Feb 22, 2024
जलद लेखन

कर्तव्य..भाग ३

Read Later
कर्तव्य..भाग ३

             प्रकरण खूप पेटलं होतं. अशा घटनेचे परिणाम जनमानसात गहिरा होतो. सुगंधाला न्याय मिळाला पाहिजे ही इच्छा दृढ झालेली होती. टीव्हीवरच्या बातम्या पाहत त्याने मोबाईलवर नंबर डायल केला. 


“बोला साहेब.” 


पलीकडून आवाज येताच ह्याच्या तोंडातून शिवी बाहेर पडली. 


“काय साहेब, अहो शिव्या का देताय ?” 


“तुला काय सांगितलं होतं ? डेड बॉडीची योग्य विल्हेवाट का नाही लावलीस तू ? तिला तसंच हायवेवर टाकून गेल्यावर पोलीस काय शांत बसतील असं वाटलं का ?” 


“मला सांगितल्या सांगितल्या मी व्यवस्था करायला गेलेलो साहेब. पण पोलिसांपर्यंत बातमी इतक्या लवकर पोहोचली काय कळलं नाही.” 


“तुला बघतो मी नंतर. एक दमडी देणार नाही आहे. त्याशिवाय अक्कल यायची नाही.” 


त्याने कॉल कट केला. 


“कितीही स्ट्रॉंग व्यक्ती असली तरी तिचा वीकपॉईंट हा असतोच मिस. रश्मी. माझ्यापर्यंत पोहोचायला तुला बरंच काही गमावावं लागेल.” 


तो हसत म्हणाला. त्याने वरूणचा नंबर डायल केला. 


“हॅलो वरूण !” 


“काय रे संक्या ? आज कशी काय आठवण आली.” 


“बातम्या पाहतो आहेस ?” 


“हं. त्या दिवशी रागाच्या भरात केलं तेच ना ? तुला बोललो होतो की नसत्या फंदात पडू नको. त्या मुलीच्या नादाला लागलाच नसतास तर हे प्रकरण गळ्यात पडलंच नसतं.” 


“अरे यार, तुझे सल्ले राहू दे बाजूला. केस कोणाकडे आहे माहित आहे ना ?” 


“हो. इन्स्पेक्टर रश्मी.” 


“अशी ओळख आहे का तिची ? मला माहित नाही असं समजू नकोस. होणारी बायको आहे ना तुझी ?” 


“मग ? एक मिनिट. संक्या मी नाही तिला गळ घालणार. ती माणूस म्हणून कशी आहे हे मला माहित आहे. पण ऑफिसर म्हणून ती अशा गोष्टींना भीक घालत असेल असं मला वाटत नाही. त्यात मी ह्यात अप्रत्यक्षपणे का असेना होतो हे तिला कळलं ना तर माझी काही खैर नाही. ” 


“ बस काय वरूण. हीच का तुझी मैत्री ? अरे प्रयत्न तरी कर.” 


“बरं बघतो.” 


“आणि हो, कॉलवर नाही सांगायचं आहे. ××× गार्डनमध्ये भेटायला बोलव. तिथे जास्त कोण नसतं. मी पण येतो.” 


“बरं. कधी बोलावायचं आहे ?” 


“आज रात्री दहानंतर.” 


“एवढ्या उशिरा ?” 


“हे बघ वरूण. आजच्या आज कर. तिला काहीही झालं तरी कळणार की तो मी आहे. त्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची.” 


“हो रे. ठेव मी बघतो.” 


संकर्षणने कॉल कट केला. एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या चेहऱ्यामागे एवढा विकृत आणि कुटील व्यक्ती दडलेला असेल हे कोणाला सांगूनही पटलं नसतं. 


“भेटूया लवकरच..! इन्स्पेक्टर रश्मी.” 


संकर्षण हसत खुर्चीवर रेलून म्हणाला. ____________ 


           रश्मी तिच्याजवळ बसून होती. आपल्या बहिणीचे अंतिम संस्कार उरकल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताही येत नव्हते. उदास होती ती की सुडाच्या आगीने पेटत होती हे सांगता येत नव्हतं. तिच्या डोळ्यांत आज वेडसरपणाची झाक दिसत नव्हती. बहिणीचा मृत्यू तिला आतून हलवून गेला होता. 


“बाळा, मी इन्स्पेक्टर रश्मी.” 


मात्र तिने काही मान वर उचलली नाही. 


“मला सुगंधाला न्याय मिळवून द्यायचा आहे. तिला न्याय मिळवून द्यायला मी काहीही करायला तयार आहे. फक्त तुझी मदत हवी आहे.” 


तिने हळूच मान वर उचलली. रश्मीला पाहून तिला कुठेतरी आभास झाला असावा की ती खरं बोलत आहे. रश्मीलाही तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव जाणवत होते. 


“मला सांग असा कोणी व्यक्ती होता का ? जो तुझ्या दीदीला त्रास देत होता ? किंवा सतत तुमच्या घरी येत होता ? किंवा ताई कुठे कामाला जात होती का ?” 


सुगंधाची सगळी माहिती सांगू शकणारी एकच व्यक्ती त्यांच्याकडे होती आणि ती ही अशी. रश्मीचे प्रश्न ऐकून ती सुन्नपणे रश्मीकडे पाहत राहिली. ती उत्तर देईल याची आशा रश्मीने गेल्या तीन दिवसांत सोडलीच होती. 


“हं.. अं.. दोरी.. साखळी.. पट्टा.. ” 


एक एक शब्द उच्चारताना ती हातवारे करत होती. तिच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते. तिचे हातवारे तिच्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचं वर्णन होतं. तिला सांगता येत नव्हतं. परंतु तिची वेदना रश्मीला जाणवत होती. ती ढसाढसा रडत हातवारे करत शब्द पुटपुटत होती. 


“ बाळा, शांत हो. माझ्याकडे बघ. नाव.. नाव काय होतं ?”“संकर्षण ओम.” 


नाव मात्र तिला चटकन आठवलं होतं. तिच्या मनपटलावर हे नाव तापत्या सळईप्रमाणे चटके देऊन जातभोतं. तिच्या नजरेत ते नाव उच्चारताना घृणा उसळून आली होती. ती मुसमुसत होती. रश्मी मात्र मागे सरकून खुर्चीवर बसली होती. ‘संकर्षण ओम..’ हे नाव कसं विसरू शकत होती ती. वरूणच्या तोंडून कितीतरी वेळा बेस्ट फ्रेंड म्हणून तिने त्याचं नाव ऐकलं होतं. थोडा वेळ तिची समजूत घालून, एका महिला ऑफिसरला तिची काळजी घ्यायला सांगून ती बाहेर पडली. संध्याकाळ झाली होती. वरूणचे तिला कॉल वर कॉल येत होते. कामात असल्यामुळे तिने उचलले नव्हते. मात्र तिने स्वतः त्याला कॉल बॅक केला. 


“हॅलो !” 


“काय यार रशु ? किती कॉल करायचे तुला ?” 


“काही काम होतं का ?” 


“मला तुला भेटायचं आहे. आजच्या आज.” 


“भेटूया. कुठे भेटायचं ?” 


वरूणला आश्चर्य वाटलं. ती भेटायला नकार देईल आणि आपल्याला फार प्रयत्न करावे लागतील असा त्याचा कयास होता. पण तिने ऐनवेळेला संभाषणाचा रंग बदलला होता. 


“मी पत्ता पाठवतो. आज रात्री दहानंतर भेटूया.” 


“ठीक आहे.” 


रश्मीने कॉल कट केला. तिला लक्षात आलं होतं की हे इन्व्हेस्टिगेशन थांबवण्यासाठी संकर्षण वरूणला गळ घातल्याशिवाय राहणार नाही. पण या प्रकरणात वरूण आहे की नाही हे तिला माहित नव्हतं. ती शांतपणे जीपमध्ये बसली. तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. ही एक घटना सर्वांच्याच आयुष्यावर गहिरा परिणाम करणार होती का ?


_______________

क्रमश:. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//