा करतो. एकमेकांशी मनमोकळेपणाने हितगुज करतो. वर्षातून एकदा आमची पिकनिक नेतात. एकंदर खूप छान जीवन चालले आहे आमच्या दोघांचे. आमची मुले त्यामुळे निर्धास्तपणे परदेशात राहू शकतात."

सरांचा निर्णय सगळ्यांनाच आवडला. सरांचा, त्यांच्या पत्नीचा तसेच आश्रमातील इतर सदस्यांचा निरोप घेऊन सगळेजण आश्रमाच्या बाहेर पडले आणि बसमध्ये बसले. बसेस आता पालघरच्या दिशेने धावू लागल्या.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all