रिटायरमेंट आईची.

.


"किती वाजलेत बघ, अजून तुझी सून उठली नाही, घरात सासू आहे, चार - आठ दिवसांकरता पाहुणी म्हणून आलेली मावससासू आहे, काही धरबंध आहे की नाही ?" शैलाताई आपल्या बहिणीचे सुजाताचे कान भरण्याचा प्रयत्न करत होत्या.

"अग आज सुट्टी आहे म्हणून, रोज उठतेच ती" सुजाताने बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

"फार लाडावून ठेवू नकोस, मीरे वाटेल तेव्हा माझे शब्द आठवतील, आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आपल्या बहिणीवर शैलाताई चांगल्याच वैतागल्या.

शैला आणि सुजाता मावस बहीणी, काही महिन्यांपूर्वी सुजाताच्या एकुलत्या एक मुलाचे अनयचे लव्हमॅरेज झाले होते, आपल्या सूनेशी कसं वागावं हा कानमंत्र बहिणीला देण्यासाठी,  शैलाताई खास आल्या होत्या.

पण "गुडमॉर्निंग" म्हणत रुची तिथे आल्यामुळे त्यांना बोलणं नाइलाजाने थांबवावं लागलं.

"सुट्टीच्या दिवशी सुद्धा घरात रहाता येत नाही का ?" संध्याकाळी अनय आणि रूचीला घाईघाईने बाहेर पडताना पाहून शैलाताई परत सुरू झाल्या.

"काही वस्तू आणायच्या आहेत मीच पाठवलं त्यांना, त्याचं काय आहे ताई, मला हल्ली एकटीने जमत नाही, आणि रुची ऑफर बघून, इस पे ये फ्री वैगरे बघून बरोबर घेवून येते".

"हो ना ! आणि त्यानिमित्ताने बाहेर भटकता येत, कामं टाळता येतात, कधी समज येणार तुला, तू आपली बसं कामं करत, ती गोड बोलून तुला नाचवत आहे. भाऊजींच्या पश्च्यात अनयला काही कमी पडू नये झटलीस, नोकरी सांभाळून सासूबाईंच सोवळओवळ सांभाळलस, सगळ्यांच सगळ केलेस, आता आराम कर बाई. नोकरीतून रिटायर झालीस तशी सांसारिक रिटायरमेंटही घे, मी जसं खडसावून सांगून टाकल माझ्या सुनांना तसचं तूही सांग, आता मी काही करणार नाही, तुझा संसार तू सांभाळ."

"रिटायरमेंट घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं ताई ? कामावरून दमूनभागून आलेल्या आपल्या सुनेला वेठीस धरायचं, काही काम न करता ऑर्डर्स सोडायच्या. जो जाच आपल्याला झाला तोच त्यांना करायचा, आपल्या मुलींच्या सासरी असं कोणी वागल की त्यांना नावं ठेवायची आणि आपणही तसचं वागायचं."

"तू असं वागून काय साध्य झालं ? तुझी मोठी सून लग्नानंतर वर्षभरातच वेगळी झाली,  धाकट्या मुलाने मोठा ब्लॉक घेतला पण तो तिथे तुम्हाला दोघांना न्यायला तयार नाही, चार दिवस झाले इथे आहेस एकाचा तरी फोन आला का तुला ?"

वर्मी घाव बसल्यागत शैलाताई गप्प झाल्या तरी ताईच्या सारख्या भुणभुण करण्याला वैतागलेली, तीचा लावालावी करण्याचा स्वभाव चांगला ठावूक असलेली सुजाता हे सगळं लवकर थांबायला पाहिजे ह्या हेतूने न थांबता पुढे बोलू लागली.

"म्हंटल तर मी रिटायर्ड आहे, म्हंटल तर नाही, म्हंटल तर हा संसार माझा आहे, म्हंटला तर रुची आणि अनयचा."

"दोन महिन्यापूर्वी पंधरा दिवस राजस्थान फिरून आले, पुढच्या महिन्यात शेगावला जाणार, जवाबदारी अशी काही नाही माझ्यावर. मान्य आहे रुची फारसं काही करत नाही पण मलाही काही करू देत नाही. दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाला, वरकामाला सगळ्याला बाई लावली आहे तीने, कपड्यांच्या घड्या घालणे, भांडी लावणे, कूट करणे अशी छोटीमोठी कामं मी माझा वेळ जातो, सारखा टीव्ही बघून कंटाळा येतो म्हणून स्वतःहून करते, भाजी आणायला जरा पाय मोकळे होतात, बरे वाटते म्हणून जाते."

"मी माझा संसार काटकसरीने केला म्हणून सुनेनेपण करावा ही अपेक्षा करण म्हणजे निव्वळ मूर्खपणा नाही का ? त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, खर्च करायची मानसिकता नव्हती, मुलं आपल्या मानाने आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, बक्कळ कमवत आहेत, करू दे की त्यांना खर्च, मी असं केलं, तसं केलं, तुम्हीही तसचं वागा, करा हा अट्टाहास कशाला ? करू दे त्यांना आपला संसार मनासारखा ."

"आणि मुख्य म्हणजे असं बोलून, ठरवून आपल्या संसारातून रिटायर्ड थोडीच होता येत ? मोह असतोच ना ग. पै पै करत जमवलेल्या संसाराचा, घरातल्या प्रत्येक गोष्टीचा. जाहीररीत्या रिटायरमेंट जरी घेणं जमलं नसलं तरी मला, तरी सुनेच्या राज्यात जास्त हस्तक्षेप न करता थोडस अलिप्त रहायचा प्रयत्न नक्कीच करते, अडलंनडलं तर जमेल तशी मदत करते, चुकलं तीच आवर्जून सांगते पण असचं वागल पाहिजे अशी सक्ती नाही, थोडं ती समजून घेते तर थोडं मी, त्यामुळेच तर गोडवा अजून तरी टिकून आहे."


शैलाताईंना सुजाताचे म्हणणे रुचले नाही सुजाताशी बोलून काही उपयोग नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला मोर्चा रुचीकडे वळवला, तीला एकांतात गाठून काहीबाही सांगण्याचा, सासुबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करू लागल्या, मोठ्या कंपनीत, चांगल्या पोस्टवर असणाऱ्या रूचीला वेळ कुठे होता ह्या सगळ्या कागाळ्या करायला, आणि मुख्य म्हणजे ती आपल्या सासूचा स्पष्टव्यक्ता स्वभाव चांगली ओळखून होती, अनयला कुठल्या परिस्थितीत इंजिनिअर केलं याची जाणं होती, सासूबाई जे बोलायचं ते तोंडावर बोलतील आपल्या माघारी कधीच नाही हे माहीत असल्याने, काही दिवसातच शैला मावशीला चांगल ओळखल्याने तीने त्यांच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही.

मोठी बहीण, अवघड जागेच दुखणं त्यामुळे एकदम तोडून टाकता येत नसलं तरी सुजाता शैलाताईला टाळू लागली, रुची तर अधीपासूनच मावस सासूपासून चार हात दूर राहत होती. ह्या सासुसूनांमध्ये आपण भांडण लावू शकणार नाही, आपला इथे यायचा हेतू सफल झाला नाही हे लक्षात येताच अजून अपमान करून घेण्यापेक्षा आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय शैलाताईंनी घेतला व अनयला दुसऱ्या दिवशीचे परतीचे रिझर्व्हेशन करायला लावले.

शैलाताईला निरोप देताना सगळ्यांनाच हायसे वाटले, तीने आणलेले रिटायरमेंट नावाचे वादळ आल्यापावली कुठलीही हानी न पोहोचवता परत गेल्याने मनोमन देवाचे आभार मानत सुटलो बुवा म्हणत सुजताने सुटकेचा निःश्वास सोडला.

©️®️मृणाल महेश शिंपी.
24.12.202