*रेशीमगाठी*

आज तो पहिल्यांदा तिला बघायला आला होता. तो रोज तिला भेटायचा पण तिचा होणारा नवरा म्हणून आज पहिल्यांदाच तिला भेटायला आला होता.
कथेचे नाव : " रेशीमगाठी "
विषय : "आणि ती हसली. "
फेरी : " राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा "


** रेशीमगाठी **

तो आज तिला पहिल्यांदाच बघायला येणार होता.
तसे ते या आधीही भेटायचे पण आज त्यांच्या लग्नाची सुपारी फोडायची होती. तिचा होणारा नवरा म्हणून तो पहिल्यांदाच तिला भेटायला आला होता.

घरच्यांची गडबड चालू होतीच. हॉलमध्ये सगळे बसलेले होते. तो ही समोरच बसला होता.

" लग्नाला तयार तर झाली आहे ती. पण, मनापासून तयार होईल का? "
विनीतच्या डोक्यात लग्न ठरल्यापासून हे विचार घोंगावत होते.
तेवढ्यात ती आली. ती म्हणजे " अनघा ". डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, नखशिखांत नटलेली. लाल रंगाची साडी, त्यावर लाल रंगाच्या मॅचिंग बांगड्या, गळ्यात एकच सोन्याचा नेकलेस, त्यावर छोटेसे कानातले, केस मागे सोडून एक छोटीशी क्लिप हलकीशी लावली होती. तिला अस नटलेलं पाहून तोही तिच्यात हरवून गेला. तसा तिला रोजच बघायचा पण आज ती त्याला वेगळीच भासत होती.

" आज उतरली धरतीवर
जणू स्वर्गाची अप्सरा ती..
रूप तिचे लावती वेड
लावण्याची जणू खाण ती.."

विनीतने मनातल्या मनातच तिला पाहून कविता रचली.

दोघांनाही समोरासमोर बसवण्यात आलं. लग्नाची सुपारी फुटली आणि सगळ्यात साखर वाटली. तो चोरून अधूनमधून तिच्याकडे बघत होता. पण हिची नजर मात्र कुठे तरी शून्यात हरवलेली. लग्नाचा आनंद असा जास्त काही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

सगळा कार्यक्रम उरकून पाहुणे त्यांच्या घरी गेले.
अनघाही तिच्या खोलीत आली. खोलीत असलेल्या आरशासमोर बसून ती तिचा साज उतरवत होती.
आरशात स्वतःलाच पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडू लागली.

" अनघा, अगं काय झाल? का रडतेस अशी?"
अनघाची आई तिच्या खोलीत आली. अनघाला रडताना पाहून तिच्या आईच्याही डोळ्यात पाणी आले. अनघा तिच्या आईला बिलगून रडू लागली. रडत असताना ती तिच्या भूतकाळात हरवली.

अनघाचा आज बर्थडे होता. कॉलेजमध्ये मित्र मैत्रिणी तिचा बर्थडे सेलिब्रेट करत होते.
त्यातलाच तिचा एक मित्र होता अनिश नावाचा.
त्याला अनघा आवडत होती. तिच्याही मनात तो होताच. अनघा च्या बर्थडे दिवशी अनिशने तिला प्रपोस केले.

अनिश : " हाय अनघा, विश यु हॅपी बर्थडे."

अनघा : " थँक्स अनिश."

दोघांनीही शेकहँड केलं. पण हात मात्र हातातच होता.

अनिश : "अनघा मला एक सांगायच आहे."

अनघा : " बोल ना अनिश. काय सांगायच आहे?"

अनिश : " अनघा आज तुझा वाढदिवस आहे. तर…"

अनघा : " तर काय? बोल ना."

अनिश : " अनघा तु मला खूप आवडते.मी तुझ्यावर खूप प्रेम करतो."

अनिश सगळं एका दमात सांगून मोकळा झाला.

अनघा शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे बघत होती.
सगळे मित्रमैत्रींनी हसू लागले आणि अनघा भानावर आली.

अनिश : " ए उत्तर दे ना काही तरी. अशी काय भुतासारखी उभी आहेस."

अनघा : " हो.".....

सगळे मित्र मैत्रिणी टाळ्या वाजवू लागले. आणि अनघाचा बर्थडे सेलिब्रेट झाला.

असेच काही दिवस निघून गेले. अनिश आणि अनघा यांचे प्रेम फुलतच होते. प्रेमाची वचने दिली गेली. दोघांनाही आपल्या प्रेमापुढे आभाळ ठेंगणे वाटू लागले. सगळं काही सुरळीत चालू होते
पण एक दिवस अनघाच्या घरी तिच प्रेम प्रकरण समजतं. अनघा सगळं कबूल करते. आणि त्याच मुलाशी लग्न करण्याचा तिचा निर्णय सांगितला.
पण घरच्यांचा याला साफ विरोध झाला.
हे सगळं विनीतला ही माहित होते. जो अनघाचा मोठा भाऊ रजतचा मित्र होता.

दुसऱ्या दिवशी अनघा कॉलेजला गेली. पण अनिश त्या दिवशी आलाच नाही. रोजच अनघा कॉलेज ला अनिशला भेटायला जात होती.पण तो आलाच नाही.
अचानक अनिशचं‌ असं नं भेटण्यानं अनघा खचून गेली.
तिच मानसिक संतुलन इतके ढासळले की तिला हॉस्पिटल मध्ये भरती केलं.

इकडे घरी रजत ने सगळ्यांना त्याच्या प्रस्ताव बोलून दाखवला.

रजत : "आई बाबा, अनघाची तब्येत ठीक नाही. आता या परिस्थितीत तिला मानसिक आधाराची गरज आहे. जो आता आपण कोणी तिला देऊ शकत नाही. माझं मत अस होत की…."

आई : " बोल रे बाळ, काय मत होतं."

रजत : " आई मी अनघाच्या लग्नाविषयीं बोलतोय."

आई : " अरे पण ती तयार होईल का लग्नाला. आणि तिच प्रेमप्रकरण सगळ्या गावभर झालंय. कोण करेल लग्न तिच्याशी."

रजत : " आई मुलगा बाहेरचा बघायची गरज नाही.घरचाच आहे."

अनघाचे बाबा : " ठीक आहे. मुलगा तु पहिला आहेस तर उत्तम असणार. पण मुलगा कोण आहे ते समजेल का."

रजत : " बाबा तो विनीत आहे."

अनघाचे बाबा : "काय? विनीत. अरे पण त्याला सगळं माहित आहे ना. मग तरी ही तो तयार झाला."

रजत : " हो बाबा. कारण तो आपल्या अनघावर प्रेम करतो. हे खूप वेळा मी त्याच्या डोळ्यात पाहिलंय."

अनघाचे बाबा :" ठीक आहे.त्याला काय अडचण नसेल तर. पण अनघाला पण विचारावं लागेल ना."

रजत : " नाही बाबा. आता यात अनघाला नाही विचारायचं. "

घरच्या सगळ्यांनी अनघा आणि विनीतच्या लग्नासाठी संमती दर्शवली. अनघा दवाखान्यातून घरी आली. घरातले तिला तिच्या ठरलेल्या लग्नाबद्दल सांगितले.पण अनघा काहीच बोलली नाही. काहीच दिवस निघून गेले.
अनघा आणी विनीत च्या लग्नाचा दिवस उजाडतो.घरात सगळीकडे घाई गडबड सुरु झाली. अनघा तिच्या खोलीत तयार होत होती तोच दारावर टकटक झाली.

अनघाने दरवाजा उघडला. बाहेर विनीत होता. " तो आता इथे कसा?" हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर लगेंच दिसतो.विनितही ते लगेच ओळखलं.

विनीत : " अनघा मी आत येऊ का? "

अनघा : " हो हो, या ना."

विनीत आत येतो.अनघा दार लावून घेतले.

विनीत :" अनघा, तु लग्नाला तयार असलीस तर च हे लग्न हे कर. पण घरच्यांसाठी करत असलीस तर नको करुस.दोघांनाही त्रास होईल."

अनघा फक्त ऐकून घेत होती. तिच काहीच उत्तर नाही बघून विनीत तिथून जायला निघाला.

विनीत : " अनघा, अजून एकदा विचार कर प्लिज. मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. जितकं तो तुझ्यावर प्रेम करत होता त्यापेक्षाही जास्त मी करेन आणि करत ही होतो. तु माझ्या आयुष्यात येणं हे मोठ भाग्य समजेन मी."


विनीत निघून गेला. अनघा ने दरवाजा बंद केला. आणि परत येऊन आरशासमोर उभी राहिली.
इकडे लग्नाच्या मांडवात विनीत पाटावर नवऱ्याच्या पोशाखात बसलेला होता. गुरुजींचा विधी सुरु झाला.
" नवरी मुलीला घेऊन ना " गुरुजींचा हे वाक्य ऐकताच अनघाची आई तिला आणायला आणायला गेली.
"अनघा येईल की नाही" हा विचार विनतच्या मनात येत होता. पण जेव्हा अनघाची आई तिला घेऊन आली.
आणि तो तिचे ते नवरीचे रूप बघून मोहित झाला.
अनघा मांडवात पाटावर आली. विनीत आणि तिची नजरानजर होताच अनघा लाजली. लग्नाचे सगळे विधी संपले. आता पाठवणीची वेळ आली. आई बाबांनी जड अंतकरणाने अनघाची पाठवणी केली.

दोघेही नवरा नवरी आपल्या गाडीतून नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रवासाला लागली

विनीत : " अनघा, एक विचारू?"

अनघा : " हो विचारा."

तिचं उत्तर येताच विनीत जरा चमकला. कारण लग्न ठरल्यापासून अनघा आता पहिल्यांदाच त्याच्याशी बोलली होती.

विनीत : " अनघा, तू तुझ्या मर्जीने माझ्याशी लग्न केलेस ना?"

अनघा : " हो."

विनीत : " तुझ्या मनातलं काही तरी समजेल का मला?"

अनघा : " जो मुलगा माझ्या भूतकाळासहित मला स्वीकारू शकतो. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो.
म्हणून च मी लग्नाला तयार झाले. आणि हो ही नवी सुरुवात आपण दोघांनीही करायची. मागचं सगळं विसरून."

हे सगळं ऐकून विनीतला खूप आनंद झाला. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला.

विनीत : " हो ना दोघांनीही नवी सुरुवात करायची."

विनीत अनघा बघताच अनघा लाजली. दोघेही हातात हात घेऊन त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली.
विनितच्या जीवनातील प्रवेशाने अनघा मनोमन हसत होती..

© रीना पाटील
कोल्हापूर….