मान

Gosht sasuchaya manachi

सूनबाईंना 'माहेरी ' जाऊन पंधरा दिवस झाले. अजून काही खबरबात नाही म्हणून सावित्रीबाई नाराज होत्या. थरथरत्या हाताने तुळशीपुढे दिवा लावत त्यांनी आपल्या "सुनेचे बाळंतपण नीट पार पडू दे" अशी प्रार्थना केली आणि "माधव येईलच इतक्यात" असे म्हणत त्या चहा टाकायला म्हणून आत गेल्या.
"आई सरूला मुलगी झाली.. मुलगी." माधव धावत -पळत आत येत म्हणाला. तशी सावित्रीबाईंनी आनंदाने देवापुढे साखर ठेवली. "माधवा निघतोयस का रे लागलीच?" असे म्हणत सावित्रीबाईंनी स्वतः शिवलेली दुपटी, झबली, टोपडी एका पिशवीत घालून ठेवली आणि नुकतेच वळलेले डिंकाचे लाडूही डब्यात भरून दिले.
माधव नुसता चहा घेऊ घाईगडबडीने घराबाहेर पडला. कधी एकदा सारूला आणि आपल्या बाळाला पाहतो आहे, असे झाले होते त्याला.

सुमारे तासाभरानंतर माधव सरूच्या गावी पोहोचला. सरुला आपल्या नवऱ्याला पाहून खूप आनंद झाला. तिने बाळाला माधवच्या हातात दिले. आपल्या चिमुकल्या बाळाला पाहताच माधवचा 'बाप झाल्याचा आनंद' डोळ्यातून वाहू लागला. आपल्या लाडक्या लेकीला तो कितीतरी वेळ एकटक पाहात बसला.
"अहो आई आल्या नाहीत?" सरूने विचारताच माधवची तंद्री मोडली. "नाही पण तिने हे सारे समान पाठवले आहे बघ."असे म्हणत त्याने आईने दिलेली पिशवी सरुकडे दिली.

"अगं बाई..हे काय इतकेच पाठवले का आईने? मला वाटलं आजीबाई चांगला एखादा 'दागिना ' पाठवतील आपल्या नातीला. ही झबली, टोपडी काय विकतही आणता येत होती, नाही का जावईबापू?" सरूची आई आपलं तोंड कसनुसं करत माधवने दिलेली पिशवी उघडत म्हणाली.
हे ऐकून माधवचा चेहरा पडला. तसा तो बाहेर बैठकीच्या खोलीत जाऊन आपल्या जाण्याची तयारी करू लागला.

सरूचा आणि माधवचा प्रेमविवाह. माधव एका कंपनीत नोकरीला होता. उत्पन्न ही जेमतेमच होते. इथे सरुच्या माहेरची परिस्थिती अतिशय उत्तम होती. पण सरूच्या हट्टापायी तिच्या आईने या लग्नाला परवानगी दिली.
माधवच्या आई, सरुच्या सासूबाई 'सावित्रीबाई ' अतिशय साध्या, शांत, सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी सरुला सून नव्हे, तर मुलगीच मानलं होत. सरुचाही आपल्या सासूबाईंवर वर खूप जीव होता. सरुच्या आईने मात्र सावित्रीबाईंशी म्हणजेच आपल्या विहिणबाईंशी कधी जुळवून घेतले नाही. कायम राग - राग करत त्या सावित्रीबाईंचा. गरीब, शांत स्वभावाच्या सावित्रीबाई त्यांना अजिबात आवडत नसतं.

वर्षभरातच सरूला दिवस गेले. डॉक्टरांनी तिला काही दिवस सक्तीची विश्रांती सांगितली, तेव्हा सासूबाईंनी तिची खूप काळजी घेतली. तिला काय हवं, नको अगदी मनापासून पाहिलं.
मात्र नववा महिना लागल्यानंतर सरुच्या आईने तिला आपल्या घरी नेले. "सासरी तिची किती हेळसांड होत होती!" असे त्या सर्वांना सांगू लागल्या. सरू आपल्या आईला समजावून थकली, "सासुबाई जीव लावतात गं मला. माझे बाळंतपण सासरीच होऊ दे म्हणून." पण आईने सरुचे काही एक ऐकले नाही.

सरूने माधवला राहण्यासाठी खूप आग्रह केला. पण कामाचे निमित्त देऊन, "सुट्टी दिवशी येईन पुन्हा," असे म्हणत माधव घरी निघून आला.
आता दोन महिने होऊन गेले, सरू अजूनही माहेरीच होती. त्यामुळे सावित्रीबाई सरूला घरी परत आणण्यासाठी माधवला आग्रह करू लागल्या. पण सरुच्या आईने सावित्रीबाईंना उलटा निरोप पाठवला, "बाळाला बघायला तिकडेच या म्हणाव. अजून थोडे दिवस तरी सरू इथून काही हालायची नाही हो."

सावित्रीबाई आपल्या नातीला पाहायला आसुसल्या होत्या. मात्र माधव त्यांना सरूच्या माहेरी जाऊ देत नव्हता. कारण त्याला माहित होते की, सरुची आई काही ना काही कारण काढून बोल लावणार सावित्रीबाईंना.

तिसऱ्या महिन्यात सरुच्या आईने बाळाच्या 'बारशाचा 'घाट घातला आणि लोकलाजेस्तव सावित्रीबाईंनाही आमंत्रण धाडलं. माधव सावित्रीबाईंना घेऊन सरुच्या गावी पोहोचला.  आपल्या सासुबाईंना पाहून सरूला खूप आनंद झाला. तिने 'बाळाच्या बारशाचा मान 'आपल्या सासुबाईंना दिला. हे पाहून सरूच्या आईने सावित्रीबाईंच्या हातून बाळाला काढून घेतले आणि त्या आपल्या जावेला हळूच म्हणाल्या,
"मान मागून मिळत नसतो ,तो कमवावा लागतो बरं. आपल्या नातीसाठी एखादा दागिनाही आणता आला नाही यांना आणि बारशाचा मान घेतात म्हणे. आमच्या सरुलाही काही कळत नाही हो. अगदी साधी, भोळी आहे ती."
हे ऐकून आपल्या नातीसाठी आणलेली सोन्याची अंगठी आणि पैंजणाची पिशवी लपवत सावित्रीबाई आपले अश्रू पुसत हळूच एका कोपऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या.

बारसं झालं. तशी सरू आपल्या सासुबाईंना म्हणाली, "आई जेवून घ्या बघू. निघतोय आपण आपल्या गावी जाण्यासाठी." हे ऐकून सावित्रीबाईंना खूप आनंद झाला. पण सरूच्या आईकडे पाहून त्या गप्प बसल्या.
" सरे अगं तिथे तुझी काळजी कोण घेईल? तुझ्या सासूबाईंना काही झेपणार नाही. सारं तुलाच करावं लागेल." असे म्हणत आई सरुला अडवू लागली. हा गोंधळ ऐकून माधवही आत आला.
आईचे बोलणे ऐकून आता मात्र सरू
चांगलीच तापली. "आई आधी माझ्या सासुबाईंची माफी माग. आजपर्यंत शांत राहिले मी, तुझ सारं काही ऐकून घेतलं. पण जिथे माझ्या सासुबाईंचा वारंवार अपमान होतो, तिथे मी आता अजिबात राहणार नाही. माझ्या सासूबाईंचा मान ठेवता येत नसेल, तर अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला आई तुला? सासर पैशांनी श्रीमंत नसेल माझं पण मनानं खूपच श्रीमंत आहे."
इकडे सासुबाई "शुभ प्रसंगी आईशी भांडू नये" असे म्हणत सरूला अडवू पाहत होत्या. पण सरू कोणाचेच ऐकेना. सरू आपल्या आईला बोलू लागलेली पाहताच सरूचे बाबा पुढे होत म्हणाले, "चूक आपलीच आहे. मागून टाका माफी."
सारे आपल्यालाच बोलत आहेत हे पाहून सरूची आई आपले तोंड फिरवून तशीच उभी राहिली.

इतके होऊनही आई काहीच ऐकत नाही, सासुबाईंची माफीही मागत नाही, हे पाहून सरू अखेर बाळाला घेऊन आपल्या सासुबाई आणि माधवसह घराबाहेर पडली. ते ही आपल्या आईची वागणूक जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत माहेरी पाऊल न टाकण्याच्या निर्धारानेच.