रियुनिअन ( भाग २ )

ही कथा आहे आयुष्याच्या पन्नाशी पार केलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.
रियुनिअन ( भाग २ )

तृप्तीच्या मेसेजने संपूर्ण ग्रुपला वाईट वाटले. आता पुढे ..........

रात्री झोपताना ऍडमिन निलेशने दुसऱ्या दिवशी तृप्तीच्या घरी जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर जाण्यास त्याची बायको, दोन - चार मैत्रिणी आणि चार - पाच मित्र तयार झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशने तृप्तीला फोन केला आणि संध्याकाळी तिच्या घरी आम्ही काही मित्रमंडळी येणार आहोत असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे तृप्तीच्या घरी दहा - बारा मित्रमंडळी गेले. सगळ्यांनी तिच्या घरी जाताना काही ना काही खाऊ नेला होता. तृप्तीने सगळ्यांचे स्वागत केले. हॉलच्या समोरच्या भिंतीवर दिनेशचा फोटो लावलेला होता.

तृप्तीने सगळ्यांसाठी समोसे मागवले होते. समोस्याची प्लेट आणि चहा तिने टीपॉयवर मांडले. तृप्तीचे घर अतिशय सुंदर होते आणि तिने ठेवलेही होते नीटनेटके. तिची दोन्ही मुले आज लौकर आली होती. तृप्तीने मुलांची ओळख आपल्या मित्रमैत्रिणींना करून दिली. तिच्या मुलांनी देखील त्यांच्या गप्पांमध्ये भाग घेतला.

" माझ्या तन्वीचं लग्न आहे बरं का दोन महिन्यांनी. सगळ्यांच्या घरी जाऊन मला आमंत्रण देण्यास जमणार नाही आणि तसंही आम्ही घरच्या देवाला आणि देवळात ठेवायला मोजून पाच पत्रिका छापणार आहोत. आमंत्रणाच्या पत्रिकांचा फोटो आणि व्हिडीओ व्हाट्सएपच्या, इमेलच्या माध्यमामार्फत आम्ही नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवणार आहोत. आम्हाला ह्या नवीन पिढीचे विचार पटले की, पत्रिका नंतर रद्दीतचं जातात. तर पत्रिकांचा उगाचं वायफळ खर्च का करायचा ? तन्वीच्या सासरचे लोकं खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत." तृप्ती म्हणाली.

" अरे वाह ! खूप छान विचार आहेत. आपल्या ग्रुपवर लग्नाची पत्रिका टाक. ज्यांना यायला जमेल ते नक्कीच येतील." वंदना म्हणाली.

" आणि काहीही, कुठलीही मदत लागली तर आम्हाला सांग. संकोच करू नकोस. आता तन्वीच्या लग्नाला मामा, मावश्या भरपूर आहेत कामे करायला." निलेश म्हणाला.

जवळपास पाऊण - एक तास बसून सगळेजण तृप्तीच्या घरून बाहेर पडले.

" अरे निलेश ! तू तृप्तीला विचारून घे काही आर्थिक मदत हवी आहे का ? आपण ग्रुपमधून करू पैशांची सोय." संतोष म्हणाला.

" हो ! माझ्याही डोक्यात तेचं होतं. मी फोन करून उद्या विचारेन तिला." निलेश म्हणाला.

दुसऱ्या दिवशी निलेशने तृप्तीला काही आर्थिक मदत हवी आहे का असे विचारले असता तृप्ती म्हणाली, " तुम्ही सगळयांनी विचारल्याबद्दल तुमचे खूप आभार. आर्थिक मदत सध्या तरी नको आहे निलेश. तन्वीच्या सासरच्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही जास्त कुठलाही खर्च करायचा नाही. ह्यांनी माझ्या नावाने व्यवस्थित प्रॉपर्टी ठेवली आहे त्यामुळे पैशांची नड नाही. मुलगी आणि जावई व्यवस्थित कमावतात. त्या दोघांनी आटोपशीर लग्न करायचे ठरवले आहे. सगळं आहे निलेश पण माझा माणूस आता माझ्याजवळ नाही. ठीक आहे जे आलं आहे पुढ्यात त्याला आता हसतखेळत सामोरं जायचं आहे."

" बरं ! ठीक आहे तृप्ती. काहीही मदत लागली तरी हक्काने सांग." निलेश म्हणाला.


निलेशने ग्रुपवर मेसेज टाकला,

\" आपल्या ग्रुपचं रियुनिअन करायचं आहे पण आता तृप्तीच्या लेकीचं लग्न अगदी दोन महिन्यांवर आले आहे त्यामुळे तन्वीच्या लग्नानंतर आपण आपल्या रियुनिअनचा कार्यक्रम आखुया. आणि अजून कोण कोण बिछडे हुए लोकं आपल्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकतात. जास्तीत जास्त लोकं असली की रियुनिअन करण्यात मजा येईल. तुम्हाला सर्वांना माझा विचार पटला ना ?\"

सगळ्यांनी निलेशच्या मेसेजवर होकारार्थी प्रतिसाद दर्शवला.

संध्याकाळी भाग्यश्री आणि प्रतीक दोघे अमेरिकेला राहणारे असलेले नवराबायको ग्रुपमध्ये ऍड झाले. भाग्यश्री आणि प्रतिकचे एकमेकांवर शाळेत असताना नववी इयत्तेपासून प्रेम होते. त्या दोघांनी त्यांचे प्रेम दहा वर्षे सुंदररित्या टिकवले होते आणि त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले होते. लग्नानंतर एक - दोन वर्षे मुंबईत राहून ते दोघे अमेरिकेला निघून गेले आणि तिथेच स्थायिक झाले. राजीव शेळकेमुळे त्या दोघांचा शोध लागला होता. भाग्यश्रीला ग्रुपमध्ये तिच्या ओळखीच्या मैत्रिणी दिसल्यावर अतिशय आनंद झाला. लगेच ती उत्साहाने चिवचिवायला लागली. तिने सुनीता आणि अहानाचा नंबर निलेशला दिला आणि त्यांना देखील ग्रुपमध्ये ऍड करायला सांगितले.

सुनीता आणि अहाना अमेरिकेतचं राहत होत्या. अहानाने तिथे जाऊन आर्किटेक्चरची पदवी घेतली होती. सुनीता सोशलवर्कचे काम पहायची. भाग्यश्री, सुनीता आणि अहाना अमेरिकेत एकमेकींच्या जवळ असल्याने संपर्कात होत्या.

भाग्यश्री अतिशय सुगरण असल्याने तिने अमेरिकेमध्ये इंडियन फूडचे टिफिन चालू केले होते. केवळ भारतीयचं नव्हे तर परदेशी लोकं देखील तिच्या इंडियन फूडची मागणी करायचे. विशेष म्हणजे भाग्यश्रीच्या मऊसूत पुरणपोळ्या आणि अळूवड्यांना विशेष मागणी असायची. भाग्यश्री सणासुदींना वेगवेगळे पदार्थ केले असता त्यांची देखील हातोहात विक्री व्हायची. प्रतीक एका नामांकित कंपनीत नोकरी करायचा. खरंतर देवाच्या कृपेने भाग्यश्रीला कुठलीही कमतरता नव्हती पण तिचा वेळ जावा आणि इंडियन फूड परदेशवासीयांना चाखता यावे यासाठी तिने आपल्या सुगरणतेचा फायदा करून घेतला होता.

आता ग्रुपमध्ये एक सोडून चार परदेशात वास्तव करणारे लोकं ऍड झाली असल्याने रात्रीपर्यंत अमेरिकेच्या गप्पा रंगल्या होत्या. त्या चौघांनी सगळ्यांना
अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले आणि कधी भारतात आल्यावर मित्रमैत्रिणींना भेटण्याचे आश्वासन दिले.

भाग्यश्रीने चॅटिंग करताना शाळेतल्या इनामदार सरांची आठवण काढली तसे सगळ्यांचे डोळे पाणावले. इनामदार सरांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. इनामदार सर होतेच तसे. कडक शिस्तीचे पण अतिशय प्रेमळ. मुलांमध्ये खूप आवडते.

भाग्यश्रीने सरांची आठवण काढली तेव्हा सगळ्यांना आठवली शाळेची सहल. एके वर्षी शाळेची सहल वज्रेश्वरीला गेली असता सहलीवरून परतताना सरांनी सहलीला गेलेल्या मुलांना, शिक्षकांना आपल्या राहत्या घरी वसईला नेले होते. तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते. त्याकाळी फोन नसल्याने सर त्यांच्या घरी काही कळवू शकले नाही आणि आयत्यावेळी मुलांना आणि शिक्षकांना असे सगळे मिळून शंभर ते दीडशे जणांसाठी त्यांनी त्यांच्या बायकोला पिठलं - भात करायला लावला होता. त्या माउलीने त्यांच्या जावेला, नणंदेला हाताशी धरून इतक्या जणांचे पिठलं - भात अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात रांधले होते. पटापट अंगणात सतरंज्या घातल्या गेल्या. पत्रावळीवर चुलीवरचे जेवण वाढले गेले आणि सगळ्यांनी मिटक्या मारत ते खाल्ले होते. त्या जेवणाची चव अजूनही प्रत्येकाच्या जिभेवर होती.

सर इतक्या लांबून शाळेत येतात ह्याचे सगळ्यांना अप्रूप वाटत होते. तेव्हा तर रेल्वे, बस यांच्या जास्त सोयी नव्हत्या. सरांना शेतातून चालत स्टेशनपर्यंत जायला लागायचे. सरांनी आपल्या घरी इतक्या जणांना प्रेमाने नेले, त्यांना जेऊ घातले त्यासाठी सगळे शिक्षक सरांचे कौतुक करत होते कारण त्यावेळी सरांना किती कमी पगार असेल पण त्यांचे मन किती मोठे होते त्याचा सर्वांनाचं प्रत्ययचं आला होता.

भाग्यश्रीने सरांची आठवण काढली म्हणून सगळ्यांनाच सरांची तीव्रतेने आठवण आली. सरांचे निधन झाले आहे असे समजल्यावर भाग्यश्रीला खूप वाईट वाटले. भाग्यश्रीला ग्रुपवर किती बोलू आणि किती नाही असे झाले होते पण तिच्याकडे जरी सकाळ असली तरी भारतात रात्र झाली होती त्यामुळे ग्रुपमधील एक एक करत सगळे झोपी गेले आणि भाग्यश्री दुसऱ्या दिवशीची वाट पाहत राहिली.

सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे निलेशने व्हाट्सएप चेक केले असता भास्करने शशांक गद्रे आणि नीलिमा ( पूर्वाश्रमीची नीलिमा वैद्य ) ह्या जोडप्याचा नंबर ग्रुपमध्ये ऍड करायला पाठवला आणि त्यांची जुजबी माहिती सांगितली ती म्हणजे, शशांक आणि नीलिमा डॉक्टर झाले आहेत आणि ते एका आदिवासी पाड्यात राहून आदिवासी लोकांची सेवा करतात. आदिवासी भागात कुठली आली इंटरनेटची सोय त्यामुळे त्या भागातून बाहेर पडल्यावरचं त्या दोघांना इंटरनेट मिळत असे. भास्करने दोन महिन्यांपूर्वी शशांकला फेसबुकवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. शशांकने रात्री भास्करचा मेसेज बघितल्यामुळे त्याने सकाळी भास्करशी संपर्क साधला आणि त्याला स्वतःचा आणि निलिमाचा फोन नंबर दिला.

दुसरे जोडपे आता ग्रुपमध्ये ऍड झाले होते. शशांक आणि निलिमा खरंतर एकाचं शाळेत, एकाचं वर्गात असले तरी ते दोघे मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही डॉक्टर होऊन जिथे वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही तिथे जाऊन ते दोघे आपल्या डॉक्टरी पेशाचा उपयोग करणार होते. दोघांचेही एकचं स्वप्न आणि दोघांचेही बरेचसे विचार जुळत असल्याने साहजिकच दोघांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि लग्न करून एका आदिवासी भागात ते दोघे राहू लागले होते. पूर्णपणे त्या दोघांनी आदिवासी बांधवांची सेवा करण्यात स्वतःला वाहून घेतले होते.

ग्रुपमध्ये सगळ्यांनी शशांक आणि निलिमाचे स्वागत केले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

होता होता आता तन्वीचे लग्न अगदी आठवड्यावर आले होते. ग्रुपमध्ये पण दिवसागणिक कोणाची ना कोणाची भर पडत होती. तृप्तीने ग्रुपवर लेकीच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ टाकला. तृप्तीने आदल्या दिवशीपासून हळदीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना आमंत्रण दिले होते. लगेच ग्रुपमधल्या महिला मंडळाचा उत्साह वाढला. कुठली साडी नेसायची, कुठले दागिने घालायचे याचे मनातल्या मनात मनसुबे रचले गेले.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all