Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आईची रिटायरमेंट

Read Later
आईची रिटायरमेंट


आईची रिटायरमेंट


"पूजा, एक ग्लास पाणी आण गं .." ऑफिसमधून थकूनभागून आलेला हर्षल आपल्या बहिणीला आवाज देत म्हणाला.

त्याचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरचं पाण्याचा ग्लास त्याला हातात मिळाला. सोफ्यावर बसलेल्या हर्षल ने पाहिले की, पाणी पूजाने न आणता त्याच्या आईने आणलेले होते.
आईचे मायेने भरलेले डोळे पाहत, हर्षल आईने आणलेले पाणी प्यायला व त्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आईच्या चेहऱ्यावरही समाधान झळकले.
पूजा आपल्या दादाला पाणी देणारच होती पण ती हातातील काम सोडून उठेपर्यंत , आईने हर्षलला पाणी दिले.
बहिणी ,पत्नी या सर्व नात्यांचे प्रेम तर मिळतचं असते, बहिणीही भावाची काळजी घेत असतात आणि पत्नी तर आपले कर्तव्य पार पाडत असते. पण आईचे प्रेम खूप वेगळे असते.. आपल्या मुलांच्या मनातील ठाव घेत असते. त्यांना काय हवे असते हे ते सांगण्याच्या अगोदर आईला सर्व समजत असते.
आई काम करून कितीही थकलेली असली तरी, मुलांसाठी काम करायला नेहमी तयार असते.

"आई, तू आमच्यासाठी व आपल्या घरासाठी किती कष्ट करत राहते. तुझे कष्ट पाहून मला खूप वाईट वाटते. तुझे कष्ट थोडे कमी करू या हेतूने मी पूजाला घरातील छोटी मोठी कामे सांगत असतो. तेवढाचं तुला आराम मिळावा म्हणून."
हर्षल आईला म्हणाला .

"गृहिणी म्हटले की कामे करावीच लागतात. आणि तुझ्या बाबांच्या पगारात घरखर्च पूर्ण होत नव्हता म्हणून मला स्वयंपाकाचे काम करावे लागले. लोकांनाही माझ्या हातचे जेवण आवडत होते आणि आपल्यालाही पैसे मिळत होते. त्यामुळेच तर तुमच्या तिघांचे शिक्षण चांगले होऊ शकले.शिक्षण करून तू चांगल्या नोकरीला लागला. हेचं तर माझ्या कष्टाचे फळ आहे !
आता तू कमवायला लागला म्हणून तू मला स्वयंपाकाचे काम बंद करायला सांगितले. आता तर फक्त घरातील कामेच करते मी. पूजाची होते मदत मला. पण तिलाही अभ्यास,कॉलेज असते. शक्य होईल तेवढे करते ती काम आणि लग्न झाल्यावर तिला कामे करावीच लागणार म्हणून मी तिला जास्त काम नाही सांगत.
मला कामांचे काही वाटत नाही, फक्त माझी मुले सुखात रहावी एवढेचं नेहमी वाटत असते.."
आई हर्षलला म्हणाली.

हर्षल आपल्या आईचे कष्टमय जीवन पाहत लहानाचा मोठा झाला होता. त्याला आईच्या कष्टांची जाणीव होती. आपल्या आईला सुख देण्याचा,आनंद देण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असायचा. आईला मदत करण्याचे बहीणभावाला सांगायचा आणि स्वतः ही मदत करायचा.

आपल्या मुलांना आपल्या कष्टांची जाणीव आहे आणि ते त्यांच्या परीने आपल्याला मदतही करतात, हे पाहून आई आपले कष्ट विसरून आनंदी होत असे.
आईला स्वयंपाकात व इतर कामात मदत करणाऱ्या पूजाचे लग्न होऊन ती सासरी गेली. त्यामुळे आईला अगोदर मिळणारी विश्रांती आता मिळत नव्हती. तिचे आपले अगोदरचे रूटीन पुन्हा सुरू झाले होते.

हर्षलचेही लग्नाचे वय झाल्यामुळे त्याचे लग्न करण्याचे आईबाबांनी ठरवले.
लग्नामुळे आपल्याला जीवनसाथी तर मिळेलच पण आईलाही कामातून विश्रांती मिळेल , या विचाराने हर्षलला आनंद झाला.

हर्षलला त्याच्या मनासारखी बायको मिळाल्याने तो खूश होता.
हर्षलची बायको प्रिया खूप चांगली होती. घरातील कामे करून ती नोकरी करत होती. तिच्या येण्याने सासूबाईंना खरचं खूप बरे वाटत होते. त्या अनेक कामातून रिटायर्ड झाल्या होत्या.

हर्षलवर आपला मुलगा म्हणून जेवढा हक्क आहे,तेवढाच प्रियाचाही हर्षलवर जोडीदार म्हणून हक्क आहे.हे त्यांनी समजून घेतले होते.हर्षलचे लग्न झाले म्हणजे आपले आई-मुलाचे प्रेम कमी नाही झाले. आई व मुलाचे प्रेम कधीही कमी होत नाही. लग्नाअगोदर हर्षलची जी छोटी मोठी कामे आपण करत होतो ,आता ती प्रिया करते आणि तो तिचा अधिकारच आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.
आपला हर्षल त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहेच आणि आपल्याशीही पूर्वीसारखा छान बोलतो,वागतो,आपली काळजी घेतो. त्याला जे हवे असते ते हक्काने आपल्याला सांगतो आणि मी त्याच्या साठी त्याच्या आवडीचे काही बनविले तर तेवढ्याच आवडीने खातो. मगं आपल्याला अजून काय हवे ? त्याच्या वागण्यात काही फरक नाही वाटत. मगं आपणही का त्याच्या सांसारिक जीवनात जास्तीचा हस्तक्षेप करावा.
काही गोष्टी आपण
स्वतः हूनचं समजून घेतल्या तर आपलाही मान,सन्मान राहतो आणि नातेही टिकून राहते.

एक दोन वर्षांनी हर्षलच्या लहान भावाचे लग्न झाले. आईला अजून एक सून आली. देवाच्या कृपेने समजूतदार सासूबाईंना दोघीही सूना चांगल्याच मिळाल्या होत्या.
घराची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याने व सूना नोकरी करणाऱ्या होत्या त्यामुळे घरातील कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी त्यांनी घरकामासाठी बाई लावली होती.
दोघीही सूना नोकरी व घरातील आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळीत होत्या. कोणाबद्दलही कसलीही तक्रार नव्हती.
घरातील कामे आईच्या वाटेला कधी येतचं नव्हते. आईचे सुखी आयुष्य पाहून हर्षलला खूप आनंद होत होता. आयुष्यात आईने आतापर्यंत खूप कष्ट केले पण आता ती सर्व जबाबदारीतून मुक्त झाली आहे, याचे हर्षलला समाधान वाटत होते.

"आई, तुझे जे स्वयंपाकाचे काम होते , त्यातून तर अगोदरचं रिटायर्ड झाली होती. पण आता घरातील सर्व कामातून तू रिटायर्ड झाली आहेस. तू तुझे जीवन आता आनंदाने जग. "
हर्षल आईला म्हणाला.

" माझ्या दोन्ही सूना खरचं खूप चांगल्या आहेत. मला घरात काही काम करू देत नाही. मी आरामच करते.मी खरचं खूप आनंदी आहे. पण मला काम करण्याची सवय असल्याने ,हे कामाविना जगणे नकोसे वाटायला लागले आहे. सासू झाली म्हणून सर्व कामांचा बोझा सूनांवर टाकायचा का? मुलांच्या सांसारिक आयुष्यात जास्त दखल न देता , सासू म्हणून व आई म्हणून मी आपले काम करीत राहणार. शरीराला काहीतरी कामाची सवय असावीच , काम केल्याने शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहते.
काही कामांतून तुम्ही मला रिटायरमेंट दिली असली तरी, घरातील लोकांची काळजी घेणं, त्यांच्या आवडीनिवडी जपणं,त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं,त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं या सर्व गोष्टींतून तर कधीच रिटायर्ड होता येत नाही ना! आयुष्य आहे तोपर्यंत या सर्व गोष्टी आहेतचं.
नोकरीवरून रिटायर्ड झाल्यावर व्यक्तीचे कामाला जाणे बंद होते, पण नोकरीच्या सर्व आठवणी,तेथील लोकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध ,भावभावना हे कसे विसरू शकतो!ते तर आयुष्यभर जपून ठेवतो. शरीराने रिटायर्ड झालेलो असलो तरी मनाने कधीच रिटायर्ड होत नाही.
गृहिणी म्हणून ,आई म्हणून प्रत्येक स्त्री विना मोबदला आयुष्यभर काम करीत असते. कालांतराने शारीरिक, कौटुंबिक परिस्थितीमुळे ती काही कामांतून स्वतः हून रिटायर्ड होते किंवा तिला रिटायर्ड केले जाते. पण नाते,भावना या गोष्टीतून ती कधीही रिटायर्ड होत नाही. आईची रिटायरमेंट कधी होतचं नसते. "

हर्षलची आई हर्षलला समजावत म्हणाली.

काही वर्षांनी हर्षलच्या आईला आपल्या नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी मिळते व ती आनंदाने पार पाडत असते.
आपल्या नातवंडांमध्ये रमलेल्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान पाहून हर्षलला खूप चांगले वाटते आणि \"आईची रिटायरमेंट\" या आपल्या विचारावर त्याला हसूही येते.


समाप्त

नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//