रिटायर्डमेंट - पोरकेपण की विसावा?

रिटाययर्ड मेंट ला पोरकेपण ठरवावे की विसावा हा तिढा आपल्यालाच सोडवावा लागतो, कारण कुटुंबातील माणसे ही आपलीच आणि नाती ही आपलीच. हाच एक विचार करण्यासारखा मुद्दा मी या लघुकथेतून मांडला आहे.
"पराग बाळा एवढा चष्मा ऑप्टिक वर्ल्ड मधून दुरुस्त करून आणशील का रे? " प्रतापराव आपल्या मुलाला (परागला) विचारत होते.

" अहो बाबा ,तुम्हाला तुमचा चष्मा नीट सांभाळता येत नाही का ? तुम्ही आता रिटायर्ड झालात, जरा काटकसर करा!वस्तू नीट वापरा. एका पगाराची आवक आता बंद झाली आहे, हे लक्षात ठेवा!!" पराग हसत हसत त्यांना म्हणाला.

      प्रतापरावांना जरा वाईटच वाटलं. कारण ज्या परागला उच्चशिक्षित बनवण्यासाठी त्यांनी स्वतः आजपर्यंत मनासारखे महागडे काहीच खरेदी केले नव्हते ,तोच आज त्यांना काटकसरीची भाषा वापरत होता.
 
       दुपारी जेवणाची वेळ झाली. मेथीची भाजी ताटात पाहून प्रतापराव नाराजच झाले, तेव्हा त्यांच्या सौभाग्यवती वैजयंती ताई म्हणाल्या,
" अहो आता तुम्ही रिटायर्ड झालात .आता तरी असे खायचे चोचले बंद करा आणि पुढ्यात जे वाढले जाईल ते खाणे पसंत करा." 

 जेवण उरकत असतानाच प्रसाद (प्रतापरावांचा नातू ) म्हणाला ,"आजोबा मी आता 12 वी ला प्रवेश घेतलाय पण वोकेशनल विषय काय घेऊ हे मला कळत नाहीये .यामध्ये हिंदी ,मराठी, संस्कृत आयटी असे विषय आहेत, काय करू?"

तेवढ्यात निधी ( प्रतापरावांची नात )उपहासाने म्हणाली ,"हा.. हा ..हा ..अरे, आजोबा आता रिटायर्ड झालेत. त्यांना यातलं काही माहिती नसेल. तू पण ना, एखाद्या जाणकाराला विचारायचं सोडून आजोबांना काय विचारतोयस?" 

प्रतापराव मनोमन दुखावले.आपण रिटायर्ड नव्हे, तर पोरकेच जास्त झालोय, असे त्यांना तीव्रतेने जाणवायला लागले.

     नोकरीवर असताना घरातील मंडळी प्रतापरावांना जो आदर ,मोठेपणा द्यायची, तो आदर आता रिटायर्ड झाल्यावर त्यांना कुठे दिसत नव्हता. त्यांना घरातील मंडळी कुठल्याही निर्णयात सहभागी करून घेत नव्हती आणि याच गोष्टीचा त्यांना खूप त्रास होत होता. त्यानंतर चार-पाच दिवस प्रतापराव खोली बाहेर फक्त जेवण करण्यासाठी आले .त्यांना प्रचंड तणावग्रस्त, उदास वाटत होते. त्या चार-पाच दिवसांत घरातील शेंडेफळ वरुण मात्र प्रचंड उदास होता, हे त्याचे आई-वडील सुनिधी व पराग यांना लक्षात आले. कारण वरुण व प्रतापराव हे दिवसभर गप्पा, वेगवेगळे प्रयोग, खेळ यात दंग असायचे. पण प्रतापराव आजारी असल्यापासून त्याचे खेळणे बागडणे बंद झाले होते. तो उदास राहायला लागला होता. घरालगतच्या कुंपणातील झाडेही सुकून गेली होती,कारण आजतागायत त्यांची देखभाल करण्यात प्रतापरावांनी कधीच कसर सोडली नव्हती.घरातील नोकरांचे पगार वाटपही अजून झालेच नव्हते ,कारण परागला याबद्दल काहीच माहीत नव्हते. नित्यनियमाने महिन्याच्या एक तारखेला सर्व नोकरांचे पाकीट प्रतापराव नेहमी तयार ठेवत असत .दोन-तीन दिवसांपासून प्रतापराव जॉगिंगलाही जात नव्हते, त्यामुळे त्यांचा प्रिय मित्र सुधीर उदास मनाने एकटाच जॉगिंगला जात होता.

            या सर्व गोष्टी पराग अनुभवत होता ,पाहत होता व आपल्या कडून काय चूक झाली आहे हे परागच्या लक्षात आले. पराग प्रतापरावांच्या खोलीत गेला व म्हणाला,

"बाबा, तुमची तब्येत बरी आहे ना आता?"
"हो."
"मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं बोलू का?"
"अरे विचारतोस काय ?मी आता बरा आहे, बोल काय म्हणतोस?"
"बाबा त्यादिवशी नकळतपणे मी तुम्हाला चष्म्यावरून उपहासात्मक बोललो त्याबद्दल मला क्षमा करा. बाबा तुम्ही रिटायर्ड फक्त तुमच्या कार्यालयीन कामांमधून झालात.आपल्या हसत्या- खेळत्या कुटुंबात केवळ आणि केवळ तुम्हीच ऊर्जा,आनंद, उत्साह टिकवून ठेऊ शकता हे मला आज समजले आहे. आम्हा सर्वांना तुम्ही आधी ही आणि आताही अगदी तसेच पण रुबाबदार ,तडफदार बाबा हवे आहात. बाबा ,यापुढे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, पण उदास होऊन असे खोलीत एकटेच बसू नका. आम्हाला कृपया क्षणभरासाठीही पोरके करू नका."
आणि परागला अश्रू अनावर झाले.

त्यावर प्रतापराव म्हणाले,
"अरे पराग, शांत हो बाळा .मी उगाचच घरातील प्रत्येक गोष्टींमध्ये मला तुम्ही सामील करून घ्यावं ही अपेक्षा करत होतो. खरंतर रिटायर्डमेंट म्हणजे विसावा नाही का? मग आता मी ठरवलय मला जे आवडतं,त्यातून रिटायर्डमेंट घ्यायची नाही. काही इतर कामे ,जबाबदाऱ्या घरातील सदस्यांवर सोपवून आपण स्वतः विसावा घ्यायचा. रिटायर्डमेंट नंतर मला विसावा खरच हवाय."असे बोलून प्रतापरावांनी परागला दिलासा दिला आणि ते परत खरच रिटायर्डमेंट म्हणजे पोरकेपण की विसावा या पेचात गुरफटले. तोपर्यंत पराग तिथून निघून गेला होता.  

 शेवटी त्यांनी स्वतःच स्वतःला समजावल की खरंच प्रत्येक गोष्टीत मी स्वारस्य घेणे हे आता योग्य नाही किंवा इतरांकडून तशी अपेक्षाही मी ठेवू नये.कारण त्यामुळे मलाच त्रास होतोय आणि मी जणू पोरका झालोय असे मला वाटू लागले आहे. तेवढ्यात त्यांची पत्नी वैजयंती ताई त्यांना हाक मारत म्हणाल्या, 

"अहो साहेब, तुमच्या आवडीची शेवग्याच्या शेंगांची  भाजी केली आहे, आमची लाडकी स्वारी येतेय ना जेवायला?."

      तेव्हा प्रतापरावांना पुनश्च जाणीव झाली की रिटायर्डमेंट हे पोरकेपण समजावे की विसावा हा पेच किंवा तिढा आपल्यालाच सोडवावा लागतो. शेवटी माणसंही आपली आणि नातीही आपलीच. असा विचार करून ते जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये आले व त्यांची सर्व लहान-मोठी नातवंडे त्यांना प्रेमाने बिलगली आणि त्यांच्या उदास मनाने उत्साहाने नवी भरारी घेतली व आनंदाने त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

समाप्त..

कथा आवडली असेल तर नक्की कळवा.
धन्यवाद!!