चाव्यांचा मान

सासू- सून यांच्या नात्यावर आधारित बोधकथा

"वाह राधा ,काय छान चहा केलास!"

"खरच सुनबाई खूप छान चहा केलास!"

राधा मनोमन खूप खुश झाली. सौरभ आणि सासऱ्यांच्या कौतुकाने तिला आनंद झाला.

"पण मी करते तसा नाही! ठीक आहे चहा!"

सासुबाईंचे असे बोलणे राधाला मात्र जरा खटकले.पण तिने तो विषय तिथेच सोडून दिला.

दुसऱ्या दिवशी,

"सुनबाई आज आपल्या गावाकडील पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासाठी विविध जेवणाचे पदार्थ बनवावे लागतील. तसंही तुला स्वयंपाकातील सर्वच येतं त्यामुळे ही जबाबदारी तुझी. ही घे लिस्ट!"

सासुबाई सारी जबाबदारी तिच्यावर सोपवून मंदिरात निघून गेल्या. इकडे पाहुणे मंडळी आली सुद्धा आणि त्यांची जेवणे देखील आटोपली.

थोड्या वेळात सासुबाई आल्या,

" वाह रमाबाई! काय छान बनवलं होतं तुझ्या सुनेने जेवण! मन अगदी तृप्त झालं!"

सासुबाई किंचित हसल्या व तिरक्या नजरेने राधाकडे बघत खोलीत निघून गेल्या.

राधाचे सासरे व सौरभ दोन-तीन दिवसापासून आईचे बदललेले वागणे बघत होते. सौरभ चे नुकतेच लग्न झाले होते.राधा मात्र आपले काम चोख करत होती.

दुसऱ्या दिवशी,

" राधा, ए राधा.."

" आले बाबा!"

" हे इलेक्ट्रिसिटी बिल, पाणी बिल भर आणि  हो गॅस चा नंबर ऑनलाईन लावतेस का?"

"हो बाबा,ही सारी कामे ऑनलाईन होतील.लगेच करते मी."

" वाह! छान!"

सासूबाई दुरूनच हे सारे बघत होत्या, राधाच्या सासऱ्यांनी ते पाहिले. 

थोड्या वेळाने,

" राधा ए राधा!"

" आले बाबा."

" हे घे बेटा घरातील कपाटाच्या चाव्या. आज पासून ही जबाबदारी तुझी."

" अहो बाबा,पण.. "

तेवढ्यात सासूबाई धावतच आल्या आणि राधाचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाल्या,

" कपाटाच्या चाव्यांचा मान हा माझा आहे. तसेही दोन दिवस झाले नाहीत हिला येऊन पण काय सगळ्यांची कौतुकं कमावतीये! हेच तर साध्य करायचं होतं हिला. माझा मान हिला असाच हिसकावून घेऊन स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता म्हणून हे सारं करत होती ती!"

" नाही हो आई असे काही नाही."

"अच्छा तर ही समस्या होती होय! हा हा हा.."

" अहो तुम्ही हसता काय?"

तिकडून सौरभ ही हसत हसत टाळ्या वाजवत आला.

"हे बघ रमा, चाव्यांचा मान राधाला देणे हे केवळ नाटक होतं. अगं आज पंचवीस वर्षे झाली तू आपला संसार किती छान सांभाळलास . चाव्यांचा मान तुझाच आहे. फक्त दोन-तीन दिवसापासून जे तू वागत होती त्यासाठी मी असे नाटक केले."

"काय हे नाटक होतं ?आणि सौरभलाही हे माहीत होतं!"

"अगं माय डियर आई, राधा आल्यापासून तुझं वागणं किती बदलले आहे. तुला तिचा चांगुलपणा, परफेक्शनिस्ट असणे खटकतय . अग राधा एकदम साधी आहे. तिला तुझा मान हिसकावण्याच्या अजिबात हव्यास नाही."

" खरच आई.मला तुमचा मान कधीही नकोय.नव्हे तो तुमचाच हक्क आहे आणि कायम राहणार आहे. खर तर माझी वहिनी माझ्या आईला नेहमी हिडीसफिडिस करते,काहीही काम करत नाही,म्हणून आईने मला लग्नाआधीच सांगितले होते,की तुझ्या भावी सासूला आपल्या कामांनी खुश ठेव,त्यांचा तसेच इतरांचा मान कायम ठेव.माझ्यासारखी वेळ कोणावरही नको.म्हणून मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होते.घरातील कामे तर बाहेरील कामे करून मी आधीपासून करते."

रमाबाई सर्वांचे ऐकून शरमल्या.

"मला माफ करा तुम्ही सर्व. विशेषतः राधा मला खरंच माफ कर. खरंतर सौरभच लग्न ठरलं तेव्हा माझ्या मैत्रिणी नवीन सुनेला तुला सर्वच शिकवावं लागेल, ती थोडी एवढी परफेक्शनिस्ट असणार आहे? आणि जर भेटलीच परफेक्शनिस्ट तर ती कदाचित घराचा ताबा तसेच मान देखील तुला धुडकावून मिळवू शकते, असे म्हणाल्या होत्या. त्यामुळे मी तेच डोक्यात ठेवले होते."

" बरं आमच्या सौभाग्यवती आता झालं का सगळ्या शंकांचं समाधान? राधाचं चांगुलपणा आता तरी समजला की अजूनही शंका आहे?"

" नाही मला आता कुणाविषयी काहीच शंका नाही किंवा तक्रारही नाही.

त्या दिवशीपासून राधा व रमाताई, एक होऊन राहू लागल्या. तसेच घरात आनंदी आनंद रोजच साजरा होऊ लागला.

     वाचकहो, द्वेष, कलह, मत्सर ,मान ,अपमान हे सारे सासु -सुन यांच्या फुलणाऱ्या नात्यातील वर्षानुवर्षे उहापोह करणारे कट्टर विरोधक . मग सासूने किंवा सुनेने सुद्धा बाहेरच्या लोकांचे ऐकून घरात वागणे एकदम चुकीचे आहे. केवळ यामुळे हसत्या खेळत्या घराचे वाटोळे होऊ शकते.म्हणून चाव्यांचा मान असो नाहीतर इतर कुठला मान तो आपोआप  टिकवून ठेवणे किंवा कमावणे हे सासू अन् सून यांच्या आपुलकीच्या , जिव्हाळ्याच्या नात्यावर अवलंबून असते. एकोप्याने राहत सासूने नव्या सुनेला समजून घेवून आणि सुनेने देखील एवढी वर्षे राब राब राबणाऱ्या सासुला समजून घेवून नवा आदर्श निर्माण करावा,एवढीच माफक अपेक्षा मी या कथेतून बोध घेवून सर्वांकडून करते.बरोबर बोलतेय ना मी?


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे