रेशमी बंध (टीम -मारवा)

सप्तपदी तुझसवे चालता एकरूप मी जाहले, जणू जनोजन्मीचे सूर आपले जुळले, रेशीमगाठीत जसे एकरूप झाले ?

रेशमी बंध- (टीम मारवा) 

"नीरजा"! ...... 
ऐ नीरजा तुझं लक्ष कुठंय आज?
समीरने तिला विचारले.

समीरने असं म्हणताच तिची तंद्री भंगली आणि ती भानावर येत म्हणाली,..."अरे काहीं नाही सहजच आपलं; विचार करत होते जरा मी...."

 "अग कसला इतका विचार करतेस? मी आवाज देऊनही तुझं लक्ष नाहीये" समीर म्हणाला.

नीरजा हसली आणि म्हणाली "तुला नाही कळणार माझ्या मनातलं  गुपित. काहीतरी खास तुझ्या लक्षात नाहीये"

ही अशी का बरं वागतीये आणि का हसली ती अशी? मी काय बरं विसरलोय?  याचाच विचार समीर करत राहिला..

नीरजा आणि समीर एक सामान्य पण थोडं वेगळं जोडपं. बारा वर्षांपूर्वी ह्या दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते, पण आजही त्यांचे प्रेम तितकेच नव्हे किंबहूना वाढलेच होते. असं म्हणतात की, लग्न गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर त्या घट्ट रेशमी धाग्यात गुंतल्या जातात आणि हेच ते रेशमी बंधनाच नातं म्हणजेच समीर आणि नीरजाची जोडी!

"आज किचन मधून हा खमंग असा सुगंध कसला येतोय? आणि आज तर रविवार आहे मग काय खास बनवतेस तू? ते पण या दुपारच्या वेळेला ?" समीरने  नीरजाला विचारले. 

अचानक त्याची ट्यूब पेटली.
"अरे हो आज आपल्या लाडक्या लेकीचा म्हणजे आरोहीचा वाढदिवस आहे ना?.... म्हणून तू आज नक्कीच काहीतरी स्पेशल पदार्थ बनवत असशील ना तिच्या आवडीचं !!"  समीर हसत म्हणाला'.

 "हो ना अरे !...  आज तिला आवडणारे गुलाबजाम आणि रसमलाई केक बनवतेय मी!  …  त्या सोबत तिच्या मैत्रिणींसाठी खास कॉर्न पॅटिस" नीरजा समीरला म्हणाली.

"मग काय बुवा मज्जा आहे आज आपल्या आरोहिची! सगळं कसं तिच्या आवडीचंच आहे की" …. समीर म्हणाला आणि दोघांनी एकमेकांना पाहून स्मित हास्य केले.

"अग पण आपली बर्थडे गर्ल आरोही कुठंय ?" समीरने इकडेतिकडे बघत प्रश्न केला.

"ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे अभ्यासासाठी" नीरजा म्हणाली

तेवढ्यात दाराची बेल वाजलीच.  समीरने दार उघडलं, तशी आरोही घरात आली
"हुश्श दमले बाबा मी"! अस म्हणत, सोफ्यावर कलंडली.

"आरोही बेटा..हॕप्पी बर्थडे.." समीरने तिला जवळ घेत तिला विश केलं. 
"थँक्यू  बाबा.." आरोहि हसत म्हणाली.."पण तुम्ही विसरला होतात ना?" 
समीरने गंमतीने कान पकडाले तशी सगळे हसले..

"आरोही बेटा पटकन आवर गा..तुझ्या मैत्रिणी यायची वेळ झाली" नीरजाने आरोहीला आवरण्यासाठी आवाज दिला.

"हो मम्मा मी आवरून येते लगेच!"
अस म्हणून आरोहीपण लगेच तयार व्हायला गेली. 

थोड्यावेळाने तिच्या रुममधून बाहेर आली तिने आवाज समीर व नीरजाला,
"मम्मा पप्पा कशी दिसतेय मी, कसा आहे माझा नवा चुडीदार ड्रेस?"

नीरजा व समीरने तिच्याकडे  पाहिले…ते दोघे एकमेकांकडे पहातच राहिले..
"आपली मुलगी कधी इतकी मोठी झाली ग् कळलंच नाही बघ निरजा" अस  समीने म्हणताच  निरजाच्या डोळ्यात टचकन पाणीचआलं...

 "लहानसहान गोष्टीवरून रुसणारी, घरभर तिचे बोबडे बोल बोलत फिरणारी व पायातील पैंजनाचा छुम छुम आवाज करणारी, मी शाळेत नाही जाणार असा हट्ट करणारी माझी परी कधी इतकी मोठी झाली समजलंच नाही ग् "
समीर लेकीच्या जुन्या आठवणीत हरवून तिच्याकडे पहात नीरजाला बोलला.

"माझी सोनूली ती, माझी लाडकी लेक".....असं म्हणून नीरजानेही आरोहीच्या चेहऱ्यावरून मायेनं हाथ फिरवला व तिची दृष्ट काढली.

थोड्याचवेळात आरोहीची बड्डे पार्टी सुरू झाली आणि एकेक करत आरोहीच्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या.
मजा-मस्ती , हुल्लडबाजी करत सगळ्यांनी आरोहीला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मम्मा ने आपल्यासाठीचा बनवलेला केक पाहून आरोही एकदम खुश होत,
"मम्मा खूप खूप खूप थँक्स ग" अस म्हणत ती नीरजाच्या मिठीत शिरली.
मग सगळ्यांनी मिळून केक कापला….

"हॅपी बर्थ डे डिअर आरोही"........सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

नीरजाने  सगळ्यांना केक व पॅटिस खायला दिले. आलेल्या मुलींना खायला देऊन मग आरोही व तिच्या मैत्रिणींच्या गप्पा सुरु झाल्या......

"आरोही किती मस्त पॅटिस बनवलेत आहेत ग तुझ्या मम्माने" ........
"काकी मला तर फार आवडले"....
अशा काॅम्प्लीमेंट्सने नीरजा सुखावून गेली.
 
केक सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी  निरजाचे कौतुक केले व समीरने सुद्धा मन भरून कौतुक केले. सर्वांनी आरोहीला फार सुंदर भेटवस्तू दिल्या. समीरने तर आरोहीला एक मोबाईल फोन भेट म्हणून दिला. आरोही तो बघून जाम खुश झाली.....
"बाबा तुम्ही मला माझ्या आवडीचे गिफ्ट दिलेत" आरोहि हसत म्हणाली.

सगळ्यांचे खाऊन झाल्यावर मैत्रिणी निघून गेल्या....आरोही किती तरी वेळ नवा मोबाईल न्याहाळत होती व तो घेऊन आपल्या बेडरूम मध्ये गेली.

आरोहीला खूप साऱ्या भेटवस्तू मिळाल्या. पण त्यात आज कुरीयरने आलेली एक भेटवस्तू अनोळखी म्हणजे विना नावाशिवाय होती. 

नीरजा विचारात पडली..' हे कोणी बरं दिलं असेल ?'

घरातील सगळा पसारा आवरून तिघे बाहेर एकत्र बसून भेटवस्तू उघडून पाहतात. नीरजाने ती निनावी भेट समीरला दाखवली.......
" हे बघ ना समीर.. कोणी दिले असेल बरं हे आपल्याला?" 

"अग्! उघडून बघना म्हणजे कळेल कोणी दिले ते, अशी काय करतेस, दे मीच पाहतो" ........असं म्हणून समीरने ते उघडले...
उघडल्यावर नीरजा व समीरच्या चेहऱ्यावरील रंगच उडून गेला...

"मला वाटलंच होत तीनेच हे पाठवले असेल" म्हणत नीरजा रागाने लाल झाली. 

"अगं..मला कुठे माहीत होतं असं काही आपल्याला मिळेल ते" म्हणत समीर तिला समजावले.

ती भेटवस्तू म्हणजे दुसरे तिसर काही नसून समीरच्या जुन्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीने पाठवलेले सुगंधित परफ्यूम व त्या परफ्यूम सोबत एक चिट्टी देखील पाठवली होती.

नीरजा व समीर एकमेकांकडे पाहू लागले, ती चिट्टी पाहून नीरजाला सहा वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवला.

कस एक वादळ त्यांच्या दारापाशी घोंगावत होत पण नीरजा व समीर ह्यांच्या खऱ्या प्रेमापुळे व नीरजाच्या खंबीरपणामुळे या वादळाचा निभाव नाही लागला.

ते वादळ म्हणजे प्रीती राव..!

अगदी सहा वर्षांपूर्वी जेव्हा समीर एका पूर्वीच्या ऑफिसमध्ये काम करत होता तेव्हा प्रीती सुद्धा तिथे काम करत होती. उंच, गोरीपान, काळेभोर लांब केस आणि दिसायला सुंदर होती प्रीती...अगदी कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी.

प्रीती ऑफिसमध्ये आली आणि ऑफिसचा एकंदरीत कायापालटच झाला, तिचे सौंदर्य पाहून पुरुष तिच्या मागे पुढे करू लागले….. तिने ह्याचाच फायदा उचलायचा ठरवला.आपल्या सौंदर्याने तिने जणू सगळ्यांना भुरळच पाडली. 

समीर हा ऑफिसमधला  बेस्ट इम्प्लॉई आणि दिसायलाही  देखणा व रुबाबदार.  प्रीती समीरच्या मागे लागली......काहीना काही कारण काढून ती रोज त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करे.  कधी छोटी मोठी मदत, तर कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याची वाट पाहणे, कोणत्यांना कोणत्या कारणाने त्याच्या जवळ जाणे…..अर्थात समीरला हे जाणवले, त्याला ही गोष्ट खटकली व त्याने ही गोष्ट त्वरित निरजाच्या कानावर घातली.

नीरजा व समीर पती पत्नी तर होतेच पण त्या सोबत त्या दोघांचे मित्र मैत्रिणी असे एक मस्त नाते होते, नीरजाला स्वतःवर व समीर वर खूप विश्वास होता, तो कधीच चुकणार नाही तिला माहीत होते.

प्रीती ही एकदा विवाहित होती पण काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला होता. त्याला कारण पण तिचा चंचल स्वभाव होता. तिचे परक्या पुरुषांच्या सोबत बोलणे, बिनधास्त स्वभाव व अंगलट करणे ह्याच मुळेच तिचे लग्न नाही टिकले.  पैसेवाले व देखणे पुरुष ह्यांच्या मागे लागून जमेल तसे पैसे उकळायचे तिला सवय लागली होती.  स्वतःच्या सुंदर दिसण्याचा ती असा नको तो वापर करत होती. 

प्रीतीच्या याच वागण्यामुळे तिचा नवरा सुयश तिला सोडून गेला होता, सुयश एक सामान्य व्यक्तिमत्व असलेला व मध्यमवर्गीय पण ताठ मानेने जगणारा, पण प्रीती त्याच्या अगदी उलट….तिला पैसा, दाग दागिने ह्याची कायम आवड असलेली, आणि म्हणूनच त्यांचा संसार जास्त टिकू शकला नाही मग घटस्फोट झाला.

समीर देखणा व वेल सेटल असा होता त्यामुळे  ती समीरच्या मागे हात धुवून लागली. तिची ही जवळीक, तिचा हेतू ऑफिसमध्ये सगळ्यांनाच ठाऊक झाला. प्रीती सुद्धा कशी आहे हे सगळ्यांनाच कळून चुकले.  ऑफिसमध्ये समीर फार जुना होता त्यामुळे समीरचे चारित्र्य अगदी स्वच्छ व शुभ्र होते हेही सगळ्यांना माहीत होते.

पण प्रीती सारखी खोटारडी लोकं काही ही करू शकतात, प्रितीने पण तेच केलं तिने समीरशी मैत्री करून त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा असफल प्रयत्न करत होती,अगदी त्यांच्या घरापर्यंत येण्याचा देखील प्रयत्न करत होती.

पण तिचा हा धूर्तपणा नीरजाने ओळखला, ती हुशार व चालाख होती, हार मानणारी तर मुळीच नव्हती, तिने ठरवले प्रीतीला चांगलाच धडा शिकवायचा.

तिने प्रीतीच्या पूर्व आयुष्याची माहिती काढली, ती कोण आहे, तिचे फॅमिली बॅकग्राऊंड, तिचे लग्न कोणाशी झाले ह्याची सगळी माहिती एका मैत्रिणींच्या साहाय्याने तिने शोधून काढली. एकंदरीत तिच्या पूर्व आयुष्याची खडा न खडा माहिती नीरजाला मिळाली. मग तिने समीरच्या आॕफिसमधला आय टी मधला मित्र रमेशची मदत घ्यायची ठरवली. 

लवकरच ऑफिसमध्ये  कसलीशी सेलिब्रेशन पार्टी होती. तिथे मोठं मोठी लोक आले होते. सगळे आपापल्या फॅमिली सोबत हजर होती. तिथे समीर व नीरजा देखील आले होते.

पार्टी चांगलीच रंगात आली होती नेमक्या ह्या संधीचा फायदा नीरजाने घ्यायचा ठरवले.  अर्थात समीर रमेशच्या मदतीने तिची पोल सगळ्यांना समक्ष उघडायचे ठरवले.

पार्टीत अचानक दिवे बंद झाले. रमेशच्या मदतीने निरजाने प्रीतीच्या आयुष्याशी निगडित गोष्टी व काही मोजके फोटो एका प्रोजेक्टरच्या साहाय्याने तिथे उपस्थित पाहुण्यांसमोर एकेक करून दाखवले. एकंदरीत तिचा भूतकाळ काय आहे आणि तिचा खरा चेहरा काय आहे हे सगळ्यांना समजले.

पैसे,दाग दागिने, ऐशोआराम हेच तिला हवे होते, ज्या साठी ती खूप खालच्या पातळीला गेली होती. त्याच मुळे तिने हे कुकर्म केली होती.  हे सगळे इतके पटकन घडले कि प्रीती एकदम घाबरून गेली, तिचा चेहरा पांढरा पडला.

आपलें पितळ उघडे पडले ते हि सगळ्यांच्या समक्ष, हा घडलेला प्रकार पाहून प्रीतीचा खरा चेहरा ऑफिसमधल्या लोकांसमोर आला.  ती चांगलीच खजील झाली, स्वतःची खोटी प्रतिमा जी प्रितीने निर्माण केली होती तीचा चक्काचूर झाला. 

निरजा असं काही वागेल ह्याची प्रीतीला कल्पना नव्हती, आपल्या पूर्व आयुष्या विषयी निरजाने कसे आणि कुठून माहिती गोळा केली असेल याचा विचार प्रीती करत राहिली.....पण तो पर्यंत नीरजाने प्रीतीचा खरा चेहरा समोर आणला.  आपला झालेला हा अपमान ती सहन करू शकली नाही. ती चटकन पार्टी सोडून निघून गेली व त्यानंतर  ऑफिसला सुद्धा परत आली नाही. 

नीरजाने निडरपणे हे सगळे घडवून आणले, कारण तिच्यात सच्चेपणा होता.  कधी कधी एक स्त्रीच स्त्रीची दुश्मन होते, स्त्रीची अनेक रूपे आहेत, पण प्रीती सारख्या स्त्रिया समाजाला लागलेला एक कलंक असतो. 

जेव्हा आपल्या सौभाग्यावर संकट येते तेव्हा स्त्री रौद्र रूप  धारण करते....ती जितके सहन करते तितकेच ती मजबूत असते, जिद्द व विश्वास ह्यांनी ठासून भरलेली असते.

समीरने नीरजाचा हा रुद्र अवतार कधीच पहिला नव्हता.....
"माझी झाशीची राणी ग ती" समीरने तिला मिठीत घेत म्हंटले.

"समीर बेटा तू खूप भाग्यवान आहेस जी तुला अशी धाडसी व इतके प्रेम करणारी पत्नी मिळाली" बॉस म्हणाले. आपल्या पत्नीचे कौतुक ऐकून समीर सुखावला.

हा झालेला भूतकाळ निरजाच्या डोळ्यासमोर उभा राहिला.  ती विचारात हरवली होती. समीरने निरजला  हलवले  त्यासरशी ती भानावर आली.

"तुला अजून आठवतंय का ग् सगळं?"म्हणत समीर भावनीक झाला होता.
 
"तर.. विसरते कि काय मी? भूतकाळ कधी सुखावणारा तर कधी एक आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण देणारा असतो, पण आपला हा भूतकाळ मात्र नकोसा आणि ह्यातून खूप काही शिकवणारा, एक धडा, बोध घ्यायला लावणारा आहे हो ना समीर?" नीरजा बोलली 

"माझे प्रेम फक्त तू व आरोही आहेत बाकी कोणीच आपल्यात येऊ शकत नाही" समीर अगदी निर्धाराने बोलला.

समिरकडे हसरा कटाक्ष टाकत बाहेरचा पसारा आवरून निरजा बेडरूम मध्ये आली.

थोड्या वेळाने समीर तिथे येत विचारतो, ते दोघे मनात नसताना प्रीतीची चिट्टी वाचू लागले.

"नीरजा व समीर,

खरतर मी आधीच तुमची माफी मागायला हवी होती.  आज इतक्या वर्षाने पत्र लिहायचे धाडस करतेय कारण धीर होत नव्हता. मी माफी मागण्या योग्य नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास व मनस्ताप झाला.

मला माझी चूक उमगली आहे.  मी जे नाही वागायचे ते वागले. जमलं तर मला माफ करा.'

नीरजाने माझी चूक मला समजावली. जो अपराध मी करणार होते, त्या पासून थांबवले.

तुमच्या मुलीच्या वाढदिवसासाठी मी पाठवलय एक मन प्रफुल्लित करणारे परफ्यूम. जे तुमच्या दोघांच्या पवित्र नात्यात सदैव बहरलेले राहावे म्हणून भेट पाठवत आहे. अर्थात ते तुम्ही स्वीकाराल मी आशा करते. तुम्ही दोघे सुखी रहा. तुम्ही मोठ्या मनाने मला माफ कराल अशी आशा बाळगते.

तुमची अपराधी,

प्रिती.

 पत्र वाचून दोघांनी एकमेकांकडे पाहीले. नीरजा भावुक झाली व विचार करू लागली. शेवटीउठून बाल्कनीत आली.

"नीरजा.......ऐ नीरजा...पुन्हा कुठे हरवलीस ग?"
ऎक ! परत सांगतो …
आता तो विचार नकोच! …
तु, मी आणि आरोही हेच आपलं सर्वस्व आहे आणि त्यामधे कोणीही आणि कधीही येणार नाही एवढंच लक्षात ठेव" 
म्हणत समीरने नीरजाला घट्ट मिठी मारली.

ते गिफ्ट देण्यामागे प्रीतीची भावना जरी आता साफ असली तरी कुठे तरी ती एक वाईट आठवण होती. नीरजा काहीतरी ठरवूनच बाहेर आली आणि, ती परफ्यूमची बाटली व चिट्टी उचलून कचऱ्यात फेकून दिली. 

आपल्याला कोणाची दुष्ट लागू नये आणि आपली संसार वेल अशीच उमलत राहू दे, म्हणत तिने पुन्हा प्रितीला मात दिली.

"नवरा बायकोचे नातं म्हणजे  एकाच नाण्याच्या दोन बाजू, पाण्यासारखं नितळ ज्यात वाकून पाहिलं की आपलंच प्रतिबिंब दिसतं.....जसं तू आणि मी....हो ना नीरजा?".

असं म्हणत अचानक आलेल्या समीरने तीच्या खांद्यावर आश्वासनाचा हात ठेवला.

आपला हात नीरजाच्या हातात देऊन तिच्या डोळ्यात त्याच्या असलेल्या प्रेमाचा विश्वास त्याने पाहिला आणि तो सुखावला.
दोघेही हसू लागले.
 नीरजा- समीर एकमेकांच्या मिठीत विसावले.

कसा वाटली माझा कथा?? 
तुमचा अभिप्राय मला नक्की द्या!!

@श्रावणी देशपांडे
गोष्टी मनातल्या.