जबाबदारी ( भाग १)

About Education

संध्याकाळची वेळ होती. रोजप्रमाणे मीरा घरी एकटीच होती. रोजची चहाची सवय म्हणून चहा पिण्यासाठी मस्त वाफाळलेला चहा कपात ओततच होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.चहा ओतून होताच ती पटकन दरवाजा उघडायला गेली. पाहते तर काय ?

दारात तिची मैत्रीण नीता हसतमुखाने उभी होती. तिच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. मीराला पाहताच तिने मीराला मिठीच मारली.
मीरालाही कळत नव्हते आज नीताच्या एवढ्या आनंदाचे कारण काय ?

मीराने नीताचे छान हसतमुखाने स्वागत केले आणि म्हणाली, " आज एवढे चांगले सरप्राईज ! काही मेसेज नाही, फोन नाही? आणि पेढे ? काही विशेष गुड न्यूज वगैरे का ? "

मीराने मुद्दाम आपल्या मैत्रीणीची गंमत केली.

नीता - " मीरा....मीरा काय सांगू तुला ? आज मी खूप खुश आहे आणि ते मला शब्दांत पण व्यक्त करता येत नाही . "

मीरा - " हो हो... ते दिसतेचं आहे तुझ्या वागण्यातून ... आनंद एकदम ओसंडून वाहत आहे ..."


नीता - " अगं कारण पण तसेच आहे . तू ऐकशील तर तू पण आनंदाने वेडीचं होशील ..."

मीरा - " तुला माहित आहे ना ? माझ्यात पेशन्स खूप कमी असतो ते.. कोणतीही गोष्ट मला लगेच कळायला हवी आणि नाही कळाली तर मनाला हुरहूर लागते.

आता सांगते का लवकर काय गुड न्यूज आहे ती? माझा पेशन्स संपत चालला आहे आता..."


नीता - " अगं , आपला पार्थ NIIT परिक्षा पास झाला बरं आणि नुसता पास नाही तर चांगल्या रँकने पास झाला. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन पक्की समज.."


मीरा- " अरे वा ! मस्तचं! शब्दच नाही पार्थचे कौतुक करायला ...त्याचे अगदी मनापासून अभिनंदन ... नुसते पेढे देवून नाही चालणार हं ... जंगी पार्टी हवी आता.."

नीता - "आता पेढे खाऊन तोंड गोड कर .. पार्टी तर देईनच ...तू मागीतली नसती तरी.."

मीरा - "ही बातमी ऐकून मलाच इतका आनंद होत आहे .. तुला ,जिजाजींना आणि पार्थला ही किती आनंद झाला असेल ना ?
आणि तो का नाही आला मावशीला पेढे द्यायला?"

नीता - " अगं,रिझल्ट कळाला आणि मी मंदिरात पेढे घेऊन दर्शनासाठी गेले.वाटेत तुझे घर येते म्हणून तुझ्यासाठी पेढे घेऊन आनंदाची बातमी द्यायला आली. पार्थ त्याच्या मित्रांशी फोनवर बिझी आणि तुझे जिजाजी नातेवाईक, मित्रमंडळींना फोनवरून आनंदाची बातमी सांगत आहे.ते दोघेही खूप खुष आहेत.

पार्थच्या या यशामुळे आम्ही आज खरचं खूप धन्य झालो...
पार्थ हुशार आहेच पण मेहनती ही खूप आहे. आज त्याच्या कष्टाचे छान फळ मिळाले त्याला."

मीरा - "पार्थ तर अगोदरपासून हुशार, मेहनती आहे.
पण तू आणि जिजाजींनी ही खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी. त्याला अभ्यासाचे जे जे हवे ते आणून दिले. त्याला अभ्यासात काही त्रास होऊ नये म्हणून घरात तसे वातावरण ठेवले. स्वतः साठी होणारा खर्च कमी करून त्याच्यासाठी चांगले क्लासेस लावले. त्याचे खाणेपिणे, आरोग्य याकडे लक्ष दिले.व्यवस्थित काळजी घेतली. मानसिक बळ दिले.
त्याने ही व्यवस्थित अभ्यास केला पण तुमची साथही त्याच्यासाठी मोलाची होती ना ? "

नीता - "आम्ही तर आईवडील म्हणून आमचे कर्तव्य पार पाडले गं ...आमच्या परीने जेवढे करायचे तेवढे केले गं...
हो ,तसा थोडासा त्रास झाला ...यांच्या नोकरीवर सर्व अवलंबून आहे. पगार ही खूप नाही.त्यामुळे बाकी खर्चात काटकसर करून पार्थचे शिक्षण करत आहोत.जर त्याला चांगले गुण नसते मिळाले तर ...प्रायव्हेट कॉलेजला त्याचे ऍडमिशन घेणे आमच्या साठी शक्य नसते. आणि त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असते. आमच्या कडे इतका पैसाही नाही, ना कोठे वशिला ना कोण्या बड्या व्यक्तिचा वरदहस्त आमच्यावर . त्यामुळे जे पण करायचे ,मिळवायचे ते स्वकष्टाने आणि चांगल्या मार्गाने. जो काही त्रास होतो तो आम्ही सर्व आनंदाने सहन करीत असतो.
त्याचे व्यवस्थित सर्व सेट झाले की करू मग आम्ही हौसमौज..
त्याच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे होते .. त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार होते हे वर्ष.
त्याने 8 वीत असतानाच डॉक्टर होण्याचे ठरविले होते. आम्ही त्याला काही फोर्स वगैरे नाही केला. त्याने त्याचे त्याचे ठरविले. तो हुशार, अभ्यासू आणि मेहनती आहे त्यामुळे आम्ही पण त्याच्या निर्णयाला संमती देत त्याला पाठबळ दिले."

मीरा - "बरोबर आहे गं तुझे. मुले हुशार आणि अभ्यासू असली की आईवडिलांना ही बरे वाटते. मुलांना मिळालेले यश पाहून आईवडिलांना ही आनंद होतोच ना! मुलांचे नेहमी चांगले व्हावे, त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत राहतात."

नीता - " हो,ते तर आहेचं म्हणा. "

मीरा - "तुझ्या पार्थप्रमाणे नसतात गं सर्व मुले. स्वतः हून कधी अभ्यास करीत नाही. आईवडिलांनी अभ्यास करायला सांगितले तर चिडचिड करतात. आईवडील आपल्या चांगल्यासाठी सांगतात हे त्यांना कळतच नाही आणि कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

नीता - "याबाबतीत आमचा पार्थ खुप समजदार आहे गं. त्याला घरातील परिस्थितीची जाणीव आहे. आपले आईवडील आपल्यावर किती प्रेम करतात ? आपल्या सुखासाठी किती त्रास सहन करतात ? हे सर्व त्याला समजते. तो ही परिस्थितीची जाणीव ठेवून वागत असतो. तो कोणत्याही गोष्टीसाठी हट्टही करीत नाही. आम्हांलाही वाईट वाटते .
मग आम्हीचं त्याच्या आवडीची गोष्ट घेऊन त्याला कधीकधी सरप्राईज देत असतो.
खुश होऊन जातो तो."

मीरा - "तुम्ही खरचं भाग्यवान आईवडील आहेत गं.. पार्थसारखा हुशार, अभ्यासू,समजदार मुलाचे आईवडील आहात तुम्ही..

मी अनेक ठिकाणी पाहते किंवा ऐकायला येते.
मुले आईवडिलांना म्हणतात,'सर्वच आईवडील आपल्या मुलांसाठी हे सर्व करतात. तुम्हीच नाही करत फक्त . तुमचे कर्तव्यच आहे.'
हे सर्व ऐकून आईवडिलांना किती त्रास होत असेल ? मला तर खूप राग येतो अशा मुलांचा."

नीता - "सर्वच ठिकाणी सारखी परिस्थिती नसते. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. आईवडिलांच्या आपल्या मुलांकडून आणि मुलांच्या आपल्या आईवडिलांकडून अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग प्रॉब्लेम्स सुरू होतात .
प्रत्येक जण म्हणतो ,माझेच बरोबर
समजून घ्यायला कोणीही तयार नसते."

मीरा - "आईवडील गरीब असो की श्रीमंत असो ..ते आपल्या मुलांच्या सुखाचाच विचार करीत असतात.
गरीब आईवडील पैशाअभावी आपल्या मुलांना अनेक सुखसुविधा देवू शकत नाही म्हणून त्यांना वाईट वाटते.
तर श्रीमंत आईवडीलांना वाटते आपण एवढे सर्व सुख देवूनही मुले चांगली वागत नाही त्यामुळे त्यांना त्रास होत असतो."

नीता - " किती विचार करते गं तू .."

मीरा - " मी अशीच आहे ..खूप विचार करणारी..
अगं, आपण बोलण्यातचं किती रमलो ना? मी चहा करून आणते आपल्या दोघींसाठी.."

मीरा आणि नीताने चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेता घेता इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.

नीता - "मीरा, चहा घ्यावा तर फक्त तुझ्या हाताचा !
काय मस्त चहा असतो तुझा ! तुझ्या चहाची टेस्ट काही औरच!
मी कितीही प्रयत्न केला तरी मला तुझ्यासारखा चहा जमतच नाही."


मीरा - " पुरे ..पुरे..गं बाई किती कौतुक करते चहाचे ! साधा चहाच तर आहे ...."


नीता - "चांगल्या गोष्टीचे कौतुक तर करायला हवे ना ?

बरं जाऊ दे ...
तुझ्या ध्रुवचा अभ्यास कसा सुरु आहे ? दहावीला आहे ना तो ?"

मीरा - "थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट ... मॅडम .

ध्रुवचा अभ्यास सुरू आहे .
कोचिंग क्लासेसला जातो. घरीही करतो.
आता क्लासलाच गेला आहे . येईनच आता तो."

नीता - "तुझा ध्रुवही हुशार आहे तुझ्यासारखा ."

दोघांचे बोलणे सुरूच होते तेवढ्यात ध्रुव आला.

ध्रुव - " हॅलो मावशी, कशा आहात तुम्ही ?"

नीता - " मी मजेत आणि हा पेढा घे . पार्थ NIIT परीक्षा चांगल्या रँकने पास झाला त्याबद्दल."

ध्रुव - "अरे वा ! मावशी.. छानचं झाले ..
पार्थ दादाला काँग्रेच्युलेशन्स सांगा माझ्याकडून."

नीता - " हो ,सांगते ... आणि एक दिवस या सर्व तुम्ही माझ्या घरी ...पार्टी करु मस्त.."

ध्रुव - "येऊ नक्की."

नीता - "तुझा अभ्यास कसा सुरु आहे ?"

ध्रुव - " छान सुरू आहे ."

नीता - "गुड बेटा, असाच अभ्यास करं आणि चांगले यश मिळव ."

ध्रुव - " हो, मावशी नक्कीच."

नीता - "मीरा, घरी ते दोघे माझी वाट पाहत असतील गं . तुझ्याकडे आली की लवकर घरी जातच नाही. कितीही गप्पा मारल्या तरी पोट भरत नाही. चल जाते आता . "

मीरा - " बस गं थोडा वेळ,बरे वाटते तुझ्याशी बोलून ,किती दिवसांनी आली आहे."

नीता - " खूप उशीर झाला आहे. निघते मी .
तुम्हीच या आता माझ्या घरी."

नीता निघून गेल्यावर ध्रुव फ्रेश होऊन खेळण्यासाठी बाहेर गेला आणि मीरा स्वयंपाकाच्या तयारीसाठी किचनमध्ये गेली.


क्रमशः

नलिनी बहाळकर