Feb 22, 2024
जलद लेखन

कर्तव्य..भाग ४ (अंतिम भाग)

Read Later
कर्तव्य..भाग ४ (अंतिम भाग)

            रश्मीने जीप थांबवली. सुगंधाच्या बहिणीला भेटून बाहेर आल्यावर ती एका वडापावच्या गाडीजवळ थांबली होती. दोन घास पोटात ढकलून ती पुढे निघाली. तिच्या डोक्यातील विचारचक्र थांबत नव्हतं. साडेनऊ वाजता ती निघाली. अर्ध्या तासाच्या अंतरावर ते लोकेशन होतं. इथे ती याआधी कधी आलेली नव्हती.आताही एकटीच येणार आहे असं निदान त्या दोघांना वाटत होतं. तिने जीप त्या गार्डनसमोर थांबवली. गार्डन कसलं, ओसाड माळरान वाटत होतं ते. आजूबाजूलाही फारशी वस्ती दिसत नव्हती. वरूण डेटसाठी अशी जागा निवडणार नाही हे तिला माहित होतं. म्हणजे संकर्षण इथे आला असणार ही तिची शंका खरी ठरली होती. बाहेर अजून एक कार उभी होती. ती गार्डनमध्ये शिरली. आत बाकड्यावर दोघेजण बसले होते. त्यांच्या बाजूला चार बॉडीगार्ड होते. तिची नजर त्या दोघांवर कमी आणि बऱ्याच अंतरावरच्या झाडीत आजूबाजूला लपलेल्या इतरांवर जास्त होती. त्याने दहाला बोलावल्यावर आठ वाजताच तिने आपल्या काही सहकाऱ्यांना पुढे पाठवलं होतं. काय करायचं ते समजावून सांगितलं होतं. ती त्यांच्या पुढयात येऊन उभी राहिली. तसा वरूण उठून पुढे आला. 


“रशु..” 


“आपण डेटवर आलो आहोत की मुलाखतीला बोलवलंय मला वरूण ?” 


तिची नजर संकर्षणवर रोखलेली होती. 


“थोडं ऐकून घे. हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. स..” 


“संकर्षण ओम.” 


तिने संकर्षणवरची नजर न हटवताच वाक्य पूर्ण केलं. 


“तू ओळखतेस त्याला ?” 


“हं. दुर्दैवाने.” 


तिच्या या वाक्याबरोबर संकर्षण आणि वरूण दोघेही सावध झाले. म्हणजे तिला कळलं होतं तर असे भाव सहजच त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. 


“नमस्कार इन्स्पेक्टर रश्मी.” 


कुत्सित हसू चेहऱ्यावर उमटलेला संकर्षण पुढे आला. रश्मीने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला होता. 


“ वरूण, या माणसासाठी गळ घालायला तर तू मला इथे बोलवलं नाही आहेस ना ?” 


“ अं.. तसंच काहीसं आहे रशु. रशु, संक्या माझा बेस्ट फ्रेंड आहे. अगदी जिवलग. एकमेकांसाठी वेळेवर जीव द्यायची तयारी आहे आमची. मला मान्य आहे त्याच्या हातून चूक झाली आहे. पण जे काही घडलंय ते रागाच्या भरात घडलं आहे. मी पाहिलं, ती मुलगीसुद्धा काही धड नव्हती. म्हणजे सगळाच दोष काही संक्यावर येत नाही. त्यामुळे तू..” 


“मी त्याला या प्रकरणातून निसाटायला मदत करू. असंच ना ?” 


रश्मीने आपली धारदार नजर वरूणवर रोखली होती. 


“वा. लवकर समजलंय की तुम्हांला.” 


संकर्षण हसत म्हणाला. रश्मीही किंचित हसली. 


“इथे तू मला बोलावलेलं असणार हे मला माहित नसेल असं तुला का वाटलं ? मी इथे आले आहे ते सुगंधाला न्याय द्यायला. माझ्याकडे तुला अटक करण्यासाठीचे सगळे पुरावे आहेत मिस्टर संकर्षण ओम. पण यात तू ही सामील असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं वरूण.” 


रश्मीच्या डोळ्यांत अविश्वासाची छटा होती. संकर्षणच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं दिसलं. वरूण रश्मीला समजवायला पुढे जाणार तोच मागून त्याचा गळा कोणीतरी घट्ट पकडला. रश्मीचे डोळे विस्फारले. तिला काहीही झालं तरी हे अपेक्षित नव्हतं. 


“संकर्षण, ऐक. तुझं वैर माझ्याशी आहे. त्याच्याशी नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध येत नाही. हिंमत असेल तर माझ्याशी लढ.” 


रश्मी ओरडून म्हणाली. त्या दोघांनाही शक्यतो जिवंत पकडून नेणं हाच तिचा उद्देश होता. एव्हाना संकर्षणच्या बॉडीगार्ड्सनी तिच्यावर गन्स रोखल्या होत्या. आजूबाजूला लपून बसलेल्या तिच्या ऑफिसर्सनीही गनपॉईंट रोखून ठेवले होते. परंतु एवढ्यात त्यांना सतर्क होऊन देऊन चालणार नव्हतं. संकर्षणने एका बॉडीगार्डकडून गन घेऊन वरूणच्या मस्तकावर रोखली. 


“ संक्या..” 


वरूणच्या तोंडून अस्फुट शब्द बाहेर पडले. 


“मी असा मित्र आहे जो दुसऱ्यासाठी जीव देऊही शकतो. पण माझा जीव वाचवायला एखाद्याचा जीव घेऊ ही शकतो.” 


तो वरूणकडे पाहून हसत म्हणाला. 


“थांब. संकर्षण, मी नाही अटक करणार तुला. पण तू त्याला काही करू नकोस. प्लिज.” 


रश्मीने सावध भूमिका घेतली. तिला काहीही करून ते दोघे जिवंतच हवे होते. 


“का ? ह्याच्याशी तुझा काही संबंध नाही ना ? फिर दर्द तुम्हे क्यूँ हो रहा है जानेमन ?” 


संकर्षण हसत होता. रश्मीने एक हलका कटाक्ष आजूबाजूला टाकला. ते सर्व तयार होते. 


“ संकर्षण प्लिज.” 


रश्मीने पुन्हा म्हटलं. 


“मग मला इथून सही सलामत जाऊ दे.” 


तो गंभीरपणे म्हणाला. रश्मीने होकारार्थी मान डोलावली. पण तिने आपली गन खाली ठेवली नाही. त्याच्या बॉडीगार्ड्सनी आपल्या गन्सचा चाप ओढला. पण अचानक रश्मी मुसंडी मारून बाजूला झाली. आजूबाजूच्या झाडीतून फायरिंग होऊ लागलं. संकर्षणचे बॉडीगार्ड्स जखमी झाले होते. एवढ्या वेळात वरूण त्याच्या हातातून सुटला होता. त्यानेही गन काढली. मात्र एवढं होऊनही त्याने गन संकर्षणवर रोखली नव्हती. त्याने गन इतर ऑफिसर्सवर रोखली. वरूण संकर्षणाला पाठमोरा होता. एका ऑफिसरने त्याच्या हातावर गोळी चालवली. त्याच्या हातातून गन खाली पडली होती. रश्मीला आपल्यावर रोखला गेलेला गन पॉईंट दिसत होता. 


“शिंदे, मूव्ह !” 


रश्मी आपली गन उचलत जोरात ओरडली. पण तोवर संकर्षणच्या गनमधून गोळी सुटली होती. शिंदेंच्या कानावर रश्मीचे शब्द पडताच तो किंचित बाजूला झाला होता. त्या गोळ्या त्याला लागणारच आहेत हे लक्षात येताच रश्मी मधे आली होती. एका हृदयद्रावक किंकाळीसहित ती खाली कोसळली. संकर्षण हे पाहून हादरला. त्याला हे अपेक्षित नव्हतं. गोळ्या झाडून संकर्षणने विरुद्ध दिशेने धावायला सुरुवात केली होती. पण रश्मीला पडताना पाहून इतर पोलिसांनी त्याच्यावर झाडलेल्या गोळ्या त्याच्या पाठीत शिरल्या आणि तो ही खाली कोसळला. सर्वजण मरणासन्न संकर्षणभोवती जमा झाले. काही क्षणांतच त्याने प्राण सोडले होते. रश्मीच्या शरीरातून अतिशय रक्तास्त्राव सुरु होता.  ऑफिसर्सनी तिला उचलून जीपमध्ये नेऊन ठेवलं आणि वरूणलाही पकडून दुसऱ्या जीपमध्ये बसवलं. 


______________ 


             दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध उद्योगपती संकर्षण ओमच्या एनकाउंटरची बातमी सर्वत्र पसरली होती. तिथे उपस्थित सर्व पोलिसांनी त्याने इन्स्पेक्टर रश्मीवर गोळी झाडली असल्याची साक्ष दिली होती. स्वसंरंक्षणासाठी त्यांनी गोळ्या झाडल्याची साक्ष सगळ्या डिपार्टमेंटने दिल्याने ही फाईल क्लोज होणार होती. टीव्हीवरची बातमी पाहून सुगंधाची लहान बहीण मात्र नाचत होती. तिला तो आनंद व्यक्त करता येत नव्हता. पण एका राक्षसाचा अंत झाला आहे ही भावना तिच्या मनापर्यंत पोहोचली होती. 


रश्मीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. वरूणला अटक झाली होती. तो प्रत्यक्ष गुन्हेगार नसला तरी अप्रत्यक्षपणे तो त्या कृत्यात सामील होता. सुगंधाची हत्या झाली त्या वेळेला आपण संकर्षणसोबत असल्याचं स्टेटमेंट वरूणने दिलं होतं. रश्मीला वाचवण्यासाठी डॉक्टर हर एक प्रयत्न करत होते. गोळ्या तिच्या कुशीत लागल्या असल्याने ती थोडक्यात बचावली होती. ती वाचली आहे हे ऐकून साऱ्या डिपार्टमेंटने सुटकेचा निश्वास सोडला. ती शुद्धीवर आल्यावर इतरांनी तिला संकर्षणच्या इन्काउंटरबद्दल आणि वरूणच्या स्टेटमेंट बद्दल तिला सांगितलं. तिनेही आधी शिंदेंबद्दल विचारलं. त्यांना लागलं नाही ना याची खात्री करून घेतली. 


“रशु, बरी आहेस बाळा ? कसं वाटतंय आता ?” 


रश्मीच्या बाबांनी विचारलं. तिचं कुटुंब तिच्याजवळ होतं. 


“मी ठीक आहे.” 


रश्मी निर्विकार चेहऱ्याने उत्तरली. 


“रशु, तू नक्की ठीक आहेस ना बाळा ?” 


आई कोणत्या उद्देशाने विचारतेय ते रश्मीला कळलं आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 


“आई, तो गद्दार आहे. गुन्हेगार आहे. संकर्षणच्या गुन्ह्यात कुठे ना कुठे त्याचाही सहभाग आहे.” 


“रशू..” 


“आई, मी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं. फार काही अपेक्षा नव्हती माझी. अगदीच परीकथेतल्या परीसारखी किंवा गोष्टीतल्या राजकन्येसारखी अनोखी प्रेमकहाणी नको होती मला. परंतु माझी प्रेम कहाणी निदान अशी अधुरी नको होती ना गं. ” 


               रश्मी आईला बिलगली. बाजूला उभी असणारी रुही स्वतःच्या चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू पुसत होती. तिला माहित होतं रश्मीसाठी प्रेमापेक्षा कर्तव्य मोठं होतं. कदाचित तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं तर तिची प्रेमकहाणी कथेतल्या परीप्रमाणे अनोखी असती. पण कर्तव्य पूर्तीसाठी तिने आपली प्रेमकहाणी अधुरी राहू दिली होती. तिच्याच डोळ्यांसमोर तिचीच प्रेमाची स्वप्नं विरून गेली होती आणि मागे उरली होती फक्त.. 

इन्स्पेक्टर रश्मी !

_____________


(कथा सहज मला सुचली होती. मला लिहावं वाटलं आणि मी लिहिली. तुम्हांला आवडली की नाही ते मला नक्की कळवा. जलद कथा लिहिण्याचाही हा पहिलाच प्रयोग. त्यामुळे कितपत जमलं असेल माहित नाही. 

Stay Connected..) 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//