रियुनिअन ( भाग ७ )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.


रियुनिअन ( भाग ७ )

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ग्रुपमध्ये अंजलीचा एक फोटो पोस्ट झालेला दिसला. त्या फोटोत अंजली आणि तिच्या नवऱ्याबरोबर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू देखील होतं. फोटोखाली लिहिले होते, \" आमच्या घरातील नवीन सदस्य.\"

फोटो पाहिल्यावर लगेच कितीतरी जणांचे मेसेज आले, " अंजली तू भुभु आणला आहेस का ग ?"

अंजलीने सांगितले की, " अरे काल मध्यरात्री आमच्या घराबाहेर एका कुत्र्याच्या पिल्लूचा \" कुकु \" असा आवाज येत होता. दार उघडून पाहिले तर कोणीतरी आमच्या गेटपाशी त्या पिल्लाच्या डोळ्यांना कापडाची पट्टी बांधून सोडले होते. छोटासा तो जीव कितीवेळ असाचं असेल देव जाणे. त्याची पहिली डोळ्यांवरची पट्टी सोडली. ते पिल्लू घाबरून थरथर कापत होते. त्या पिल्लाची अवस्था पाहून मनातल्या मनात त्याला अशा अवस्थेत सोडणाऱ्या माणसाला दोन - चार शिव्या हासडल्या. आम्ही त्याला घरात घेतले.
मी लगेच त्याला एका छोट्या थाळीत दूध प्यायला दिले तर लगेच त्याने संपवले. किती भुकेलेले पण होते ते. त्याला ह्यांनी स्वच्छ पुसून काढले.
मुलांनी लगेच त्याच्यासाठी अंथरूण तयार केले आणि त्याला झोपवले. आता सकाळपासून आमच्या चौघांच्या अंगावर उड्या मारतंय ते. लगेच आमच्या घरात रुळलं देखील. मुलगी भुभु आहे म्हणून आम्ही तिचं नाव \" चिक्की \" ठेवलं.
आज तिच्यासाठी एका डॉक्टरांना बोलावले आहे. ते थोड्या वेळाने येऊन तिचे व्हॅकसिनेशन करतील.
मला खरंच माणसांच्या वृत्तीचे आश्चर्य वाटते. अरे ते कुत्र्याचं पिल्लू म्हणजे एक जीवंच आहे ना ? त्या पिल्लाला अशा अवस्थेत सोडून जाताना त्या माणसाला काहीचं कसे वाटले नाही ? त्या मुक्या प्राण्यांना फक्त बोलता येत नाही पण त्यांना देखील भावना असतातचं ना ?"

अंजलीच्या मेसेजवर मनीषा म्हणाली, " अंजू खूप छान केलंस की त्या मुक्या जीवाला तुम्ही आश्रय दिलात. मनुष्यप्राण्याची वृत्तीचं नीच. माणूस माणसाचा विचार करत नाही तर प्राणिमात्रांचा कुठे करणार ? हे भुभु लोकं मालकाबरोबर शेवटपर्यंत इमानाने राहतात. मनुष्य एकवेळ बेईमान होतो पण हे लोकं त्यांचं इमान सोडत नाहीत. आणि तसंही मला तरी वाटतं कुत्र्याचे महागडे ब्रीड खरेदी करण्यापेक्षा अशा अनाथ भुभुना ऍडोप्ट करणे केव्हाही चांगले. त्यांना एक सुरक्षित घर मिळते, आश्रय मिळतो, प्रेम मिळते. आपण जेवढं त्यांच्यावर प्रेम करू त्यापेक्षा कितीतरी पटीने ते भुभु आपल्याला प्रेम देतात."

सगळ्यांनी ग्रुपमध्ये अंजलीचे आणि तिच्या कुटुंबाचे कौतुक केले.


भाग्यश्रीने आपल्या गावातील घराचे, शेतातले, आपल्या सुनेचे चूल पेटवतानाचे फोटो ग्रुपवर पोस्ट केले. सगळ्यांनी भाग्यश्रीच्या सुनेचे कौतुक केले. आता भाग्यश्री एक आठवड्याने अमेरिकेला परत जाणार होती.


ग्रुपवर दुपारी राजश्रीचा मेसेज आला. तिच्या लेकाचा सुहृदचा आज बारावीचा रिझल्ट लागला होता त्यात त्याला ९९ टक्के मिळाले होते. नेमका योगायोग असा होता की सुहृदचा तीन दिवसांनी अठरावा वाढदिवस देखील होता. त्यामुळे मग राजश्रीने दोन्ही निमित्ताने पार्टी आयोजित केली. तिने ग्रुपमधल्या लोकांना आणि तिच्या नातेवाईकांना आमंत्रित केले.

पुन्हा ग्रुपमध्ये शंभर लोकांनी शंभर शंभर रुपये काढून दहा हजारांची रक्कम जमा केली. सुहृदच्या घवघवतीत यशाबद्दल आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला गिफ्ट तर द्यायला तर हवेचं होते.

राजश्रीने तिच्या बंगल्याच्या लॉनमध्ये तिच्या लेकाच्या वाढदिवसासाठी खूप छान व्यवस्था केली होती. राजश्रीचा नवरा गर्भश्रीमंत असल्याने ग्रुपमध्ये आता समजलं की राजश्रीने लग्नानंतर स्वतःचं करिअर वगैरे का केले नाही. राजश्रीने ग्रुपमध्ये कधीच जाणवून दिले नव्हते की तिचा नवरा मोठा उद्योगपती असून लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते आहे आणि तिने ह्या गोष्टींचा बडेजाव सुद्धा कधीच केला नव्हता.

शाळेच्या ग्रुपमधील साठ - सत्तर मित्रमंडळी राजश्रीच्या घरी पोहचले. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे मोठ्या अदबीने स्वागत करण्यात येत होते. सगळे स्थानापन्न झाले. राजश्रीच्या नातेवाईकांमध्ये काहीतरी कुजबुज चालू होती. काय ते नक्की समजत नव्हते. फक्त कानावर इतकंच पडत होते की, \" सुहृदने किती नशीब काढलं आहे. हे सारं वैभव त्याचेचं होणार. वगैरे वगैरे.\" राजश्रीच्या मित्रमंडळींना त्यांच्या बोलण्याचा कसलाचं संदर्भ लागत नव्हता.

सुहृदने केक कापला. सगळ्यांनी त्याला गिफ्ट दिले. राजश्रीच्या नवऱ्याने माईकवरून आलेल्या पाहुण्यांना जेवून घेण्याची विनंती केली. तेवढ्यात सुहृद म्हणाला, " बाबा मला थोडं बोलायचं आहे." सुहृदने माईकचा ताबा घेतला.

" नमस्कार, मी सुहृद. आज तुम्ही माझ्या वाढदिवसासाठी आणि मला मिळालेल्या बारावीमधील यशासाठी जमले आहात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मी आताच इथे काही लोकांच्या तोंडून कुजबुज ऐकली. खरं तर मला असे कान देऊन ऐकायची सवय नाही पण काही वाक्ये कानावर आल्याने मला तुमच्याशी बोलावेसे वाटले.
मी सुहृद. मी एका अनाथाश्रमात राहत होतो. मी सात वर्षांचा असेन त्यावेळी अनाथाश्रमाच्या एका खोलीत कोपऱ्यात बसलो असताना मला आई - बाबांनी पाहिले आणि मला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आईबाबांना स्वतःचे मूल होणार नसल्यामुळे त्यांनी मूल दत्तक घेण्याचा पर्याय स्वीकारला होता.
माझ्या आईबाबांनी मला कधीच परकेपणा जाणवू दिला नाही. माझ्यावर त्यांनी एवढं प्रेम केलं की त्याची परतफेड मी करूचं शकणार नाही. जेव्हा मी या घरात आलो तेव्हाचं मनाशी ठरवले होते की माझ्या आईबाबांना माझ्यामुळे मान खाली घालावी लागेल असे कुठलेही काम करणार नाही. मला माझ्या स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे अस्तित्व उभे करायचे आहे. माझे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचे. पैशाअभावी ज्यांना मेडिकल फॅसिलिटी मिळत नाहीत अशांसाठी मला सर्व सुखसोयींयुक्त हॉस्पिटल उभारायचे आहे. माझ्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे."

सुहृदच्या बोलण्याने राजश्री आणि तिच्या नवऱ्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले होते. तसेच उपस्थितांना देखील गहिवरून आले होते.

" मी दोन शब्द बोलू इच्छितो." राजश्रीच्या नवऱ्याने माईक हातात घेतला. " आमच्या सुहृदच्या यशप्राप्तीसाठी आणि वाढदिवसासाठी आपण सगळे इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. खरंतर आतापर्यंत आम्ही कधीच सुहृद आमचा दत्तक मुलगा आहे याची वाच्यता केली नाही. पण आपला समाज ह्या गोष्टींची सतत जाणीव करून देतो. मूल दत्तक घेण्याविषयी अजूनही समाजात उदासीनता जाणवते. मूल कुठेही जन्माला येऊदे पण त्याला लहानपणापासून घडवलेले संस्कार ही त्याची खरी ओळख ठरते. मी जास्त बोलून आपला वेळ घेत नाही. आपण सर्वांनी जेवून घ्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो."

सगळ्यांनी जेवण केले. सगळ्यांनाच राजश्री आणि तिच्या नवऱ्याचे खूपचं कौतुक वाटले. राजश्री आणि तिच्या परिवाराचा निरोप घेऊन मित्रमंडळी घरी जाण्यास निघाले.

वाटेत रस्त्यात लता म्हणाली की, " माझ्या भाचीच्या देखील लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. खूप डॉक्टर करून झाले. तिला मुलांची भयंकर आवड आहे त्यामुळे ते दोघे नवरा बायको हल्लीच दत्तक मूल घेण्याचा विचार करत होते पण तिचे सासूसासरे दत्तक मूल घेण्यास नकार देत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, तुम्हाला स्वतःचे मूल होऊ शकते. त्या मुलाचा कुठे जन्म झाला असेल ? त्याचे आईवडील कोण असतील ? ते कुठल्या जातीचे असेल ? असा विचार ते करतात. ते त्यांची मानसिकता बदलत नाहीत.
माझ्या भाचीने आणि तिच्या नवऱ्याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे काही केल्या ऐकत नाहीत. शेवटी घरात वादविवाद नको म्हणून भाची आणि तिच्या नवऱ्याने शांत बसण्याची भूमिका घेतली.
आता मी स्वतः जाऊन राजश्रीचे उदाहरण त्यांना देईन. राजश्रीचा नवरा बोलला ना ते वाक्य मला खूप आवडलं, \" मनुष्य कुठेही जन्माला येऊदे त्याची खरी ओळख त्याच्या संस्कारामुळे दिसते.\" अगदी हे वाक्य मी त्या दोघांना आवर्जून सांगेन. बघू मी माझे प्रयत्न करेन त्यांना समजवण्याचे. पुढे त्यांनी त्यांचे ठरवले पाहिजे."

लताच्या बोलण्यावर मनोज म्हणाला, " लता खरंच तू तुझ्या भाचीच्या सासुसासऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न कर. आज राजश्री आणि तिच्या नवऱ्याच्या विचारांचे फारचं अप्रूप वाटले. लोकांनी त्यांची मानसिकता बदलायलाचं हवी."

रात्री सगळ्यांनी एकमेकांना गुड नाईटचे मेसेजेस टाकले. मधेचं संगीता बोलली, " बाबा निलेश, रियुनिअनचे लौकर ठरव."

निलेशने मेसेज टाकला की, \" ह्या दोन तीन दिवसांत जागा फायनल करतो.\"

निलेशच्या मेसेजने पुन्हा ग्रुपमध्ये चैतन्य निर्माण झाले.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all