जबाबदारी (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
जबाबदारी

आचार्य त्याच्या घरी शिष्यांसोबत होता.

“गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला जी सामग्री लागणार आहे त्याची यादी आली?” आचार्यने विचारलं.

“हो गुरुजी.” धनी म्हणाला.

“त्या यादीतील जिन्नसांपुढे एक एक शून्य अजून वाढवा. तेव्हाच तर आमची खरी गुरुदक्षिणा आम्हाला मिळेल. अरे राजपुरोहित आहोत आम्ही आमचाही राजकोषावर थोडा हक्क आहेच की नाही? या उत्सवात गणपतीची कृपा आमच्यावरही होऊ दे. वाढवा वाढवा एक एक शून्य वाढवून यादी बनवा.” आचार्य म्हणाला.

झालं! त्याने सांगितल्याप्रमाणे यादी बनवली गेली. दरबार भरला. धनी आणि मणी मिळून राजाला यादी वाचून दाखवत होते इतक्यात रामा आला.

“माफ करा महाराज आज यायला जरा उशीर झाला.” रामा म्हणाला.

“उशीर? दरबारातील कार्यवाहीचा दुसरा प्रहर सुरू आहे. याला तुम्ही जरा उशीर असं म्हणताय?” आचार्य उठून म्हणाला.

“माफ करा महाराज पण काय करू रात्रभर काळजीत होतो आणि त्यामुळे झोप लागली नाही म्हणून उठायला उशीर झाला.” रामा म्हणाला.

“महाराज! विशेष सल्लागारच काळजीत असतील तर कसे व्हायचे?” आचार्य म्हणाला.

“कसली काळजी होती पंडित रामाकृष्णा?” राजाने विचारलं.

“महाराज चंद्रमणी हिऱ्याची काळजी. आता सगळ्यांनाच माहित आहे तो हिरा किती अद्वितीय आहे. त्याचे मूल्य कोणी विचार करू शकत नाही एवढे आहे आणि तो सार्वजनिक होणार तर ते चोरांना प्रत्यक्ष निमंत्रण नसेल का?” रामा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने राजाही विचार करू लागला.

“बहुदा हे अजून झोपेतच आहेत आणि झोपेतच बडबडतायात. जागे व्हा पंडित! सकाळ झाली आहे.” आचार्य त्याच्यासमोर टीचक्या वाजवून म्हणाला.

रामा काही बोलायला जाणार इतक्यात आचार्य पुढे बोलू लागला; “यांना नक्की म्हणायचे काय आहे? तो हिरा चोरीला जाईल? उलट यांनीच आता सार्वजनिक दृष्ट्या असे बोलून चोरांना निमंत्रण दिले आहे. या आणि आपापले नशीब आजमावून बघा. लागला कोणाच्या हाती हिरा तर लागला!” आचार्य म्हणाला.

“एक मिनिट आचार्य! यांच्या बोलण्यात तथ्य आहे. त्यांचे काम आम्हाला सल्ला देण्याचे आहे त्यांनी तो दिला.” राजा म्हणाला.

आता सगळेच राजा काय निर्णय घेतोय याकडे लक्ष ठेवून होते.

“पंडित रामाकृष्णा! तुम्ही म्हणताय तसे काही घडू शकते परंतु आता काय करायचे? सगळीकडे निमंत्रणे वाटली जात आहेत आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण तर तो चंद्रमणी हिराच आहे.” राजा म्हणाला.

“तेच तर महाराज! जर आता आपण माघार घेतली तर ते हास्यास्पद ठरेल. यावर एक उपाय आहे.” आचार्य म्हणाला.

त्याच्या डोक्यात रामा विरुद्ध कट शिजला होता.

“महाराज आम्हाला वाटते चंद्रमणीची संपूर्ण जबाबदारी पंडित रामाकृष्णा यांना देण्यात यावी.” आचार्य म्हणाला.

तो रामाकडे कुत्सितपणे बघत होता.

“काय गरज होती तुला बोलायची? झालं! आता तुझाही जीव धोक्यात आणि माझाही.” बंधू म्हणाली.

रामा काही बोलायला जाणार एवढ्यात आचार्य पुढे बोलू लागला; “यांच्यासारखा बुद्धिमान माणसाकडे ही जबाबदारी असेल तर काळजीचे काही कारणच राहणार नाही.”

“तुमची कल्पना छान आहे आचार्य. पंडित रामा! तुमच्याकडे आता चंद्रमणीची संपूर्ण जबाबदारी असेल. तुम्ही ती योग्य पद्धतीने पेलाल याची आम्हाला खात्री आहे परंतु एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, काहीही झाले तरी चंद्रमणीला काही होता कामा नये. त्याच्यावर आलेली आच म्हणजे आमच्या प्रतिभेवर लागलेला डाग असेल आणि मग आम्ही काय करू आम्हालाही माहित नाही. तेव्हा मग आमच्याकडून नम्रतेची अपेक्षा करू नका. तुम्हाला यावर काही बोलायचे आहे?” राजा म्हणाला.

यावर रामाने जरा विचार केला आणि तो आचार्यकडे बघून स्मित करू लागला.

“गुरुजी नक्कीच आता काहीतरी वाईट होणार आहे.” मणी म्हणाला.

“जेव्हाही हा तुमच्याकडे बघून असा स्मित करतो तेव्हा याच्या डोक्यात काहीतरी शिजत असते. बघा आता तुमचा कसा ढोल वाजेल. बघा त्याने तोंड उघडलं.” धनी म्हणाला.

“जर महाराज मला या योग्य समजत आहेत तर मी तयार आहे. मी माझे सौभाग्य समजतो मला एवढी मोठी जबाबदारी दिली गेली आहे. मी वचन देतो महाराज माझ्या जीवाची पर्वा न करता मी चंद्रमणी जीवापाड जपेन पण महाराज जर जबाबदारी द्यायची आहेच तर अशी अर्धवट का? मला पूर्ण जबाबदारी देण्यात यावी.” रामा म्हणाला.

“पूर्ण जबाबदारी? काय म्हणायचे आहे तुम्हाला?” राजाने विचारलं.

“हेच महाराज जर महाराज योग्य समजत असतील तर मी या संपूर्ण कार्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेऊ इच्छितो.” रामा म्हणाला.

“का? तुम्हाला जे काम दिले आहे तेवढे करा. आम्ही आहोत ना महाराज! आम्ही बाकी सर्व बघतो.” आचार्य बिथरून म्हणाला.

“आचार्य वर तुम्ही तर कुलगुरू, राजगुरू आहात. तुमच्यावर किती भार टाकणार? तुमचे पूजेच्या दिवसात शांत आणि पूर्ण ध्यानस्थ असणे गरजेचे आहे म्हणून तुम्ही फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा. या सेवकाला करू द्या ही लहानसहान कामे.” रामा म्हणाला.

रामाच्या बोलण्याने मंत्र्यांना आनंद झाला होता. त्यांना माहीत होते आचार्य दरवेळी असे जास्तीचे सर्व सांगून भ्रष्टाचार करतो परंतु त्यावर कोणालाही अंकुश ठेवता येत नव्हता.

“मलाही पटते आहे महाराज! आचार्य यामुळे जबाबदारी मुक्त होतील तर त्यांचे पूजेत विशेष ध्यान लागेल.” मंत्री म्हणाले.

“नाही महाराज असे काही नाही. आम्ही करू सर्व.” आचार्य म्हणाला.

“आम्हाला महामंत्री म्हणाले ते पटले आहे. जर पंडित रामाकृष्णा यांना संपूर्ण जबाबदारी घेण्याची इच्छा असेल तर त्यांना ती दिली पाहिजे. आचार्य वर! तुम्ही आणेली यादी पंडित रामाकृष्णांना द्या.” राजा म्हणाला.

“जशी आज्ञा महाराज.” आचार्य म्हणाला आणि त्याने नाराजीनेच धनी आणि मणीच्या हातून ती यादी घेऊन रामाच्या हातात दिली.

“आता ही जबाबदारी देखील तुमचीच असेल. राजकोषातून निघणाऱ्या संपूर्ण खर्चाचा हिशोब आता तुम्ही ठेवायचा.” राजा म्हणाला.

दरबार संपला आणि रामा घरी आला पण त्याला चांगलाच सर्दी आणि ताप आलेला. पाण्यात पाय बुडवून, डोक्याला रुमाल बांधून तो शिंकत बसला होता. शारदा त्याच्यासाठी काढा घेऊन आली.

“ओहो! किती शिंकताय! घ्या काढा उचला आणि प्या. लगेच बरे वाटेल. फक्त न शिंकता.” ती म्हणाली.

“जीवन, मृत्यू आणि शिंक हे कोणाच्या हातात आहे शारदा? कधीही आणि कुठेही येऊ शकते.” रामा म्हणाला.

रामाने काढा घ्यायला हात पुढे केला पण त्याला शिंक आली. शारदाने पटकन पेला बाजूला केला. पुन्हा रामाला शिंक येत आहे असे वाटले पण आली नाही. नेमका त्याने पेला घ्यायला हात पुढे केला आणि शिंक येऊन काढा सांडला. शारदा जाऊन पुन्हा काढा करून घेऊन आली. यावेळी रामाला नाही तर शारदाला शिंक आली आणि काढा सांडला. अम्मा बाहेर आली आणि खुणा करू लागली, शारदा बोलू लागली.

“काय माहित कोणाची नजर लागली आहे घराला? काय होतंय हे?”

“तू कालजी नको कलू शालदा, लामाला काला मी देतो.” गुंडप्पा म्हणाला.

इतक्यात त्यालाही शिंक आली. अम्मा खुणा करू लागली आणि शारदा सांगू लागली; “काय आजकालची मुलं ही! नुसती नाजूक. आम्ही बघा एवढं वय होऊन आजवर शिंक नाही आली. याला म्हणतात नाकावर ठेवलेले नियंत्रण.”

इतक्यात तीही शिंकली आणि सगळे हसू लागले.

“हे सगळं यांच्यामुळे झालंय. कुठून सर्दी पडसे घेऊन आले काय माहीत. सगळे घर आजारी पडले.” शारदा म्हणाली.

“अम्मा काहीतरी कर ना! असं आजारी राहून चालणार नाही. उद्या विशेष अतिथी येणार आहेत त्यांच्या स्वागताला काय असा शिंकत उभा राहू का? काहीतरी कर.” रामा म्हणाला.

दुसऱ्या दिवशी रामा व्यवस्थित तयार होऊन दरबारात गेला. महामंत्री आणि रामा विशेष गायक अतिथिंचे स्वागत करण्यासाठी उभे होते. सगळीकडे छान सजावट केली होती. महामंत्री रामाला सगळ्यांची माहिती देत होते.

“आता अतिथी यायला सुरुवात होईलच. विशेष करून पोर्तुगाल वरुन येणाऱ्या क्लारा त्यांच्या गायनासाठी खूप प्रसिद्ध आहेत त्यासाठीच त्यांना इथे आमंत्रित करण्यात आले आहे.” ते म्हणाले.

रामाने होकारार्थी मान हलवली इतक्यात आचार्य त्याच्या शिष्यांसोबत तिथे आला.

“प्रणाम गुरूवर! तुम्ही इथे?” रामाने विचारलं.

“का? आता कुठे येण्याजाण्यासाठी तुमची परवानगी घ्यायची?” त्याने विचारलं.

“नाही तसं नाही..” रामा म्हणाला.

“मग कसं आहे?” तो म्हणाला.

“मी तर फक्त उत्सुकतेपोटी विचारलं, महान राजगुरू इथे महालाच्या दाराशी?” रामा म्हणाला.

“हा ते आम्ही…” आचार्यला काय बोलावे सुचेना.

“स्वागत! गुरुजी इथे विशेष अतिथीगणांचे स्वागत करण्यासाठी आले आहेत तुम्हाला काही त्रास?” धनी म्हणाला.

आचार्यने देखील होकारार्थी मान हलवली.

“नाही नाही बंधुवर! मला काय त्रास असणार? मी फक्त एवढ्यासाठी विचारलं की, हे आमचे काम आहे. आता महागुरू असे दारापाशी कसे वाटतील म्हणून.” रामा म्हणाला.

“त्याची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही. जर गुरुजींना काही त्रास नाही तर तुम्हाला कशाला झाला पाहिजे?” मणी म्हणाला.

“हा आणि असा विचारही करू नका की गुरुजी ती विदेशी महिला येणार आहे म्हणून आलेत.” धनी म्हणाला.

रामा आणि मंत्र्यांनी एकमेकांकडे पाहिले. आचार्यला त्याचं काय करावं हेच कळत नव्हतं.

“आणि हो असा विचार तर डोक्यातून काढूनच टाका की, त्यांना रात्रभर त्या विचाराने झोप लागली नाही, ते कुस बदलत राहिले.” मणी म्हणाला.

इतक्यात पाहुण्यांची पालखी येताना दिसली. आचार्य उत्साहात पुढे गेला. तिथे असलेला हार त्याने घेतला आणि पालखीच्या जवळ गेला. त्या पालखीतून एक माणूस उतरलेला पाहून त्याने हार पुन्हा तबकात टाकला आणि नाराजीने मागे आला. तो पालखीतून उतरलेला माणूस आलाप लावत पुढे आला. त्याच्या एका हातात केळे होते आणि तो माकडासारखे अंग खाजवत होता.

“बोला प्रभू श्रीरामचंद्र की जय!” तो म्हणाला.

“हे मोठे गायक आणि रामभक्त मथुरा दास आहेत.” मंत्री रामाला म्हणाले.

इतक्यात तो माणूस पुढे आलेला होता.

“स्वागत आहे तुमचे.” मंत्री त्याला हार घालत म्हणाले.

“सौभाग्य आहे आमचे तुमचे शुभ चरण इथे लागले. प्रवासात काही त्रास नाही झाला ना?” रामा म्हणाला.

“कोण आहे हा युवक? आधी परिचय दे स्वतःचा.” तो म्हणाला.

“सेवकाला पंडित रामाकृष्णा म्हणतात. महाराजांच्या दरबारात विशेष सल्लागार आहे.” रामा म्हणाला.

“हसू आहे किती गोड, गोड त्याची वाणी, बघून तुम्हाला गेला सगळा कंटाळा आमचा.” तो म्हणाला.

“धन्यवाद महोदय.” रामा हात जोडून म्हणाला.

“गुरुजी! बहुतेक देव माकड बनवत होता पण मन बदलले म्हणून असे काहीसे झाले.” धनी त्या माणसाची नक्कल करत म्हणाला.

“अरे सुरू करा सुरू करा.” तो आचार्यकडे बघत म्हणाला.

“काय सुरू करा?” आचार्यने गोंधळून विचारलं.

“काहीतरी नाच गाणे, हास्य विनोद. विदूषक आहात ना?” तो म्हणाला.

रामा आणि मंत्री एकमेकांकडे बघून हसले.

“विदूषक नाही! राजगुरु आहोत आम्ही दरबारात.” आचार्य गर्वाने म्हणाला.

“माफ करा. आम्हाला माहीत नव्हतं.” तो म्हणाला.

“पाहुण्यांना त्यांच्या कक्षात घेऊन जाण्यात यावे.” मंत्री सावरून घेत म्हणाले.

लगेचच एक सेवक त्याला घेऊन त्याच्या कक्षाकडे गेला आणि दुसरी पालखी आली. आचार्य पळत पुढे आला आणि त्याने हार हातात घेतला. याही पालखीतून एक माणूस निघाला तसा तो मागे आला. तो महाल बघत बघत हळूहळू पुढे येत होता.

“कर्नाटक संगीताचे महान गायक आहेत योगिंद्र राव! खूप मोठे संगीत तज्ञ आहेत पण यांच्या बाबतीत एक समस्या आहे, यांना चोरी करण्याचा आजार आहे.” मंत्री म्हणाले.

रामाने घाबरून आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.

“हो! जे काही दिसेल ते चोरी करतात. तसे चोर नाहीयेत आणि तसा मानसदेखील नाहीये पण सवयीचे गुलाम आहेत.” मंत्री म्हणाले.

“काय मंत्रीवर! आधीच चंद्रमणीच्या सुरक्षेची टांगती तलवार डोक्यावर आहे आणि त्यात हे महाशय अश्या आजारासहित.” रामा काळजीत म्हणाला.

पण हे बोलणे ऐकून आचार्यच्या डोक्यात मात्र काहीतरी सुरू होते. रामाने तर त्याला सर्दी असतानाही कसेबसे सगळ्यांचे स्वागत केले होते आणि आता त्याच्या डोक्यावर अजून एक काळजीचे सावट फिरत होते.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all