रियुनिअन ( भाग ३ )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.


रियुनिअन ( भाग ३ )

तन्वीच्या हळदीला नाही म्हटलं तरी पस्तीस लोकांचा ग्रुप गेला. ग्रुपमधेचं ठरवलं गेलं की, हळदीला अर्ध्या लोकांनी जायचं आणि लग्नाला अर्ध्या लोकांनी. फक्त ऍडमिन निलेश दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावणार होता.

तृप्तीच्या बिल्डिंगच्या टेरेसवर हळदीचा कार्यक्रम ठेवला होता. टेरेसवर प्रवेश केल्यावर सर्वांना लिंबू सरबत, चहा, कॉफी दिले जात होते.

हळदीचा कार्यक्रम अगदी वेळेत सुरू केला गेला. कुठल्याही पाहुण्यांची रखडपट्टी केली गेली नाही. तन्वीने मेहंदी सकाळीचं काढून घेतली होती. नाजूकश्या तन्वीच्या गोऱ्या हातावर मेहंदी आणि हिरवा चुडा खूपचं खुलून दिसत होता. आलेल्या पाहुण्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. तशी थीमचं ठेवली होती.

तन्वीला हळद लागली. सगळे खूप उत्साहात
नाचले. तृप्तीच्या डोळ्यांत आपल्या लेकीला बघून बघून सारखे पाणी येत होते. सारखी तिच्या नवऱ्याची तिला आठवण येत होती.

तन्वी सुद्धा नाचली आणि नाचता नाचता तिच्या आईला तिने नाचायला ओढले. तृप्ती तिच्यासाठी थोडं थिरकली पण नंतर त्या मायलेकी गळ्यात पडून रडू लागल्या. उपस्थितांच्या डोळ्यांत देखील पाणी आले.
रडता रडता पुन्हा तन्वी गाण्यांवर थिरकली.

जेवणासाठी पुरणपोळी, बटाट्याची सुकी भाजी, मसालेभात, जिलेबी, मठ्ठा असा बेत होता. जेवणासाठी टेरेसवर खुर्च्या आणि टेबल मांडले गेले. पाहुणेमंडळी जेवून आपापल्या घरी गेले.

दुसऱ्या दिवशी तन्वीचे लग्न असल्याने ग्रुपमधून दीडशे जणांनी प्रत्येकी दोनशे रुपये आहेर म्हणून निलेशला बँक ट्रान्स्फर केले होते. तीस हजारांची रक्कम जमली होती. निलेशने एका इन्व्हेलोपमध्ये ती रक्कम भरून ठेवली. सगळ्यांचं मत ठरलं होतं की, पैशांचं पाकीटचं देऊया. तृप्ती तिच्या लेकीला आवडीचे काय द्यायचे असेल ते आपण दिलेल्या आहेरातून घेऊ शकेल.

निलेशसोबत त्याची बायको स्वाती देखील लग्नाला जाणार होती. निलेश स्वातीसह लग्नाच्या हॉलमध्ये पोहचला. हॉलमध्ये झेंडू आणि अष्टरच्या फुलांची साधीशी सजावट केली होती. थर्माकोलचे डेकोरेशन आणि प्लास्टिक यांचा वापर पूर्णपणे टाळला होता.

जमलेल्या माणसांना जास्त न रखडवता लग्नाचे विधी सुरू झाले. आलेल्या पाहुण्यांना पन्हे आणि कोकम सरबत दिले जात होते. स्टार्टर म्हणून कोथिंबीर वडी आणि अळूवडी फिरवली जात होती. तन्वी आणि तिच्या नवऱ्याने पूर्णपणे महाराष्ट्रीयन पदार्थांना लग्नात मानाचे स्थान दिले होते.

सीमंत पूजनाला तृप्ती बसली होती. तृप्ती आणि तन्वीने नऊवारी साडी नेसली होती. तन्वीने लग्नाच्या मुहूर्तासाठी पिवळ्या रंगाची, लाल काठाची नऊवारी साडी नेसली होती आणि मोत्यांचे ठसठशीत पारंपरिक दागिने घातले होते. तन्वीच्या सासरच्यांकडील आणि माहेरच्यांकडील बायकांनी देखील नऊवारी साडी नेसली होती तसेच समस्त पुरुषांनी सदरा आणि धोतर परिधान केले होते. तन्वीला एका पालखीत बसवून, तुतारी फुंकून तिला लग्नमंडपात आणले गेले होते.

तन्वीने आणि तिच्या सासरच्या लोकांनी तृप्तीला सांगितले होते की, लग्नाचे विधी तृप्तीच्या हातूनचं केले जातील. एक आई आपल्या मुलांना वाढवताना किती कष्ट घेते आणि एखाद्या माणसाची बायको मृत पावली असली तरी तो सगळ्या कार्यात सहभागी होऊ शकतो तर एक स्त्री का नाही ? त्यामुळे लेकीच्या लग्नात तृप्ती लग्नाच्या सगळ्या विधींमध्ये सहभागी झाली होती.

लेकीची मंगलाष्टके देखील तिने ऐकली. वास्तविक आईने लेकीची मंगलाष्टके ऐकू नये असे म्हणतात पण तन्वीने गुरुजींना यामागचे शास्त्र विचारले असता गुरुजी म्हणाले, " काही ठोस असे कारण नाही. एक आई आपली मुलगी परक्या घरी जाते यामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात केवळ यासाठीचं मुलीच्या आईला मंगलाष्टके ऐकू देत नाहीत." मंगलाष्टकांसाठी तांदळाच्या अक्षता वापरल्या गेल्या नाहीत तर गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या वापरल्या गेल्या होत्या.

तन्वीचे लग्न खूप छान पार पडले. तन्वीची सासरची माणसे खरोखरंच पुढारलेल्या मतांची होती. तृप्तीच्या सासरच्या, माहेरच्या पाहुण्यांशी तसेच तिच्या मित्रमैत्रिणींशी ते अदबीने बोलत होते. सगळ्यांना जेवणाचा आग्रह करत होते.

तन्वीच्या लग्नाच्या जेवणाचा मेनू पूर्णपणे मराठमोळा होता. वांग्याचं भरीत, झुणका, मिरचीचा ठेचा, ज्वारी आणि तांदळाची भाकरी, चवळी - बटाट्याची रस्सा भाजी, छोटे - छोटे बटाटेवडे, कांदा - बटाटा भजी, वरण - भात, मसालेभात, कढी, उकडीचे मोदक, पापड, कुरडई, जिलेबी, मठ्ठा, पंचामृत, आंब्याचे लोणचे, खोबऱ्याची चटणी यांची रेलचेल होती. पूर्ण ताट पंचपक्वानांनी भरून गेले होते. जेवण वाढण्यासाठी पूर्वीप्रमाणे टेबल - खुर्ची मांडून पंगत बसवली होती आणि वाढपी वाढत होते. जेवणाच्या ताटासोबत प्रत्येकाला एका छोट्या मिठाईच्या बॉक्समध्ये बुंदीचे दोन लाडू पॅकिंग करून दिले होते.

तन्वी आणि तिचा नवरा रिसेप्शनसाठी लगेच तयार होऊन आले. तन्वीने पुन्हा दुसरी डाळींबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती आणि तिच्या नवऱ्याने डाळींबी रंगाचा सदरा आणि मोती कलरचे धोतर नेसले होते. तन्वीने जुन्या पारंपरिक पद्धतीचे दागिने घातले होते. अतिशय सुंदर दिसत होते ते जोडपे. सगळ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी नवदाम्पत्यांना आहेर आणि आशीर्वाद दिले.

सगळेजण तन्वीच्या लग्नसोहळ्याचे कौतुक करून हॉलबाहेर पडत होते. तृप्तीच्या सगळ्या मित्रमंडळींनी तृप्तीचा निरोप घेतला आणि आपापल्या घरी जाण्यास निघाले. तृप्तीला आपले मित्रमंडळी लेकीच्या लग्नाला आल्याबद्दल समाधान वाटले होते. एका सुंदर, पुढारलेल्या मतांनी केलेला लग्नसोहळा सगळ्यांच्या पसंतीस पडला होता.

तन्वीच्या हळदीचे, लग्नाचे फोटो ग्रुपमध्ये शेअर केले गेले. जे लोकं लग्नाला येऊ शकले नाही ते हळहळले कारण इतक्या देखण्या समारंभाला ते मुकले होते. मग फोटो पाहून त्या लोकांनी दुधाची तहान ताकावर भागवली. निलेश मात्र खूप खुशीत होता कारण तो तन्वीच्या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला होता.

संध्याकाळी अमेरिकेत स्थायिक असलेल्या सदस्यांनी तन्वीच्या लग्नाचे ग्रुपमधील फोटो पाहिले. भाग्यश्रीच्या लेकाचे देखील लग्न ठरले असल्याने तिला तन्वीच्या लग्नसोहळ्याची कल्पना खूप आवडली होती. भाग्यश्रीच्या मुलाने त्याचे लग्न युरोपियन मुलीशी ठरवले होते पण तिची होणारी सून जरी युरोपियन असली तरी तिला भारतात येऊन महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचे होते. भाग्यश्रीच्या लेकाचे तिच्या सुनेच्या पद्धतीचे लग्न अमेरिकेत होणार होते आणि हिंदू पद्धतीने भारतात होणार होते. भाग्यश्री तन्वीच्या लग्नसोहळ्याने प्रेरित होऊन तिच्या आणि तिच्या होणाऱ्या सुनेच्या कुटुंबाबरोबर लग्नाच्या कार्यक्रमाची चर्चा करणार होती.


थोडया वेळाने तृप्तीचा ग्रुपवर मेसेज आला.

" सगळ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. तुम्ही सगळे माझ्या लेकीच्या लग्नासाठी उत्साहाने सहभागी झालात याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. अगदी दोन महिने झाले आपण ह्या ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आलो तरी कुठलाही परकेपणा जाणवला नाही आणि इतका भरभक्कम आहेर तुम्ही माझ्या लेकीला दिलात.
काय बोलू माझ्याकडे शब्द नाहीत. तन्वीने देखील तुम्हा सर्वांचे आभार मानले आहेत. ती देखील म्हणाली, " आई ! तुमचा ग्रुप खरंच वेगळा आहे. सगळे माझ्या लग्नात किती आपलेपणाने आले." तन्वीला तुम्हा सर्वांचे खूप कौतुक वाटले. असेच सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मुलांना लाभो हेचं देवाकडे मागणे मागते."

तृप्तीच्या या मेसेजवर निलेशने खूप छान रिप्लाय दिला.

" तृप्ती सगळ्यात प्रथम मी तुझे आभार मानतो की, तन्वीच्या दोन्ही कार्यक्रमासाठी तू मला आमंत्रण दिलेस. खूप सुंदर आणि आधुनिक विचारांनी लेकीचा लग्नसोहळा पार पाडलास आणि समाजासमोर एक नवा विचार तुम्ही मांडला. खरंच आपण ह्या एकविसाव्या शतकात असूनही किती अंधश्रध्देच्या आहारी गेलो आहोत. किती त्या जाचक रुढीपरंपरा अद्यापही जपतो आहोत.
तुझ्या लेकीचे, जावयाचे आणि त्याच्या घरातील सदस्यांचे कौतुक करावे तितके कमीचं आहे. एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे. एका सुंदर कार्यक्रमाचा मी साक्षीदार झालो असल्याने मला खूप आनंद झाला आहे. लेक आणि जावई तर दृष्ट लागण्याइतके सुंदर दिसत होते पण तृप्ती तू देखील फारचं सुंदर दिसत होतीस. भक्कमपणे लेकीच्या पाठी उभी राहिलीस. एकटीने तिच्या सोहळ्याचा भार पेललास. एक वेगळेचं तेज तुझ्यात निर्माण झाले होते. तुझ्या खंबीरतेला आम्हा सर्वांचा सलाम."

निलेशच्या मेसेजने तृप्तीचे डोळे तर पाणावलेचं पण समस्त ग्रुपमधील सदस्यांना देखील भरून आले. सगळ्यांनी तन्वीच्या आधुनिक विचारांचे खूप कौतुक केले आणि मुलगी चांगल्या सुस्थळी गेल्याबद्दल तृप्तीचे अभिनंदन केले.

" निलेश ! आता ठरल्याप्रमाणे आपले रियुनिअनच्या कार्यक्रमाचे लौकरात लौकर ठरव. म्हणजे आपली सर्वांची भेट होईल." स्मिताच्या मेसेजने आता सगळ्यांनाचं रियुनिअनचे पुन्हा वेध लागले होते. रियुनिअनचा कार्यक्रम लौकर ठरव अशी सगळ्यांनीचं निलेशकडे मागणी केली.

लौकरात लौकर कार्यक्रम ठरवतो असे आश्वासन निलेशने मित्रमंडळींना दिले आणि आता तो कार्यक्रम कसा आखयचा ह्याची मनात तो जुळवाजुळव करू लागला.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all