रियुनिअन ( भाग १० अंतिम )

ही कथा आहे आयुष्याची पन्नास वर्षे उलटून गेलेल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींची.
रियुनिअन ( भाग १० अंतिम )

तिन्ही बसेस आता दुपारी साडेबाराच्या सुमारास पालघरला शशांकच्या घराजवळ पोहचल्या. सगळे बसमधून उतरले. प्रवेशद्वारावर एक मोठी सुंदर रांगोळी काढली होती आणि वेलकम असे मोठ्या अक्षरात फुलांनी लिहिले होते. शशांकने त्याच्या अंगणात मोठा मंडप घातला होता. तिथे सगळ्यांसाठी टेबल खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या.

शशांक आणि निलिमा सगळ्यांच्या स्वागतासाठी दारातच उभे होते. सर्वांना शशांक आणि निलिमाला पाहून खूप आनंद झाला. सगळेजण खुर्च्यांवर बसल्यावर प्रत्येकाला कोकम सरबत दिले गेले. सगळ्यांच्या गप्पांना उधाण आले होते. निलेशने राणे सरांबद्दल शशांकला सांगितले आणि सरांना त्याच्या कार्याची माहिती सांगितली हे देखील सांगितले. राणेसरांनी शशांकला भेटण्यासाठी बोलावले आहे हे देखील सांगितले. त्यावर शशांक म्हणाला की, " मी नक्की राणेसरांना भेटायला जाईन."

सगळ्यांनी शशांकचे घर बघितले. शशांकचे घर गावातल्या घरांसारखे कौलारू होते. शशांक आणि निलिमाच्या घरातचं दोघांचा दवाखाना होता. शशांकच्या दोन मुलांसाठी खाऊ नेला होता तो मुलांच्या हातात दिला.

बरोबर दीड वाजता निलिमाने सगळ्यांना जेवून घेण्याची विनंती केली. निलिमाने आदिवासी स्त्रियांना मदतीला घेऊन शाकाहारी - मांसाहारी स्वयंपाक करून ठेवला होता. सगळ्यांनी चुलीवरील जेवणावर यथेच्छ ताव मारला. शाकाहारी जेवणात निलिमाने दारात लावलेल्या विशेषतः रानभाज्या होत्या तर मांसाहारी जेवणात मटण होते. ज्वारीच्या तसेच तांदळाच्या भाकऱ्या देखील होत्या.

जेवणानंतर तर सगळेचं सुस्तावले होते पण सगळ्यांनाच शशांकचे गाव पहायचे होते. गावाला चारही बाजूने डोंगर लाभलेले होते. त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणून मुक्तहस्ताने निसर्गाने हिरव्या रंगाची उधळण केली होती.

शशांक आणि निलिमाने त्या आदिवासी भागात ग्रामपंचायतद्वारे बरीच सुधारणा केली होती. गावची वस्ती फार मोठी नव्हती. जेमतेम पाच - सहा हजार लोकवस्ती होती. मुलांसाठी शाळेची सोय केली होती तसेच निलिमा प्रौढशिक्षण वर्ग देखील चालवत होती. निलिमाने आदिवासी भगिनींना पापड, कुरडई बनविण्यासाठी कुटिरोद्योग सुरू केला होता तर शशांकने आदिवासी बांधवांना बांबूपासून वस्तू बनविण्याचा लघुउद्योग सुरू करून दिला होता. आदिवासी बांधवांना स्वछतेचे महत्व पटवून दिल्याने गावातील परिसर अतिशय स्वच्छ होता. पाण्यासाठी विहिरी बांधून घेतल्या होत्या. तसेच शुद्ध पाण्याची पाणपोई देखील सर्वत्र होत्या. प्रत्येकाच्या घरात गोबर गॅस पोहोचला होता. गावात एक छोटेसे हॉस्पिटल सुद्धा शशांकच्या खटपटीने बांधले होते. शशांकने गायीचे महत्त्व तिथल्या रहिवाशांना पटवून दिले होते ते म्हणजे \" गाय ही केवळ दूध देत नाही तर तिच्या शेणाच्या गोवऱ्या तसेच गोमूत्र देखील फार उपयुक्त असते. बाजारात मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते.\" म्हणून एका घरात एक गाय दिसून येत होती.

वास्तविक पाहायला गेलं तर मुंबईपासून किती जवळ होता तो विभाग पण मुंबईसारख्या सुविधा तिथे उपलब्ध नव्हत्या. तरी शशांक आणि निलिमाने एक आदर्श गाव निर्माण केले होते. सगळ्यांना शशांक आणि निलिमाच्या कार्याचे कौतुक वाटले.

एवढी माणसे मुंबईतून आपले गाव पाहायला आले आहेत याचे तिथल्या लोकांना फार मोठे अप्रूप वाटत होते.

गावातून थोड्या अंतरावर एक धबधबा होता. शशांक आणि निलिमा सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले. प्रचंड उत्साहात लहान होऊन धबधब्याखाली सगळे मनमुरादपणे खेळले. सगळ्यांनी भरपूर प्रमाणात फोटो काढले. मधेच ढग भरून येत असल्याने सगळीकडे धुके देखील पसरत होते. वेगवेगळ्या जातीची फुले, वेगवेगळ्या जातीचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे तिथे पाहायला मिळाली. निसर्गाच्या सानिध्यातून बाहेर पडावेसे कोणालाच वाटत नव्हते.

बरोबर पाच वाजता सगळेजण शशांकच्या घराकडे परतले. निलिमाने सगळ्यांसाठी आले घातलेला चहा बनवला. चहा पिऊन सगळ्यांना तरतरी आली. आता सर्वजण पुन्हा मुंबईला परत जाण्याची तयारी करू लागले.

निलेशने मित्रांच्या मदतीने आदिवासी बांधवांना गरजेच्या वस्तू, भेटवस्तू, खाऊ आणला होता तो शशांककडे सुपूर्द केला. पावणेदोनशे सदस्यांनी प्रत्येकी हजार रुपये जमा केले होते ते एक लाख पंचाहत्तर हजार रुपये शशांकला देण्यात आले. शशांक आणि निलिमाला सगळ्या मित्रमैत्रिणींचे प्रेम पाहून भरून आले. शशांक पैसे घेण्यासाठी तयार नव्हता पण निलेशने त्याला सांगितले की ही रक्कम तू तुझ्या गावच्या कल्याणासाठी वापर तेव्हा ते त्याने घेतले.

सगळेजण मुंबईला जाण्यासाठी निघाले तर निलिमाने प्रत्येकाला हव्या तेवढ्या रानभाज्या, ताजी वांगी, अळूची पाने, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता पिशवीत भरून दिले. प्रत्येकाला शेतातले दोन किलो तांदूळ दिले. सगळ्यांना गावची भेट खूप आवडली.

निलेश शशांकला म्हणाला, " मित्रा ! खूप छान वाटले तुझे गाव पाहून. तू आणि निलिमाने आम्हा इतक्या जणांचा खूप सुंदर आदरसत्कार केलात. तुम्हा दोघांचे कार्य पाहून आम्ही सगळे भारावून गेलो आहोत. गावामध्ये तुम्ही अनेक सुविधा निर्माण केल्या. हे कार्य म्हणजे कोणी ऐऱ्या - गैऱ्याचे काम नव्हे. तुम्ही दोघे मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे झालात पण मुंबईसारखे जीवन सोडून एका आदिवासी पाड्यात येऊन राहायचे, तिथे समाजकार्य करायचे खरोखरंच किती तुम्ही दोघांनी कष्ट उपसले असतील ? तुमच्या दोघांच्या कार्याला आमचा सलाम. असेच कार्य करण्यासाठी तुम्हाला बळ मिळो, तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना आम्हा सर्वांकडून अनेक शुभेच्छा."

निलेशचे बोलणे ऐकून शशांक आणि निलिमाला भरून आले. शशांक सगळ्या मित्रमैत्रिणींना उद्देशून म्हणाला, " तुम्ही सगळे आलात आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही दोघे आमच्या कामात व्यस्त असल्याने तुम्ही दुसरीकडे जर रियुनिअन करायचे ठरवले असते तर कदाचित आम्ही दोघे उपस्थित राहू शकलो नसतो पण तुम्ही सगळे इथे आलात, सगळ्यांना आम्ही दोघे भेटू शकलो, तुम्हा सगळ्यांबरोबर वेळ घालवू शकलो यासाठी तुम्हा सगळ्यांचेच खूप खूप आभार. तुम्ही आमच्या गावातील बांधवांना स्वेच्छेने गरजेच्या वस्तू आणल्या, त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणात खाऊ आणलात, समाजकार्यासाठी रक्कम दिलीत यासाठी आम्ही दोघे तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत.
असेच इथे सगळे येत राहा.
आज आमच्या दोघांचाही दिवस फारचं छान गेला. आम्हालाही तुम्हा सगळ्यांबरोबर एन्जॉय करता आले. शाळेचे दिवस आठवले. पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले. खरंच असा एक दिवस आपल्या आयुष्यात जरूर यावा. इथे दोन दिवसांसाठी तुमची सगळ्यांची सोय होऊ शकली नाही यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण माझ्या घराचे दार तुम्हा सर्वांसाठी कायम उघडेच असेल याची खात्री बाळगा. असेच इथे येत राहा, तुमच्या फॅमिलीला घेऊन या. आम्हा दोघांना अतिशय आनंद होईल."

सगळ्यांनाच शशांक आणि निलिमाचा निरोप घेताना भरून आले होते. जड मनाने सगळे बसमध्ये जाऊन बसले आणि बसेस मुंबईच्या दिशेने निघाल्या. प्रत्येकाने निलेशचे कौतुक केले कारण निलेशने रियुनिअनची अतिशय चोख व्यवस्था केली होती. प्रत्येक कामाचे आखणीबद्ध नियोजन केले होते.

रात्री नऊ - दहाच्या सुमारास सगळेजण आपापल्या घरी पोहचले. आपापल्या घरच्या लोकांना पूर्ण दिवसाची गंमत सांगण्यात प्रत्येकाचा वेळ गेला. नंतर बऱ्याच लोकांनी ग्रुपमध्ये आजच्या दिवसाचे फोटो शेअर केले. जे लोकं रियुनिअनसाठी येऊ शकले नव्हते ते फोटो पाहून हळहळले.

निलेश घरी येऊन फ्रेश झाला आणि तडक संजयला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला. त्याने संजयच्या तब्येतीची चौकशी केली.

ग्रुपमध्ये आज सगळेजण खुश होते. रियुनिअनच्या निमित्ताने आज सगळे एकत्र आले होते. केवळ पंचवीस - तीस सदस्य येऊ शकले नव्हते.

सामाजिक बांधिलकी जपत, एकमेकांबरोबर मैत्री जपत ग्रुप दिवसेंदिवस अधिकाधिक परिपक्व बनत होता. कोणाच्या मुलांची लग्न, कोणाच्या नातवंडांची मुंज, बारसे, पिकनिक ह्या निमित्ताने सगळे एकत्र येत होतेचं आणि ह्या त्या कारणांनी ग्रुपमध्ये रियुनिअन होतचं होते. ग्रुपमधून शाळेसाठी पण भरघोस देणगी देण्यात आली. ज्या मुलांना शिक्षणाची आवड आहे पण पैशा अभावी शिकू शकत नाही अशा मुलांसाठी ग्रुपमधील सदस्यांतर्फे शाळेला निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.

केवळ मित्रमैत्रिणींचा ग्रुप न राहता आता त्याला एक कौटुंबिक स्तर निर्माण झाला होता. इतके सुंदर मैत्रीचे बंध निर्माण झाले होते. ग्रुपमध्ये कोणालाही मदतीचा हात हवा असल्यास त्या व्यक्तीला ग्रुपमधून ताबडतोब मदत केली जाई. अशी ही मित्रमैत्रिणींची निखळ मैत्री, प्रेम दिवसेंदिवस दृढ होत चालले होते.

( समाप्त )

रियुनिअन ह्या कथेत मी अनेक सामाजिक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला ही कथा आवडेल. कथा आवडल्यास जरून अभिप्राय द्यावा ही विनंती.

सौ. नेहा उजाळे
ठाणे

🎭 Series Post

View all