Feb 22, 2024
जलद लेखन

कर्तव्य.. भाग २

Read Later
कर्तव्य.. भाग २

              दोन दिवसांनी रात्री सातच्या सुमाराला रश्मी तयार होत होती. डेटसाठी तिने लाल रंगाचा, साधासाच अनारकली निवडला होता. ओढणी पिनअप करत ती बाहेर आली. अतिशय साधा पोशाख आणि शांत चेहरा अशा तिला पाहून सोफ्यावर बसलेल्या रुहीने डोक्यावर हात मारला. 


“काय यार दी ? अशी जाणार आहेस तू डेटला ? तुला तर नीट तयारही होता येत नाही आहे.” 


“गप गं. बाबा, पहा बरं माझ्याकडे. वाईट दिसतेय का मी ?” 


“कशी दिसतेय मी असा प्रश्न असतो तो.” 


रुही वैतागून म्हणाली. बाबांनी हलकेच तिच्या डोक्यात टपली मारली. 


“नको छळू तिला. तिला आवडेल ते घालू दे. छान दिसत आहेस तू बाळा. बरं जाणार कशी आहेस ? बुलेट घेऊन जायचा तर विचार नाही ना ?” 


“नाही बाबा. वरूण येणार आहे न्यायला. मग.. ” 


रश्मीचं वाक्य पूर्ण होणार तोच तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. नाव पाहून तिने लगेच कॉल उचलला. 


"येस सर. येस..येस. मी दहा मिनिटांत पोहोचते सर. जय हिंद सर.” 


रश्मीने कॉल कट केला आणि जीपची चावी घेतली. 


“ रशु, अग कुठे जात आहेस ? वरूण येईलच थोड्या वेळात. ” 


आई काळजीने पुढे आली होती. 


“महत्वाचं काम आहे आई. मी समजावेन नंतर वरूणला. आला तर परत जायला सांग त्याला. मला उशीर होईल.” 


वेगाने ती तिथून बाहेर पडली. दहा मिनिटांत ती हायवेवर पोहोचली. तिथे जमलेली गर्दी आणि पोलिसांच्या व्हॅन पाहून तिने ओळखायचं ते ओळखलं होतं. तिने आपली जीप तिथे उभी केली. तिला पाहून पोलिसांनी गर्दीला थोडं मागे लोटलं. ती तिथे आली. तिथे एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेला होता. कपड्यांवरून लक्षात येत होतं की मुलगी आहे. ताबडतोब पंचनामा करण्यात आला. तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तिने रातोरात काम करण्याचे आदेश दिले. ती हवालदिल होऊन घरी परतली. त्या मुलीची अवस्था तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हती. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं खरं कारण समोर येणारच होतं. घरी आली तेव्हा इतर सर्वजण झोपले होते. ती पलंगावर आडवी तर झाली. पण तिचा डोळा लागत नव्हता. रात्री एकच्या सुमाराला ते परत एकत्र जमले. 


“मॅम हे रिपोर्ट्स. त्या मुलीच्या हात आणि पायावर व्रण आहेत. कोणीतरी तिला मारण्याचा अथवा त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असावा. तिच्या कुर्त्याच्या आतील बाजूला एक छोटा खिसा होता. त्यात हे आय.डी. आणि दोनशे रुपये सापडले आहेत.” 


“शिंदे, यावरून तिच्या कुटुंबातील कोणाचा शोध लागला होता का ?” 


“हो मॅम. तिच्या घरी तिची धाकटी बहीण आहे. परंतु ती थोडीशी वेडसर आहे. तिने हिला ओळखलं आहे. मात्र तिला असं पाहिल्यापासून ती सतत किंचाळतेय. ” 


रश्मीला वाईट वाटलं. ती त्या मुलीच्या धाकट्या बहिणीजवळ गेली. ती अंग आकसून बसलेली होती. डोळे रडून सुजलेले दिसत होते. रश्मीने तिच्या हातावर हात ठेवला. 


“नाव काय आहे हिचं ?” 


रश्मीने शिंदेंना विचारलं. 


“माहित नाही मॅम. आल्यापासून ती फक्त सुगंधाच्या नावाने ओरडते आहे. ह्या मुलीचं नाव सुगंधा होतं. पण सुगंधाचा मृत्यू झालाय हे ती मान्य करायला तयार नाही आहे.” 


शिंदेचं बोलणं संपतं न संपतं तोच ती बहीण त्यांच्या अंगावर धावून गेली. 


“खोटं बोलत आहेस तू ! दीदी जिवंत आहे माझी. आता उठणार आहे ती. मी तिच्यावर रागावले ना म्हणून ती नाटक करून दाखवतेय. दीदी.. उठ ना गं. दीदी..” 


महिला ऑफिसर्सनी कसंबसं तिला सुगंधाच्या मृतदेहापासून दूर नेलं. रश्मी तडक तिथून बाहेर पडली. सुगंधाची निघृण हत्या करण्यात आली होती. याचा शोध घेतल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हतं. बाहेर जाता जाता तिने मोबाईलवर काही तासांपूर्वी आलेला मेसेज पाहिला. 


“तुला भेटायची फार इच्छा होती. पण इमर्जन्सीमुळे गेली आहेस असं कळलं. नंतर कधीतरी नक्की भेटू. घरी गेल्यावर मेसेज कर.” 


रश्मीला जाणवलं की तिने वरूणला काही कळवलं नव्हतं. पण सध्यातरी तिच्या डोक्यात फक्त सुगंधा होती. 

____________             इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात झाली होती. मीडियापर्यंत बातमी पोहोचल्यामुळे सर्वत्र तो चर्चेचा विषय बनला होता. इन्स्पेक्टर रश्मिने तपास हाती घेतला आहे म्हटल्यावर मीडियाने थोडं संथ घेतलं होतं. तिच्या कामाच्या बाबतीत आजवर कधी दिरंगाईची बातमी आली नव्हती. तीन दिवस झाले होते. रश्मी छोटे मोठे धागे शोधून काढण्यात गुंतली होती. दुपारी ती घरी परतली. काही वेळाने परत जावं लागणार म्हणून तिची आवराआवर सुरु होती. आई तिच्या खोलीत आली. 


“रशु, गडबडीत आहेस का ?” 


“नाही गं. पण मला जायचं आहे. काही काम होतं का ?” 


“काम असं नाही. पण वरूणचा कॉल येऊन गेला. दोन दिवस तो सतत तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. पण तू कॉल उचलत नाही आहेस, असं म्हणाला.” 


“त्याला माहित नाही का काय सुरु आहे आता ? नाही वेळ आहे मला. एवढं काय अडलंय त्याचं ?” 


रश्मी थोडीशी चिडलीच. 


“कामबिम तर सुरूच राहतं रशु. निदान एक मेसेज करून कळव त्याला.” 


“बघते. करते.” 


रश्मी जरी तोंडदेखलं म्हणाली असली तरी तिचा मुळीच मूड नव्हता. आईचा निरोप घेऊन ती बाहेर पडली.

________________

क्रमशः.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//