Feb 22, 2024
जलद लेखन

कर्तव्य..भाग १

Read Later
कर्तव्य..भाग १

जलद कथामालिका.. (एक अधुरी प्रेमकहाणी)


           मोबाईल घेऊन रुही सगळीकडे धावत होती. तर रश्मी तिच्या मागोमाग धावत होती. त्या दोघींचा धुडगूस पाहून शेवटी आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने पटकन रुहीच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तोवर कॉल कट झाला होता. 


“काय गं रुही ? मस्ती आली आहे तुला ? एवढा गोंधळ कसला सुरु आहे ?” 


आईने चिडूनच विचारलं. 


“अग आई, मिस्टर वरूणचा कॉल आलेला. मी म्हटलं आपण उचलावा. पण कोणाला तरी ना मला कॉल उचलू द्यायचाच नाही आहे.” 


रुही रश्मीकडे पाहत हसत म्हणाली. आईही गालात हसली. 


“आई, मला खरंच उशीर होतोय. तो मोबाईल दे इकडे.” 


रश्मी थोडी वैतागतच म्हणाली. आईने मोबाईल तिच्याकडे दिला. तसा रुहीकडे एक खुनशी कटाक्ष टाकत रश्मी बाहेर गेली. 


“रुही, तुला तर ना..” 


“आह्ह..आई दुखतंय गं !” 


“कितीदा सांगितलं आहे तुला की उगाच गडबडीच्या वेळी तिला छळत जाऊ नको. एक दिवस तुलाच लॉकअपमध्ये टाकेल ती.” 


“ए आई, मी काही लहान नाही हा आता. ही कसली धमकी देतेस ! तसंही जीजूंचा कॉल होता तर म्हटलं करावी थोडी मस्ती. इतना तो बनता है ना ?” 


रुही खट्याळपणे हसत म्हणाली. आईनेही हसतच दुजोरा दिला. इन्स्पेक्टर रश्मी ! लहान वयातच अतिशय जोखमीच्या जबाबदारीवर नियुक्त झालेली हुशार व्यक्ती. रश्मीची आपल्या कामावर नितांत श्रद्धा होती. म्हणूनच ती एक अतिशय विश्वासू पोलीस अधिकारी म्हणून ओळखली जात होती. रश्मीचा बालमित्र वरूण ! वरूण एका यशस्वी उद्योजकाचा मुलगा होता. गर्भश्रीमंत असल्यामुळे त्याला इतर काही करण्याची आवश्यकताच नव्हती. वारसाहक्काने तो त्याच्या वडिलांचा व्यवसायच पुढे चालवत होता. वरूण आणि रश्मीची अतिशय घट्ट मैत्री होती. त्याच्या काही वाईट सवयी सोडल्या तर रश्मी त्याला नेहमी साथ द्यायची. त्याच्या वाईट सवयींपासून, उगाच इतरांच्या खोड्या काढण्याच्या वृत्तीपासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्नही तिने अनेकदा केला होता. पण तो सुधारायचा फक्त काही वेळासाठीच ! हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलत गेली होती आणि घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्या रश्मीला सुट्ट्या मिळत नसल्यामुळे ते लांबणीवर पडलं होतं. 


संध्याकाळी रश्मी घरी आली तेव्हा तिची आई कॉलवर कोणाशी तरी बोलत होती. 


“घ्या. नुकतंच तिचं नाव घेतलं आणि ती आली. बोलणार आहात का तुम्ही ? देऊ का मोबाईल तिच्याकडे ?” 


तिकडून काय उत्तर आलं ते रश्मीला कळलं नाही. आईने मोबाईल तिच्या हातात दिला आणि ती हलकेच पुटपुटली. 


“जावईबापू आहेत.” 


रश्मीने मनातल्या मनात वरूणला रागे भरत मोबाईल कानाला लावला. 


“हॅलो..” 


“गुड एव्हनिंग रशु. कसा गेला दिवस ?” 


“छान. आईला का कॉल केलेलास ?” 


“अग ते माझ्या मॉमने कॉल करून विचारायला सांगितलं होतं. या महिन्यातच एखादा मुहूर्त बघायचा म्हणत आहेत ना सर्व. मग खरेदीला कधी जायचं ?” 


“मला सुट्टी मिळेल का हे ही अजून माहित नाही आणि तुम्ही कसलं कसलं प्लॅनिंग करताय !” 


“अग मी फक्त कानावर घालायला कॉल केला होता. वेळ तर सध्या मलाही नाही आहे.” 


“का ? तू कशात व्यस्त आहेस ?” 


“थोडे महत्वाचे डिल्स वगैरे होते. कंपनीची कामं आहेत आणि मुख्य म्हणजे संक्याला भेटायला जायचं आहे.” 


“वा ! कंपनीच्या कामात एवढा रस घेत आहेस हे एका अर्थी चांगलं आहे. पण त्या संकर्षणकडे काय अडलेलं असतं तुझं सारखं ?” 


“ते नाही कळायचं तुला. बरं रशु, खरेदी नाही तर नाही. परवा रात्री डिनर डेटसाठी तरी भेटूया का ? चार महिने झाले. आपण समोरासमोर भेटलोच नाही आहोत.” 


“हं. अं.. ठीक आहे. भेटूया परवा रात्री. नऊच्या आसपास भेटू. ” 


त्याने होकार दर्शवल्यावर रश्मीने कॉल कट केला. आई आणि रुही तर जणू कॉलवर नजरच ठेवून होत्या. रश्मीने त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि ती आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. 


“काय म्हणाले गं जीजू ?” 


“ तुला कशाला नसत्या चौकश्या ? जे म्हणायचं ते आईला सांगितलं आहे त्याने. तुला सगळं माहितच असलं पाहिजे असं नाही.” 


रश्मी आपल्या खोलीत निघून गेली. रुहीने रागातच आपल्या हातातील रुमालाचा चोळामोळा करून तिच्या खोलीच्या दारावर मारला. 


“जा उडत. माझा तर इंटरेस्टच गेला.” 


ती ही आपल्या खोलीत निघून गेली. रश्मीची आई मात्र गालात हसली. वरूण आणि रश्मीचं वागणंबोलणं नेहमीच मोजकंच असतं हे त्यांना अनुभवाने कळलं होतं. पण फक्त आपली मुलगीच अशी आहे की तो ही तसाच आहे ह्याचा मात्र त्यांना फारसा अभ्यास झालेला नव्हता. परंतु मुलांनी स्वतःच्या मनाने काही निर्णय घेतला आहे, तर आपण त्याला पाठींबा द्यावा असा विचार करून दोन्ही घरांतील पालकांनी होकार दर्शवला होता. खोलीत रश्मी आरशात पाहून किंचित हसत होती. वरूणला भेटताना दर वेळेला जाणवणारा आपलेपणा तिला हवाहवासा वाटायचा. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात ही छोटीशी डिनर डेट तिला आराम ठरणार होती. 

______________

क्रमशः


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//