Jan 23, 2022
वैचारिक

रिटायरमेंट

Read Later
रिटायरमेंट

नेहा आणि समीर चे नुकतेच लग्न झाले होते. नवलाई अजून संपली नव्हती. नव्या नात्याचे पदर हळू हळू उलगडू लागलेले..
नेहाच्या माहेरचा गोतावळा मोठा तर सासर चे चौकोनी कुटुंब. हळू हळू ती सासरी रुळायला लागली होती..  
नेहा आणि समीर सुट्टी संपवून नुकतेच कामावर रुजू झाले. एक, दोन दिवस होतात न होतात तोवर नेहाच्या सासूबाईंच्या म्हणजेच मीनाकाकूंच्या माहेरहून निरोप आला, त्यांच्या आईची तब्येत बिघडली होती..तुम्ही इथे लगेच निघून या म्हणून.

नेहा घर नीट सांभाळू शकेल की नाही याची काळजी वाटत असल्याने काकू जाण्यास तयार होत नव्हत्या. त्यात नेहाने नुकतेच ऑफिस जॉईन केले होते..तिला सुट्टी ही काढता येणार नव्हती. समीरला आणि बाबांना ही घरातील कामाची सवय नव्हती. 
पण मीना काकूंना जावे तर लागणारच होते.
नेहा ला भरमसाठ सूचना देऊन त्या जाण्यास तयार झाल्या. इतकी वर्षे स्वतः च्या मर्जीने केलेला, मांडलेला संसार चटकन नवीन सुनेच्या हाती सोपवून जाणे त्यांना नको वाटत होते.

काकू माहेरी आल्या तरी त्यांचे मन अजून आपल्या घरीच होते.. नेहा नीट घर सांभाळेल ना? झाड-लोट नीट करेल का? किराणा सामान संपत आले..मी यादी ही केली नाही...भाजी-पाला तर दर दोन दिवसांनी आणावा लागतो...
नेहा- समीर चे, यांचे ऑफिस कसे होईल मॅनेज? पाहुणे आले तर त्यांचे आदरातिथ्य नीट होईल का?
डोक्यातले विचार संपतच नव्हते त्यांच्या..

पण आज ना उद्या नेहा आणि समीर ला घरची थोडीफार जबाबदार घ्यावी लागणारच होती. मग आतापासूनच सुरुवात होऊ दे की... या विचाराने काकूंचे मन थोडे शांत झाले. त्यांनी आईच्या सेवेत स्वतः ला गुंतवून घेतले.

इकडे नेहा ला थोडे टेन्शन आले होतेच. माहेरी तर  कामाची फारशी सवय नव्हती. इथे अचानक सर्व काम एकदम अंगावर पडले. आईचे ऐकायला हवे होते. मुलीला थोडी तरी कामाची सवय हवीच.. सारखी आई ओरडत असे...
इथे सासरची पद्धत वेगळी होती..आता एकटीनेच सर्व करायचे.. सासुबाई येईपर्यंत तरी..

दुसऱ्या दिवशी नेहा गजर लावून सकाळी लवकर उठली. आवरून स्वयंपाक घरात आली तर समीर आणि बाबा दोघे ही तिथेच होते. हा सारा पसारा मांडून ठेवला होता दोघांनी... हे पाहून नेहा अगदी रडकुंडीला आली. तिला पाहताच समीरने गरम- गरम उपम्याच्या तीन डिश तयार केल्या. यू ट्यूब ला पाहून पहिल्यांदाच केलेला आणि कसानुसा झालेला नाश्ता तिघांनी हसत- खेळत संपवला. ऑफिस ची गडबड लक्षात आल्यावर मग मात्र नेहाने पटापट पसारा आवरून स्वयंपाकाची तयारी सुरू केली. समीर ने तिला भाजी चिरून दिली, झाड -लोट करायला ही जमेल तशी मदत केली. स्वयंपाक आटोपल्यावर बाबांनी सर्वांचे डबे भरले आणि मग कुठे तिघांची स्वारी ऑफिसकडे रवाना झाली.

तीन -चार दिवस असेच गेले. तसा नेहाला हळूहळू कॉन्फिडन्स येऊ लागला. मग तिघांनी मिळून जशी जमतील तशी कामे वाटून घेतली. तसा गडबड, गोंधळ थोडा कमी झाला.

शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस. पण शनिवारी बाबांनी आठवणीने तीन -चार भाज्या आणून ठेवल्या. नेहाने किराणा सामानाची यादी केली आणि सामान ऑनलाईन मागवले. त्यामुळे वेळ ही वाचला. तो वेळ तिने स्वयंपाकात सत्कारणी लावला.
'डिनर' आवडत्या हॉटेल मध्ये प्लॅन करून रविवारी मात्र तिघांनी मस्त आराम केला..

आता तिघांचे रूटीन छान सुरू झाले.

इकडे नेहाच्या सासूबाईंना मात्र चिंता लागून राहिली होती. तसे फोन वरुन त्यांना रोज इथले अपडेट्स मिळत होतेच. तरीही सून अजुन नवीन आहे आणि सगळं कसं मी आत्ता पर्यंत केलं... तसचं तिने ही करावं, अडलं नडलं मलाच विचाराव. . हा अट्टाहास मनात कुठे तरी होताच त्यांच्या.
जशी आई ची तब्येत सुधारू लागली तसे काकूंना घरचे वेध लागले. 

काकू घरी आल्यावर पाहतात तर सगळ कसं छान चालू होत...कधी ही देवा पुढे हात न जोडणारा नवरा देवपुजा करीत होता. सुट्टीच्या दिवशी तासा-तासाला चहाची ऑर्डर सोडणारा त्यांचा मुलगा स्वयंपाक घरात आपल्या बायकोला मदत करत होता. नेहाने ही घर आणि ऑफिस दोन्ही छान सांभाळले होते. थोड्या फार चुका झाल्या .. पण त्या मनावर घेण्यासारख्या नव्हत्या.

काकूंना वाटले इतकी वर्षे आपणच पुढे होऊन केलं सारं..कधी तरी 'यांच्या' खांद्यावर ही थोडं ओझं द्यायला हवं होतं.. मलाही मदत झाली असती..
मात्र आता त्यांनी आनंदाने मनोमन सारा संसार मुलाच्या आणि सुनेच्या हाती सोपवला. खूप केले आपण घरासाठी... फक्त नोकरी नाही केली. इतकेच काय ते राहून गेले...हा विचारच कधी केला नाही. घर आणि नोकरी सांभाळणे तारेवरची कसरत म्हणतात ना..मी ही अनुभवले असते.

आता मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे संसार करू दे....निर्णय घेऊ दे.. आपण आहोतच की. त्यांचे चुकेल तिथे समजावू, प्रसंगी कान ही धरू.. आणि अडेल तिथे मदत करू.. आपल्याच सूनेवर अविश्वास दाखवणे बरे नाही तसेच अपेक्षा लादणे ही बरे नाहीच..
त्यापेक्षा सुनेची छान 'मैत्रीण' होण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील....आणि...
या वयात थोडी 'रिटायरमेंट' तो बनती ही है...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now